जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –164/2010 तक्रार दाखल तारीख –06/12/2010
विजय पि.रघुनाथ पवार
वय - 24 वर्षे, धंदा - शेती ,
रा.लुखेगाव, ता.माजलगांव, जि.बीड ...तक्रारदार
विरुध्द
1. उपअभियंता,
एम.एस.ई.बी.कार्यालय,माजलगाव
ता.माजलगांव जि.बीड
2. कार्यकारी अभियंता,
एम.एस.ई.बी.विभागीय कार्यालय, अंबाजोगाई,
ता.अंबाजोगाई जि.बीड ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- वकिल – लघाने एस.पी,
सामनेवालेतर्फ :- वकिल – एस.एन.तांदळे,
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार मौजे लुखेगाव,ता.माजलगांव जि.बीड येथील रहीवाशी असुन व्यवसायाने शेतकरी आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून विज जोडणी घेतली आहे. सामनेवालेंनी विज पुरवठा करण्यासाठी तक्रारदाराचे शेत गट क्रं. 80 मध्ये डी.पी.बसवली आहे. त्यामुळे त्याची देखभाल सामनेवाले करत असत. ता.5.6.2001 रोजी डी.पी. ट्रान्सफार्मर खराब झाल्याने तक्रारदाराने इतर गावक-यांच्या सहकार्याने तक्रार अर्ज सामनेवाले नं.1 कडे दिला. तसेच विनंती करुन सुध्दा गावचे लाईनमन नागरगोजे व उपअभियंता मसुदअली यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन टाळाटाळ केली. कर्तव्यात कसुर करुन हयगय केली.
तक्रारदाराचा शेतीस जोड धंदा म्हशीच्या दुधाचा होता. त्यांचे स्वतःची म्हैस ता.13.6.2010 रोजी चारण्यासाठी त्यांचे शेतात घेवून गेले होते. परंतु डी.पी. /ट्रान्सफार्म जवळ असलेल्या तारेमध्ये अचानक विज पुरवठा होवून उतरला. आर्थिंग तारेला चिकटून तक्रारदाराची म्हशीला विजेचा जोराचा झटका बसला ती मरण पावली.
तक्रारदारांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिका-याला घटनास्थळावर बोलावले, पोलीसानी घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिका-यांनी म्हशीचे श्वविच्छेदन केले. माजलगांव तहसिलचे नायब तहसिलदार यांनी सुध्दा पंचनामा केला. म्हैस मेल्यांने तक्रारदाराचे रु.40,000/- नुकसान झाले. दुधाचा व्यवसाय बंद पडला. रु.500/- रोज प्रमाणे नुकसान झाले. म्हशीन पुढील 6 महिने दुध दिले असते खर्च वजा जाता तक्रारदाराचे अंदाजे रु.50,000/- चे दुधाचे नुकसान झाले. त्यावर नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारदारानी सामनेवाले नं.1 कडे अनेक वेळा अर्ज दिले. प्रत्येक्ष भेटी घेतल्या. प्रत्येक वेळेस तुम्हास नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाले नं.2 यांचेकडे प्रस्ताव पाठवला आहे. मंजूर होवून आला की, नुकसान भरपाईची रक्कम देवू असे सांगण्यात आले. सामनेवाले नं.1 ने तक्रारदाराना वेळेवेळी आश्वासन दिले. परंतु आजपर्यन्त नुकसान भरपाई रक्कम दिली नाही.
शेवटी ता.9.7.2010 रोजी अर्ज दिला तरीही नुकसान भरपाई मिळाली नाही.
सामनेवालेचे चुकीमुळे बेजबाबदारपणामुळे, हलगर्जीपणामुळे तक्रारदाराचे रु.90,000/- चे नुकसान झाले आहे.
विनंती की, तक्रारदारास रु.90,000/- नुकसान भरपाई सामनेवालेकडून त्यावर द.सा.द.शे. 15 टक्के प्रमाणे व्याज देण्याचा आदेश व्हावा. दाव्याचा खर्च व मानसिक त्रासा बद्दल 10,000/- वेगळे देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले नं.1 व 2 यांनी त्यांचा एकत्रीत खुलासा नि.10 ता.13.1.2011 रोजी दाखल केला. खुलासा थोडक्यात की,
तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व अक्षेप सामनेवाले यांनी नाकारलेले आहे. डी.पी. बंद होता. तक्रारदारांनी त्यांची म्हैस पोलला बांधली व परंतु म्हशीने पोलच्या स्टेवायरमध्ये शिंग आडकवले तसेच जोराने झटके दिले असतावेत त्यामुळे स्टे वायरचा संबंध विज तारेला होवून अपघात झाला असावा. यात सामनेवाले यांची कुठलीही चुक अथवा निष्काळजी झाली नाही, चुक तक्रारदाराची आहे. सामनेवाले यांचे पश्चात पंचनामे केले आहेत, ते पुराव्यात वाचता येणार नाही. तक्रारदारांनी पोलीस व तलाठी यांचे संगनमताने पचनामे केले आहेत.
तक्रारदारांनी म्हशीची किमंत अंदाजी तयार केली आहे. त्याचा कुठलाही पुरावा नाही. दुधाचे नुकसान झालेचे चुकीचे असुन खोटे आहे.
तक्रारदारांनी या सामनेवालेकडे घटना घडल्यानंतर 3 आठवडयानी कळविले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास आश्वासन दिलेले नाही.
तक्रारदारांनी ता.9.7.2010 लाच प्रथम अर्ज केला आहे. तक्रारीस कुठलेच कारण घडले नाही. सामनेवाले कुठलीच नुकसान भरपाई देण्यास जिमेदार नाहीत.
तक्रारदार हे एजी पंपाचे ग्राहक आहेत. परंतु तक्रारदाराची म्हैस त्यांच्या विहीरीवर अथवात्यांच्या शेतात लाईटशॉक लागल्याने मेली नाही. तक्रारदारांनी खरी हकीगत लपवून ठेवली. सामनेवाले यांनी जी डी.पी बसवली होती ती तक्रारदाराचे शेतात नाही, ती नव्हती. तक्रार रद्द करणे योग्य आहे.
विंनती की, तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. सामनेवाले यांना खर्च म्हणुन रु.5,000/- देण्याबाबत आदेश व्हावेत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकिल एस.पी.लघाने व सामनेवाले यांचे विद्वान वकिल एस.एन.तांदळे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्याची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तसेच ता.13.6.2010 रोजी तक्रारदाराची म्हैस मेलेली आहे. ती तक्रारदाराचे म्हणने प्रमाणे सामनेवाले यांचे डी.पी.चे जवळ असलेल्या तारेमध्ये विज प्रवाह येवून विजेचा धक्का लागुन ती मेलेली आहे. सामनेवाले यांचे म्हणने प्रमाणे डी.पी बद होती हे तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेले आहे. डी.पी. जवळील तारेला म्हैस बांधली असल्याने शिंग तारेला घासले असल्याने तारेला एल.टी. तारेचा स्पर्श होवून त्या तारेमध्ये विज उतरली असावी त्यामुळे म्हैस मेली असावी यात चुक सामनेवालेची नसल्यांने तक्रारदाराची आहे. वरील दोन्ही विधाने जरी तारेचा शॉक लागुन म्हैस मेल्याचे सामनेवाले यांनी स्पष्ट मान्य केले नसले तरी सामनेवाले यांनी सदरची शक्यता नाकरलेली नाही. श्वविच्छेदन अहवालावरुन म्हशीचा मृत्यू हा विजेच्या धक्याने झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विजेचा धक्का लागुन म्हैस मेली ही बाब स्पष्ट होते.
यासंदर्भात तक्रारदारांनी म्हशीची नुकसान भरपाईची मागणी सामनेवाले यांचेकडे केली आहे. व त्याबाबत योग्य ती कागदपत्रे सामनेवाले यांना दिली आहे. तथापी सदरची घटना ही 3 महिन्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना कळविल्याचे सामनेवाले यांचे म्हणने आहे. तसेच सामनेवाले यांनी महसुल पंचनामा व पोलीस पंचनामा यांचे पश्चात झाले असल्याने नाकरले आहे. परंतु वरील विवेचनावरुन विजेच्या धक्याने म्हैस मेल्याची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाले यांनी म्हशीची किमत देणे उचित होईल. तसेच तक्रारदारांनी म्हैस किती रुपयाला विकत घेतली त्याचा पुरावा जोडला नाही व म्हशीची किमत रक्कम रु.40,000/- दर्शविली आहे. यासंदर्भात कोणताही पुरावा नाही. परंतु म्हशीची बाजार भावाची किमत विचारात घेवून तक्रारदाराना म्हशीची वाजवी किमत रु.20,000/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणेच्या समर्थनात खालील न्याय निवाडे तक्रारीत दाखल केले आहेत.
1986-99 ग्राहक 3695 मा.राष्ट्रीय आयोग,हरियाना स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड विरुध्द मोहनलाल
ग्राहक संरक्षण कायदा 1986 – कलम 2(1)(जी) – सेवेत कसूरी – इलेक्ट्रीसीटी – तक्रारदारांनी सामनेवाले कडून टयूबवेलसाठी विज जोडणी घेतली होती – दोन हायटेनशन लाईन जमीनीवरुन जात होते- त्यामुळे घर्षन होवून थिनग्या पडून पिकाचे नुकसान झाले – तक्रार – तक्रार न्यायमंचाने रद्द केली – राज्य आयोगाने सदरची तक्रार फेरचौकशीस पाठवली – रिव्हिजन पिटीशन दाखल केले – सामनेवालेंची सेवेत कसूरी – नाही
याच आशयाचा मा. राज्य आयोग, अपिल क्र.79/2005 महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड विरुध्द रामदास शांताराम हा न्यायनिवाडा दाखल केला. वरील दोनही न्यायनिवाडयाचे सखोल वाचन केले असता, सदरचे न्यायनिवाडे सदर प्रकरणात सामनेवालेच्या समर्थनार्थ लागू होत नाहीत, असे न्यायमंच नम्रपणे नमुद करत आहे. प्रस्तुत प्रकरणात हायटेशान लाईट गेल्याचे सामनेवाले यांचे कोठेही म्हटलेले नाही.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
** आ दे श **
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, तक्रारदारास मयत म्हशीची किमत रक्कम रु.20,000/-( अक्षरी रुपये वीस हजार फक्त ) आदेश मिळालेपासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, तक्रारदारास मानसिक त्रासाची रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) आदेश मिळाले पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास वरील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के तक्रार दाखल ता.6.12.2010 पासून व्याज देण्यास सामनेवाले जबादार राहतील.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड