जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती |
तक्रार क्र. : CC/2021/153
दाखल दिनांक : 13-07-2021
निर्णय दिनांक : 04-11-2022
अर्जदार / तक्रारदार : श्री दादु राजु अखंडे
वय ४७ वर्षे, धंदा – शेती
रा. पो. कोटमी, ता. चिखलदरा,
जि. अमरावती.
// विरुध्द //
गैरअर्जदार /विरुध्दपक्ष : 1 युनीवर्सल शॅंपा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि.
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, डिव्हीजनल ऑफीस
प्लॉट नं. ईएएल 994/केएलसी टॉवर
एम.आय.डी.सी. महापे, नवी मुंबई
2 मे. जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
तर्फे मॅनेजर, दुसरा मजला,
जायका बिल्डींग, कमर्शियल रोड,
सिव्हील लाईन नागपुर.
गणपूर्ती :- मा. श्रीमती एस.एम. उंटवाले, अध्यक्ष
मा. श्रीमती शुभांगी कोंडे, सदस्या
तक्रारदार यांचे तर्फे वकील :- अॅड. उदय क्षिरसागर
विरुध्दपक्ष क्र.1 यांचे तर्फे वकील :- अॅड. ए.ए.पवार
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे तर्फे वकील :- अतुल रार्घोते प्रतिनीधी
::: आ दे श प त्र :::-
(दिनांक : 04-11-2022)
मा. सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे, यांनी निकाल सांगितला :-
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ (१) अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीचे विवरण येणे प्रमाणे.
1) तक्रारदाराचे कथन आहे की, तो एक शेतकरी असुन शेतातील उत्पन्नावर त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. विरुध्दपक्ष क्र. 1 ही वीमा कंपनी आहे. शासनाच्या वतीने तालुका कृषि अधिकारी हे शेतकरी अपघात वीमा योजने अंतर्गत दावे स्वीकारतात. सदर दाव्याचा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन सर्व प्रस्ताव बरोबर आहे हे पाहुन विरुध्दपक्ष क्र. 1 ला दिला जातो व विरुध्दपक्ष क्र. 1 सदर दाव्याचे भुगतान करतो.
2) तक्रारदाराचा मुलगा विनायक दादु अखुंडे याचा दि. १९.९.२०२० रोजी रेल्वे अपघातात जखमी होऊन मृत्यु झाला. त्याचा शेतकरी व्यक्तीगत अपघात वीमा योजने अंतर्गत विमा काढला असल्याने तक्रारदाराने तालुका कृषी अधिका-याकडे दि. १२.१.२०२१ रोजी रितसर अर्ज केला तसेच वेळोवेळी विरुध्दपक्षाने मागीतलेल्या दस्तांची पुर्तता केली. परंतु विरुध्दपक्षाने प्रदीर्घ कालावधी होवुनही तक्रारदाराचा वीमा दावा मंजूर अथवा नामंजूर न केल्याने व विमा दाव्याची रक्कम न दिल्याने तक्रारदाराला विरुध्दपक्षा विरुद्ध दाद मागावयास आयोगासमोर यावे लागले.
3) तक्रारदाराची प्रार्थना आहे की, आयोगाने त्याची तक्रार मंजूर करुन विरुध्दपक्षाकडून वीमा दाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- त्यावर प्रस्ताव दाखल दिनांक १२.१.२०२१ द.सा.द.शे. १८ व्याज देण्याचा आदेश व्हावा. तसेच शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये ५०,०००/- आणि तक्रार खर्च रुपये २०,०००/- देण्याचा आदेश आयोगाने द्यावा तसेच ईतर न्यायोचित आदेश तक्रारदाराच्या लाभात आयोगाने द्यावे.
4) तक्रारदाराने तक्रारी सोबत निशाणी क्र. २ ला एकूण (८) दस्त दाखल केले. त्यावर त्याची तक्रार आधारीत असल्याचे दिसुन येते.
5) विरुध्दपक्ष क्र. 1 ने आपला लेखी जबाब नीशाणी क्र. 11 ला दाखल केला. त्यात त्यांनी प्राथमीक आक्षेप घेतला की, विमा धारकाचे मृत्युचे सर्व दस्त व पोलिस पंचनामा पाहता त्याचा मृत्यु रेल्वे ट्रॅक ओलांडतांना झाला असे आढळते व तो अपघात हा कायद्याचे उल्लंघन केल्याने व स्वतः दुखापत ओढवल्याच्या कारणाने झाला आहे व सदर बाब ही त्रिपक्षीय करार योजनेच्या शर्ती व अटींचे अपवाद क्र. 2 व 12 अंतर्गत यते त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्याचा विमा प्रस्ताव हा योग्य कारणाने नाकारला असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 हा विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार नाही.
6) विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराच्या तक्रारीला परिच्छेद नीहाय जबाब देतांना त्यातील सर्व कथनं नाकारली तसेच तक्रारदाराला कोणताही मानसीक त्रास झाला नाही तसेच विरुध्दपक्षाच्या सेवेत त्रुटी झाली नाही करीता त्यांच्या विरुध्द तक्रार खारीज व्हावी अशी विनंती केली.
विरुध्दपक्ष क्र. 1 ने जबाबासोबत निशाणी क्र. 17 ला (२) दस्त दाखल केला.
7) विरुध्दपक्ष क्र. 2 ने आपला लेखी जबाब नीशाणी क्र. 7 ला दाखल केला त्यात त्यांनी नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 हा शासनाच्या योजने मध्ये अर्जदार व शासन यांच्या मधील मध्यस्ती म्हणुन सल्लागाराचे काम करतो. शासनाची योजना विमा कंपन्या व विमा सल्लागार कंपन्या मार्फत राबविण्यात येत असल्याने कोणतेही न्यायालयीन प्रकरण शासनास प्रतिवादी करता येणार नाही. तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेला विमा प्रस्ताव दि. १९.९.२०२० रोजीचा असुन सदर दावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि. १२.१.२०२१ रोजी प्राप्त झाला. तर जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे दि. १८.१.२०२१ रोजी प्राप्त झाला तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 यांना दि. २५.१.२०२१ रोजी प्राप्त झाला. सदर दाव्याची छाननी करुन विरुध्दपक्ष क्र.2 ने दि. १४.४.२०२१ रोजी सदर प्रस्ताव पुढील आदेशाकरीता विरुध्दपक्ष क्र. 1 कडे पाठविला. विरुध्दपक्ष क्र. 1 ने दि. १५.५.२०२१ रोजी विमा दावा नाकारला व ते अपात्र ठरविण्याचे कारण मृतक रेल्वे रुड ओलांडत असतांना अज्ञान रेल्वे खाली आल्याने झाला आहे असे नमुद केले. सदर प्रस्ताव विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी नामंजूर न केल्याने दाव्याची सर्वस्वी जबाबदारी विमा कंपनीची आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे काम शेतक-यांचा प्रस्तावाची छाननी परिपुर्ण करुन विरुध्दपक्ष क्र. 1 कडे वेळेत सादर करण्याची आहे. विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 ची आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 ने आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडली आहे त्यामुळे ते सदर प्रकरणात जबाबदेही ठरत नाही. त्यामुळे त्याच्या विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
विरुध्दपक्ष क्र. 2 ने जबाबासोबत विमा दावा नामंजूर पत्र दाखल केले.
8) तक्रारदारानी नीशाणी क्र. 12 ला विरुध्दपक्षाच्या जबाबाला प्रतिउत्तर दाखल केले त्यात त्यांनी नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 ने विमा प्रस्ताव नाकारल्याची प्रत तक्रारदाराला दिली नाही. पी.एम. रिपोर्ट मध्ये तक्रारदाराच्या मुलाचे मृत्युचे कारण रेल्वे अपघातात जख्मामुळे झाला असे नमुद असुन पोलिस एफआयआर मध्ये तक्रारदाराच्या मुलावर गुन्हा दाखल नाही व त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे अपघात होवुन तो मय्यत झाल्याचे नमुद नाही. सदर मृत्यु मृतकाच्या बेजबाबदारपणामुळे झाला असल्याचा पुरावा विरुध्दपक्षाने दिला नाही. तक्रारदाराच्या मुलाचा विमा पॉलिसीचे विहीत संरक्षण कालावधीत अपघाती मृत्यु पावल्याने तक्रारदार दावा रक्कम मिळण्यास पात्र आहे.
9) तक्रारदाराची तक्रार, त्यासोबत दाखल सर्व दस्तं, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब त्यांनी दाखल केले दस्त, तक्रारदाराचे प्रतिउत्तर , तक्रारदार व विरुध्दपक्ष क्र. 1 चा युक्तीवाद विचारात घेता आयोग खालील मुद्दे न्यायनिर्णयाकरीता चौकशीला घेत आहे. त्याचे निष्कर्श विरुध्द बाजुस खालील दिलेल्या कारणांसह नोंदवित आहोत.
अ.क्र. मुद्दे निष्कर्श
i) तक्रारदाराने हे सिध्द् केले का
विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब
केला व तक्रारदाराला द्यावयाचे सेवेत त्रुटी
केली आहे ? .. होय
ii) तक्रारदाराने हे सिद्ध केले का, तो
मागतो त्या अनुतोषास पात्र आहे ? अंशतः होय
iii) अंतिम आदेश व हुकूम काय ? खालीलप्रमाणे
कारणें मुद्दा क्रमांक 1 करिताः-
10) वादातीत मुद्दा आहे की, तक्रारदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यु झालयाने विरुध्दपक्षाने त्याला शेतकरी अपघात विम्या योजने अंतर्गत विमा दाव्याची रककम दिली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या युक्तीवादावरुन व दस्तांवरुन त्याने तक्रारदाराचा विमा दावा विमाधारक याचा मृत्यु रेल्वे रुळ ओलांडत असतांना अज्ञात ट्रेन खाली येवुन झाला व तो पॉलिसीच्या अपवाद क्र. (2) स्वतःहुन ओढवुन घेतलेली दुखापत व क्र. (12) कोणत्याही कायद्याचे उल्लंघन किंवा गैरव्यवहारामुळे उद्भवला या कारणाने नाकारला असे दिसते. विमा धारकाने रेलवे ट्रॅक ओलांडतांना ट्रेन येत आहे का याची खबरदारी घेणे आवश्यक होते. रेलवे फाटक बंद असतांना रेलवे ट्रॅक वरुन जावु नये हया गोष्टी त्याने पाळावयास पाहिजे होत्या. त्यामुळे त्याचा मृत्यु हा अपघाती म्हणता येणार नाही व तसे पोलिस दस्तांवरुन दिसते.
11) तक्रारदाराचा युक्तीवाद आहे की, विमाधारकाने/तक्रारदाराच्या मुलाने कोणत्याही रेल्वे कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले नाही. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल असल्याचा दस्त किंवा त्यांच्या बेजबाबदारपणाने त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष क्र. 1 ने प्रकरणात दाखल केला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यु अपघाती आहे व विरुध्दपक्ष विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार आहे.
तक्रारदाराने आपल्या कथनाच्या पृष्टयर्थ प्रकरणात खालील न्यायनिवाडे दाखल केले.
i) II (2021) (NC) R.P. No 1098/2020
decided on 27/1/2011
Oriental Insurance Co. Ltd. //Vs//
Madhu Khandelwal
ii) IV (2007) CPJ 334
Maharashtra State Consumer Dispute Redressal
Commission Circuit Bench at Aurangabad
F.A.No. 1274/2007 decided on 5/6/2007
Indubai Kumavat //Vs// United India Insurance
iii) II (2005) CPJ 707
CC No. 63/2002 decided on 9/3/2004
Mohit Batra //Vs// The Oriental Insurance co.
iv) I (2003) CPJ 100
Appeal No. 696/2002 decided on 8.8.2002
Life Insurance Corporation of India //Vs//
Smt. Usha Jain
v) State Consumer Disputes Redressal Commission
Maharashtra Mumbai
CC No. 1/326 decided on 8.9.2011
Smt. Mangal Sontakke //Vs// National Insurance
वरील सर्व न्यायनिवाडयांमध्ये मा. राष्ट्रीय आयोग व राज्य आयोगाने स्पष्ट केले की, विमाधारकाचा मृत्यु रेल्वे ट्रॅक ओलांडतांना अपघाती झाला असेल व विमा कंपनीने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा कारणावरुन किंवा तयाने कायद्याचे उल्लंघन केल्याचे कारणावरुन विमा दावा त्याचे कोणतेही पुरावा नसतांना नाकारला असेल तर ही विरुध्दपक्षची सेवेतील त्रुटी आहे. विमा कंपनी तक्रारदाराला विमा दाव्याची रक्कमेकरीता जबाबदार राहील.
12) आयोगाच्या मते आमच्या पुढील प्रकरणात तक्रारदाराने दाखल केलेला दस्त क्र. (4) व (5) पान क्र. 28 ते पान क्र. (41) पर्यंत तक्रारदाराला रेलवे पोलिसांनी अपघाताची दिलेली कागदपत्रे व पोलिस दस्त आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यात तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यु हा त्याने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचा व स्वतःहुन दुखापत ओढवुन घेतल्याने झाल्याचा उल्लेख नाही. तसा पुरावाही विरुध्दपक्ष क्र. 1 ने प्रकरणात दाखल केला नाही. त्यामुळे वरील न्यायनिवाडे आमच्या पुढील प्रकरणात लागु होतात असे आयोगास वाटते व गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजने अंतर्गत शेतक-याचा अपघाती मृत्यु दाखल दस्तांवरुन सिद्ध झाल्यास विमा कंपनी विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार राहील असे स्पष्ट नमुद आहे. तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यु हा अपघातात झाला हे दाखल दस्तांवरुन स्पष्ट होते त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 तक्रारदाराचा विमा दावा विनाकारण नाकारुन व विमा दाव्याची रककम न देवुन अनुचित व्यापारी प्रथा व सेवेत त्रुटी केली आहे असे आयोग ठरविते.
13) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र. 2 ही विमा सल्लागार कंपनी आहे त्यांची सेवेतील त्रुटी कोणती हे तक्रारदाराने सिध्द केले नाही व त्यांच्या विरुध्द तक्रारदारची तक्रारही दिसुन येत नाही करीता त्यांना आयोग प्रकरणात जबाबदार ठरवित नाही. करीता मुद्दा क्र. 1 ला तक्रारदाराचे लाभात होकारार्थी निष्कर्श नोंदवित आहोत.
कारणें मुद्दा क्रमांक 2 करिताः-
14) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र. 1 ची अनुचित व्यापारी प्रथा व सेवेतील त्रुटी सिद्ध झाल्याने तक्रारदार खालील अनुतोषास पात्र आहे. तक्रारदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यु झाल्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात वीमा योजने अंतर्गत तो वीमा दाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- मिळण्यास पात्र आहे. ती रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्याला अगोदरच दिली असती त्याचा लाभ त्याला झाला असता त्याच्या गुंतवणुकीवर व्याज मिळाले असते त्यामुळे वरील रक्कमेवर विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला दि. १५.५.२०२१ प्रस्ताव नाकारल्यापासुन द.सा.द.शे. ८ टक्के व्याज रक्कम देईस्तोवर देणे योग्य होईल असे आयोगास वाटते.
15) तक्रारदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यु झाला. शासनाने ज्या उद्देशाने शेतकरी व त्याच्या कुटुंबाकरीता वीमा योजना काढली त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 कडून प्राप्त होत नाही. त्याचा उपयोग त्यांना कुटुंबाच्या आधाराकरीता मिळत नाही ही अत्यंत मनस्ताप देणारी बाब आहे. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक, आर्थिक त्रास होणे स्वाभावीक आहे. तक्रारदाराने प्रार्थना मध्ये त्याकरीता रक्कम रुपये ५०,०००/- मागणी केले असले तरी तक्रारीचे स्वरुप पाहता आयोग रक्कम रुपये ५,०००/- देय ठरवीते. तक्रारदाराला विरुध्दपक्षाचे कृतीमुळे तक्रार दाखल करणेकरीता दस्तं गोळा करावे लागले, वकील नेमावा लागला, प्रकरणाचा खर्च करावा लागला त्याकरीता रक्कम रुपये ३,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला देणे योग्य होईल. याव्दारा मुद्दा क्र. 2 ला आयोग अंशतः होकारार्थी निष्कर्ष नोंदवुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत.
आ दे श
1) तक्रार अंशतः मंजूर.
2) विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला
व तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असे आयोग घोषीत करते.
3) विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला वीमा दाव्याची रक्कम रुपये
२,००,०००/- व त्यावर दि. १५-५-२०२१ पासुन द.सा.द.शे.
८ टक्के व्याज रक्कम देईस्तोवर द्यावे.
4) विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला आर्थिक, शारिरीक, मानसिक
त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये
३,०००/- द्यावयाचा आहे.
5) तक्रारदाराच्या इतर मागण्या नामंजुर.
6) विरुध्दपक्ष क्र. २ विरुध्द कोणताही आदेश नाही.
7) विरुध्दपक्ष क्र. 1 ने आयोगाच्या आदेशाचे पालन आदेश
उपलब्ध तारखे पासुन ३० दिवसाच्या आत करावयाचे आहे.
8) आदेशाची पहिली प्रत विनामुल्य दोन्ही पक्षकारांना देण्यात यावी.
( श्रीमती शुभांगी कोंडे) (सौ. एस.एम. उंटवाले)
मा. सदस्या मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती.
SRR