न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचे पती मारुती गणपती चौगुले हे शेतकरी होते व त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेी होती व आहे. सदर पॉलिसीच्या कालावधीतच तक्रारदार यांचे पती मारुती गणपती चौगुले यांचा जिन्यावरुन तोल जावून खाली पडल्यामुळे डोक्यास मोठी दुखापत झाली व डोक्यास अंतर्गत जबर मार लागून अपघाती मृत्यू झाला. त्याबाबत तक्रारदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वि.प. विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म दाखल केला असता वि.प. विमा कंपनीने चुकीच्या कारणास्तव तक्रारदार यांचा न्याययोग्य क्लेम नाकारला आहे व तक्रारदार यांना द्यावयाचे सेवे त्रुटी केली आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. विमा कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर विस्तारलेले असून कंपनीचे कोल्हापूर येथे स्थानिक कार्यालय आहे. तक्रारदार यांचे पती मयत मारुती गणपती चौगुले हे शेतकरी होते व त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” या कल्याणकारी विमा योजेनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेली होती. सदर पॉलिसीचा क्र. 3317/60662423/00/000 असा होता. सदरचे पॉलिसीचे कालावधीतच म्हणजेच दि. 25/3/2020 रोजी तक्रारदार यांचे पती मारुती गणपती चौगुले हे जिन्यावरुन तोल जावून खाली पडलेमुळे त्यांचे डोक्यास मोठी दुखापत झाली. यास्तव त्यांना लगेचच वाठार येथील दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांचे सांगण्यावरुन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे तातडीने नेणेत आले. मात्र औषधोपचार सुरु असताना तक्रारदार यांचे पतीचे निधन झाले. याबाबत पोलिसांनी प्रेताचा इंक्वेस्ट पंचनामा केलेला आहे व शासकीय रुग्णालयाने शवपरिक्षा करुन Death due to Head injury असे अपघात मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद करुन पोस्टमार्टेम अहवाल दिलेला आहे. तदनंतर सर्व त्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदार महिलेने विहित पध्दतीने कृषी कार्यालयामार्फत सदरचा क्लेम वि.प. विमा कंपनीकडे दाखल केलेला आहे. मात्र दि. 19/11/2020 रोजीच्या पत्राद्वारे विमाधारक यांचा मृत्यू चक्कर येवून पाय-यांवरुन पडून झाला आहे व योजनेच्या अटीनुसार अपघाती मृत्यू म्हणजेच शारिरिक दुखापतीमुळे होणारा मृत्यू म्हणजेच थेट किंवा स्वतंत्रपणे उद्भवलेल्या आजाराशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे किंवा अशा जखमांसाठी वैद्यकीय किंवा शल्यक्रिया उपचार आवश्यक असतात, अशा अपघाताच्या तारखेपासून 12 महिन्यांचे आत विमाधारकाचा मृत्यू असे अत्यंत विपर्यास्त व चुकीचे कारण देवून क्लेम नाकारला आहे. तक्रारदार यांचे पतीस यापूर्वी कोणताही आजार अथवा औषधोपचार सुरु नव्हते. त्यांची प्रकृती पूर्णतः चांगली होती. मात्र वि.प. विमा कंपनीने वर नमूद क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलली आहे. याकरिता तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडून क्लेमची रक्कम रु.2 लाख व दि. 25/3/2020 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होवून मिळणेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने सदरचा विमा दावा मंजूर करणेसाठी कथन केलेले आहे. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- इतका मागितलेला आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, मयताचा नावचा सातबारा व 8-अ उतारा, सदाशिव चौगुले यांचा जबाब, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू कारणाचे प्रमाणपत्र, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 नुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. विमा कंपनीस आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दाखल केले. त्यांचे कथनानुसार पॉलिसीबाबतचा मजकूर हा अंशतः बरोबर आहे. सदरच्या पॉलिसीला नियमावलीप्रमाणे अटी व शर्ती लागू आहेत व सदरचा मजकूर शाबीत करणेची जबाबदारी तक्रारदार यांची आहे. सदरचे कामी तक्रारदार यांनी आजतागायत एफ.आय.आर. हजर केलेला दिसून येत नाही. तसेच दाखल केलेले पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदनासाठी पाठवावयाचा पोलिस अहवाल इ. पेपर्स पाहता सदर कामातील तक्रारदार यांचे पती मारुती गणपती चौगुले हे चक्कर येवून पडल्याचे दिसून येत आहे. तसेच सदर कामातील विमा पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार विमाधारक यांचा मृत्यू पाय-यांवरुन पडल्यामुळे झाला आहे व अपघाती मृत्यू म्हणजे शारिरिक दुखापतीमुळे होणारा मृत्यू म्हणजेच थेट किंवा स्वतंत्रपणे उद्भवलेल्या आजाराशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे किंवा अशा जखमांसाठी वैद्यकीय किंवा शल्यक्रिया उपचार आवश्यक असतात, अशा अपघाताच्या तारखेपासून 12 महिन्यांचे आत विमाधारकाचा मृत्यू या अटीनुसार सदरचा मृत्यू हा अपघाती मृत्यू नसलेने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. सबब, कोणतीही त्रुटी ठेवणेचा प्रश्नच उद्भवत नाही. याकरिता सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी या संदर्भात त्रिपक्षीय करार, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांचे पती मयत मारुती गणपती चौगुले हे शेतकरी होते व त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे ”गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” या कल्याणकारी विमा योजेनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेली होती. सदर पॉलिसीचा क्र. 3317/60662423/00/000 असा होता. याबाबत उभय पक्षांमध्ये उजर नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी वर नमूद विमा पॉलिसी वि.प. विमा कंपनीकडे उतरविली आहे यामध्ये उभय पक्षांमध्ये वादाचा मुद्दा नाही. मात्र तक्रारदार यांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू नाही या कारणास्तव वि.प. विमा कंपनीने सदरचा विमादावा नाकारलेला आहे. वि.प. विमा कंपनीचे कथनाप्रमाणे विमाधारक यांचा मृत्यू हा चक्कर येवून पाय-यांवरुन पडल्यामुळे झाला आहे. विमा धारक यांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू नाही. सबब, सदरचा अपघाती मृत्यू नसलेकारणाने तक्रारदार हे विमा दावा मिळणेस पात्र नाहीत. सदरचा विमादावा हा वि.प. विमा कंपनीचे अटी शर्तीमध्ये बसत नाही. मात्र यांनी तक्रारअर्जाचे कामी काही महत्वाची कागदपत्रे दाखल केली आहेत, जसे की, “सदाशिव गणपती चौगुले” यांचा जबाब, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, मृत्यू कारणाचे प्रमाणपत्र व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 नुसार अप्राकृतिक मृत्यू (अनैसर्गिक मृत्यूची नोंद) अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचे पतीस मृत्यू पूर्वी कोणताही आजार अथवा औषधोपचार सुरु होते अशी कोणतीही कागदपत्रे या आयोगासमोर दाखल केलेली नाहीत व तक्रारदार यांनीही आपल्या युक्तिवादामध्ये तक्रारदार यांचे पतीस मृत्यूपूर्वी कोणताही आजार नव्हता, ते पूर्णतः ठणठणीत व चांगले होते असे स्पष्ट कथन केले आहे व दाखल कागदपत्रांवरुनही तक्रारदार यांना कोणताही आजार असल्याची बाब शाबीत होत नाही. सबब, दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता कागदपत्रांत तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा अपघाती असल्याची बाबच स्पष्टपणे नमूद आहे व या वर हे आयोग ठाम आहे. तक्रारदार यांनी सदाशिव गणपती चौगुले यांचा दि. 1/6/2020 रोजीचा जबाब दाखल केलेला आहे. यावरुनही जिन्यावरुन जात असताना त्यांचा तोल जावून ते खाली पडले व त्यांचे डोक्यास मोठी दुखापत झालेने त्यांना सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे अॅडमिट केले असे स्पष्ट कथन केले आहे. तसेच तक्रारदार यांनी दाखल केले विमाधारकाचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टवरुन Death due to Head injury असे स्पष्ट नमूद आहे. वर नमूद कारणांचा विचार करता तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, तक्रारदार यांचा विमादावा अपघाती असले कारणाने मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. या कारणास्तव तक्रारदार यांनी मागितलेली विमादाव्यापोटीची रक्कम रु. 2 लाख तक्रारदार यांना देण्याचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर विमा दावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात. तसेच तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम मागितलेली रक्कम रु.50,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 2,00,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर विमा दावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.