न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती कै. सिद्राम कृष्णा पाटील मयत होणेपूर्वी शेती हा व्यवसाय करीत होते. तक्रारदार यांचे पतीचे नावे शेतजमीन आहे. तक्रारदार यांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. तक्रारदार यांचे पती कै. सिद्राम कृष्णा पाटील हे दि. 14/10/2020 रोजी वाहन अपघातामध्ये मयत झालेले आहेत. तक्रारदाराचे पती हे गाडी चालवत असताना गाडी स्लीप झालेमुळे अपघात होवून ते मयत झाले आहेत. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे विमा प्रस्ताव सादर केला. परंतु तक्रारदार यांना विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. विमा प्रस्ताव विमा कंपनीस प्राप्त झालेपासून 21 दिवसांचे आत कार्यवाही करणे गरजेचे आहे परंतु वि.प. यांनी तसे काहीही केलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.20,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 13 कडे अनुक्रमे क्लेम फॉर्म, जमीनीचा 7/12 उतारा व 6ग उतारा, वारसा डायरी, मृत्यू दाखला, घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, श्री सुनिल पाटील यांचा जबाब, पी.एम. रिपोर्ट, मयताचा शाळा सोडलेचा दाखला, तक्रारदार यांचे आधार कार्ड व शासन निर्णय वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत त्रिपक्षीय करारपत्र, म्हणणे व शपथपत्र हाच पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) सदर कामातील दाखल केलेली पोलिस कागदपत्रे पाहता तसेच पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट पाहता मयत हे हार्ट अॅटॅकने मयत झाले आहेत. यावरुन तक्रारदार यांनी सदर योजनेचा गैरफायदा घेवून पैसे मिळविणेच्या गैरहेतूने पोलिस पेपर बनवून खोटा क्लेम दाखल केला आहे. तक्रारदार यांनी खोटी माहिती देवून वि.प. कंपनीची फसवणूक केलेने या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणेस तक्रारदार अपात्र आहेत. तथाकथित अर्जासोबतचे कागदपत्रे पाहता अपघाताची कारणे वेगवेगळी दिसून येतात.
iii) सदर विमा योजनेअंतर्गत लाभास पात्र असणा-या शेतक-याचे कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास विमाधारक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार हिचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. तक्रारदार हे तिचे पतीचे कायदेशीर व सरळ वारस आहेत. सबब, तक्रारदार हे त्यांचे पतीचे मृत्यू पश्चात विमा पॉलिसीअंतर्गत लाभधारक आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदार यांचे पती कै. सिद्राम कृष्णा पाटील हे दि. 14/10/2020 रोजी गाडी चालवत असताना गाडी स्लीप झालेमुळे अपघात होवून मयत झाले आहेत. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे विमा प्रस्ताव सादर केला. परंतु तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत अशी तक्रारदाराची तक्रार आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, सदर कामातील कागदपत्रे पाहता विमाधारक हे हार्ट अॅटॅक आलेमुळे मयत झालेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत असे कथन केले आहे. तथापि तक्रारदारांनी याकामी तक्रारदाराचे पतीचे ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले आहे. सदरचे लायसेन्स हे दि.31/05/2017 पर्यंत वैध होते. वादातील अपघात हा दि. 14/10/2020 रोजी झालेला आहे. परंतु सदरचा अपघात हा गाडी स्लीप झालेमुळे झालेला आहे. तक्रारदाराचे ड्रायव्हींगचे चुकीमुळे सदरचा अपघात झाला हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. सदरचा अपघात व तक्रारदाराचे ड्रायव्हींग यामध्ये कोणताही संबंध (nexus) असल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. तक्रारदाराकडे वैध ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते म्हणून अपघात झाला अशी वस्तुस्थिती दिसून येत नाही. शवविच्छेदन अहवालामध्ये तक्रारदाराचे पतीच्या मृत्यूचे कारण Myocardial infarction असे आहे. तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे जसे की, वर्दी जबाब, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल यांचे अवलोकन करता तक्रारदाराचे पती हे त्यांचे ताबेतील मोटारसायकल स्लीप होवून पडल्याने त्याला हार्ट अॅटॅक आला असे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे जरी असे गृहीत धरले की, तक्रारदाराचे पतीचा अपघात गाडी स्लीप होवून झाला व या अपघातामुळे तक्रारदाराचे पतीचा मृत्यू झाला नाही तर हार्ट अॅटॅकने झाला तरीसुध्दा वेगवेगळया वरिष्ठ न्यायालयांनी त्यांचे न्यायनिवाडयात हार्ट अॅटॅक सुध्दा एक अपघातच आहे असा निर्वाळा दिला आहे. सबब, तक्रारदाराचे पती हे अपघाताने मयत झाले असे गृहीत धरणे या आयोगास न्यायोचित वाटते. वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेला आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदारास विमादाव्याची रक्कम अदा न करुन वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.