श्री. मिलिंद केदार, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. वि.प.ने तक्रारकर्तीच्या मृतक पतीचा विमा दावा नाकारल्यामुळे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिचे पती श्री. हेमराज ईश्वर इंगळे (यापुढे मृतक असे संबोधल्या जाईल) यांचा दि.04.01.2020 रोजी अपघातात मृत्यु झाला. सदर मृतक हे शेतीचा व्यवसाय करीत असून त्यांच्या नावे शेत जमीन मौजा-वासी, ता.भिवापूर, जि.नागपूर, भूमापन क्र. 147 होती. तक्रारकर्तीच्या पतीने शेतकरी अपघात विमा वि.प.क्र. 3 कडे रीतसर अर्ज करुन काढला होता. सदर विमा दावा दि.29.02.2020 रोजी खारीज करण्यात आला.
वि.प.क्र. 3 हे सदर विमा पॉलिसीचे नियमानुसार दावे स्विकारण्यासाठी नियुक्त केले आहे. त्यानुसार वि.प.क्र. 3 हे दस्तऐवजांची शहानिशा करुन दावे स्विकारतात व वि.प.क्र. 1 कडे पाठवितात.
3. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, वि.प.ने विमा दावा नाकारीत असतांना अपवाद क्र. 3 (11) प्रमाणे अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली असल्यामुळे नाकारला आहे.
तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे की, तिचे मृतक पती हे कधीही अल्कोहोल किंवा ड्रग्सचे सेवन करीत नव्हते. तक्रारकर्तीने आवश्यक सर्व दस्तऐवज देऊनही वि.प. यांनी विमा दावा नाकारला ही वि.प.ची सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल केली असून तक्रार अर्ज मंजूर करावा, तसेच विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- 18 टक्केव्याजासह द्यावी व शारिरीक मानसिक त्रासाकरीता रु.40,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.20,000/- मिळण्याची मागणी केलेली आहे.
4. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 ते 3 वर बजावण्यात आली असता वि.प.क्र. 1 व 2 ने लेखी उत्तर दाखल केले. वि.प.क्र. 3 यांना आयोगाची नोटीस मिळूनही ते आयोगासमोर हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द दि.23.09.2021 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
5. वि.प.क्र. 1 यांनी आपल्या लेखी जवाब नि.क्र. 12 वर दाखल केला आहे. त्यांनी आपल्या प्राथमिक आक्षेपात तक्रारकर्तीने आपली संपूर्ण कायदेशीर वारस सदर प्रकरणामध्ये जोडले नाही असा आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी पुढे नमूद केले आहे की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत त्रिपक्षीय करार असून जर विमा धारक हा दारुच्या प्रभावाखाली असेल तर त्याला विमा दावा देय ठरत नाही. या कारणावरुन 29.02.2020 रोजी विमा दावा नाकारल्याचे नमूद केले आहे.
वि.प.क्र. 1 यांनी आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरामध्ये तक्रारकर्तीचे बहुतांश म्हणणे नाकारुन तक्रारकर्ता शेतकरी असल्याचे सुध्दा नाकारले आहे. सदर तक्रार ही खारीज करण्याची विनंती केली आहे.
6. वि.प.क्र. 2 यांनी आपला लेखी जवाब नि.क्र. 8 वर दाखल केला आहे. त्यांनी आपल्या लेखी जवाबात नमूद केले आहे की, विमाधारक विमा दाव्यासंबंधीचे दस्तऐवज वि.प.क्र. 3 म्हणजे कृषी अधिकारी यांचेकडे पाठवितात, ते त्यांची शहानिशा केल्यावर त्यांचेकडे येतात.
त्यांनी आपल्या लेखी उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचे दि.04.01.2020 रोजी अपघाती निधन झाले. त्या संदर्भात तक्रारकर्तीने दि.05.02.2020 रोजी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर केला होता. सदर अर्ज हा तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झाला. जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून सदर अर्ज वि.प.क्र. 2 यांना दि.10.02.2020 रोजी प्राप्त झाला.
तक्रारकर्तीने अर्जासोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांची शहानिशा केल्यावर वि.प.क्र. 1 यांनी मृतक व्यक्ती दारुच्या नशेत असतांना अपघात झाला, त्यामुळे दि.29.02.2020 रोजी सदर विमा दावा नाकारण्यात आला. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची मागणी वि.प.क्र. 2 ने केली आहे.
7. सदर तक्रार आयोगासमक्ष युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्त्याचे वकीलांनी युक्तीवाद केला व न्याय निवाडयाच्या प्रती दाखल केल्या. वि.प.क्र. 1 चे वकीलांचे सहायक वकीलांनी तोंडी युक्तीवाद केला. युक्तीवादाचेवेळी वि.प.क्र. 2 व त्यांचे वकील गैरहजर होते. वि.प.क्र. 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
तसेच उभय पक्षांचे कथन व आयोगासमक्ष दाखल दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाच्या विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती विरुध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय
2. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? नाही
3. तक्रारकर्ती कुठला आदेश मिळण्यास पात्र आहे ? तक्रार खारीज.
8. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीचे मृतक पती हे शेतकरी होते असे नमूद केले आहे. त्या पुष्टयर्थ तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्तऐवज क्र. 4 सादर केले आहे. सदर दस्तऐवज हे 7/12 असून त्यामध्ये मृतकाचे नाव समाविष्ट आहे. यावरुन मृतक हा शेतकरी होता ही बाब स्पष्ट होते.
उभय पक्षाने केलेल्या कथनावरुन मृतक हा विमाधार होता हे स्पष्ट होते व मृतकाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभ धारक होता ही बाब स्पष्ट होते त्यामुळे तक्रारकर्ती ही वि.प.ची लाभार्थी म्हणून ग्राहक ठरते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
9. मुद्दा क्र. 2 – सदर प्रकरणामध्ये मृतक हा शेतकरी होता ही बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन स्पष्ट होते. तसेच मृतकास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभासाठी सुध्दा पात्र होता. वि.प. यांनी सदर प्रकरणात आक्षेप घेतला आहे की, मृतकाचा अपघात झाला त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. आपला आक्षेप स्पष्ट करण्याकरीता वि.प. यांनी पोस्टमार्टेम रीपोर्टचा आधार घेतला आहे. सदर पोस्टमार्टेम रीपोर्ट तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्तऐवज क्र. 3 म्हणून दाखल केला आहे. सदर दस्तऐवजाचे अवलोकन केले असता त्यामध्ये पोटात व मोठया आतडीमध्ये (stomach and Intestine) असलेल्या द्रव्याचा दारुसारखा वास येत होता असे नमूद आहे. सदर दस्तऐवजाचे अवलोकन केले असता त्यामध्ये विसेरा Viscera collected and discarded. असा उल्लेख आहे. यावरुन पोटातील किंवा आतडीमधील द्रव्याचा वास दारुसारखा असला तरी मृतक दारु पीऊन होता हे सिध्द करण्याकरीता विसेरा रीपोर्ट आवश्यक आहे. तसे सदर प्रकरणात केल्याचे दिसत नाही. वि.प. यांनी ज्या कारणाकरीता विमा दावा नाकारला ते सिध्द करण्याची जबाबदारी वि.प.ची असतांनासुध्दा वि.प. यांनी ते केल्याचे दिसून येत नाही सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्तीने नि.क्र. 19 सोबत न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
1) Latabai Raosaheb Deshmukh Vs. State of Maharashtra W.P.No. 10185 of 2015 Decided on 06/03/2019 (Aurangabad High Court)
2) Sujata Vs. Bajaj Allianz General Insurance ( R.P.2790/2013 decided on 0th March, 2015) NCDRC
3) M/s. New India Assurance Co. Ltd. Vs. Ashminder Pal Singh (F.A.No. 230/2009 decided on 25th March, 2015)
सदर न्यायनिवाडे तक्रारकर्तीच्या भुमिकेशी सुसंगत असून त्यामध्ये स्पष्ट आहे की, मृतक हा दारुच्या अधिपत्याखाली होता ही बाब सिध्द होणे आवश्यक आहे. तसे वि.प. यांनी कुठल्याही दस्तऐवजाद्वारे सिध्द केले नसल्यामुळे व तक्रारकर्तीने आपले तक्रारीत प्रतिज्ञालेखावर नमूद केले आहे की, मृतक हा कधीही दारुचे व्यसन करीत नव्हता ही बाब ग्राह्य धरण्याजोगी आहे.
वि.प. यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील अपवाद क्र. 3 (11) प्रमाणे नाकारलेला विमा दावा योग्य पुराव्याशिवाय नाकारला असल्यामुळे वि.प. यांची ही सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
10. मुद्दा क्र. 3 – सदर प्रकरणी मृतकाचा विमाकृत होता ही बाब स्पष्ट होते. त्याचा विमा दावा कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय नाकारल्या गेला हेही स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ती ही विमा दावा खारीज केल्याचे दि.29.02.2020 पासून विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने मिळण्यास पात्र ठरते असे आयोगाचे मत आहे.
तक्रारकर्तीने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.40,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु होऊन तिला अपार दुख झाले आहे ही बाब विचारात न घेता कोणत्याही सबळ पुरावा नसतांना विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्तीस साहजिकच मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही रु.20,000/- मिळण्यास पात्र ठरते असे आयोगाचे मत आहे. तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.
उपरोक्त विवेचनावरुन सदर प्रकरणी आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- ही विमा दावा खारीज केल्याचे दि.29.02.2020 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजाने द्यावी.
2) वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईदाखल रु.40,000/- तसेच तक्रारीच्या खर्चादाखल रु.10,000/- द्यावे.
3) वि.प.क्र. 1 ने आदेशाचे पालन आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
4) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.