न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पतीचे नांवे शेतजमीन असून त्यांचे नावे 7/12 होता व आहे. तक्रारदार यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. तक्रारदार यांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांचे पती कै. सतिश रामचंद्र म्हसवेकर हे दि. 27/02/2020 रोजी जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरी येथून त्यांचे काम आटोपून मोटरसायकल क्र. एम.एच.09-डी.एफ-3857 ने हुपरी ते मुरगूड असे घरी येत असताना भडगांव फाटा लगत मोटर सायकलचा अपघात झाला व सदर अपघातामध्ये तक्रारदार हिचे पतींना डोकीस जबर जखम झालेने ते जागीच मयत झाले. तदनंतर त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले असून डॉक्टरांनी तक्रारदारांचे पतीचा मृत्यू अपघातात झाले जखमांमुळे झाले असलेचा दाखला दिलेला आहे. तदनंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, करवीर यांचेमार्फत दाखल करणेचा प्रयत्न केला असता त्यांनी सदर प्रस्ताव मुदतीत नसलेचे कारण देवून प्रस्ताव स्वीकारणेस नकार दिला. म्हणून तक्रारदाराने दि. 29/12/2020 रोजी विमा प्रस्ताव वि.प. कंपनीकडे रजि.पोस्टाने पाठवून दिला. परंतु सदरचा प्रस्ताव वि.प. यांनी त्याची दखल न घेता सदाचा प्रस्ताव हा तक्रारदारास परत पाठवून दिला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. कंपनीस दिलेले पत्र, विमा प्रस्तावासोबत दिलेली कागदयादी, विमाक्लेम फॉर्म भाग 1, शेतजमीनीचा 7/12 व 8अ उतारा, जुनी डायरी उतारा, तलाठयाचे प्रमाणपत्र, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र, बोनाफाईड, मृत्यू दाखला, सम्राट म्हसवेकर यांचा जबाब, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मयताचे व तक्रारदारांचे आधारकार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, वि.प. कंपनीने प्रस्ताव परत पाठविलेला लखोटा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट तसेच त्रिपक्षीय करार, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदाराने मुदतीत प्रस्ताव दाखल केला नसलेने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत. सदर प्रस्तावाची कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे मिळालेची नोंद वि.प. यांचेकडे नाही.
iv) तक्रारदारांनी हजर केलेले पोलिस पेपर्स पाहता तक्रारदार हिचे पतींना झालेल्या अपघातावेळी विमाधारक स्वतः वाहन चालवित होते, सबब, सदरकामी विमाधारक यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार वाहकाचा वाहन परवाना असणे बंधनकारक आहे. सदरकामी तक्रारदारांनी विमाधारक यांचा वाहन चालविण्याचा परवाना हजर केलेला नाही. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेने तक्रारदार हे या योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करीत होते. तक्रारदार या मयत सतिश रामचंद्र म्हसवेकर यांच्या पत्नी असून मयताचे नावांवर शेती होती. त्याचा 7/12 उतारा, 8-अ उतारा व 6-क चा उतारा याकामी दाखल आहे. तक्रारदार या त्यांचे पतीच्या सरळ व कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांचे पती कै. सतिश रामचंद्र म्हसवेकर यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदाराने मुदतीत प्रस्ताव दाखल केला नसलेने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत. तसेच अपघातावेळी विमाधारक स्वतः वाहन चालवित होते, सबब, सदरकामी विमाधारक यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे कायद्याने बंधनकारक आहे. सदरकामी तक्रारदारांनी विमाधारक यांचा वाहन चालविण्याचा परवाना हजर केलेला नाही. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेने तक्रारदार हे या योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत असे कथन केले आहे.
8. सदरकामी अपघातात मयत तक्रारदाराचे पती सतिश रामचंद्र म्हसवेकर यांचा मोटारसायकलवरुन पडून डोक्यास गंभीर दुखापत होवून मृत्यू झालेचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट हेाते. तथापि सदर मयत सतिश रामचंद्र म्हसवेकर यांचे निष्काळजीपणामुळे अथवा चुकीमुळे अपघात झाला होता असे दाखविण्यासाठी कोणताही कागद याकामी वि.प यांनी दाखल केलेचे दिसून येत नाही. म्हणजेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराचे पती मयत सतिश रामचंद्र म्हसवेकर यांचे चुकीमुळे अपघात झाला ही बाब याकामी शाबीत होत नाही. तसेच सदर मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते म्हणून अपघातास कारण झाले, ही बाबही कागदपत्रांवरुन शाबीत होत नाही. म्हणजेच मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते म्हणून अपघात घडला असा कुठेही संबंध (Nexus) दिसून येत नाही किंवा दाखल कागदपत्रांवरुन सदर अपघात हा तक्रारदाराचे पती सतिश रामचंद्र म्हसवेकर यांचे चुकीमुळे झाला ही बाब शाबीत होत नाही.
9. तक्रारदाराने याकामी खालील मा.राज्य आयोग, मुंबई यांचा निवाडा दाखल केला आहे.
Appeal No. 642/14 decided on 13/12/2017
Future Generali Insurance Co.Ltd.
Vs.
Smt. Parvati Ananda Vharambale
We are of the opinion that although in the facts and circumstances of the case, farmer had no effective and valid motor driving licence to drive the motor cycle, that was not the sole cause of the accident but his motor cycle was hit by another vehicle which caused the accident resulting in the death of the farmer. Therefore, considering the documents such as, FIR, Inquest panchanama, P.M. Report, police investigation papers, etc., the claim deserves to be allowed, however, on non-standard basis as referred to in the ruling in the impugned judgment in the case of United India Insurance Co.Ltd. Vs. Gaj Pal Singh.
सदर निवाडयाचा विचार करता, तक्रारदारांचा विमादावा मंजूर न करण्याची वि.प. यांची कृती ही न्यायोचित वाटत नाही असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
10. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदाराने मुदतीत प्रस्ताव दाखल केला नसलेने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत असे कथन केले आहे. परंतु मा. वरिष्ठ न्यायालयांनी अनेक निवाडयांमध्ये उशिराचे कारण देवून विमा क्लेम नाकारु नये असा निर्वाळा दिला आहे. तथापि कृषी अधिका-यांनी विमा प्रस्ताव उशिराचे कारण देवून स्वीकारला नसलेने तक्रारदाराने सदर प्रस्ताव हा विमा कंपनीस पाठविला आहे. सबब, उशिराचे कारण देवून वि.प. विमा कंपनीस तक्रारदाराचा विमाप्रस्ताव नाकारता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम मंजूर न करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. वर नमूद मा.राज्य आयोग, मुंबई यांचे निवाडयाचा विचार करता तक्रारदार हे नमूद विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- च्या 75 टक्के इतकी रक्कम नॉन-स्टँडर्ड बेसीसवर वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना नॉन-स्टँडर्ड बेसीसवर विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- च्या 75 टक्के इतकी रक्कम अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.