जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ७५५/२००९
तक्रार दाखल दिनांक – २४/११/२००९
तक्रार निकाल दिनांक – १९/०८/२०१३
श्री.हिरामण विठ्ठल चौधरी
उ.व. ५० वर्षे, धंदाः- ट्रॅक्टर व ट्रॉली मालक
रा.मु.पो. धनुर ता.जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
युनायटेड इंडिया इन्शुं कं.लि.
शाखा धुळे दिनेश कॉम्प्लेक्स, दुसरा मजला,
नेहरू चौक, जुना मुंबई आग्रा रोड, धुळे.
(समन्सची बजावण, म.शाखाधिकारी
यांच्यावर करण्यात यावी) ................. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एम.ए. माळी)
(सामनेवाला तर्फे – अॅड.एस.आर. वाणी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांना विमा पॉलिसीनुसार विम्याचे लाभ दिेले नाहीत म्हणून तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळणेकरीता तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रं.नं.एम.एच.१८/एन-२४२७ या वाहनाची विमा पॉलिसी युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांचेकडून दि.२७/०२/२००९ ते २६/०२/२०१० या कालावधीसाठी पॉलिसी क्रं.२३०५०२/४७/०८/९६/००००१०८६ अन्वये घेतली आहे. दि.१९/०५/२००९ रोजी रात्री २२.०० वाजेच्या सुमारास तक्रारदार यांच्या ट्रॅक्टरचा मुंबई आग्रा रोडवर सोनगीर गावाच्या शिवारात एन.जी.बागुल हायस्कुल समोर दापोरा फाटयाजवळ नरडाणाकडून धुळेकडे जाणारी मारूती कार क्रं.एम.एच.१५/एफ-८०६५ या वाहनामुळे अपघात घडला. सदर अपघाताची नोंद सोनगीर पोलिस स्टेशनला गु.र.नं.२६/२००९ अन्वये झाली आहे. सदर अपघात घडला त्यावेळी ट्रॅक्टर पूर्णपणे रिकामे होते. सदर अपघातामुळे ट्रॅक्टरचे बरेचसे नुकसान झाले आहे.
२. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर अपघातामुळे झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीस त्वरीत कळविले व सर्व कागदपत्रे पुरविलेली आहे. परंतु विमा कंपनीने दि.२८/०८/२००९ रोजी पत्र देवून तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केलेला आहे.
३. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम रू.८१,१९२/- व त्यावर दि.१९/०५/२००९ पर्यंत १२ टक्के व्याज, शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रू.९०,०००/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.३ वर शपथपत्र, तसेच नि.६ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार २२ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.६/१ वर फिर्याद, नि.६/२ वर घटनास्थळ पंचनामा, नि.६/३ वर विमा पॉलिसी, नि.६/४ वर विमा कंपनीला दिलेले पत्र, नि.६/५ ते नि.६/२२ वर बिले, नि.१५ वर प्रतिउत्तर तसेच नि.१६ वर मोटार गॅरेज मालकाचे शपथपत्र, नि.१७ वर चेक मिळाला नसल्याबदृलचा अर्ज, नि.१८ वर स्वतःचे शपथपत्र, नि.१९ वर साक्षिदाराचे शपथपत्र तसेच नि.२४/१ वर बॅंकेत चेक विमा कंपनीने दिला असल्याबदृल बॅंकेचे पत्र दाखल केले आहे.
५. विमा कंपनीने आपली कैफियत नि.१२ वर दाखल करून तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार यांनी स्वच्छ हेतूने तक्रार दाखल केलेली नाही व विमा कंपीनीने सेवेत त्रृटी केलेली नाही. त्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
६. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी Discharge Voucher वर स्वाक्षरी केली आहे व नुकसान भरपाईची रक्कम त्यांना मिळालेली आहे. परंतू तक्रार अर्जात त्याबदृल उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार हे कंपनीस Compensatory Costs Rs.5000/- देण्यास पात्र आहेत.
७. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांना दि.०८/१०/०९ रोजी रक्कम रू.१८,०००/- सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार अदा करण्यात आले आहेत. त्या संदर्भात तक्रारदार यांनी पावतीवर स्वाक्षरी केली आहे. परंतू तक्रार अर्जात त्याबदृल उल्लेख करण्यात आलेला नाही व प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांना सर्व्हे रिपोर्टनुसार पूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे. तक्रारदार यांना पूर्ण रक्कम देण्यात आलेली असल्यामुळे तक्रारदार यांना मागणी केलेली रक्कम रू.८१,१९२/- व मानसिक त्रासापोटी रू.९०,०००/- मागण्याचा अधिकार नाही. शेवटी तक्रार रदृ करावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
८. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.१३ वर रविंद्र बोकाडे यांचे शपथपत्र, नि.२२/१ वर Settlement Intimation Voucher ची प्रत, नि.२२/२ वर Claim Disbursement Voucher ची प्रत आणि नि.२२/३ वर बॅंक ऑफ महाराष्ट्र यांचे पत्र, नि.२७/१ वर सर्व्हे रिपोर्ट, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
९. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनी यांचा खुलासा, दाखल कागदपत्रे पाहता व संबंधीत वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थीत होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
१. विमा कंपनीने तक्रारदार यांना दृयावयाच्या
सेवेत कमतरता केली आहे काय ? नाही
२. आदेश काय? खालीलप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा क्र.१- तक्रारदाची मुख्य तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रं.नं.एम.एच.१८/एन-२४२७ असुन सदर वाहनाचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडुन दि.२७/०२/२००९ ते २६/०२/२०१० या कालावधीकरिता रक्कम रू.१,२७,००००/- व रू.३०,०००/- चा काढलेला आहे.
११. सदर ट्रॅक्टरचा अपघात दि.१९/०५/२००९ रोजी रात्री २२.०० वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा रोडवर सोनगीर गाव शिवारात, दापोरी फाटयाजवळ, नरडाणाकडून धुळेकडे जाणारी मारूती ८०० कार क्रं.एम.एच.१५/एफ-८०६५ या गाडीने धडक दिल्याने घडला. त्याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनला गु.र.नं.२६/०९ अन्वये गुन्हा दाखल आहे.
१२. सदर अपघातात ट्रॅक्टरचे एकंदरित रू.८१,१९२/- चे नुकसान झालेले आहे. सदर ट्रॅक्टरचे नुकसानीबाबत तक्रारदारने विमा कंपनीस त्वरीत सूचना दिलेली होती. त्याप्रमाणे विमा कंपनीने वेळोवेळी मागणी केली त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे पुरविलेली आहे. परंतु कंपनीने दि.२८/०५/०९ रोजीचे पत्रान्वये क्लेम नामंजूर केल्याचे तक्रारदारला कळविलेले आहे व सेवेत त्रृटी केलेली आहे.
१३. याबाबत सामनेवाला विमा कंपनीने आपल्या खुलाश्यात तक्रारदारला दि.०८/१०/२००९ रोजी कंपनीच्या सर्व्हेअरने केलेल्या दि.२३/०९/२००९ च्या रिपोर्ट नुसार रू.१८,०००/- अदा केलेले असल्याने सदर तक्रारदारचे अर्जातील मागणी खोटी व बेकायदेशीर असल्याने तक्रार कॉस्टसहित रदृ करावी. तसेच सदर बाब तक्रारदार हा मे.मंचापासून लपवून ठेवत आहे व तो स्वच्छ हेतूने मे.मंचासमोर आलेला नाही असे नमूद केले आहे.
१४. या संदर्भात आम्ही सामनेवाला विमा कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केलेले आहे. त्यात त्यांनी नि.१३ वर मॅनेजर आर.के. बोकाडे यांचे प्रतिज्ञापत्र, नि.२२ सोबत नि.२२/२ वर Claim Disbursement Voucher नि.२२/३ वर बॅंक ऑफ महाराष्ट्र कापडणे ब्रॅंच यांचे पत्र तसेच नि.२७/१ वर सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर settlement voucher वर `I/ We agree to accept in full & final discharge of my/our claim upon the company under policy No.230502/47/08/96/00001086 in respect of SHRI HIRAMAN VITHHAL CHAUDHARI’ असे नमुद आहे. सदर voucher वर तक्रारदारची सही आहे. तसेच सर्व्हे रिपोर्टवरही Net Assessed amount Rs.18000/- नमुद आहे. सदर सर्व्हे रिपोर्टवर दि.२३/०९/०९ ही तारीख नमूद आहे व Disbursement Voucher वर दि.०८/१०/२००९ ही तारीख नमुद आहे. तसेच बॅंकेच्या पत्रातही दि.२९/१०/२००९ रोजी रक्कम रू.१८,०००/- तक्रारदारचे ट्रॅक्टर कर्ज खात्यात जमा केल्याचे नमुद आहे. यावरून तक्रारदारला नुकसानीबाबतची सर्व्हे रिपोर्टनुसारची रक्कम ही मे.मंचात तक्रार दाखल करण्या अगोदर म्हणजे तक्रार दाखल दि.२४/११/२००९ चे पूर्वीच साधारणतः १ महिना अगोदर प्राप्त झालेली आहे. यावरून तक्रारदार हा स्वच्छ हाताने मे.मंचात आलेला नाही हे सिध्द होत आहे. याउलट तक्रारदारने आपल्या तक्रारीत विमा कंपनीने क्लेम नाकारलेला आहे असे नमूद केलेले आहे. परंतु तक्रारीसोबत विमा कंपनीने क्लेम नाकारल्याबाबतचे पत्र दाखल केलेले नाही. तसेच सरतपाणीचे प्रतिज्ञापत्रातही स्वर्हे झाल्याचे तक्रारदारने नमूद केलेले आहे. यावरून त्यांना नुकसानी भरपाई रकमेबदृल पूर्व कल्पना होती हे दिसून येते.
१५. तक्रारदारने नि.१८ वरील दि.१८/११/२०१० रोजीचे प्रतिज्ञापत्रात तक्रारदार विमा कार्यालयास गेला असता कंपनीच्या अधिका-यांनी सहया करण्यास सांगितले, त्याप्रमाणे त्याने सहया केल्या, चेकची मागणी केली असता, चेक पाठवून देवू असे सांगितले पण चेक आजतागायत मिळालेला नाही असे नमूद आहे. तक्रारदारने ज्यावेळी settlement voucher वर सहया केल्या त्यावेळी त्यावर नमुद full & final discharge ही बाब नक्कीच वाचली असणार. कारण सदर voucher वर तक्रारदारने इंग्रजीत सही केलेली असल्याने कोणताही सुशिक्षित माणूस कागदपत्रे वाचल्याशिवाय सही करणार नाही हे निश्चित आहे. तसेच दाखल कागदपत्रांवरून विमा कंपनीने तक्रारदारचा विमा क्लेम रकमेचा धनादेश तक्रारदारचे बॅंकेकडे कर्ज खात्यात वर्ग केल्याचे दिसते. याउलट तक्रारदारची अपूर्ण क्लेम मिळाल्याची कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे विमा कंपनीने सेवेत कमतरता केली आहे हे गृहीत धरण्यात काहीही कायदेशीर आधार नाही या मतास आम्ही आलो. म्हणून मुदृा क्रं.१ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१६. मुद्दा क्र.२- वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
(श्री.एस.एस. जोशी ) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.