जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –115/2010 तक्रार दाखल तारीख –28/06/2010
निकाल तारीख – 05/05/2011
-------------------------------------------------------------
विमल भ्र. अशोक बडे,
वय- सज्ञान, धंदा- घरकाम,
रा. अस्वलांबा ता. परळी वै. जि. बीड. ... तक्रारदार
विरुध्द
1. युनाईटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.
मार्फत- मॅनेजर,
कार्यालय- अंबिका हाऊस,
धर्मापेठ एक्स्टेशन, शंकर नगर,
नगर चौक, नागपूर- 440010.
2. मॅनेजर, कबाल इंन्शुरन्स सर्विसेस प्रा. लि.
दिशा अलंकार, शॉप नं. 2,
कॅनॉट प्लेस, टाऊन सेंटर, औरंगाबाद.
3. तालुका कृषि अधिकारी,
ता. परळी वैजनाथ, जि. बीड. ... सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
सौ. एम. एस. विश्वरुपे,
तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. पी. एस. अपेगांवकर
सामनेवाले नं. 1 :- एकतर्फा.
सामनेवाले नं. 2 :- स्वत:
सामनेवाले नं. 3 :- स्वत:
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती मयत अशोक रावसाहेब बडे तारीख 25/11/2009 रोजी विजेचा धक्का बसून मौजे हिंगणी ता. धारुर जि. बीड येथे अपघाताने जागीच मयत झाले. त्यांचे नांवे मौजे अस्वलांबा ता. परळी येथे गट नं. 15 मध्ये 20 आर जमीन होती.
अशोब बडे हे शेतकरी होते. त्यामुळे पतीच्या निधनानंतर शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारदार हिने सामनेवाले नं. 1 यांचेकडे सामनेवाले नं. 3 मार्फत दावा दाखल केला.
सदर योजनेंतर्गत विमा दावा दाखल केल्यापासून एक महिन्याच्या आत तक्रारदारास किंवा मयताच्या वारसास नुकसान भरपाई देणे सामनेवालेंवर बंधनकारक असतांना त्यांनी आजतागायत नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही व सदरचा दावाही फेटाळलेला नाही. ही सामनेवालेच्या सेवेतीत त्रुटी आहे.
विनंती की, सामनेवाले नं. 1 ते 3 यांनी विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- 15 टक्के व्याजासह देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक त्रासाची रक्कम रु. 20,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 1 न्याय मंचात हजर नाहीत. म्हणून त्यांच्या विरुध्द तारीख 29/11/2010 रोजी तक्रार एकतर्फा चालविण्याचा निर्णय न्याय मंचाने घेतला.
सामनेवाले नं. 2 यांनी त्यांचा खुलासा न्याय मंचात तारीख 03/08/2010 रोजी पोस्टाने पाठवला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, अशोक बडे रा. अस्वलांबा ता. परळी यांचा अपघाती मृत्यु तारीख 25/11/2009 रोजी झाला. त्याचा दाव तारीख 19/04/2010 रोजी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला. तारीख 27/04/2010 रोजी तो त्यांना मिळाला. त्यांनी सदरचा दावा त्यांचे पत्र क्रं. 230200 /फार्मर्स पीए/113/2010-11, दिनांक 13/07/2010 ने नाकारला व याबाबतची सुचना आयुक्त कृषी संचालनालय पुणे यांना दिलेली आहे.
सामनेवाले नं. 3 यांनी तारीख 05/08/2010 रोजी त्यांचा खुलासा दाखल केला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, तक्रारदार यांनी श्री अशोक बडे हे शेतकरी शॉक लागून तारीख 25/11/2009 रोजी मयत झाल्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठीचे प्रकरण या कार्यालयास तारीख 29/3/2010 रोजी प्राप्त झाले आहे. सदर प्रकरण या कार्यालयामार्फत तारीख 07/04/2010 रोजी कबाल इन्शुरन्स कंपनी औरंगाबाद पाठविण्यासाठी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड कार्यालयास पाठवण्यात आले. त्यांनी सदरचे प्रकरण कबाल इन्शुरन्स कंपनी औरंगाबादकडे तारीख 19/4/2010 रोजी सादर केल्याचे दिसून येते. तथापि, कंपनीच्या स्थरावर सदर प्रकरण अपूर्ण् असल्याचे दिसून येते. याबाबत त्रुटीचे पूर्ततेसाठी या कार्यालयास पत्र अप्राप्त आहे. याबाबत कंपनीकडून त्रुटीचे पूर्ततेबाबत कळवल्यास संबंधीत अर्जदाराकडून अपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुन घेऊन प्रकरण निकाली काढण्याचे दृष्टीने विहीत मार्गाने सादर करण्यात येईल व त्यानंतर क्लेम मंजूर झाल्यास संबंधीताला याबाबत अवगत करण्यात येईल.
याप्रकरणी तक्रारदाराने क्लेमबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन कंपनीकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाले नं. 2 चा खुलासा, सामनेवाले नं. 3 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. अपेगांवकर गैरहजर, त्यांचा युक्तिवाद नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवाले नं. 3 कडे प्रस्ताव अर्ज पाठवला होता. सदर प्रस्ताव अर्ज योग्य त्या कागदपत्रासह सामनेवाले नं. 3 कडून सामनेवाले नं. 2 कडे मिळाल्याचे सामनेवाले नं. 2 चे म्हणणे आहे. सामनेवाले नं. 2 यांनी सदरचा प्रस्ताव अर्ज सोबतच्या कागदपत्रांसह विमा कंपनीकडे ता. 19/04/2010 रोजी पाठवलेला होता. तारीख 27/4/2010 रोजी सदरचा प्रस्ताव अर्ज विमा कंपनीला मिळालेला आहे व सामनेवाले नं. 1 विमा कंपनीने तारीख 13/7/2010 रोजी त्यांचे पत्राद्वारे आयुक्त कृषी संचालनालय पुणे यांनी दावा नामंजूर केला असल्याचे कळविल्याचे सामनेवाले नं. 2 यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात सामनेवाले नं. 2 यांनी सदरचा दावा नाकारल्याचे पत्र दाखल केलेले नाही. तसेच यासंदर्भात सामनेवाले नं. 1 हे न्याय मंचात हजर नाहीत व त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीस कुठलेही आव्हान दिलेले नाही, त्यामुळे विमा दावा नाकारल्याची बाब स्पष्ट होवू शकलेली नाही. याबाबत सामनेवाले नं. 3 चा खुलासा अत्यंत सावध आहे. त्यांनी कागदपत्रे दाव्यासोबत त्यांचे वरिष्ठ कार्यालयामार्फत संबंधीत विमा कंपनी सामनेवाले नं. 2 यांना पाठवलेली आहेत. ही बाब सामनेवाले नं. 2 च्या खुलाशावरुन स्पष्ट झालेली आहे.
सामनेवाले नं. 2 यांनी तारीख 13/7/2010 च्या सामनेवाले नं. 1 च्या पत्राचा उल्लेख केलेला आहे परंतू सदरचे पत्र सामनेवाले नं. 2 यांनी दाखल केलेले नाही. कोणत्या कारणावरुन दावा नाकारण्यात आला, याबाबतचे कारण सामनेवाले नं. 2 च्या खुलाशात नमूद नाही. तसेच सामनेवाले नं. 2 यांनी सर्व कागदपत्रासह तपासणी करुनच सामनेवाले नं. 1 कडे प्रस्ताव अर्ज पाठवलेला आहे, ही बाब येथे लक्षात घेता सामनेवाले नं. 1 यांनी दावा नाकारण्याचे कारण सामनेवाले नं. 1 यांनी स्वत: देणे आवश्यक होते परंतू त्याबाबत त्यांचा कोणताही खुलासा नसल्याकारणाने तसेच दावा नाकारल्याचे पत्र आयुक्त कृषी संचालनालय, पुणे यांनी दिलेले आहे. ते तक्रारदारांना दिलेले नाही, त्यामुळे तक्रारदारांना याबाबतची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तक्रारदाराच्या दाव्या बाबतची माहिती तक्रारदारांना मिळणे हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे परंतू सामनेवाले नं. 1 ने योग्य त-हेने तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते.
तक्रारदार हिचे पती हे विजेचा धक्का लागून मयत झालेले आहे व याबाबत शवविच्छेदन अहवाल तक्रारदाराने दाखल केलेला आहे. तसेच सदर कागदपत्रांना सामनेवाले नं. 1 यांची कोणतीही हरकत नाही आव्हान नाही, त्यामुळे सदरची कागदपत्रे ग्राहय धरुन तक्रारदाराच्या पतीचे अपघाती निधन झालेले असल्याने व ते शेतकरी असल्याने सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे. तसेच सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना त्यांच्या दाव्याबाबत न कळविणे ही बाब निश्चितच सेवेत कसूरी करणारी असल्याने सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सामनेवाले नं. 2 व 3 यांच्या विरुध्द सेवेत कसूरीची बाब स्पष्ट होत नसल्याने त्यांच्या विरुध्दची तक्रार रद्द करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराचे मयत पतीच्या शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत तक्रारदारांना अदा करावी.
3. वरील रक्कम विहीत मुदतीत तक्रारदारास अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे तारीख 28/06/2010 म्हणजेच तक्रार दाखल तारखेपासून व्याज देण्यास सामनेवाले नं. 1 जबाबदार राहतील.
4. सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
5. सामनेवाले नं. 2 व 3 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड