न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34(1) अन्वये दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पतीचे नांवे शेतजमीन असून त्यांचे शेतजमीनीचा गट नं. 622 आहे. तक्रारदार यांचे पतीचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. तक्रारदार यांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांचे पती कै. सचिन रंगराव घाटगे हे दि. 12/09/2020 रोजी अॅक्टीव्हा गाडी नं. एम.एच.-ए.इ.-8865 वरुन रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मौजे कळंबणी बुद्रुक येथे येत असताना रस्त्याचे दुभाजकाच्या बाजूला रिव्हर्स घेवून उभ्या असलेल्या दहा चाकी ट्रकच्या मागील बाजूस मोटर सायकल धडकून कै. सचिन रंगराव घाटगे यांना दुखापत झाली. त्यांना विन्स हॉस्पीटल कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु दि. 14/09/2020 रोजी ते मयत झाले. त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले तसेच सदर अपघाती मृत्यूची नोंद खेड पोलिस ठाणे येथे करण्यात आली. कै. सचिन रंगराव घाटगे यांचा मृत्यू अपघाती असल्याने तक्रारदार हे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमायोजनेचा लाभ मिळणेस पात्र आहेत. म्हणून तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांसह विमाप्रस्ताव मंडल अधिकारी पेठवडगांव यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी हातकणंगले यांचेकडे दाखल केला. परंतु वि.प. यांनी विमा रक्कम तक्रारदारांना अद्याप दिलेली नाही. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे क्लेम दाखल झाल्यापासून 30 दिवसांच्या आत रक्कम देणे बंधनकारक असताना वि.प. यांनी आपली जबबदारी टाळली आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 14 कडे अनुक्रमे क्लेम फॉर्म, तक्रारदाराचे स्वयंघोषणापत्र, सातबारा उतारा, 8अ उतारा, वारसा प्रकरणाची नोंदवही, वर्दी जबाब, पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, तक्रारदारचे रेशनकार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदारांचा तक्रारअर्ज व पोलिस पेपर्स पाहता विमाधारक यांनी गाडी निष्काळजीपणाने चालविली असलेने सदरचा अपघात घडला आहे. सदर अपघातात विमाधारक यांची चूक दिसून येते. सबब, तक्रारदार हे सदर योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत.
iv) विमाधारक हे स्वतः वाहन चालवित असलेने त्यांचा वाहन चालविणेचा परवाना सादर करणे कायद्याने आवश्यक आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करीत होते. त्यांचे नावे शेतजमीन असून त्याचा गट क्र.622 असा आहे. तक्रारदाराचे पतींचे नावचा सातबारा उतारा, तसेच 6क चा उतारा याकामी दाखल आहे. सबब, तक्रारदाराचे पती हे शेतकरी होते ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांचे पती कै सचिन रंगराव घाटगे यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, विमाधारक यांनी गाडी निष्काळजीपणाने चालविली असलेने सदरचा अपघात घडला आहे. सदर अपघातात विमाधारक यांची चूक दिसून येते. सबब, तक्रारदार हे सदर योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. तसेच विमाधारक हे स्वतः वाहन चालवित असलेने त्यांचा वाहन चालविणेचा परवाना सादर करणे कायद्याने आवश्यक आहे असे वि.प. यांचे कथन आहे. तथापि याकामी तक्रारदाराने दि. 14/5/2022 चे कागदयादीसोबत मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले आहे. सदर ड्रायव्हींग लायसेन्स पाहता अपघात झाला, त्यावेळी सदरचे लायसेन्स हे वैध होते. कारण अपघात दि. 12/09/2020 रोजी झाला आहे तर ड्रायव्हींग लायसेन्स दि. 2/11/2017 ते 1/11/2020 पर्यंत वैध आहे हे स्पष्ट होते. तसेच मयत सचिन घाटगे यांचेविरुध्द समरी अबेट झाली आहे हेही दाखल कागदपत्रांवरुन दिसून यते.
8. याकामी तक्रारदाराने दि. 3/11/2020 रोजी क्लेम फॉर्म व सोबत सर्व कागदपत्रे कृषी अधिकारी यांना पाठविली. ती कागदपत्रे कृषी अधिकारी यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे पाठविली. परंतु वि.प. यांनी तक्रारदाराला विमाक्लेमबाबत काहीही कळविलेले नाही. विमा कायद्यांतर्गत 90 दिवसांत वि.प.ने तक्रारदाराला विमाक्लेमबाबत योग्य तो निर्णय कळविणे आवश्यक व बंधनकारक आहे. परंतु वि.प. ने त्याचे उल्लंघन केले आहे. सबब, वि.प.ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे स्पष्ट हेाते. सबब, याकामी तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.