(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 सप्टेंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये, तक्रारकर्त्याने ही तक्रार युनिवर्सल साम्पो जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड विरुध्द त्याचे अपघातग्रस्त वाहनाचा विमा नामंजूर केल्यामुळे दाखल केली आहे. तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा वाहन क्रमांक MH 40 Y 2044 चा मालक असून, ते IDV रुपये 17,00,025/- साठी विरुध्दपक्ष क्र.1 कडून विमाकृत करण्यात आले होते. विरुध्दपक्ष क्र.2 ही विरुध्दपक्ष क्र.1 चे प्रमुख कार्यालय आहे. विम्याचा अवधी दिनांक 2.1.2013 ते 1.1.2014 असा होता. तक्रारकर्त्याला विम्याच्या अटी व शर्तीचे दस्ताऐवज विरुध्दपक्षाने पुरविले नव्हते. विमा अवधीमध्ये दिनांक 17.1.2013 ला त्या वाहनामध्ये M.S. Angle (लोखंडी सामान) भरले होते आणि तो नागपुरहून नाशिक येथे ते सामान घेऊन जात होता. वाहन चालवीत असतांना समोरुन दुसरे वाहन आले व तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या चालकाने धडक होऊ नये म्हणून एकाएकी ब्रेक लावले, त्यामुळे वाहनात ठेवलेले लोखंडी Angle वाहनाच्या कॅबिनचा मागचा पत्रा फोडून आंतमध्ये घुसले आणि समोरची काच त्यामुळे फुटली, त्या अपघातामध्ये चालकाच्या कॅबिनचे ब-याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची खबर विरुध्दपक्ष क्र.1 ला ताबडतोब देण्यात आली. त्यानुसार, सर्व्हेअर येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्तीकरीता नुकसानीचा अंदाजपत्रक काढण्यासाठी गॅरेजमध्ये घेऊन येण्यासाठी सांगितले. घटनेची खबर पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. परंतु, घटनास्थळ पंचनामा करण्यात आला नाही, कारण कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नव्हती. तक्रारकर्त्याला अपघातग्रस्त वाहन दुस-या गाडीला बांधून न्यावे लागले होते, ज्यासाठी रुपये 15,000/- खर्च आला. दुरुस्तीचा अंदाजीत खर्च रुपये 4,64,468/- सांगण्यात आला होता आणि रुपये 21,650/- लेबर चार्जेस सांगण्यात आले. तक्रारकर्त्याने अंदाजपत्रकासहीत विरुध्दपक्ष क्र.1 कडे दावा दाखल केला. त्यानंतर, अंतिम सर्व्हे करण्यात आला, परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे वाहनाच्या दुरुस्तीसाठी मंजुरी बरेच दिवस मिळाली नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 ला नोटीस पाठविला, त्यावर विरुध्दपक्षा क्र.1 ने उत्तर देवून कळविले की, वाहनाला झालेला अपघात कुठल्याही बाहेरील कारणामुळे झाला नसल्याने तो विमा पॉलिसीच्या अंतर्गत येत नाही आणि म्हणून विमा राशी देय होत नाही. त्यानंतर, तक्रारकर्त्याने स्वतः पैसा खर्च करुन वाहनाची दुरुस्ती केली. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा कुठल्याही वैध कारण नसतांना आणि चुकीच्या कारणास्तव रद्द करुन आपल्या सेवेते कमतरता ठेवली. म्हणून, या तक्रारीव्दारे रुपे 4,98,130/- दुरुस्तीचा खर्च व्याजासह मागितला असून, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितला आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला आणि तक्रार पूर्णपणे नामंजूर केली. विरुध्दपक्षाने हे मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याचे वाहन विरुध्दपक्ष क्र.1 कडून विमाकृत करण्यात आले होते आणि विमा कराराच्या अटी व शर्तीनुसार विमा पॉलिसी देण्यात आली होती. अटी व शर्तीचे दस्ताऐवज दिले नाही, ही बाब विरुध्दपक्षाने नाकबूल केली. विमाकृत वाहनाचा दिनांक 17.1.2013 ला अपघात झाला, ही बाब विरुध्दपक्षाने मान्य केली. परंतु, तक्रारकर्ता सांगतो त्याप्रमाणे अपघात झाला, ही बाब नाकबूल केली आहे. तक्रारकर्त्याला दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाजपत्रक देण्यात आला होता, तसेच वाहन वर्कशॉपमध्ये नेण्यासाठी खर्च आला होता आणि त्याने सर्व कागदपत्रासहीत वेळेवर विमा दावा केला होता, यासर्व बाबी नाकबूल केल्या आहेत. तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करण्यात आला होता, ही बाब मात्र कबूल करण्यात आली आहे. ज्या कारणास्तव विमा दावा नामंजूर करण्यात आला तो विमा कराराच्या अटी व शर्तीनुसार असल्यामुळे त्याच्या सेवेत कुठलिही कमतरता नव्हती. अशाप्रकारे, तक्रारीतील संपूर्ण मजकूर नामंजूर करुन ती तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी युक्तीवादावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. विरुध्दपक्षाने जरी तक्रारीतील सर्व मजकूर नाकबूल केला आहे तरी दाखल दस्ताऐवजावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्त्याच्या विमाकृत वाहनाला नुकसान झाले होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे वाहन अपघातग्रस्त झाले होते म्हणून वाहनाला नुकसान झाले. परंतु, हे दर्शविण्यासाठी तक्रारकर्त्याने असा एकही दस्ताऐवज दाखल केला नाही की, ज्यावरुन ही बाब सिध्द होऊ शकले की त्याच्या वाहनाला अपघात झाला होता. तक्रारकर्त्याचे स्वतःचे असे म्हणणे आहे की, पोलीसांनी अपघातग्रस्त वाहनाचा किंवा घटनास्थळाचा पंचनामा केला नाही. परंतु, रिपोर्ट दिल्याची प्रत सुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केली नाही. त्यामुळे, वाहनाला खरोखरच अपघात झाला होता की नाही याबाबत शंका उपस्थित होते.
6. थोडयावेळाकरीता जरी असे गृहीत धरले की, विमाकृत वाहनाला झालेले नुकसान अपघातामुळे झाले होते तरी तक्रारकर्त्याच्या स्वतःच्याच म्हणण्याप्रमाणे अपघात होण्या मागे कुठल्याही दुस-या वाहनाचा किंवा व्यक्तींचा हात नव्हता. तक्रारकर्त्याने अपघातासंबंधी जे वर्णन केले आहे ते असे दर्शवीते की, समोरुन वाहनाला धडक बसु नये म्हणून विमाकृत वाहनाच्या चालकाने एकाएकी ब्रेक लावले. वाहन वेगात असल्यामुळे आणि एकदम ब्रेक लावल्यामुळे त्यात ठेवलेल्या लोखंडी Angle ला लावलेली पट्टी तुटली आणि ते Angle चालकाच्या कॅबिन फोडून आंतमध्ये घुसले. याचाच अर्थ असा की, त्या वाहनाला झालेले नुकसान हे त्याच्या चालकामुळे झाले. तक्रारकर्त्याने सुध्दा तक्रारीत असे नमूद केले आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 च्या म्हणण्यानुसार “Own Damages Claim” मध्ये पोलीस रिपोर्ट किंवा दुरुस्तीच्या बिलांची गरज नसते, म्हणजेच तक्रारकर्त्याचा विमा दावा “Own Damages Claim” अंतर्गत होता. वाहनाला झालेले नुकसान कुठलेही दुसरे वाहन किंवा कारण जबाबदार नव्हते.
7. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.1 कडून जे नोटीसाचे उत्तर आले, त्यामध्ये त्याने वाहनाला झालेला अपघात External means मुळे झाले नसल्याने दावा खारीज केल्याचे कळविले आहे. कारण, पॉलिसीच्या शर्तीनुसार जर विमाकृत वाहनाला External means मुळे अपघात झाला तर नुकसान भरुन देण्याची जबाबदारी येते. त्यामुळे विरुध्दपक्ष कंपनीने पॉलिसीच्या शर्तीनुसार तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर केला, यामध्ये कुठलिही चुक दिसून येत नाही. तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य नसल्यामुळे ती खारीज होण्या लायक आहे. सबब, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश देण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चा बद्दल कोणताही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 28/09/2017