श्रीमती शितल अ. पेटकर, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
- प्रस्तुतची तक्रार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12(1)(a) प्रमाणे विरुध्द पक्ष यांनी दोषपूर्ण सेवा दिली असा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
- तक्रारकर्तीचे पती चंद्रभान उकंडराव इंगोले, यांचा अपघाती मृत्यू दिनांक 04/02/2020 रोजी दुचाकी वाहनावर मागे बसलेले होते त्यावेळी चारचाकी कारचालकाने भरधाव वेगात विरुद्ध दिशेने निष्काळजीपणाने कार चालवत आणून झुलेलाल कॉलेज, रोड लोणार रोड, पो. कोराडी, जिल्हा नागपूर, येथे अपघात घडला व त्यांचा मृत्यू झाला. तसेच तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असून संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबलेले होते.
- महाराष्ट्र शासनाने सन 2019 - 2020 या दरम्यान राज्यातील शेतकरी हितासाठी व कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी कुटुंबातील व्यक्ती जखमी झाल्यास अथवा मरण पावल्यास त्यांना तात्काळ मदत म्हणून इन्शुरन्स पॉलिसी, क्लेम देणेबाबत जाहीर केले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने प्रीमियमची रक्कम भरली.
- सदर माहिती तक्रारकर्तीस मिळाल्यावर तक्रारकर्तीने विलेज रेवेन्यू ऑफिसर तलाठी यांच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विमा क्लेम फॉर्म सोबत इतर महत्त्वाची कागदपत्रे जमा केलीत.
5) परंतु विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा, मयत व्यक्ती हे ट्रिपल सीट मोटार सायकल वर जात होते याप्रमाणे त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले हे कारण नमूद करून दिनांक 16/06/2020 रोजी नामंजूर केला. त्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांना वारंवार विचारणा केली व कायदेशीर नोटीस पाठवली परंतु विरुध्द पक्षांनी उत्तर दिले नाही.
6) याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस दोषयुक्त सेवा दिलेली आहे. सबब तक्रारकर्तीने प्रस्तुतची तक्रार आयोगामध्ये दाखल करून विनंती कलमांमध्ये केलेली मागणी पूर्ण होऊन मिळण्यास विनंती केली आहे ती पुढील प्रमाणे :-
A. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना विमा दाव्याची रक्कम रुपये 2,00,000/- द्यावे. विरुध्द पक्ष यांनी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून संपूर्ण रक्कम फितेपावेतो 18 टक्के व्याजाने तक्रारकर्ता यास देण्यात यावे.
B. विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी पूर्वग्रह न देता दावा रद्द केला याची नोंद घ्यावी
C) सदर इतर योग्यते न्यायोचित आदेश हे तक्रारकर्ती यांचे बाजुने व्हावेत.
1) तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशाणी क्रमांक चार वर दाखल केलेल्या कागदपत्राची यादी प्रमाणे कागदपत्रेच्या सत्यप्रति दाखल केलेली आहेत.
7) तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना आयोगाची नोटीस पाठवण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व २ हजर होऊन तक्रारकर्तीने केलेल्या आरोपाचे खंडन करून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल करून खालील प्रमाणे बचाव घेतला आहे.
A. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथनः- तक्रारकर्तीचे पती व त्यांचेसह दोन इसम दि.04.02.2020 रोजी दुचाकी वाहनाने ट्रीपलसिट बोखारा कडून बैलवाडाकडे जात असतांना झुलेलाल कॉलेजजवळ अपघात झाला व त्यात तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू झाला. तक्रारकर्तीचे पती दूचाकी वाहनावर ट्रीपलसिट प्रवास करुन त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे व विमा पॉलिसीमधील अटी व शर्तींचा भंग केला असल्याने त्यांना झालेली दुखापत ही त्यांनी स्वतःहून ओढवुन घेतली आहे. सबब दि.17.06.2020 रोजी विरुध्द पक्षांनी नाकारलेला दावा हा योग्य प्रकारे नाकारलेला आहे. त्यामध्ये विरुध्द पक्षांनी कोणतीही दोषयुक्त सेवा दिली नाही, त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
B. विरुध्द पक्ष क्र.2 यांचे कथनः- तक्रारकर्ती हिचा विमा दावा हा विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे दि.08.05.2020 रोजी प्राप्त झाला व त्यांचेकडून जिल्हा कृषी अधिकारी यांचे मार्फत विरुध्द पक्ष क्र.2 यांना दि.14.05.2020 रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज व सोबतचे कागदपत्र विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.26.05.2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे पाठविला. दुचाकी वाहनावरील 3 व्यक्ति अवैधरित्या प्रवास करीत होते म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सदर विमा दावा नामंजूर केला. याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांचेवरील जबाबदारी व्यवस्थीत व चोखपणे पार पाठलेली आहे.
8) तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रमांक 1 तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
9) तक्रारीचा गुणवत्तेवर निकाल होणेकामी तक्रारीचा निवारणार्थ खालील प्रमाणे मुद्दे या आयोगाच्या विचारार्थ उद्भवल्याने त्यावर खालील प्रमाणे कारणमीमांसा व निष्कर्ष देण्यात आले.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कमतरता केली हे तक्रारकर्त्याने सिद्ध केले आहे काय ? | ...होय.... |
2. | मागितलेली दाद मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात काय ? | होय. |
3. | आदेशबाबत काय? | अंतिम. आदेशाप्रमाणे |
| | | |
- // कारणमिमांसा व निष्कर्ष // -
मुद्दा क्रमांक -1 ः-
10) तक्रारकर्त्याच्या युक्तिवादाप्रमाणे तक्रारकर्ती यांचे पती शेतकरी होते. तिचे पतीचा मृत्यू दिनांक 04/02/2020 रोजी झालेला आहे. सरकारने शेतकऱ्यास मदत म्हणून काढलेल्या गोपीनाथ मुंडे, शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य विमा योजना दिनांक 31/08/2019 प्रमाणे तक्रारकर्त्याने दावा दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांनी बचाव घेतला आहे की तक्रारकर्तीचे पतीने दूचाकी वाहनावर ट्रीपलसिट प्रवास करुन त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे व विमा पॉलिसीमधील अटी व शर्तींचा भंग केला असल्याने त्यांना झालेली दुखापत ही त्यांनी स्वतःहून ओढवुन घेतली आहे. त्यामुळे सदर दावा नामंजूर करून विरुध्द पक्षाने कोणतीही दोषयुक्त सेवा तक्रारकर्तीस दिली नाही या कारणास्तव तक्रार फेटाळण्यात यावी.
11) सदर वादासंबंधी अभिलेखावर दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीचे पती मयत चंद्रभान उकुंडराव इंगोले यांचे गाव नमुना 7/12, उतारा तसेच फेरफार उतारा पत्रक, दाखल केलेले आहे. यावरून तक्रारकर्तीचे पती यांचे शेत जमिनीवर नाव आहे, त्याप्रमाणे ते शेतकरी होते व दिनांक 04/02/2020 रोजी मोटार सायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखल पुरावा घटनास्थळ पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवालावरून दिसून येते.
12) विरुध्द पक्ष यांनी घेतलेल्या बचावाप्रमाणे ट्रीपलसिट दुचाकी चालविणे हा जरी कायद्याने गुन्हा असला तरीही सदर प्रकरणात तक्रारकर्ती हिचा पती दुचाकी चालवित नव्हता. तसेच सदर दुचाकी ही तक्रारकर्तीचे पतीचे नावे नव्हती. तर तक्रारकर्तीचा मयत पती हा दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट इतर दोघांसोबत बसुन प्रवास करीत होता. त्यामुळे ट्रीपलसीट वाहन चालवण्यास पूर्णतः वाहन चालक कारणीभूत असतो, तर मागे बसलेले प्रवासी नाही. तसेच डिसेंबर-2019 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या त्रिपक्षीय करारनाम्यामधील पॉलिसीच्या अटी व शर्तींमधील परिच्छेत क्र. (III) Exclusion मधील पॉईंट नं 6 मध्ये Aviation, other than as a passenger नमुद आहे. याप्रमाणे वाहन चालकाला वगळले आहे, तर प्रवासी हे समाविष्ट आहेत याचा आशय लक्षात घेता विरुध्द पक्ष यांनी घेतलेला आक्षेप येथे लागू होणार नाही. तसेच ट्रीपलसिट बसण्याचा व झालेल्या अपघाताचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कोणताही संबंध येत नाही. तसेच पोस्ट मॉर्टम अहवालामध्ये सुद्धा वरील कारणामुळे अपघात झाला असे नमूद नाही. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याकरीता दाखल केलेले कारण हे योग्य नाही या निष्कर्षावर आयोग आलेले आहे.
13) वरील प्रमाणे पुराव्याचे विवेचनावरून व शासनाच्या निर्देशानुसार, तक्रारकर्ती यांचे पती शेतकरी असल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा हा शासन निर्णय दिनांक 31/08/2019 रोजी काढलेल्या जीआर प्रमाणे दाखल केला असल्याने तक्रारकर्तीच्या पतीचा विमा दाव्याप्रमाणे तक्रारकर्ती लाभ मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्ती हि लाभार्थी आहेत हे सिद्ध झाल्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारून दोषयुक्त सेवा दिली. या निष्कर्षावर आम्ही आलेले आहोत. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक -2 व 3ः-
14) मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष होकारार्थी आल्याने तक्रारकर्तीने मागितलेली दाद मिळण्यास ती पात्र ठरतात. सबब तक्रारकर्तीने केलेली विनंती मागणीप्रमाणे विरुध्द पक्ष क्रमांक 1 विमा कंपनी यांनी तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.9% दराने विमा दावा नाकारल्याचे दि.17.06.2020 पासुन येणारी संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीस अदा करावी. तक्रारर्तीला मानसिक त्रास सहन करावा लागला व तिची मागणी मंजूर होण्याकरीता सदरची तक्रार दाखल करावी लागली. सबब मानसिक त्रासाकरता रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 5,000/- विरुध्द पक्षाने तक्रारदारांना अदा करणे बाबतचा आदेश देणे योग्य व न्यायोचीत ठरेल. सबब मुद्दा क्रमांक 2 व 3 चे उत्तर होकारर्थी देण्यात येते. वरील विवेचनावरून पुढील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात आला.
- // अंतिम आदेश // -
1) ग्राहक तक्रार क्रमांक 64 /2021 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.9% दराने विमा दावा नाकारल्याचे दि.17.06.2020 पासुन येणारी संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीस आदेश पारीत दिनांकापासुन 45 दिवसात अदा करावी.
3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीस मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची रक्कम रु.10,000/- व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- दयावी.
5) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या प्रस्तूत आदेश पारीत दिनांकापासुन 45 दिवसाच्या कालावधीत वरील आदेशाचे पालन करावे.
6) आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क पुरविण्यात याव्यात.