(१) तक्रारदार यांनी त्यांच्या पतीचा अपघातामुळे मृत्यू झाल्याने, सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या अपघात विमा पॉलिसीची रक्कम मिळावी या मागणीसाठी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे पती विनीत अर्जून मालजी वानखेडकर हे धुळे नंदुरबार जिल्हा सुचित्र बॅंक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या, धुळे या पतसंस्थेचे सभासद होते. त्यांची सामनेवाले यांचेकडे ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट पॉलिसी अंतर्गत, पॉलिसी क्र.२३०५०२/४२/०८/०३/००००००५० प्रमाणे रु.१,५०,०००/- आणि पॉलिसी क्र.२३०५०२/४७/०८/६१/०००००१००५ प्रमाणे रक्कम रु.१,००,०००/- अशा दोन पॉलिसी असून त्यांची मुदत दि.०१-०२-२००९ ते दि.३१-०१-२०२० अशी आहे.
(३) तक्रारदार यांच्या पतीचा दि.०१-०१-२०१० रोजी रेल्वे अपघातात गंभीर इजा व अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. त्याबद्दल तक्रारदाराने सामनेवाले यांना सूचना देऊन विमा रक्कम मिळणेसाठी अर्ज केला. परंतु सामनेवाले यांनी सदर क्लेम अर्ज दि.१६-०३-२०११ चे पत्रान्वये नामंजूर केला. सामनेवाले यांनी अन्यायाने क्लेम नामंजूर केला आहे. यामुळे तक्रारदारास शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामनेवाले यांचेकडून दोन्ही विमा पॉलिसीची रक्कम द.सा.द.शे.१२ टक्के व्याजासह मिळावी आणि शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.२५,०००/- मिळावेत अशी तक्रारदारांनी शेवटी विनंती केली आहे.
(४) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.नं.२ वर शपथपत्र तसेच नि.नं.४ वरील दस्तऐवज यादी प्रमाणे एकूण सहा कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(५) सामनेवाले यांनी त्यांचा खुलासा नि.नं.१२ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील संपूर्ण कथन म्हणणे व मागणी ही खोटी, लबाडीची व बनावट असून ती सामनेवाले यांना मान्य व कबूल नाही. तसेच तक्रारीत नमूद दान्ही विमा पॉलिसी या पतसंस्थेच्या सभासदांच्या दि.०१-०२-२००९ ते दि.३१-०१-२०१० या कालावधीसाठी घेतल्या आहेत. तक्रारदार ही सामनेवाले यांची ग्राहक नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या विमा मागणी बाबत, पॉलिसीतील कलम नं.४ मधील अटीचे उल्लंघन झाल्याचेकारणाने त्वरीत दि. १६-०३-२०११ रोजी रक्कम देण्याची जबाबदारी नसल्याचे कळविले आहे. तक्रारदाराचे मयत पती हे दि.०१-०१-२०१० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास धुळे रेल्वे स्टेशन ट्रेन नं.१६१५ डाऊन या रेल्वे समोर आल्यामुळे अपघात होऊन मृत झाले आहेत. यामागे तक्रारदारांच्या पतीचा हेतू हा आत्महत्या करण्याचा असल्यामुळे पॉलिसीच्या कलम नं.४ चे उल्लंघन झाले असल्याने, तक्रारदार मयताची विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. म्हणून तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी शेवटी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.
(६) सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ नि.नं.१३ वर शपथपत्र व नि.नं.१५ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
(७) तक्रारदार यांचा अर्ज, शपथपत्र, छायांकीत कागदपत्र, पुराव्याचे शपथपत्र तसेच सामनेवालेंचा जबाब व शपथपत्र पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर तसेच सामनेवालेंनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद वाचला असता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(८) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे पती हे धुळे नंदुरबार जिल्हा सुचित्र बॅंक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या, धुळे या पतसंस्थेचे सभासद असल्याने त्यांनी सामनेवाले यांच्याकडे ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट पॉलिसी अंतर्गत क्र.२३०५०२/४२/०८/०३/००००००५० प्रमाणे रु.१,५०,०००/- आणि पॉलिसी क्र.२३०५०२/४७/०८/६१/०००००१००५ प्रमाणे रक्कम रु.१,००,०००/- अशा दोन पॉलिसी घेतल्या आहेत. त्यांची मुदत दि.०१-०२-२००९ ते दि.३१-०१-२०२० अशी आहे. या पॉलिसीच्या कव्हरनोटची छायांकीत प्रत नि.नं.४/१ व ४/२ वर दाखल केली आहे. सदर पॉलिसी सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ‘‘ग्राहक’’ असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांचे पती मयत अर्जून मालजी वानखेडकर यांचा दि.०१-०१-२०१० रोजी रेल्वे अपघातात मृत्यू झालेला आहे. त्याकामी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मयताच्या विमा पॉलिसीची रक्कम मिळण्याकामी क्लेम केला आहे. परंतु सामनेवाले यांनी दि.१६-०३-२०११ च्या पत्राने सदर क्लेम नाकारला आहे. या पत्राची छायांकीत प्रत नि.नं.४/३ वर दाखल आहे. या पत्राचा विचार होता यामध्ये सामनेवाले यांनी सदर विमा दावा हा पॉलिसीतील अटी शर्ती क्र.४ या प्रमाणे नाकारला आहे. या प्रमाणे सामनेवालेंनी असा बचाव घेतला आहे की, मयताचा सदर अपघात हा आकस्मीकरित्या घडलेला नसून तो मयताने आत्महत्या करण्याकामी घडवून आणला आहे. त्यामुळे दोन्ही पॉलिसीतील अटी शर्तींचा भंग झालेला आहे.
या कामी तक्रारदार यांनी उपविभागीय दंडाधिकारी धुळे यांच्याकडील दि.०१-१०-२०१० रोजीचे आदेश वजा पत्र दाखल केले आहे. या पत्राचा विचार होता यामध्ये “इनक्वेस्ट पंचनामा तसेच वैदृयकीय अधिकारी यांच्याकडील शव विच्छेदनाचा अहवाल पाहता मृत्यूचे कारण, रेल्वेचा मार लागून गंभीर इजा व अति रक्तस्त्रावाने मृत्यु असे नमूद केले आहे. तसेच मयताच्या मृत्युबाबत नातेवाईकांचा कोणावरही संशय नाही. त्यामुळे मयताच्या किमती वस्तु वारसांना परत करण्यात याव्यात” असा आषय पत्रात नमूद केलेला आहे.
या आदेश वजा पत्राचा विचार होता, यामध्ये मयतास गंभीर इजा होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे मयताच्या किमती वस्तु त्यांचे वारसांना परत करणेकामी सदरचा आदेश वजा पत्र देण्यात आल्याचे दिसत आहे. या पत्रावरुन मयताने आत्महत्या केली आहे किंवा नाही या बाबतचा कोणताही खुलासा होत नाही. तक्रारदार यांच्या वकीलांनी या कामी असा युक्तिवाद केला की, या पत्राप्रमाणे मयतास गंभीर इजा होऊन अपघात झाला आहे, त्यांनी आत्महत्या केलेली नाही. परंतु तक्रारदार यांनी सदर घटनेबाबत संबंधीत पोलीस स्टेशनला दाखल केलेली फिर्याद, पंचनामा, जबाब, पोस्टमॉर्टेम अहवाल इत्यादी कोणतीही कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली नाहीत. सदर पोलीसांकडील कागदपत्रां अभावी, पोलीस तपासात सदर मयत व्यक्ती हा रेल्वे समोर कोणत्या कारणाने आला व अपघात कसा घडला ? या बाबतचा काय तपास केला ? किंवा तसा कोणता पुरावा तपासात उपलब्ध झाला ? या बाबतचे कोणतेही स्पष्टीकरण होत नाही. आमच्यामते कोणतीही व्यक्ती रेल्वे समोर येऊन आकस्मीक अपघात होऊ शकत नाही. सदर व्यक्ती ही रेल्वेतून प्रवास करत होती किंवा नाही ? किंवा त्यावेळी रेल्वे रुळ ओलांडण्याकरिता त्या व्यक्तीने काळजी घेऊन रेल्वे रुळ ओलांडलेला आहे किंवा नाही ? या बाबतचा कोणताही खुलासा समोर आलेला नाही.
मयताचे मृत्युचे कारणावरुन असे दिसते की, सदर व्यक्ती ही रेल्वे समोर आपणहून जाणीवपूर्वक समोर आलेली असल्याने रेल्वेचा मार लागून मयत झालेली आहे. सदर मृत्युचे कारण हे रेल्वेमुळे अपघात होऊन झालेला आहे. परंतु सदर मृत्यु हा आकस्मीकरित्या घडला आहे याबाबत काहीही स्पष्ट होत नाही. तक्रारदार हे केवळ दंडाधीकारी धुळे यांच्याकडी दि.०१-१०-२०१० रोजीच्या पत्राचा आधार घेऊन, सदर अपघात हा आत्महत्या नाही असा बचाव घेत आहेत. परंतु सदरचे पत्र हे मयताने आत्महत्या केली आहे किंवा नाही हे सिध्द करत नाही. तक्रारदाराने पुराव्यासाठी इतर कोणतीही कागदपत्रे दाखल न केल्यामुळे, मयताच्या मृत्युबाबत शंका निर्माण होत आहे. यावरुन तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज हा पुराव्यानिशी सिध्द केलेला नाही. याचा विचार करता सामनेवालेंच्या बचावात तथ्य आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, तक्रारदार त्यांची तक्रार पुराव्या अभावी सिध्द करु शकत नसल्याने, तक्रार निकाली काढणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. सबब खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : २७-०६-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.