पारित द्वारा मा रायपुरे. सरिता बी ., सदस्या,
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-अंतिम आदेश
( पारित दिनांक 31/01/2023)
1. तक्रारकर्ता क्रमांक 1 ने त्याच्या आईच्या अपघाती मृत्युमुळे “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा” योजनेनुसार नुकसान भरपाई मिळण्याबाबत विमा दावा विरूध्द पक्ष क्र. 3 कडे दाखल करूनही विमा कंपनीने दावा मंजुर अथवा नांमजुर काहीही कळविले नाही करिता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 35 अन्वये दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. तक्रारकर्ता क्रमांक 2 च्या मालकीची मौजा-पलखेडा, तालुका-गोरेगाव, जिल्हा- गोंदिया येथे भूमापन क्रमाक 321 या वर्णनाची शेतीजमीन आहे. तक्रारकर्ता क्रमांक 2 हा शेतीचा व्यवसाय करीत आहे व शेतीतील उत्पन्नावर कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनी असून विरूध्द पक्ष क्र. 3 तर्फे अर्जदाराकडून दाखल झालेल्या विमा प्रस्तावाची व त्यासोबत असलेल्या कागदपत्रांची शहानिशा करून सर्व विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्र. 1 कडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे मंजूर करण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्ता क्रमांक 1 ची आई व तक्रारकर्ता क्रमांक 2 ची पत्नी श्रीमती. पुष्पा छगनलाल पटले यांचा मृत्यु दिनांक 13/10/2021 रोजी विहीरीत पाय घसरून पडून व बुडून झाला. तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या आईचा व तक्रारकर्ता क्रमांक 2 च्या पत्नीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत समावेश असल्याने व तक्रारकर्ता क्रमांक 2 ने स्वत:ची मन:स्थिती ठीक नसल्याने तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या मार्फत अपघाती मृत्युनंतर विम्याची रक्कम मिळण्याकरीता विरूध्द पक्ष क्रमाक 3 कडे दिनांक 26/05/2022 रोजी अर्ज सादर केला तसेच विरूध्द पक्षाने वेळोवेळी जे दस्ताऐवजाची मागणी केली त्याची पुर्तता केली. तक्रारकर्त्याने विमा अर्ज व आवश्यक दस्ताऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने तक्रारकर्त्यास आईच्या दाव्याबाबत मंजूर अथवा नामंजूर काहीही कळविले नाही. विरूध्द पक्षाची सदर कृती ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रृटी असल्यामुळे तक्रारकर्त्याने विद्यमान न्याय आयोगाच्या अधिकार क्षेत्रात विमा दाव्याची नुकसान भरपाई रक्कम रू 2,00,000/- व्याजासह मिळावे तसेच दाव्याची रक्कम न दिल्याने तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 20,000/-मिळण्यासाठी सदर तक्रार दाखल केली आहे.
5. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान आयोगाने दिनांक 23/11/2022 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्षांना आयोगामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्षांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपआपला लेखी जबाब दाखल केला.
6. विरूध्द पक्ष क्र. 1व 2 तर्फे अधिवक्ता श्री.एम.बी. रामटेके यांनी आपला लेखी जबाब दिनांक 19/01/2023 रोजी आयोगात दाखल केला. विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या तक्रारिचे परिच्छेद निहाय कथन अमान्य केले असून आपल्या लेखी जबाबातआपल्या लेखी जबाबात प्राथमिक तथ्य (Preliminary facts ) दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की , त्यात विरूध्द पक्षाने म्हटले आहे की तक्रारकर्तीने सदर तक्रारीत तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 21/09/2021 रोजी विहीरीत पाय घसरून पडुन व बुडुन झाला. पंरतू विमाधारकाच्या मृत्युचे मुख्य कारण काय आहे हे स्पष्ट केलेले नाही. तसेच पोलिस दस्तऐवजवरून दिसुन येते की, विमाधारकाने स्व:ता विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली आहे परंतु तक्रारकर्ते ही खरी घटना लपवित आहे. त्रिपक्षीय करारातील Exclusion clause III (1) नुसार आत्महत्या किंवा आत्महत्येसाठी केलेला प्रयत्न यांमुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्त्यांना विम्याची रक्कम देय नाही. तक्रारकर्ते खरी घटना लपवित आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्त्यास विम्याची रक्कम देय नाही. करिता तक्रारकर्त्यांची तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
7. तक्रारकर्त्यांचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच उभय पक्षांच्या अधिवक्त्यांनी केलेला मौखीक युक्तीवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | निःष्कर्ष |
1. | विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ने तक्रारकर्त्यास सेवा देण्यात त्रृटी केली आहे का ? | होय |
2. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे का ? | होय. |
3. | तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसे प्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 बाबत ः-
8. तक्रारकर्त्यांनी सदरच्या तक्रारीमध्ये दाखल केलेले दस्तऐवज गाव नमुना सात बारा उतारा, गाव नमुना आठ-अ, फेरफार नोंदवही, गाव नमुना सहा-क, ईत्यादी दस्तऐवजावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्ता क्रमांक 2 हे शेतकरी होते आणि त्यांच्या नावाने भुमापन क्र. 321 या वर्णनाची शेतजमीन आहे. तक्रारकर्ता क्रं. 2 च्या पत्नीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 हे मृतक विमाधारकाचे वारसदार म्हणुन विम्याचा लाभ मिळविण्यास पात्र आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी त्याच्या लेखी जबाबामध्ये आक्षेप घेतला आहे की, पोलिस दस्तऐवजवरून दिसुन येते की, विमाधारकाने स्व:ता विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली आहे. त्यामुळे हा अपघात नसून आत्महत्या आहे. करीता तक्रारकर्त्यास विम्याचा लाभ मिळणार नाही याविषयी आयोगाचे स्पष्ट मत असे आहे की, पोलीस दस्तऐवजामध्ये विमाधारकाचा मृत्यु विहीरीत पाय घसरून पडुन व बुडुन झाला असे नमूद केलेले आहे तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्युचे कारण पाण्यात बुडुन असे नमूद आहे. विमाधारकाने स्व:ता आत्महत्या केली असा कुठेही उल्लेख नाही. तक्रारकर्तीच्या तक्रारकर्ता क्र. 1 च्या आईया मृत्यु मृत्यु हा “self inflicted injury” आहे हे विरूध्द पक्ष हे सिध्द करू शकले नाही. विरूध्द पक्षाने आपली जबाबदारी योग्यरित्या न बजावून तक्रारकर्त्यास सेवा देण्यात त्रुटी केली आहे असे निदर्शनास येते करिता तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 मृतकाचे वारसदार या नात्याने “ लाभार्थी ” म्हणुन विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहे. करिता मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. .
9. याकरीता आयोगाने खालील न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
i) IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”
सदर प्रकरणात मा. राष्टीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्याचे कायद्दा नुसार भक्कम पुरावा आहे असे म्हणता येणार नसल्याने पोलीसांचे दस्तऐवजाचा विरूध्द पक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
सदरहु घटना अपघात नसून आत्महत्या केल्याचे जे विरूध्द विरूध्द पक्ष विमा कंपनीचे म्हणणे आहे व त्या कारणास्तव त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला, त्यासंबधात त्यांनी कोणताही भरभक्कम पुरावा (Substantial & Cogent evidence) आयोगा समक्ष दाखल केलेला नसल्याने केवळ पोलीस दस्तऐवजाचे आधारे मृतकाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला, तो चुकीचा असल्याचे दिसुन येते. विरूध्द पक्ष विमा कंपनीने त्याचे जवळ कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना मृतकाने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढुन विनाकारण तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केल्याने त्यांनी तक्रारकर्त्यांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
उपरोक्त न्यायनिवाडे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीशी सुसंगत असल्यामुळे तक्रारकर्ता हा खालील आरेशानुसार शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळविण्यास पात्र आहे.
10. वरील चर्चेनुरूप व निःष्कर्षावरून मा. आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
:: अंतिम आदेश :ः
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या मृतक आईच्या शेतकरी अपघात विम्याची रक्कम रू. 2,00,000/ (अक्षरी रूपये दोन लाख फक्त) द्यावे आणि या रक्कमेवर तक्रार नोंदणीकृत केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 01/11/2022 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्यास अदा करेपर्यंत द. सा. द. शे 15% व्याजदराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रू.10,000/-(अक्षरी रूपये दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रू. 5,000/- (अक्षरी रूपये पाच हजार फक्त) द्यावे.
4. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनी यांना असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी अंतिम आदेशामध्ये नमूद आदेशित रकमा शेतक-याच्या / वारसदाराच्या आधार लिंकड बॅंक खात्यात डी.बी.टी. / ईसीएस/ आरटीजीएस ने डायरेक्ट जमा कराव्यात.
5. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी सदर आदेशाचे अनुपालन त्यांना निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र. 2 व 3 चे पालन 30 दिवसांत न केल्यास द. सा. द. शे 18% टक्के व्याज देय राहिल.
6. निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यांत याव्यात.
7. प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्त्यांना परत करण्यांत याव्यात.