न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती कै.दिपक प्रकाश ससाणे हे वाहन अपघातामध्ये मयत झालेले आहेत. तक्रारदार यांचे पती हे शेती व्यवसाय करीत होते. मौजे आरदाळ या गावी भूमापन गट क्र.47 ही जमीन मिळकत तक्रारदार यांचे पतीचे नावे आहे. तक्रारदारांचे नावे शेती असलेमुळे महाराष्ट्र शासन दुग्ध व्यवसाय विकास व पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येत आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्या पतीचा विमा वि.प. कंपनी यांचेकडे उतरविलेला आहे. तक्रारदार यांचे पती ता. 7/2/2020 रोजी कार क्र. एम.एच.02-एक्यु-6754 व स्कूटी यांची धडक झालेमुळे मयत झाले असून त्यांचा मृत्यू Septicaemia in a case of multiple injuries या कारणामुळे झाला आहे. म्हणून तक्रारदार यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेचा लाभ घेणेसाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे दि.6/7/20 रोजी प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावासोबत तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रे जोडून सदरचा प्रस्ताव वि.प. यांचेकडे मुदतीत सादर केलेला होता. परंतु वि.प. यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव मंजूर आहे किंवा नाही, याबाबत आजतागायत कळविलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केलेने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांना विमा क्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- मिळावेत व सदर रकमेवर 15 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.20,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत क्लेम फॉर्म, 7/12 उतारा, गाव नमुना 6क उतारा, वारसा डायरी, मृत्यू दाखला, हनुमंत तारी यांचा जबाब, पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मयताचा शाळा सोडलेचा दाखला, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोचपावती व तक्रारदाराचे आधार कार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच कागदयादीसोबत तपास टिपण, शासन निर्णय यांच्या प्रती दाखल केल्या आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सदरकामी तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व हजर केलेले पोलीस पेपर्स पाहता मयत श्री दिपक ससाणे हे दि 7/2/20 रोजी कार क्र. एम.एच.02-एक्यु-6754 व स्कूटी यांची धडक झालेमुळे मयत झाले असून तदनंतर उपचरादरम्यान श्री दिपक ससाणे यांचे 19/2/20 रोजी निधन झाले आहे. पोलिस पेपर्स पाहता मोटरसायकलवर गुन्हा नोंद झालेला आहे. सदर अपघातात मोटरसायकल चालविणा-याची चूक आहे. तसेच विमाधारक यांचा वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. योजनेअंतर्गत अटीनुसार शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल तर व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रसंगी वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील. सदर कामी वाहन धारकाचा वाहन चालविणेचा परवाना नसल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी म्हणणे व शपथपत्र हाच वि.प. यांचा पुरावा म्हणून वाचण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली असून विम्याबाबत झालेल्या त्रिपक्षीय कराराची प्रत व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार यांचे पती कै.दिपक प्रकाश ससाणे हे वाहन अपघातामध्ये मयत झालेले आहेत. तक्रारदार यांचे पती हे शेती व्यवसाय करीत होते. मौजे आरदाळ या गावी भूमापन गट क्र.47 ही जमीन मिळकत तक्रारदार यांचे पतीचे नावे आहे. तक्रारदारांचे नावे शेती असलेमुळे महाराष्ट्र शासन दुग्ध व्यवसाय विकास व पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येत आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्या पतीचा विमा वि.प. कंपनी यांचेकडे उतरविलेला असून सदरची पॉलिसी वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांच्या पतीचे ता. 7/2/2020 रोजी कार क्र. एम.एच.02-एक्यु-6754 व स्कूटी यांची धडक झालेमुळे मयत झाले असून त्यांचा मृत्यू Septicaemia in a case of multiple injuries या कारणामुळे झाला आहे. तक्रारदार यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेचा लाभ घेणेसाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे दि.6/7/20 रोजी प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावासोबत तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रे जोडून सदरचा प्रस्ताव वि.प. यांचेकडे मुदतीत सादर केलेला होता. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दि.6/7/2020 रोजी क्लेम प्रस्ताव दाखल केलेला असताना देखील वि.प. यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव मंजूर आहे किंवा नाही, याबाबत आजतागायत कळविलेले नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना वि.प. विमा कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेपासून 21 दिवसांच्या आत कळविणे बंधनकारक असताना देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर विमा प्रस्तावाबाबत आजतागायत काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.1 ला ता. 6/7/2020 रोजीचा क्लेम फॉर्म दाखल केलेला असून अ.क्र. 2 ला तक्रारदार यांच्या मयत पतींचा भूमापन गट क्र. 47 चा सातबारा उतारा, गाव नमुना 6क, वारसा डायरी, तसेच मृत्यू दाखला इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. प्रस्तुतकामी वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदार यांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली असून सदरकामी तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व हजर केलेले पोलीस पेपर्स पाहता मयत श्री दिपक ससाणे हे दि 7/2/20 रोजी कार क्र. एम.एच.02-एक्यु-6754 व स्कूटी यांची धडक झालेमुळे मयत झाले असून तदनंतर उपचरादरम्यान श्री दिपक ससाणे यांचे 19/2/20 रोजी निधन झाले आहे. पोलिस पेपर्स पाहता मोटरसायकलवर गुन्हा नोंद झालेला आहे. सदर अपघातात मोटरसायकल चालविणा-याची चूक आहे. तसेच विमाधारक यांचा वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. योजनेअंतर्गत अटीनुसार शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल तर व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रसंगी वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील. सदर कामी वाहन धारकाचा वाहन चालविणेचा परवाना नसल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले आहे.
8. सदर मुद्याच्या अनुषंगाने प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हनुमान सत्यवान तारी यांच्या जबाबाचे अवलोकन करता
आज दि.9/2/20 रोजी सायंकाळी 7 वाजून 15 चे सुमारास आजरा उत्तूर रोडवर आर्दाळ गावच्या हदीत ओढयाचे पुढे माझी अल्टो कार नं. एमएच-02/एक्यु-6754 घेवून जात असताना उत्तूरकडून येणारी गुलाबी रंगाचे पेप्ट स्कूटीवरील चालक स्कूटीवर देान इसमांना बसवून घेवून भरधाव वेगात हयगयीने, निष्काळजीपणाने चालवून आमच्या बाजूला येवून माझे आल्टो कारला उजव्या बाजूस धडक देवून अपघात करुन मला जखमी केले व स्वतः तसेच स्कूटीवर एका इसमास गंभीर जखमी केले आहे म्हणून माझी पेप्ट स्कूटी चालकाविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. तरी तपास व्हावा.
असा जबाब दाखल असून वि.प. यांनी त्याअनुषंगाने ता. 10/2/2022 रोजीचे तपास टिपण दाखल केले असून सदरच्या तपास टिपणाचे अवलोकन करता,
त्यानंतर मला लोकांचेकडून स्कूटी चालकाचे नांव दयानंद दौलत ससाणे असे असल्याचे व त्याचे पाठीमागे बसलेल्यांची नांवे दिपक प्रकाश ससाणे, महेश गणपत नाईक सर्व रा. आर्दाळ ता. आजरा असे असलेचे समजले असून स्कूटीचालक दयानंद दौलत ससाणे यांच्या चुकीमुळे सदरचा अपघात झालेला आहे
असे नमूद आहे.
सबब, सदरच्या कागदपत्रांवरुन तक्रारदार यांचे पती ज्या स्कूटी गाडीवरुन प्रवास करीत होते, त्या गाडीच्या चालकाचे नाव दयानंद ससाणे असे दिसून येते. तसेच तक्रारदार यांचे पती स्कूटी गाडीवर पाठीमागचे बाजूस बसलेचे देखील दिसून येते. त्यामुळे सदरचा अपघात हा तक्रारदार यांच्या पतीच्या चुकीमुळे घडलेला नाही ही बाब सिध्द होते. सबब, वि.प. यांच्या म्हणण्यामध्ये सदर योजनेअंतर्गत शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे असे नमूद केले आहे. तथापि सदरकामी तक्रारदारांचे मयत पती हे सदरचे वाहन स्वतः चालवित नव्हते ही बाब सिध्द होत असून तक्रारदार यांच्या पतीच्या विरुध्द कोणतीही तक्रार दाखल नाही. त्याकारणाने वि.प. यांची सदरची कथने ही हे आयोग विचारात घेत नाही. तथापि, तक्रारदार यांनी दाखल केलेला ता. 7/2/21 रोजीचा पंचनामा तसेच मरणोत्तर पंचनामा यावरुन तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू हा अपघाती असून Septicaemia in a case of multiple injuries या कारणाने झालेला आहे ही बाब सिध्द होते.
9. वि.प. यांनी त्यांच्या लेखी युक्तिवादामध्ये सदर मोटरसायकलचे रजिस्टर्ड सर्टिफिकेट पाहता सदर वाहनाची प्रवासी संख्या 2 असताना सदर वाहनामध्ये बेकायदेशीररित्या क्षमेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते असे दिसून येते. विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला असता तो कंपनीच्या अटी व शर्तीचा भंग असे कायद्याने मानले जाते. त्याकारणाने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत असे कथन केलेले आहे. सदर मुद्याच्या अनुषंगाने दाखल कागदपत्रांवरुन सदर स्कूटीवर अपघातासमयी प्रवास करणा-या तिघांना उपचारासाठी पाठविले होते ही बाब दिसून येते. त्याकारणाने तक्रारदार यांचे मयत पतीने पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला असला तरी तक्रारदार ही नॉन स्टँडर्ड बेसीसवर तक्रारदार यांच्या पतीचा अपघाती मृत्यू असलेमुळे 75 टक्के विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्याअनुषंगाने हे आयोग पुढील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
Amalendu Sahoo Vs. Oriental Insurance Co.
Suprme Court dated 25th March 2010
It has been held that in case of violation of condition of policy as to the nature of use of vehicle, the claim ought to be settled on a non-standard basis. The said decision of the policy, the appellant in insurance company ought to have settled the claim on non-standard basis. In Nitin Khandelwal the state commission allowed 75% of the claim of the claimant on non-standard basis. The said order was upheld by the National Commission and this court refused to interfere with the decision of the National Commission.
सबब वि.प. विमा कपंनी यांनी मार्गदर्शक सूचनेप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेपासून 21 दिवसांत तक्रारदार यांना सदरचा प्रस्ताव मंजूर आहे किंवा नाही हे कळविणे बंधनकारक असताना देखील पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदार यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला असताना देखील तक्रारदार यांना सदरच्या क्लेमबाबत काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा क्लेम रक्कम रु.2,00,000/- चे 75 टक्के प्रमाणे होणारी रक्कम रु.1,50,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 15/11/21 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
11. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा तक्रारदार यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु. 2 लाखच्या 75 टक्के प्रमाणे होणारी रक्कम रु. 1,50,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 15/11/21 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|