न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पतीचे नांवे शेतजमीन असून त्यांचे शेतजमीनीचे खाते नं. 2196 आहे. तक्रारदार यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. तक्रारदार यांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांचे पती कै. कृष्णात धोंडीराम हराळे हे दि. 18/01/2020 रोजी शेळया मेंढया चारण्याकरिता रानात गेले होते. सायंकाळी 4.30 वाजणेचे सुमारास ते झाडावर चढून झाडाचा पाला तोडून शेळयांना खाण्याकरिता टाकत असताना अपघाताने व अनावधानाने पाय घसरुन खाली पडले. त्यावेळी ते जखमी झालेने त्यांना अशोका हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. तेथून पुढे त्यांना सी.पी.आर.हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. परंतु दि. 24/01/2020 रोजी ते मयत झाले. तदनंतर त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले असून डॉक्टरांनी तक्रारदारांचे पतीचा मृत्यू हा डोकीस मार लागल्यामुळे झाले असलेचा दाखला दिलेला आहे. तदनंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, करवीर यांचेमार्फत दाखल करणेचा प्रयत्न केला असता त्यांनी सदर प्रस्तावात त्रुटी काढून प्रस्ताव स्वीकारणेस नकार दिला. म्हणून तक्रारदाराने दि. 18/2/2021 रोजी विमा प्रस्ताव वि.प. कंपनीकडे रजि.पोस्टाने पाठवून दिला. परंतु सदरचा प्रस्ताव वि.प. यांनी त्याची दखल न घेता सदाचा प्रस्ताव हा दि. 4/3/2021 रोजी तक्रारदारास परत पाठवून दिला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 22 कडे अनुक्रमे वि.प. कंपनीस दिलेले पत्र, विमा प्रस्तावासोबत दिलेली कागदयादी, विमाक्लेम फॉर्म भाग 1, शेतजमीनीचा 7/12 व 8अ उतारा, जुनी डायरी उतारा, वारसा डायरी, घोषणापत्र, मयताचा दाखला, सदाशिव हराळे यांचा जबाब, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मयताचे व तक्रारदारांचे आधारकार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, वि.प. कंपनीने प्रस्ताव परत पाठविलेला लखोटा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट तसेच त्रिपक्षीय करार, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदाराने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये मयताची कारणे वेगवेगळी असल्याकारणाने सदर प्रस्तावामध्ये विसंगती आहे. त्यामुळे तक्रारदाराचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही असे सांगून तक्रारदाराचा प्रस्ताव स्वीकारलेला दिसून येत नाही. सदर प्रस्तावाची कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे मिळालेची नोंद वि.प. यांचेकडे नाही.
iv) तक्रारदारांनी हजर केलेले पोलिस पेपर्स पाहता सदरचा अपघात हा बांधकाम करताना पडून झाला आहे असे नमूद आहे. सदरच्या कागदपत्रांमध्ये मयताची कारणे वेगवेगळी असल्याकारणाने मृत्यूच्या कारणांमध्ये विसंगती आहे. सदर अपघात हा विमाधारक यांचे चुकीमुळे झालेला आहे. सदरचे विमाधारक यांचे वर्तन हे विमा पॉलिसी कलम 2 म्हणजे स्वतःहून ओढवून घेतलेली दुखापत या अटीचा भंग झालेने तक्रारदार हे या योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करीत होते. त्यांचे नावे शेतजमीन असून त्याचा खाते क्र.2196 असा आहे. तक्रारदार यांचे पती शंकर विष्णू चौगले यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदारांनी हजर केलेले पोलिस पेपर्स पाहता सदरचा अपघात हा बांधकाम करताना पडून झाला आहे असे नमूद आहे. सदरच्या कागदपत्रांमध्ये मयताची कारणे वेगवेगळी असल्याकारणाने मृत्यूच्या कारणांमध्ये विसंगती आहे. सदर अपघात हा विमाधारक यांचे चुकीमुळे झालेला आहे. सदरचे विमाधारक यांचे वर्तन हे विमा पॉलिसी कलम 2 म्हणजे स्वतःहून ओढवून घेतलेली दुखापत या अटीचा भंग झालेने तक्रारदार हे या योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत असे वि.प. यांनी कथन केले आहे.
8. सदरकामी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाताने झाले जखमांमुळे (डोळयास तार लागलेने) झालेला आहे हे स्पष्ट होते. मयताचे नावे 7/12 उतारा दाखल आहे. सदर 7/12 उतारा, 8अ उतारा, 6ड व 6क उतारा वगैरे उता-यावर मयताचे नावाची नोंद आहे. मयताचे नावे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडले आहे. दाखल सर्व कागदपत्रांवरुन मयत कृष्णात हराळे यांचा मृत्यू अपघाताने झाले जखमांमुळे झालेचे स्पष्ट होते. पी.एम.रिपोर्ट मध्येही मृत्यूचे कारण Head Injury असे नमूद आहे. पोलिस पेपर्स पाहता मयत झाडावर झाडाचा पाला, डहाळे काढणेसाठी चढला असताना अनावधानाने पडला व जखमी झाला असे स्पष्ट होते. म्हणजेच तक्रारदाराचे पती हे अपघाताने मयत झाले हे स्पष्ट होते. वि.प. यांनी सदर अपघात हा विमाधारक यांचे चुकीमुळे झालेला आहे व विमाधारकाने विमा पॉलिसीचे कलम 2 म्हणजे स्वतःहून ओढवून घेतलेली दुखापत, या अटीचा भंग केलेला आहे, ही बाब ठोस पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम मंजूर न करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. सबब, तक्रारदार हे नमूद विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.