न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या नावे मजकूर गावी शेतजमीन आहे. तक्रारदार यांचे सदर शेतजमीनीचे सातबारा पत्रकी नांव असून त्यांचे व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचा विमा वि.प. विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला होता व आहे. तक्रारदार यांचा मुलगा अक्षय प्रकाश लाड ता. 12/3/2020 रोजी मोटरसायकल नं.MH-09-EZ-718 वरुन असळज येथून गावी जात असताना सदर गावच्या हद्दीत कोल्हापूरकडून जाणा-या कंटेनरने समोरुन धडक दिलेने अपघातात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर सिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दि.24/3/2021 रोजी अक्षय लाड यांचा अपघाती मृत्यू झाला. तक्रारदार यांनी विवप यांचेकडे त्यांचा मुलगा अपघातात मयत झालेनंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दि. 23/10/2020 रोजी क्लेमफॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचेकडे प्रस्ताव दाखल केला असता सदर कार्यालयाने प्रस्ताव स्विकारणेस नकार दिला. तसेच सदर तारखेदिवशी तक्रारदार यांनी वि.प. यांना देखील क्लेम फॅार्म पाठविला. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरच्या विमा प्रस्तावाबाबत अद्याप काहीही कळविलेले नाही. तक्रारदार यांनी विमा प्रस्ताव हा कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिला असल्याने सदरचा प्रस्ताव वि.प. कंपनीला मिळाला असे गृहीत धरले. तथापि वि.प. यांनी सदर प्रस्तावाबाबत तक्रारदार यांना अद्याप काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कमरु. 2 लाख व सदर रकमेवर 18 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, वि.प. कंपनी पुणे यांना पाठविलेल्या प्रस्तावाबाबतची पोष्टाची पावती, पोष्टाचा ट्रॅक रिपोर्ट, विमा क्लेम भाग-1 व सहपत्र, शेतजमीन खाते नं.281 चा सातबारा उतारा, गट नं.84 ब चा 7/12 उतारा, मिळकतीची जुनी डायरी नं.152, स्वयंघोषणापत्र, महादेव पांडुरंग रेपे यांचा खबरी जबाब, मयताचे पी.एम. करिता पोलीसांनी दिलेला फॉर्म व मरणोत्तर पंचनामा व पी.एम. रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांचे कथनानुसार, सदर योजनेसंदर्भात त्रिपक्षीय करार झालेला आहे. सदर विमा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांनी स्विकारला नसलेने प्रस्तावाची संगणकाच्या प्रणालीमध्ये नोंद नसल्याने वि.प. यांना प्रस्तावाची कोणतीही माहिती नाही, प्रस्तावाची नोंद कंपनीकडे नाही. विमा योजना राबविण्यासाठी अवलंबिण्याच्या कार्यपध्दती बाबत शासनाचे परिपत्रक जाहीर केले आहे. सदरच्या परिपत्रकानुसार (6.1 6.2 मधील तरतुदीनुसार)
विमादाव्याच्या अनुषंगाने पूर्वसूचना अर्ज विहीत कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल/प्राप्त होवून व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल, त्या दिनांकासच तो दावा प्राप्त झाला आहे समजण्यात येईल.
सदर योजनेअंतर्गत लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज/ कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. सबब, सदरचा विमा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांनी स्विकारला नसलेने प्रस्तावाची संगणक प्रणालीमध्ये नोंद झाली नसलेने सदरचा प्रस्ताव विमा कंपनीस मिळालेला नाही. त्याकारणाने विमा कंपनीने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही, सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी लेखी म्हणणे शपथपत्रासह दाखल केले आहे. तसेच वि.प. यांचे म्हणणे व शपथपत्र हाच पुरावा समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांची पुरसीस यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या नावे मजकूर गावी शेतजमीन आहे. तक्रारदार यांचे सदर शेतजमीनीचे सातबारा पत्रकी नांव असून त्यांचे व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचा विमा वि.प. विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला होता व आहे. विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. वि.प. यांनी सदरचा विमा नाकारलेला नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचा मुलगा अक्षय प्रकाश लाड ता. 12/3/2020 रोजी मोटरसायकल नं.MH-09-EZ-718 वरुन असळज येथून गावी जात असताना सदर गावच्या हद्दीत कोल्हापूरकडून जाणा-या कंटेनरने समोरुन धडक दिलेने अपघातात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर सिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दि.24/3/2021 रोजी अक्षय लाड यांचा अपघाती मृत्यू झाला. तक्रारदार यांनी विवप यांचेकडे त्यांचा मुलगा अपघातात मयत झालेनंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दि. 23/10/2020 रोजी क्लेमफॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचेकडे प्रस्ताव दाखल केला असता सदर कार्यालयाने प्रस्ताव स्विकारणेस नकार दिला. तसेच सदर तारखेदिवशी तक्रारदार यांनी वि.प. यांना देखील क्लेम फॅार्म पाठविला. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरच्या विमा प्रस्तावाबाबत अद्याप काहीही कळविलेले नाही. तक्रारदार यांनी विमा प्रस्ताव हा कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिला असल्याने सदरचा प्रस्ताव वि.प. कंपनीला मिळाला असे गृहीत धरले. तथापि वि.प. यांनी सदर प्रस्तावाबाबत तक्रारदार यांना अद्याप काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प यांनी ता. 3/1/2023 रोजी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. वि.प. ही विमा कंपनी आहे. सदर योजनेसंदर्भात त्रिपक्षीय करार झालेला आहे. सदर विमा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांनी स्विकारला नसलेने प्रस्तावाची संगणकाच्या प्रणालीमध्ये नोंद नसल्याने वि.प. यांना प्रस्तावाची कोणतीही माहिती नाही, प्रस्तावाची नोंद कंपनीकडे नाही. विमा योजना राबविण्यासाठी अवलंबिण्याच्या कार्यपध्दती बाबत शासनाचे परिपत्रक जाहीर केले आहे. सदरच्या परिपत्रकानुसार (6.1 6.2 मधील तरतुदीनुसार)
विमादाव्याच्या अनुषंगाने पूर्वसूचना अर्ज विहीत कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल/प्राप्त होवून व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल, त्या दिनांकासच तो दावा प्राप्त झाला आहे समजण्यात येईल.
सदर योजनेअंतर्गत लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज/ कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. सबब, सदरचा विमा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांनी स्विकारला नसलेने प्रस्तावाची संगणक प्रणालीमध्ये नोंद झाली नसलेने सदरचा प्रस्ताव विमा कंपनीस मिळालेला नाही. त्याकारणाने विमा कंपनीने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. सबब, वि.प. यांचे म्हणणे तसेच तक्रारदार यांचे पुरावा शपथपत्र व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत तक्रारदार यांच्या शेतजमिनीची सातबारा उतारा, 8ब उतारा, मिळकतीची जुनी डायरी नं.152, स्वयंघोषणापत्र भाग अ, ब इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरच्या कागदपत्रांवरुन तक्रारदार हे शेतकरी होते ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारदार यांनी अ.क्र.11 ला पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, अ.क्र.12 ला मरणोत्तर पंचनामा दाखल केला असून सदर पंचनाम्याचे अवलोकन करता
12 पोलिस व पंच यांचे मरणाबाबत मत – यातील मयत हा ता. 12/3/2020 रोजी गगनबावडा ते कोल्हापूर रोडवर अपघातात जखमी होवून औषधेपचारासाठी दाखल झाला असता, आज दि. 14/3/2020 रोजीचे सुमाराम औषधोपचारादरम्यान मयत झाला आहे. असे नमूद आहे.
Opinion as to cause of death- head injury
सबब, सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांच्या मुलाचे सिटी हॉस्पीटल येथे उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झाला ही बाब शाबीत होते. सदरचा अपघात वि.प. यांनी नाकारलेला नाही.
8. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी अ.क्र. 1 ला ता. 23/10/2020 रोजी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेले पत्राची प्रत दाखल केलेली आहे. तसेच अ.क्र.4 ला तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे कार्यालयास प्रस्ताव पाठविलेल्या पोस्टाची प्रत दाखल केलेली आहे. सबब, सदरच्या कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी जिल्हा कृषी अधिक्षक यांना तसेच तालुका कृषी अधिकारी यांना तक्रारदार यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालेनंतर लगेचच कळविलेले होते. सदर पत्रांचे अवलोकन करता सदर पत्राने तक्रारदार यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांना विमा प्रस्ताव दाखल करुन घेवून त्याची पूर्तता वि.प. विमा कंपनीकडे करणेबाबत कळविले आहे. तथापि तक्रारदार यांनी अ.क्र.22 ला दाखल केलेल्या पत्राचे अवलोकन करता तालुका कृषी अधिकारी यांनी दि.5/11/2020 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठविलेले असून सदर पत्राने तक्रारदार यांचा ता. 27/10/2020 रोजीचा प्रस्ताव पोस्टाने प्राप्त झाला असल्याचे कळविलेले आहे. सदर पत्राने तालुका कृषी अधिकारी यांनी विमा प्रस्ताव हा मूळ प्रत व दोन झेरॉक्स प्रतींसह विहीत मार्गे कार्यालयास सदर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यामुळे आपला प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणेस अडचण निर्माण झाली होती. तरी मूळ प्रस्ताव विहीत मार्गे विनाविलंब सादर करावा असे तक्रारदार यांना कळविलेले आहे. सबब, सदर कागदपत्रांवरुन तालुका कृषी अधिकारी यांना तक्रारदार यांचा प्रस्ताव हा पोस्टाने प्राप्त झालेला होता ही बाब स्पष्टपणे दिसून येते. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. कंपनीचे पूणे कार्यालयास प्रस्ताव पाठविलेची पोस्टाची पावती दाखल केलेली असून त्यासोबत तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव विमा कंपनीला मिळालेचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केला आहे. सदरचे ट्रॅक रिपोर्टचे अवलोकन करता सदरचा प्रस्ताव हा वि.प. विमा कंपनीचे पुणे कार्यालयास ता. 27/10/2020 रोजी मिळाल्याचे दिसून येते. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.
9. सबब, दाखल कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता, तक्रारदार यांचा मुलगा अक्षय लाड हा शेतकरी असून त्याचा अपघाती मृत्यू झालेची बाब कागदपत्रांवरुन सिध्द होते. त्याकारणाने वि.प. यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रारदार यांचे प्रस्तावाची संगणकाच्या प्रणालीमध्ये नोंद नसलेने वि.प. यांना प्रस्तावाची कोणतीही माहिती नव्हती. या केवळ तांत्रिक कारणास्तव विमा पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदार यांना सदरच्या क्लेमबाबत अद्याप काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब तक्रारदार हे वि.प. यांचेकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा क्लेमची रक्कम रु.2 लाख मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 30/8/2022 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा तक्रारदार यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 30/08/2022 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|