नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 241/2010 नोंदणी तारीख - 14/10/2010 निकाल तारीख - 7/3/2011 निकाल कालावधी - 143 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री नामदेव रामू जाधव रा.34, धर्मवीर संभाजी कॉलनी, शाहूपुरी, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री मिलिंद ओक) विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. कोरेगाव, शाखा सोहन बिल्डींग, दुसरा मजला, शांतीनगर, रहिमतपूर रोड, रेणुकामाता मंदिराजवळ, कोरेगाव ता.कोरेगाव जि. सातारा तर्फे श्री व्ही.एल.जाधव, शाखाधिकारी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. कोरेगाव शाखा ----- जाबदार (अभियोक्ता श्री नारायण फडके) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांचा वाहतुक व्यवसाय आहे. त्यांचे मालकीचे टाटा एलपीटी 909 हे वाहन असून त्याचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला होता. पॉलिसी उतरवितेवेळी जाबदार यांनी सदर वाहनाची किंमत रु.3,30,000/- इतकी धरली होती व वाहनाचे ग्रॉस व्हेईकल वेट हे 9600 किलोग्रॅम एवढे पॉलिसीमध्ये नमूद केले होते. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेल्या वाहनाच्या नोंदणीपुस्तकामध्येही वाहनाचे वेट 9600 किग्रॅ इतके नमूद आहे. सदरचा टेम्पो माल भरुन नेत असताना तो अचानक पाठीमागून पेटला व जळून खाक झाला. सबब नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे क्लेम दाखल केला परंतु जाबदार यांनी तो फेटाळला. सदरचा क्लेम फेटाळणेची जाबदार यांनी दिलेली कारणे ही बेकायदेशीर व अनाधिकाराची असून ती कायद्याचे चौकटीत बसणारी नाहीत. सबब वाहनाचे नुकसानीपोटी रु.3,30,000/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. एल.एम.व्ही. लायसेन्स असणा-या चालकाला 7500 पर्यंत वजन असणारे वाहन चालविण्याचा अधिकार आहे. परंतु अर्जदारचे वाहन हे 9600 कि.ग्रॅम वजनाचे असून आर.सी. पुस्तकाप्रमाणे ते एच.जी.व्ही. प्रकारातील आहे. अपघाताचे वेळी अर्जदारचे चालकाकडे वाहन चालविण्याचे पक्के लायसेन्स नव्हते, त्याचेकडे हलक्या वाहनाचा शिकाऊ परवाना होता. या जाबदारने तज्ञ सर्व्हेअर मार्फत वाहनाची पाहणी केली असता त्यांचे अहवालानुसार ट्रकचे सॅल्व्हेजची रक्कम वजा जाता रु.2,79,000/- इतकी रक्कम होते. सेवेतील त्रुटीबाबत अर्जदार यांनी काहीही कथन केलेले नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री ओक यांनी व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री फडके यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदारचे वाहन चालक श्री सुनिल फडतरे यांचेकडे हलके वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना होता, त्याचेकडे पक्का परवाना नव्हता. परंतु प्रस्तुतचे प्रकरणातील महत्वाची बाब म्हणजे वाहनाचे झालेले नुकसान हे वाहन जळाल्यामुळे झाले आहे. वाहन चालविणारे श्री सुनिल फडतरे या चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले आहे अशी परिस्थिती नाही. त्यामुळे वाहनचालकाकडे कोणत्या प्रकारचा परवाना हा मुद्दा येथे गौण ठरतो. वाहनास लागलेल्या आगीशी चालकाचा कोणताही संबंध दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकाकडे योग्य परवाना नव्हता म्हणून अर्जदार हे विमारक्कम मिळणेस पात्र ठरत नाहीत हे जाबदार यांचे कथन योग्य व संयुक्तिक नाही असे या मंचाचे मत आहे. याकामी अर्जदार यांनी खालील निवाडा दाखल केला आहे. 3 (2009) सी.पी.जे. 254 नॅशनल कमिशन युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. विरुध्द गज पाल सिंग रावत सदरचा निवाडा प्रस्तुतचे प्रकरणास तंतोतंत लागू होतो. 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये पुढे असे कथन केले आहे की, अर्जदारचे वाहनाची आर.सी.पुस्तकातील नोंदीप्रमाणे अर्जदारचे वाहन हे एच.जी.व्ही. या प्रकारातील आहे, त्याचे ग्रॉस वेट 9600 किलोग्रॅम आहे. परंतु वाहनचालकाकडे असलेल्या परवान्यानुसार त्याला 7500 किलोग्रॅम पेक्षा अधिक क्षमतेचे वाहन चालविण्याचा अधिकार नाही असे जाबदार यांनी कथन केले आहे. तथापि याठिकाणी महत्वाची बाब नमूद करणे आवश्यक आहे ती अशी की अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे जी पॉलिसी उतरविलेली आहे त्या पॉलिसीमध्ये अर्जदारचे वाहनाचे वजन हे 9600 किलोग्रॅम असे नमूद केले आहे. सदरची पॉलिसी उतरविताना जाबदार यांनी अर्जदारचे आर.सी.पुस्तकाची पाहणी केली होती व त्यावर अर्जदारचे वाहनाचे वजन हे 9600 किलोग्रॅम असल्याची नोंद विचारात घेवूनच जाबदार यांनी त्यानुसार विमा प्रिमिअमच्या रकमेची आकारणी केली आहे व तो प्रिमिअम अर्जदार यांचेकडून स्वीकारुनच पॉलिसी उतरविलेली आहे. परंतु वाहनाचे नुकसानभरपाईचा क्लेम अर्जदारने दाखल केलेनंतर मात्र जाबदार यांनी वाहनाच्या त्याच आर.सी.पुस्तकातील एच.जी.व्ही. या शब्दाचा आधार घेवून क्लेम नाकारला आहे. सदरची जाबदार यांची कृती ही अयोग्य आहे असे या मंचाचे मत आहे कारण याच पुस्तकाची पाहणी करुन जाबदार यांनी अर्जदारचे वाहनाची पॉलिसी उतरविली होती व त्यामध्ये वाहनाचे वजन 9600 किलोग्रॅम असे नमूद केले होते. सबब अर्जदार यांचा विमादावा नाकारुन जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार यांनी याकामी श्री नितीन लक्ष्मण जोशी या सर्व्हेअरचा अहवाल व त्याचे पृष्ठयर्थ नि.18 ला शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी वाहनाची देय रक्कम रु.2,79,000/- इतकी निश्चित केली आहे व सदरची रक्कम ही नियमानुसार उचित, वाजवी व योग्य आहे असे कथन केले आहे. सदरचे तज्ञ सर्व्हेअरचे शपथेवरील कथन पाहता अर्जदार हे वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु.2,79,000/- हे जाबदार यांचेकडून मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु.2,79,000/-(दोन लाख एकोणऐंशी हजार फक्त) द्यावेत व या रकमेवर अर्ज दाखल ता.14/10/10 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे व्याज द्यावे. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 7/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |