न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून त्यांचे शेतातील घरासाठी विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदार यांचा वीज मीटर ग्राहक क्र. 26671001003014 असा आहे. सदर मीटरचा पुरवठा दि. 18/5/2010 रोजी तक्रारदार यांना केला आहे. सदर तारखेपासून सदरचे मीटर हे नादुरुस्त होते. तक्रारदार हे सदर वीजेचा वापर जास्त प्रमाणात करत नव्हते. तरीदेखील वीजेचे बिल जास्त येत होते. सदरची बाब तक्रारदार यांनी वि.प. यांना कळविली असता त्यांनी कोणत्याही स्वरुपाची दाद दिली नाही. तक्रारदाराचे कथनानुसार दि. 25/01/2019 ते 19/01/18 या कालावधीत तक्रारदारांना दिलेल्या वीज बिलामध्ये तक्रारदार यांचे सरासरी लाईट बिल रक्कम व युनिट यामध्ये तफावत दिसते. तक्रारदारांचे वीज बिलावर फॉल्टी असा शेरा मारला. तरीदेखील तक्रारदार यांचे मीटर दुरुस्त केले नाही. दि. 21/11/2017 रोजी तक्रारदारांना रक्कम रु. 93,850/- या रकमेचे बिल आले. सदरची बाब वि.प. यांना कळवून देखील त्यांनी दाद दिली नाही. तदनंतर दि. 20/12/17 रोजी तक्रारदारांना रक्कम रु.95,560/- चे बिल आले. म्हणून तक्रारदारांनी वि.प यांचेकडे तक्रार केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम रु. 54,090/- इतकी कमी केली. तदनंतर दि. 19/1/18 रोजी तक्रारदारांना रक्कम रु.56,060/- चे बिल आले. त्यावेळी वि.प. यांनी मीटरमध्ये फॉल्ट असला तरीही आलेले बिल तुम्हाला भरावयास पाहिजे असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदार यांचे शेतातील विद्युत मीटर बंद केलेने शेतातील घरात वावरणे तक्रारदारांना अडचणीचे झाले आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचे वाढील बिलाची रक्कम कमी करुन द्यावी तसेच बंद केलेले मीटर चालू करुन द्यवे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अधिकारपत्र, तक्रारदारांनी भरलेल्या वीज बिलाच्या प्रती, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली नोटीस, वर्तमानपत्रातील बातमी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र, श्री मंगलसिंह टारझन बागडे यांचे शपथपत्र, श्री सखाराम मारुती खराडे यांचे शपथपत्र, राजू बापू माळी यांचे शपथपत्र, जग्गू सुंदर माछरे यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदाराने वि.प. यांच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. सबब, या आयोगास तक्रार दाखल करुन घेणेचा अधिकार नाही. वि.प. कंपनीचे नियमाप्रमाणे ग्राहकाचे वीज कनेक्शन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये बंद असेल तर सदरचे वीज कनेक्शन पुन्हा सुरु करता येत नाही. तक्रारदार यांचे वीज कनेक्शन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये परमनंट डिसकनेक्शन केले असलेने तक्रारदाराचे वीज कनेक्शन पुन्हा सुरु करता येणार नाही. तक्रारदार यांना नवीन वीज कनेक्शन घेणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदाराचे वीज कनेक्शन मीटर हे एप्रिल 2015 पर्यंत नादुरुस्त असलेने त्यांना दरमहाची सरासरीची 60 युनिट आकारणीची बिले देण्यात आली होती. माहे जून 2015 मध्ये तक्रारदाराने नादुरुस्त मीटर बदलण्यात आले व नवीन मीटर बसविण्यात आले. त्यावेळी मीटरवर 1 रिडींग होते. त्यामध्ये सदर ग्राहकास नवीन मीटर संगणकप्रणालीमध्ये अपडेट झाले. परंतु तांत्रिक कारणामुळे ग्राहकास चालू रिडींग प्रमाणे वीज देयके न जाता फॉल्टी या शे-याने माहे जून 2015 ते सप्टेंबर 2015 पर्यंतची 50 युनिटची देयके गेली. तसेच माहे ऑक्टोबर 2015 ते ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये प्रतिमाह सदर युनिटची देयके पाठविली गेली. तसेच माहे सप्टेंबर 2017 ते ऑक्टोबर 2017 मध्ये 20 युनिटची देयके पाठविली. सदर तक्रारदार यांचे नोव्हेंबर 2017 मध्ये 8205 असे रिडींग वि.प. कंपनीचे कार्यालयास मिळाले. सदर रिडींगची शाखा कार्यालयामध्ये खात्री करण्यात आली. तक्रारदार यांनी 1 ते 8305 असे एकूण 8304 युनिटचे बिल जाणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी सरासरी देयके भरलेली असलेने गेलेली सरासरी युनिट कमी करणे आवश्यक होते. सदरचे सरासरी युनिट हे 1900 इतके होते. तक्रारदारास नोव्हेंबर 2017 चे देयक देताना त्यांनी भरलेली 1900 युनिट वजा करुन देणे आवश्यक होते. म्हणून 1900 ते चालू रिडींग 8305 असे 6405 युनिटचे देयक तक्रारदारास देण्यात आले व ते बरोबर व योग्य आहे. तक्रारदाराचा एकूण वापर हा माहे मे 2015 ते नोव्हेंबर 2017 असा 31 महिन्यांध्ये विभागण्यात आला असता मासिक 268 युनिट इतका दरमहाचा वापर झाला. यावरुन तक्रारदाराला पाठविलेले देयक हे अत्यंत योग्य वापराचे व बरोबर असल्याचे दिसून येणार आहे. तक्रारदाराने ते भागविणे आवश्यक आहे. वि.प. यांचे अधिका-यांनी तक्रारदाराचे वीज कनेक्शनची तपासणी केली असता तक्रारदारांनी आपले वीज कनेक्शनमधून शेजारील 2 घरांना वीज पुरवठा दिल्याचे आढळून आले. तसेच तक्रारदाराने श्री वरुटे यांचे चौकटी व वीटा तयार करण्याचे कारखान्यास ही सदर वीज कनेक्शनमधून वीजपुरवठा केलेला होता. त्यामुळे तक्रारदारांचा वीज वापर वाढला होता. तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी राजू माळी यांचे वीज बिल, मंगलसिंह बागडे यांचे वीज बिल, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार हे शेतकरी असून हसुर दुमाला ता.करवीर जि.कोल्हापूर येथील नमूद पत्त्यावरील कायम रहिवासी आहेत. वि.प. हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी असून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे त्यांचे शेतातील घरासाठी विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचेकडे वीज बिल भरल्याच्या बिलांच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. सदरची तक्रारदार यांचे नावची वीजबिले वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सबब, तक्रारदार यांनी त्यांच्या घराच्या विद्युत कनेक्शनसाठी वि.प. यांचेकडून वीज कनेक्शन घेतलेले असून सदर वीज कनेक्शनपोटी वि.प. यांच्याकडे वीज बिले भरलेली असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचारर करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून स्वतःच्या कुटुंबियांचे उपजिविकेकरिता शेतीचा व्यवसाय करतात. शेतामधील शेती अवजारे व शेती उपयोगी वस्तू ठेवणेसाठी तक्रारदार यांनी शेतामध्ये घर बांधलेले आहे. तक्रारदार यांचा वीजमीटर ग्राहक क्र. 26671001003014 असून वि.प. यांनी ता. 18/5/2010 रोजी पासून तक्रारदार यांना वीजपुरवठा दिलेला आहे असे तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्रात कथन केले आहे. तक्रारदार हे वि.प. यांचेकडे नियमितपणे वीज बिले भरत आलेले आहेत. सदरची बिले वि.प. यांचेकडे भरणा करीत असताना सरासरी लाईट बिल व युनिटमध्ये तक्रारदार यांना तफावत आढळली. तक्रारदार यांचे वीज बिल सरासरी 400 इतके येत होते. तक्रारदार यांच्या वीजबिलावर वि.प. यांनी फॉल्टी असा शेरा मारला तरी देखील वि.प. यांचे तक्रारदारांचे मीटर दुरुस्त केले नाही तसेच सदरचे मीटर दुरुस्त न करता फॅाल्टी असताना ता. 21/11/17 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.93,850/- इतके वीज बिल दिले. सदरचे बिलाची रक्कम वि.प. यांनी ता 20/12/2017 रोजी वि.प. यांनी रक्कम रु.54,090/- इतकी कमी केली. पुन्हा तक्रारदार यांनी वि.प. यांना मीटरमध्ये फॉल्ट असल्याचे कळवूनदेखील वि.प. यांनी तक्रारदार यांचे सदरचे विद्युत कनेक्शन 2018 मध्ये बंद केले. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना वादातील मीटर हे फॉल्टी असा शेरा मारलेले असलेले कळवून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना जादा वीज बिलाची मागणी करुन तक्रारदारांचे विद्युत कनेक्शन बंद करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
8. प्रस्तुतकामी वि.प. यांनी ता. 26/10/208 रोजी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार यांचे वीज कनेक्शन एप्रिल 2015 पर्यंत नादुरुस्त झालेने त्यांना दरमहा सरासरी 60 युनिटची आकारणी करुन देयके दिली होती. मात्र जून 2015 मध्ये तक्रारदार यांचे नादुरुस्त मीटर बदलण्यात आले व नवीन मीटर क्र. 76-05662351 हे बसविण्यात आले. त्यावेळी मीटरवर 1 रिडींग होते. त्यामध्ये सदर ग्राहकास नवीन मीटर संगणकप्रणालीमध्ये अपडेट झाले. परंतु तांत्रिक कारणामुळे ग्राहकांस चालू रिडींग प्रमाणे वीज देयके न जाता फॉल्टी या शे-याने माहे जून 2015 ते सप्टेंबर 2015 पर्यंतची 50 युनिटची देयके गेली. तसेच ऑक्टोबर 2015 ते ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये प्रतिमाह सदर युनिटची देयके पाठविली गेली. सप्टेंबर 2017 ते ऑक्टो. 2017 चे वीज युनिट देयके पाठविली गेली. तक्रारदार यांचे नोव्हेंबर 2017 मध्ये 8205 असे रिडींग वि.प. या कंपनीचे कार्यालयास मिळाले. तक्रारदार यांनी 1 ते 8305 असे एकूण 8304 युनिटचे बिल जाणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी खालीलप्रमाणे सरासरी देयके भरलेली असलेने गेलेली सरासरी युनिट कमी करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी ऑक्टोबर 2017 पर्यंतची त्यांना पाठविलेली सरासरी देयके भरलेली असलेने तक्रारदार यांस 2017 चे देयक देताना त्यांनी भरलेली सरासरी 1900 युनिट वजा करुन देणे आवश्यक होते. यास्तव ग्राहकांस नोव्हेंबर 2017 ची देयके ही मागील रिडींग 1 व चालू रिडींग 8305 असे एकूण 8304 युनिट न काढता ते मागील रिडींग दुरुस्त करुन 1900 ते चालू रिडींग 8305 असे 6405 युनिटचे देयक देण्यात आले. परंतु नोव्हेंबर 2017 मधील देयकाचा वापर हा एका महिन्यातील नसलेने सदरचा वापर हा 2015 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत 1 युनिट ते 8305 = 8304 असा असलेने सदर देयक दुरुस्त करुन एकूण वापर हा मे 2015 ते नोव्हेंबर 2017 असा 31 महिन्यात विभागण्यात आला असता मासिक 268 युनिट इतका दरमहा वापर झाला ग्राहकाचे डिसेंबर 2017 चे देयक हे नॉर्मल मागील युनिट 8305 ते 8564 असे 259 युनिटचे आले. यावरुन तक्रारदाराचे सरासरी दरमहा वीज वापर हा 260 युनिटचा आल्याचे दिसून येणार आहे. यावरुन तक्रारदारास पाठविलेले वीज देयक हे अत्यंत योग्य वापराचे व बरोबर आहे असे वि.प. यांनी कथन केलेले आहे. वि.प. यांच्या सदरचे कथनाच्या अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचेकडे वीज बिल भरल्याच्या दि.25/1/17 ते 19/1/2018 अखेरच्या पावत्या दाखल केल्या आहेत तसेच वीज बिले दाखल केली आहे. सदरच्या वीज बिलांचे अवलोकन करता चालू रिडींग
महिना | युनिट | बिलाची रक्कम रु. |
25/01/2017 | 70 | 480/- |
17/02/2017 | 70 | 400/- |
24/03/2017 | 70 | 400/- |
21/04/2017 | 70 | 800/- |
24/05/2017 | 70 | 1190/- |
21/09/2017 | 20 | 1350/- |
19/10/2017 | 20 | 330/- |
21/11/2017 | 6405 | 92690/- |
20/12/2017 | 259 | 95560/- |
19/01/2018 | 36 | 56060/- |
9. सदरच्या वीज बिलांमध्ये जानेवारी 2017 ते जून 2017 अखेर चालू रिडींग या ठिकाणी FAULTY असा शेरा दिसून येतो. सदर FAULTY या शे-याबाबत वि.प. यांच्या कथनांचे अवलोकन करता वि.प. यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये,
नवीन मीटर संगणक प्रणालीमध्ये अपडेट झाले परंतु तांत्रिक कारणामुळे ग्राहकांस चालू रिडींग प्रमाणे वीज देयके न जाता FAULTY या शे-याने युनिट देयके पाठविली गेली असे कथन केलेले आहे. सबब, वि.प. यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदरची बिले त्यांच्या संगणकीय प्रणालीच्या दोषामुळे सदरचे मीटर FAULTY असलेचा शेरा दिलेचे मान्य केलेले आहे ही बाब दिसून येते.
10. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये तक्रारदाराचे मीटर नादुरुस्त होते व वीजेचे बिल जास्त येत होते. त्या कारणाने तक्रारदार यांनी वि.प. कंपनीला कळविले असता वि.प. यांनी कोणत्याही स्वरुपाची दाद दिली नाही व मीटरही दुरुस्त केले नाही असे कथन केलेले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे भरलेल्या बिलांचे तपशीलाचे अवलोकन करता ता. 21/11/17 रोजी युनिट 6405 आणि विज बिलाची रक्कम रु.93,850/- इतकी तक्रारदार यांना आलेचे दिसून येते. तसेच ता.20/12/2017 रोजी युनिट 259 बिलाची रक्कम रु.95,560/- इतकी दिसून येते. तक्रारदार यांनी त्याच्या पुरावा शपथपत्रामध्ये जेव्हा तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे तक्रार केली, त्यावेळी वि.प. यांचे तक्रारदार यांना दि.20/12/2017 रोजी पत्र आले, त्यावेळी त्या पत्रात त्यांनी बिलाची रक्कम कमी करुन दिली असे कथन केले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी ता. 20/1/22017 रोजीचे पत्र दाखल केले असून सदर पत्राचे अवलोकन करता सदर वीज बिलाची रक्कम ही रु.54,090/- इतकी कमी केल्याचे दिसून येते. ता. 19/1/18 रोजी युनिट 36 विजबिल रु.56,060/- इतके आलेचे दिसून येते. सबब, सदरकामी दाखल कागदपत्रे आणि वि.प. यांचे म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी सदरचे वीज बिलाचे मागील रिडींग दुरुस्त करुन 6405 युनिटचे देयक तक्रारदार यांना दिलेले होते. तसेच सदरचा वापर हा मे 2015 ते नोव्हे. 2017 पर्यंत 1 युनिट ते 8305 = 603 असा असलेने सदराचे देयक दुरस्त करुन वापर हा मे 2015 ते नोव्हेंबर 2017 असा 31 महिन्यात विभागून दरमहा 268 युनिट इतका वापर झालेचे कथन केले आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांच्याकडून माहे मे 2015 ते नोव्हे. 2017 या कालावधीतील वीज वापर केलेल्या युनिटची मागणी केलेली आहे.
Section 26(2) in The Indian Electricity Act, 1910
(2) Where the consumer so enters into an agreement for the hire of a meter, the licensee shall keep the meter correct, and, in default of his doing so, the consumer shall, for so long as the default continues, cease to be liable to pay for the hire of the meter.
त्याकारणाने, वर नमूद कलम 26(2) नुसार सदरचे मीटर हे सुस्थितीत ठेवून त्याचे रिडींग येाग्य त-हेने घेण्याची जबाबदारी ही वि.प. यांचेवर आहे. त्याकारणाने वीज बिलामध्ये Faulty हा शेरा वि.प. यांच्या संगणकीय दोषामुळे/चुकीमुळे आलेची बाब वि.प. यांनी मान्य केलेली आहे. त्या कारणाने मे 2015 ते नोव्हेंबर 2017 अखेरचे वीज देयक वि.प. यांच्या चुकीमुळे तक्रारदार हे देणेस बंधनकारक नाहीत या निष्कर्षास हे आयोग येत आहे.
11. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी आपले वीज कनेक्शनमधून शेजारी दोन घरांना वीज पुरवठा दिला होता असे आढळून आले. सदर ठिकाणी चौकशी केली असता तक्रारदार यांनी शहाजी वरुटे यांनी तक्रारदार यांच्या मिळकतीमध्ये सिमेंट क्रॉंक्रीटच्या चौकटी व वीटा याकरिता कारखाना काढला होता. सिमेंट कॉंक्रीट तयार करणा-या मशिनरीज तक्रारदार यांच्या घरगुती वीज कनेक्शनमधून विज पुरवठा दिला होता व त्याचा वापर कारखान्याकरिता केला होता. त्यामुळे तक्रारदार यांचा वीज वापर वाढला होता. वीज बिल जादा आले होते. त्याची कसलीही माहिती/ कल्पना वि.प. कंपनीला दिली नाही. तक्रारदार यांनी सत्य माहिती लपवून ठेवली असेही वि.प. यांनी म्हणण्यामध्ये कथन केले आहे व त्याअनुषंगाने वि.प. कंपनीचे प्रसाद सुरेश दिवाण यांचे जादा पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्राचे अवलोकन करता, “ तक्रारदार यांनी आपले वीज कनेक्शनमधून शेजारी लोकांना वीज वापर केला. तक्रारदार यांच्या शेजारी राजू बापू माळी यांना तक्रारदार यांनी वीज कनेक्शनमधून घराकरिता वीज पुरवठा दिला. राजू बापू माळी यांनी ता. 25/6/18 रोजी नवीन वीज कनेक्शन दिले आहे. केस दाखल झाल्यानंतर त्यांनी वि.प. कंपनीकडे नवीन कनेक्शन दिले आहे ” हे स्पष्ट दिसून येते. तक्रारदार यांनी मंगलसिंग बागडे यांनाही आपल्या वीज कनेक्शनमधून वीज पुरवठा दिला होता असा जादा पुरावा वि.प. यांनी दाखल केला असून राजू बापू माळी व मानसिंग बगाडे यांची वीज बिले आयोगात दाखल केली आहेत. वि.प. यांच्या सदरच्या म्हणण्यानुसार सदरकामी सदर राजू बापू माळी यांचे पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता राजू बापू माळी यांनी वि.प. यांचे म्हणणे पूर्णतः चुकीचे व खोटे आहे असे कथन केले आहे.
माझे व तक्रारदार यांचे शेतातील घरामध्ये अंतर लांब व किचकट असलेने सदर वीज पुरवठा करणे खूपच अडचणीचे आहे, शिवाय मी स्वतः माझे शेतातील घरासाठी वि.प. यांचेकडून स्वतंत्र वीज पुरवठा घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या घरासाठी तक्रारदार यांचेकडून वीज पुरवठा कनेक्शन घेण्याची कोणतीही गरज नव्हती व नाही. कोणतेही वीज कनेक्शन मी तक्रारदार यांचेकडून घेतलेले नाही असे पुरावा शपथपत्र दाखल केलेले आहे.
12. तसेच तक्रारदार यांनी जग्गू सुंदर माछवे यांचेदेखील जादा पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांनी शहाजी वरुटे यांनी तक्रारदार यांच्या मिळकतीमध्ये सिमेंट क्रॉंकीटच्या चौकटी व वीटा तयार करण्याकरिता मशीनरीजचा तक्रारदार यांच्या घरगुती वीज कनेक्शनमधून वापर केल्याचे कथन केले आहे. तथापि त्याअनुषंगाने वि.प. यांनी कोणताही परिस्थितीजन्य पुरावा Circumstantial evidence अथवा सद्यपरिस्थितीचा पंचनामा दाखल केला नाही तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांचेविरुध्द कोठेही वीज चोरीबाबत अथवा कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल केलेली नाही अथवा त्याअनुषंगाने कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्याकारणाने वि.प. यांनी त्यांची कथने पुराव्यासहीत शाबीत केली नसल्याने सदरची कथने पुराव्याअभावी हे आयेाग विचारात घेत नाही.
Section 56(2) of Electricity Act 1910
No sum due from any consumer under this section shall be recoverable after the period of two years from the date when such sum becomes first due unless such sum has been shown continuously as recoverable as arrear of charges for electricity supplied and the licensee shall not cut off the supply of the electricity.
13. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना जून 2015 पासून ते ऑगस्ट 2017 पर्यंत सदरची वीज बिले तक्रारदार यांना पाठविण्यात आली. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे वीज बिले अदा केली हे कागदपत्रांवरुन दिसून येते. वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली वीज देयकांवर FAULTY हा शेरा वि.प. यांच्या संगणकीय प्रणालीतील चुकीमुळे असताना देखील तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कळवूनदेखील तक्रारदार यांचे मीटर दुरुस्त केले नाही व सदरचे मीटर फॉल्टी शेरा असताना सुध्दा दुरुस्त न करता तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.93,850/- ची मागणी केली व तदनंतर सदरचे बिल रु.54,090/- इतके कमी करुन सदर बिलाचे रकमेची मागणी केली व सदरचे बिल न भरलेने तक्रारदार यांचे विद्युत कनेक्शन 2018 मध्ये खंडीत केले. महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी कायदा 1930 चे कलम 26 नुसार मीटर सुस्थितीत ठेवून त्याचे योग्य ते रिडींग घेणे ही वि.प. यांची जबाबदारी असताना देखील वि.प. यांनी तक्रारदार यांचे मीटर सदोष रिडींग घेवून तक्रारदार यांचेकडून जादा वीज बिलाचे रकमेची मागणी करुन तसेच तक्रारदार यांचे विद्युत कनेक्शन खंडीत करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेल्या वाढीव बिलाची रक्कम कमी करुन तक्रारदार यांचे बंद केलेले वीज मीटर चालू करुन द्यावे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
14. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुतकामी झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/- ची मागणी केली आहे. तथापि त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. परंतु दाखल कागदपत्रांवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांचे विज कनेक्शन 2018 पासून आजअखेर बंद केलेले आहे ही बाब नाकारता येत नाही. त्याकारणाने तक्रारदार यांचे शेतातील घराचा वापर झालेला दिसून येत नाही. सबब, त्यापोटी झालेल्या नुकसानीपोटी तक्रारदार यांना रक्कम रु.20,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना सदरची तक्रार आयेागात दाखल करणे भाग पडले, त्यामुळे झालेल्या मानिसिक त्रासापोटी तक्रारदार हे रक्कम रु.8,000/- तसेच खर्चापोटी रु.3,000/- इतकी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेल्या वाढीव बिलाची रक्कम कमी करुन तक्रारदार यांचे बंद केलेले मीटर चालू करुन द्यावे.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/- अदा करावी.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|