न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज वि.प. विमा कंपनीने त्यांचा न्याययोग्य क्लेम नाकारलेने ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रार स्वीकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. यांनी मंचात उपस्थित राहून म्हणणे दाखल केले आहे. सबब, तक्रारदार व वि.प. तर्फे युक्तिवाद ऐकून सदरचा तक्रारअर्ज गुणदोषांवर निकाली करणेत येतो.
3. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी —
तक्रारदार यांनी त्यांचे वाहन मॉडेल TATA LPT EX/42BSII रजि.नं. एम.एच.-10-बीए-3411 या वाहनाचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविला असून सदर पॉलिसीचा क्रमांक 1628003115पी102508678 असा आहे. पॉलिसीचा कालावधी दि. 8/6/2015 ते 07/06/16 असा आहे. सदर वाहन हे शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता करार पध्दतीने दिलेले आहे. दि.24/11/15 रोजी सदर रस्त्यावर कुत्री अचानकपणे आडवी आलेने सदर वाहनास अपघात झाला व सदर वाहनाची धडक रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्क केलेल्या कारला बसली. त्यामध्ये सदर वाहनाचे सुमारे रु.41,000/- चे नुकसान झाले. तक्रारदारांनी सदर घटनेची माहिती त्वरित वि.प. यांना दिली. त्यानंतर वि.प.तर्फे सर्व्हेअर यांनी वाहनाची पाहणी करुन वाहनाच्या नुकसानीचा तपशील नोंद करुन घेतला. तदनंतर तक्रारदाराने वि.प. याचेकडे क्लेम दाखल केला असता, वि.प. यांनी दि. 04/03/16 चे पत्राने सर्व्हेअर भेट देण्याआधीच वाहन पूर्णतः दुरुस्त करुन घेतल्याचे खोटे कारण देवून तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. वास्तविक, तक्रारदाराने अपघाताची माहिती वि.प. यांना दिलेनंतर सर्व्हेअरने त्याच दिवशी 2-3 तासातच वाहनाचा सर्व्हे केला होता. तदनंतर तक्रारदाराने वाहनाची दुरुस्ती करुन घेतलेली आहे. कारण सदर वाहन विद्यार्थ्यांना ने-आण करणेसाठी कराराने बांधलेले होते. अशा प्रकारे चुकीचे कारण देवून वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे व त्याद्वारे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे. सबब, तक्रारदाराने विमा कंपनीकडून नुकसान भरपाईपोटी रु.41,000/- मिळावेत, सदर रकमेवर दि.24/11/15 पासून 18 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
4. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराचे माहिती अधिकाराखालील अर्जास वि.प. यांनी दिलेले उत्तर, क्लेम फॉर्म, वाहनाचे परमिट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ड्रायव्हींग लायसेन्स, पॉलिसी, प्रिमियम भरल्याची पावती, वि.प. च्या सर्व्हेअर यांनी अपघातादिवशी केलेला सर्व्हे रिपोर्ट ता.28/1/2016, वाहनाच्या झालेल्या नुकसानीचे फोटो, वाहनाच्या दुरुस्तीची बिले इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. वि.प. यांनी याकामी दि.13/7/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल करुन तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी दि. 24/11/15 रोजीच्या अपघाताबाबत वि.प. यांना लगेच कळविलेले नव्हते व वि.प. यांनी कथित अपघाती वाहनाचा सर्व्हे करणेसाठी कधीही कंपनीच्या सर्व्हेअरला पाठविलेले नव्हते. याउलट तक्रारदारांनी वि.प. यांना अपघाताबाबत न कळविता स्वतः खाजगी सर्व्हेअरकडून सर्व्हे करुन घेतला होता. तसेच काहीही न कळविता परस्पर वाहनाची दुरुस्ती करुन घेतलेली आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडील Own damage claim ची प्रक्रिया न करता स्वतःच परस्पर सर्व गोष्टी करुन नंतर वि.प. यांचेकडे नुकसान भरपाई दावा दाखल केलेला होता. त्यामुळे वि.प यांनी कधीही सेवेत त्रुटी केलेली नव्हती. विमाकृत वाहनाचे अपघाती नुकसान झालेस विमा कंपनी त्यांचे पॅनेलवरील नेमलेले अधिकृत सर्व्हेअर यांना पाठवून स्पॉट सर्व्हे करतात. त्यानंतर वाहन संबंधीत गॅरेजला दुरुस्तीसाठी पाठविलेनंतर सबंधीत गॅरेजमधून अंदाजे दुरुस्ती बिल तसेच तसेच एस्टिमेट व क्लेम फॉर्म कंपनीस दिलेनंतर सबंधीत गॅरेजमध्ये पुन्हा फायनल सर्व्हेसाठी कंपनीचे अधिकृत सर्व्हेअर पाठविले जातात. त्यांचे अधिकृत रिपोर्ट व बिलचेक रिपोर्टवरुनच वाहनाची नुकसान भरपाई दिली जाते. या सर्व प्रक्रियेचे तक्रारदारांनी पालन केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे वाहनाचे किती नुकसान झाले व दुरुस्तीसाठी त्यांनी किती खर्च केला हे कळून येत नव्हते. त्यामुळे योग्य त्या कारणासाठीच वि.प. यांनी विमाक्लेम नाकारला आहे. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
6. वि.प. यांनी याकामी विमा पॉलिसी, मोमीन यांचा सर्व्हे रिपोर्ट, सर्व्हेअरचे शपथपत्र, वि.प. चे पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
7. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
8. प्रस्तुत कामी तक्रारदार यांचे वाहन मॉडेल TATA LPT EX/42BSII रजि.नं. एम.एच.-10-बीए-3411 याचा वि.प. विमा कंपनीकडे विमा उतरविलेला असून विमा पॉलिसी क्र. 1628003115P102508678 आहे. विमा कालावधी दि. 8/6/2015 ते 07/06/16 असा असून विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सदरचे वाहन स्कूल बस असून सदर स्कूल बस श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मेडीयम स्कूल, उजळाईवाडी, कोल्हापूर या शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणेसाठी करार पध्दतीने दिलेली आहे. त्यातून येणा-या मासिक रकमेमधून सर्व खर्च वजा जाता राहिलेल्या रकमेतून तक्रारदार स्वतःचे व कुटुंबाचा चरितार्थ चालवितात असे तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केलेले आहे. सदरचे वाहन विद्यार्थी वाहतूक करीत असताना ता. 24/11/15 रोजी महवीर गार्डन व उद्योग भवन जवळील रस्त्यावर काही कुत्री अचानकपणे वाहनाचे आडवी आल्यामुळे ड्रायव्हरने सदर बस साईडला घेतली असता, रस्त्याचे डाव्या बाजूला पार्क केलेल्या कारला अनपेक्षितपणे सदर वाहनाच्या पुढील डावे बाजूची अपघाताने धडक बसली. त्यामध्ये सदर वाहनाचे रु.41,000/- चे नुकसान झाले. सदर विमाकृत वाहनाचे नुकसानीबाबतचा दावा वि.प. यांचेकडे दाखल केला असता वि.प. यांनी ता. 4/3/16 रोजी At the time of final survey, you have not shown accidental damages and vehicle was completely repaired prior to visit of surveyor या कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारला. सबब, सदर कारणास्तव तक्रारदारांचा विमा क्लेम वि.प. यांनी नाकारुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी तक्रारीसोबत वि.प. यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, मोटार दावा फॉर्म, वाहनाचे आर.टी.ओ. परमिट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, चालकाचे ड्रायव्हींग लायसेन्स, तसेच वि.प. यांचेकडे सदर वाहनापोटी प्रिमियम भरलेची पावती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वि.प. यांनी हजर होवून म्हणणे दाखल केलेले असून विमा पॉलिसीचे कालावधीमध्ये विमाकृत वाहनाचा झालेला अपघात मान्य व कबूल केलेला आहे. तथापि वि.प. यांचे म्हणणे अवलोकन केले असता, सदर अपघातादिवशी वि.प. कंपनी कोणत्याही सर्व्हेअरने वाहनाचा सर्व्हे केलेला नव्हता. तक्रारदार यांनी अपघाताबाबत वि.प. यांना न कळविता, स्वतः प्रायव्हेट सर्व्हेअरकडून सर्व्हे करुन घेतला. वाहनाची परस्पर दुरुस्ती करुन घेतलेली आहे. Own Damage claim ची प्रक्रिया न करता स्वतःच परस्पर सर्व गोष्टी करुन नंतर वि.प. यांचेकडे भरपाई दावा केलेला आहे. अपघाती वाहन संबंधीत गॅरेजला दुरुस्तीसाठी पाठविलेनंतर अंदाजे दुरुस्ती बिल, एस्टिमेट तसेच क्लेम फॉर्म व इतर गाडीचे कागदपत्रे वि.प. कंपनीत दिलेनंतर फायनल सर्व्हे सदरचे वाहनाची दुरुस्ती विमादार यांनी करुन घेणेची असते. अधिकृत सर्व्हे रिपोर्ट वरुन वाहनाचे Depreciation धरुन किती नुकसान झाले आहे व दुरुस्तीचा खर्च धरुन फायनल सर्व्हे झाल्यानंतर सर्व्हेअर यांचे बिल चेक रिपोर्टप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते. परंतु सदर कामी तक्रारदार यांनी वि.प. कंपनीस न कळविता तसेच वि.प. यांचे पॅनेल सर्व्हेअर कडून फायनल सर्व्हे न करुन घेताच परस्पर वाहन दुरुस्त करुन घेतले आहे. तथापि वि.प. यांचे सदरचे मुद्याचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या दि. 28/1/16 रोजीचा Private and Confidential motor spot survey report चे अवलोकन केले असता, सदरचे वाहनाची IDV Rs.8,57,143/- आहे. तसेच
12.1) Any other comments - As per telephonic instruction of Shri P.M. Kulkarni, claim department Kolhapur D.O.No.II, Kolhapur we have attended the said spot survey.
Damages to insured vehicle
02) Front show/passenger body shell – Bus body (sheet metal/Fabricated type) – Front bumper, Body structure, LH side fiber panel, side panel its wheel arch, Dashboard, metor panel, front floor panel pressed/bent/dented. LH inner fiber structure pressed/bent.
03) Dash meters/Electricals – Head lights: RH- Safe, LH broken, HL Bezel: RH-Safe, LH broken, indicators: RH – Safe, LH Broken,
“The damages given in this report are based upon visual inspection of accidental vehicles on the sport of accident or where it is inspected.”
सदरचा अहवाल तक्रारदार यांनी माहिती अधिकाराखाली वि.प. यांचेकडून मिळवून प्रस्तुतकामी दाखल केलेला आहे. सदरचे स्पॉट सर्व्हे केलेल्या हर्षेल सर्व्हेअर्स यांचे अवलोकन करता, वि.प. यांचे क्लेम डिपार्टमेंटकडून अपघातादिवशी स्पॉट सर्व्हे करण्यात आलेचे स्पष्टपणे दिसून येतो. तदनंतर सदरचे वाहन दुरुस्तीकरिता सोडण्यात आले. प्रस्तुतकामी तक्रारदार याने सदरचे वाहनाचे रंगीत फोटो व दुरुस्तीची अधिकृत बिले देखील दाखल केलेली आहेत. सदर दुरुस्ती बिलामध्ये Microtouch Body यांनी सदरचे वाहनाचे Total Estimate-Rs.41,000/- इतके दिले असून तशी त्यावर त्यांची सही आहे. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.
9. प्रस्तुतकामी वि.प. यांनी ता. 21/1/19 रोजी वि.प.तर्फे साक्षीदार एम.ए.मोमीन सर्व्हेअर यांचे पुरावा शपथपत्र दाखल केलेले आहे. सोबत सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदरचे सर्व्हे रिपोर्टचे या मंचाने अवलोकन केले असता, सदरचा सर्व्हे ता. 15/11/16 रोजी घेतलेचा दिसून येतो. म्हणजेच सदरचा सर्व्हे अपघात घडलेपासून तब्बल 51 दिवसांनी घेतलेला आहे. सदरचे रिपोर्टमध्ये At the time of survey, insured was not shown the accidental damages, while in our visit, we found that the IV was completely repaired. तथापि, सदरचा सर्व्हे सदरच्या वाहनाचे अपघातानंतर तब्बल 51 दिवसांनी घेतलेला असलेने सदरचा मोमीन यांचा सर्व्हे रिपोर्ट हे मंच विचारात घेत नाही.
10. दाखल कागदपत्रांवरुन सदरचे वाहनाचा स्पॉट सर्व्हे वि.प. यांचे डिपार्टमेंटकडून अपघातादिवशीच करण्यात आलेला होता हे स्पष्टपणे दिसून येते. वि.प. यांनी सदरचा स्पॉट सर्व्हे केलेनंतर तक्रारदार यांनी सदर वाहनाची दुरुस्ती करुन घेतलेली आहे. सदरचे वाहन हे शाळेतील मुलांना वेळेत व सुस्थितीत शाळेत सोडण्यासाठी कराराने बांधील आहे. त्या कारणाने केवळ वि.प. यांचे फायनल सर्व्हेपर्यंत सदरचे वाहन एकाच ठिकाणी थांबवून ठेवणे योग्य नाही असे या मंचाचे मत आहे. प्रस्तुतकामी तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केले असून त्याअनुषंगाने अपघातादिवशी केलेला सर्व्हे रिपोर्ट, अपघातामध्ये वाहनाचे झालेले नुकसानीचे फोटो, वाहनाची दुरुस्ती बिले इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सबब, वि.प. यांनी विमा पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता, तक्रारदारांचा क्लेम ता. 4/3/16 रोजी सर्व्हेअरचे भेटीचे आधी वाहन पूर्णतः दुरुस्त करुन घेतलेचे चुकीचे व तांत्रिक कारण सांगून तक्रारदार यांचेकडून विमा हप्ता स्वीकारुन देखील तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
11. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा पॉलिसीची प्रत दाखल केलेली असून सदर वाहनाचे IDV Rs.8,57,143/- आहे. प्रस्तुत वाहनाचे ता. 28/1/2016 रोजीचे सर्व्हे रिपोर्टवरुन सदर वाहनाचे नुकसान झालेचे दिसून येते. त्यासोबत सदरचे वाहनाचे दुरुस्त केल्याच्या पावत्या दाखल आहेत. त्यावर Total estimate Rs.41,000/- नमूद आहे. सबब, या सर्व बाबींचा सखोलतेने विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमा क्लेमची रक्कम रु.41,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 3/5/2017 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्तुत कामी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श -
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसी क्र. 1628003115P102508678 अंतर्गत विमा क्लेमची रक्कम रु.41,000/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर तारीख 03/05/17 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.