न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पतीचा शेती हा व्यवसाय होता. त्यांचे कर्नाटक या बँकेकडे सेव्हिंग्ज खाते होते. तक्रारदारांचे पतीचा के.बी.एस.सुरक्षा ग्रुप पर्सनल अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविेला होता. सदर पॉलिसीचा हप्ता तक्रारदाराचे खातेतून वि.प. कंपनीकडे अदा केलेला आहे. पॉलिसीचा क्र. 3333/57994491/000/ असा असून कालावधी दि. 01/01/2018 ते 31/12/2019 असा आहे. तक्रारदारांचे पती कै. सुर्यकांत तानाजी पाटील हे दि. 08/10/2018 रोजी त्यांचे ऊस पिकास शेतात तणनाशक फवारणी करिता गेले असता आंब्याच्या झाडाखाली बसून पंपात पाणी भरुन त्यात लागणारे औषध मिसळत असताना अपघाताने आंब्याच्या झाडावरील माकडाने उडी मारलेने सदर आंब्याचे झाडावर असलेली वाळलेली फांदी अपघाताचे तक्रारदार यांचे पतीचे हातातील ग्रामोझोनचे औषधाचे भांडेवर पडलेने सदरचे औषध तक्रारदाराचे पतीचे तोंडावर, चेह-यावर व अंगावर उडाले. तदनंतर तक्रारदार हे तोंड धुवून घरी आले. परंतु दोन दिवसांनी त्यांचे तोंडात जखम असलेचे त्यांना जाणवले व बोलता येणे बंद झाले. म्हणून त्यांना दि. 10/10/2018 रोजी सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. तदनंतर त्यांना दि. 16/10/2018 रोजी मंगलमूर्ती हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले असता दि. 20/10/2028 रोजी ते मयत झाले. त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन झाले असून त्यांचा मत्यू हा विषबाधेने झालेबाबतचा दाखला हॉस्पीटलने दिला आहे. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला. परंतु वि.प. कंपनीने त्यांचे दि. 7/08/2019 चे पत्राने तक्रारदार यांचे पतीने नशेत आत्महत्या केली या कारणावरुन विमादावा नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 10,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 19 कडे अनुक्रमे क्लेम फॉर्म, विमा पॉलिसी प्रत, तक्रारदाराचे पतीचा दाखला, मृत्यूपूर्व जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, मृत्यू दाखला, पी.एम.रिपोर्ट, तक्रारदाराचे पतीचे व तक्रारदारांचे आधार कार्ड, तक्रारदार यांचे पासबुक, रेशनकार्ड, व्हिसेरा रिपोर्ट, सी.पी.आर. हॉस्पीटल यांनी दिलेला फायनल रिपोर्ट, मंगलमूर्ती हॉस्पीटल यांनी दिलेला दाखला वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत तक्रार दाखल करणेसाठी झालेला विलंब माफ होवून मिळणेसाठी तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दाखल करतानाच विलंब माफीचा अर्ज दिलेला होता. सदर विलंब माफी अर्जातील उशिरासाठी झालेल्या कारणांचा ऊहापोह करता सदरची कारणे ही योग्य व समाधानकारक असलेने या आयोगाने तक्रारदारास तक्रार दाखल करणेस झालेला विलंब माफ केला असून विलंब माफी अर्ज मंजूर केला आहे. सबब, या आयोगाने तक्रारअर्ज दाखल करुन घेतला व वि.प. यांना नोटीस पाठविणेचे आदेश केले.
5. त्याप्रमाणे वि.प. यांनी हजर होवून सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत त्रिपक्षीय कराराची प्रत, विमा पॉलिसी तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदार यांनी हजर केलेले पोलिस पेपर पाहता तथाकथित अपघात हा दि. 8/10/2018 रोजी झालेला दिसून येतो व दि. 20/10/2018 रोजी तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू झालेला आहे. दि. 21/10/2018 रोजी पंचनामा झालेला दिसून येतो. तसेच पोस्ट मार्टेम रिपोर्ट पाहता death was due to Gramoxone poisoning (A diagnosed case) असे नमूद केलेचे दिसून येते तसेच व्हिसेरा राखीव ठेवलेला दिसून येतो. त्यामुळे Gramoxone poisoning हे नक्की कशामुळे झाले हे नमूद नाही. सदरकामी पोलिस व हॉस्पीटल येथे दिलेली माहिती ही मयत यांचे नातेवाईकांनी दिलेली आहे. सदरकामी अन्य कोणत्याही साक्षीदारांचे जबाब घेतलेचे दिसून येत नाही. सदर औषध पोटात जाऊ शकते याची कल्पना असून देखील दोन दिवस घटनेकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच सदरची दुखापत ही intentional self-injury आहे. सदरचे मयत यांचे वर्तन हे संशयास्पद असून ही आत्महत्या असू शकते. सदर कामी मृत्यूचे कोणतही ठोस कारण नमूद नाही. म्हणून वि.प यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदाराचा तक्रारअर्ज मुदतीत आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
3 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराने तक्रारअर्ज दाखल करतानाच तक्रार दाखल करणेसाठी झालेला उशिर माफ होवून मिळणेसाठी विलंब माफीचा अर्ज दिला होता. त्यातील कारणांचा ऊहापोह करुन या आयोगाने विलंब माफीचा अर्ज मंजूर केला आहे व तक्रारअर्ज दाखल करुन घेतला आहे. सबब, तक्रार अर्जास झालेला विलंब हा विलंब माफी अर्ज मंजूर केलेने मुदतीचा बाध येणार नाही.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार यांचे पती सुर्यकांत तानाजी पाटील यांचे कर्नाटक बॅंकेमध्ये बचत खाते होते. सदर बँकेमार्फत तक्रारदाराचे पतीचा वि.प. कंपीनकडे केबीएल सुरक्षा ग्रुप पर्सनल अपघात विमा योजनेअंतर्गत विमाउतरविला होता व विमा हप्ता सदर बँके खातेतून वि.प. कंपनीकडे अदा केला होत. सदरची विमा पॉलिसी पॉलसल नंबर व विमा कालवधी हा वि.प. यांना मान्य आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
9. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराने दाखल केलेला तक्रारअर्ज व सर्व कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी तोंडी युक्तिवाद त्याचप्रमाणे वि.प. ने दाखल केलेले म्हणणे, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी तोंडी युक्तिवाद यांचा साकल्याने ऊहापोह करता सदरकामी तक्रारदाराचे पती कै. सुर्यकांत तानाजी पाटील हे दि.8/10/2018 रोजी त्यांचे भोगावती महाविद्यालय भोगावती जवळ असणारे ऊस पिकास शेतात तणनाशक फवारणी करिता गेले असता आंब्याच्या झाडाखाली बसून पंपात पाणी भरुन त्यात लागणारे औषध मिसळत असताना अपघाताने आंब्याच्या झाडावरील माकडाने उडी मारलेने सदर आंब्याचे झाडावर असलेली वाळलेली फांदी अपघाताचे तक्रारदार यांचे पतीचे हातातील ग्रामोझोनचे औषधाचे भांडेवर पडलेने सदरचे औषध तक्रारदाराचे पतीचे तोंडावर, चेह-यावर व अंगावर उडाले. तदनंतर तक्रारदार हे तोंड धुवून व अंगावरील औषध धुवून घरी आले. परंतु दोन दिवसांनी त्यांचे तोंडात जखम असलेचे त्यांना जाणवले व बोलण्यास त्रास होत असलेने त्यांना दि. 10/10/2018 रोजी सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे औषधोपचारासाठी दाखल केले व तेथून पुढील उपचारासाठी दि. 16/10/2018 रोजी मंगलमूर्ती हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले असता दि. 20/10/2028 रोजी ते मयत झाले. मयत सुर्यकांत तानाजी पाटील यांचे प्रेताचे शवविच्छेदन सी.पी.आर. हॉस्पीटल येथे झाले असून तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा विषबाधेने झालेचा दाखला सी.पी.आर. हॉस्पटलने दिला असून तो याकामी दाखल आहे. सदर घटनेची नोंद सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर यांचेमार्फत करवीर पोलिस स्टेशन यांचेकडे झाली असून करवीर पोलिस यांनी घटनेचा तपास केला आहे.
10. सदर तक्रारदाराचे पती (विमाधारक) यांचा मृत्यू अपघाताने, अनावधानाने, विषबाधेने झालेबाबत माहिती तक्रारदाराने वि.प. कंपनीस दिली होती व त्यानुसार वि.प. कंपनीकडून विमा क्लेम फॉर्म मागणी करुन सदर क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या सर्व कागदपत्रांसह विमाप्रस्ताव वि.प. कंपनीकडे दाखल केला होता. परंतु वि.प. विमा कंपनीने दि. 7/08/2019 रोजीचे पत्राने तक्रारदारचे पतीने नशेत आत्महत्या केली असून अपघाती मृत्यू नाही असे कारण देवून नाकारलेचे वि.प. च्या नमूद पत्रावरुन स्पष्ट होते. परंतु तक्रारदाराचे पतीने आत्महत्या केली याबाबत वि.प. ने कोणताही ठोस व सबळ पुरावा याकामी दाखल केलेला नाही. सबळ पुरावा नसतानाही तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारणे ही सेवात्रुटीच आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
1. सदर तक्रारअर्जातील दाखल कागदपत्रांचा ऊहापोह करता तक्रारदाराचे पतीची Personal Accident Policy केबीएल सुरक्षा ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट विमा स्कीमप्रमाणे रक्कम रु.10,00,000/- विमा रकमेची असलेली विमा पॉलिसी होती हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराचे पती मयत सुर्यकांत तानाजी पाटील यांनी दि. 16/10/2018 रोजी मंगलमूर्ती हॉस्पीटल, कोल्हापूर यांचे हॉस्पीटलमध्ये पोलिस निरिक्षक, करवीर पोलिस ठाणे यांचेसमोर दिलेल्या जबाबाचे अवलोकन करता दि. 8/10/2018 रोजी तक्रारदाराचे पती सुर्यकांत पाटील हे त्यांचे ऊसाचे शेतात तणनाशक ग्रामोझोन फवारणी करणेसाठी गेले असता आंब्याच्या झाडाखाली औषध फवारणी पंपात पाणी घालून त्यात तणनाशक ग्रामोझोन औषध मोजमापाने घेवून मिसळत असताना आंब्याच्या झाडावरुन माकडाने अचानक उडी मारल्याने झाडाची वाळलेली फांदी तक्रारदाराचे पती सुर्यकांत पाटील यांचे हातावर व तणनाशक असलेल्या भांडयावर पडलेने हातातील तणनाशक औषध तक्रारदाराचे पतीच्या तोंडावर व चेह-यावर तसेच कमरेखालील भागावर लघवीच्या जागेवर उडाले. त्यानंतर तक्रारदाराचे पतीने पाण्याने तोंड धुवून तसेच अंगावर पडलेले औषध धुतले व घरी आले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे तोंडात जखम झालेचे त्यांना जाणवले व बोलण्यास त्रास होवू लागला. त्यावेळी तक्रारदाराचे पतीला तणनाशक पोटात गेले असावे अशी जाणीव झाली व त्यांना विनायक विष्णू पाटील याने दि. 10/10/2018 रोजी सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. नंतर पुढील उपचाराकरिता तक्रारदाराचे पतीस दि. 16/10/2018 रोजी मंमलमूर्ती हॉस्पीटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर येथे दाखल केले. तेथे औषधोपचार चालू केलेनंतर तक्रारदाराचे पतीला थोडे थोडे बोलता येवू लागले व रात्री 8.30 वाजता तक्रारदाराचे पती सुर्यकांत पाटील यांनी पूर्ण शुध्दीत असताना जबाब दिला व सदरचा प्रकार हा अनावधानाने घडला असून कोणाबद्दल तक्रार नसलेबाबतचा जबाबदार तक्रारदाराचे पतीने दिला असून त्यावर विमाधारक (तक्रारदाराचे पती) सुर्यकांत पाटील यांची व पोलिस निरिक्षक करवीर पोलिस ठाणे यांच्या सहया आहे. तसेच याकामी दाखल केले कागदपत्रांतील घटनास्थळ प्रचनामा, Cause of Death Certificate तसेच P.M. Report वगैरे कागदपत्रांचे तसेच तक्रारदाराने दाखल केलेला अ समरी रिपोर्ट/उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालय, करवीर विभाग, कोल्हापूर यांनी दिले मयत समरी आदेश यानुसार सदर आदेशात अ.क्र.43 ला तक्रारदाराचे पती सुर्यकांत तानाजी पाटील रा. कुरुकली ता.करवीर जि. कोल्हापूर यांचे नावाची नोंद असून त्यांच्या मृत्यूचे कारण ग्रामोझोन नावाचे विषारी औषध फवारणीकरिता मिक्स करत असताना ते अपघाताने तोंडात गेलेने तसेच कमरेच्या खाली जांघेत पडून मयत असे कारण दिले आहे.
12. वरील सर्व बाबींचा साकल्याने ऊहापोह करता तक्रारदाराचे पती विमाधारक सुर्यकांत तानाजी पाटील हे अपघाताने तणनाशक ग्रामोझोन हे तोंडात, चेह-यावर तसेच अंगावर पडल्याने मयत झाले आहेत ही बाब स्पष्टपणे सिध्द होते.
13. याउलट वि.प. ने तक्रारदाराने पतीने नशेत आत्महत्या केलेचा बचाव सबळ पुराव्यासह सिध्द केलेला नाही. सबब, वि.प यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमादावा नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
14. सबब, तक्रारदार हे वि.प. कडून रक्कम रु. 10,00,000/- विमाक्लेमपोटी मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 10,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.