निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 17/07/2013
कालावधी 01 वर्ष. 07महिने. 15दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
दिगांबर पिता दिनानाथ पुरोहित. अर्जदार
वय 72 वर्षे. धंदा.पेन्शनर. अड.जे.एन.घुगे.
रा.कौस्तुभ,म्युनिसिपल कॉलनी,दर्गा रोड,परभणी.
विरुध्द
उप कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. अड.एस.एस.देशपांडे.
परभणी शहर उपविभाग,मर्यादित (महावितरण)
विद्युत भवन,जिंतूर रोड, परभणी ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिली आहे.म्हणून ही तक्रार अर्जदाराने दाखल केलेली आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 530010035740 असा असून अर्जदाराचा मिटर क्रमांक 7611559168 असा आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचा गेल्या वीस वर्षांपासून ग्राहक आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार महावितरण यांस विजेचा भरणा वेळोवेळी केला आहे.गैरअर्जदाराने अर्जदारास सप्टेंबर 2011 चे लाईट बील 2380 युनिटचे दाखवून त्या पोटी 22,200/- रुपयांचे विद्युत बिल गैरअर्जदाराने अर्जदारास दिले सदरचे बिल हे अवाजवी व चुकीच्या पध्दतीने दिले.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने बेजबाबदारपणाचा व ग्राहकांचा शोषणाचा कळस गाठला असून अर्जदारास एप्रिल 2011, मे 2011, जानेवारी 2011, या महिन्यामध्ये सुध्दा अनुक्रमे 125,119 व 749 युनिटचे अवाजवी विद्युत बिले दिली ती पूर्णतः चुकीच्या स्वरुपाची आहेत. अर्जदारास गैरअर्जदाराने पूर्वी दिलेली विद्युत देयके पाहिल्यास अर्जदार यास ऑगस्ट 2011, जुलै 2011, जून 2011, मार्च 2011, फेब्रुवारी 2011, डिसेंबर 2010, नोव्हेंबर 2010 महिन्या मध्ये अनुक्रमे 95, 98, 80, 59, 68, 70, 70, युनिटची विद्युत बिले दिली.सदरचे बिले पाहिल्यास गैरअर्जदाराने अर्जदारास सप्टेंबर 2011 व एप्रिल व मे 2011 चे विद्युत बिले अवाजवी असल्याचे स्पष्टपणे दिसते या बद्दल अर्जदाराने गैरअर्जदारास अनेक वेळा लेखी तक्रार करुनही गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही,म्हणून सदरची फिर्याद दाखल करणे भाग पडले, म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2011, सप्टेंबर 2011 जानेवारी 2011 एप्रिल 2011 मे 2011 या महिन्याचे विद्युत देयक रद्द करण्यात यावे व गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या मानसिकत्रासापोटी गैरअर्जदाराने 90,000/- रुपये व दाव्याच्या खर्चापोटी 10,000/- रुपये अर्जदारास देण्याचा आदेश करण्यात यावा.अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 8 वर 3 कागदपत्रांच्या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये सप्टेंबर 2011 चे विवादित बिल, ऑक्टोबर 2011 चे बिल व अर्जदाराने गैरअर्जदारास केलेली लेखी तक्रार इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर नि.क्रमांक 15 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने 09/09/2011 नंतर बिले भरले नाही व अर्जदाराने वेळोवेळी बिल न भरल्यामुळे त्याची थकबाकी व थकबाकी वरील व्याज वाढले, त्यामुळे विज बिलांची रक्कम जास्त दिसत होती, अर्जदारास योग्यच विज बिल प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणे दिलेले आहेत. म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी,
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराने नि.क्रमांक 18 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे व गैरअर्जदाराने नि.क्रमांक 19 वर सी.पी.एल. दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 8/1, व 8/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. अर्जदारास माहे सप्टेंबर 2011 चे विद्युत देयक 2380 युनिटचे आले असून त्यापोटी 22,200/- चे विद्युत बिल आलेले आहे, जे अवाजवी आहे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, माहे जानेवारी 2011, एप्रिल 2011, मे 2011 चे विद्युत बिले हे अवाजवी व चुकीच्या पध्दतीने दिलेली आहेत.सदरचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण नि.क्रमांक 19 वर दाखल केलेले सी.पी.एल.पाहता असे दिसते की, जानेवारी 2011 ते मार्च 2012 पर्यंत मिटर रिडींग ही Continues घेतलेली दिसते. व कोठेही मिटर रिडींग मध्ये चुक दिसत नाही. करंट रिडींग व प्रिव्हीयस रिडींग यांचा मेळ पूर्ण जानेवारी 2011 ते मार्च 2012 या कालावधीसाठी दिसत आहे.म्हणून जानेवारी 2011 ला आलेले 749 युनिटचे बिल तसेच सप्टेंबर 2011 ला आलेले 2380 युनिटचे बिल हे गैरवाजवी वाटत नाही.अर्जदाराने आपल्या अर्जात कोठेही असे म्हंटलेले नाही की, सदरचे मिटर फॉल्टी असून ते कधी जास्त तर कधी कमी बिल दर्शवित आहे, म्हणून बिले कमी आले तेव्हा बिल योग्य व जास्त आले तेव्हा ते अवाजवी हे अर्जदाराचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही.म्हणून अर्जदार हा आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे.व गैरअर्जदाराने त्यास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही,व गैरअर्जदाराने दिलेले विद्युत देयके ही मिटर रिडींग प्रमाणेच दिलेली आहे. व ते योग्यच आहे.असे मंचास
वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष