न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती गोपाळ बाबाजी गवळी मयत होणेपूर्वी शेती हा व्यवसाय करीत होते. तक्रारदार यांचे पतीचे नावे शेतजमीन आहे. तक्रारदार यांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. तक्रारदार यांचे पती गोपाळ बाबाजी गवळी हे दि. 12/11/2020 रोजी शेतामध्ये काम करत असताना मयत झालेले आहेत. भातमळणीची कामे चालू असलेमुळे ते भाताचे पोते बैलगाडीमध्ये ठेवणेसाठी जात होते, त्यावेळेला शेतामध्ये बांधावरुन पाय घसरुन खाली पडले. त्यांना उपचाराकरिता चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी ते मयत झालेचे सांगितले. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे दि. 20/12/2020 रोजी विमा प्रस्ताव सादर केला. परंतु तक्रारदार यांना विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. विमा प्रस्ताव विमा कंपनीस प्राप्त झालेपासून 21 दिवसांचे आत कार्यवाही करणे गरजेचे आहे परंतु वि.प. यांनी तसे काहीही केलेले नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 21/9/2019 रोजी नोटीस पाठविली आहे. परंतु तरीही वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.20,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 10 कडे अनुक्रमे क्लेम फॉर्म, जमीनीचा 7/12 उतारा, घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोलिस निरिक्षक चंदगड यांचा रिपोर्ट, पी.एम. रिपोर्ट, मृत्यू दाखला, विमा कंपनीस पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व पोहोचपावती, तक्रारदार यांचे आधार कार्ड तसेच विमायोजना राबविण्याची कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत त्रिपक्षीय करारपत्र, म्हणणे व शपथपत्र हाच पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) मयत विमाधारक यांचे वय 60 होते. सदर कामातील कागदपत्रे पाहता विमाधारक हे काम करताना हार्ट अॅटॅक आलेमुळे खाली पडून मयत झालेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत.
iii) सदर विमा योजनेअंतर्गत लाभास पात्र असणा-या शेतक-याचे कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास विमाधारक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार हिचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. तक्रारदार हे तिचे पतीचे कायदेशीर व सरळ वारस आहेत. सबब, ते तक्रारदाराचे पतीचे विमा पॉलिसीअंतर्गत लाभधारक आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदाराचे पती भाताचे पोते डोक्यावर घेवून शेतामध्ये बैलगाडीत ठेवणेस जात असताना बांधावरुन पाय घसरुन पडून जखमी झाले व उपचारापूर्वीय ते चंदगड ग्रामीण रुग्णालयात मयत झाले. म्हणून तक्रारदाराने वि.प. कडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी, चंदगड व जिल्हा कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचेमार्फत वि.प. कडे दि. 29/12/2020 रोजी प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावासोबत योग्य ती कागदपत्रे सादर केली. परंतु वि.प. ने सदर विमा प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजूर केला याबाबत तक्रारदाराला काहीही कळविलेले नाही. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, मयत विमाधारक यांचे वय 60 होते व सदर कामातील कागदपत्रे पाहता विमाधारक हे काम करताना हार्ट अॅटॅक आलेमुळे खाली पडून मयत झालेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेस अपात्र आहेत असे कथन केले आहे. तथापि तक्रारदारांनी याकामी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी याकामी घटनास्थळ पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट दाखल केले आहेत. सदरचे कागदपत्रांचा ऊहापोह करता तक्रारदारांचे पती हे भाताचे पोते डोक्यावर घेवून जात असताना बांधावरुन पाय घसरुन पडून ते मयत झाले ही बाब स्पष्ट हेाते. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये तक्रारदाराचे पतीचे मृत्यूचे कारण Cause of death या सदराखाली Cardio respiratory arrest due to fracture central spine असे नमूद केले आहे. म्हणजेच तक्रारदाराचे पती भाताचे पोते डोक्यावर घेवून जात असता बांधावरुन पाय घसरुन पडलेमुळे त्यांचे बरगडया मणका फ्रॅक्चर/गंभीर दुखापत झालेमुळे त्यांचा मृत्यू झालेचे स्पष्ट होते. परंतु वि.प. यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेला आहे. सबब, तक्रारदारास विमादाव्याची रक्कम अदा न करुन वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.