(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 25 फेब्रुवारी, 2011) तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढला होता. तक्रारकर्तीचे मृतक पती हे शेतकरी असून त्यांची मौजा मेहंदी तह. पारशिवनी, जिल्हा नागपूर येथे शेती होती व त्यांचा शेत क्रमांक 196/2, आराजी 2.00 हे.आर. असा होता. दिनांक 17/8/2009 रोजी तक्रारकर्तीचे मयत पती श्री घनश्याम बासबरीले हे मोटारसायकल वरुन घरी जात असताना ट्रक क्रमांक एमएच—40, एन—16 या वाहनाचे चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून त्यांचे वाहनास ठोस मारली. त्यात घनश्याम बासबरीले यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलीस स्टेशन कोराडी यांनी सदर वाहनाचे चालकाविरुध्द दिनांक 17/8/2009 रोजी एफआयआर नोंदविली. तक्रारकर्तीने सदर अपघाती मृत्यूची सूचना पटवारी यांना दिली व त्यांचे सूचनेवरुन, तसेच महाराष्ट्र शासनाचे परीपत्रक प्रपत्र ‘ड’ मध्ये निर्देशित केलेल्या दस्तऐवजांची पूर्तता करुन सदरची दस्तऐवजे तसेच दावा प्रपत्र कृषी अधिकारी नागपूर यांचेमार्फत सादर केले. त्यानंतरही गैरअर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने दस्तऐवजांची पूर्तता केली. त्यानंतर पुन्हा गैरअर्जदाराने कृषि अधिकारी यांचेमार्फत दिनांक 3/2/2010 रोजी 7/12 ची मुळ प्रत, 6—ड, 6—क व वाहन चालविण्याचे परवान्याची मागणी केली. वाहन चालविण्याचा परवाना सोडून सर्व कागदपत्रांची तक्रारकर्तीने पूर्तता केली. वाहन चालकाचा परवाना अपघात स्थळावरुन गहाळ झाला होता व महाराष्ट्र शासनाचे परीपत्रकाप्रमाणे गैरअर्जदार यांना वाहन चालविण्याचा परवाना मागण्याचा अधिकार नव्हता. वास्तविक, समोरील वाहन चालकाचे चूकीमुळे सदर अपघात झाला होता व तशी नोंद पोलीसांनी सुध्दा घेतलेली होती. असे असतांना देखील वाहन चालविण्याच्या परवान्याचे खोटे कारण सांगून तक्रारकर्तीचा विमादावा नाकारला. ही गैरअर्जदार यांची कृती अयोग्य असून सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडून विमा दाव्यापोटी रुपये 1 लक्ष 15% व्याजासह मिळावे, तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 20,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रुपये 5,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्तीने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत दावा नामंजूर केल्याचे पत्र, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र, 7/12 चा उतारा, एफआयरची प्रत, घटनास्थळ पंचनामा, इंकवेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, नोटीस, पोचपावती तसेच प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली. त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांचे कथनानुसार तक्रारकर्ती ही ‘ग्राहक’ नाही आणि सदर तक्रारीत त्रयस्त पक्षास आवश्यक प्रतिपक्ष केले नाही म्हणुन तक्रार खारीज करावी. गैरअर्जदार यांचे मते मृतकाचे नावे कोणतीही शेती नव्हती व मृतक हा शेतकरी हा या व्याखेत बसत नाही. विमा पॉलीसीप्रमाणे ज्या दिवशी पॉलीसी जारी केली त्यादिवशी शेतक-याचे नांव 7/12 चे उता-यात दर्ज असणे जरुरीचे आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेली दस्तऐवजे संशयास्पद आहेत. तसेच तक्रारकर्तीने मयताची कायदेशिर लग्नाची पत्नी असल्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. अपघाताचे वेळेस मयताजवळ मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. वास्तविक विमा करारातील अटीप्रमाणे तो आवश्यक आहे. तसेच सदर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ग्रिव्हंस समितीपुढे मांडणे गरजेचे होते, ते तक्रारकर्तीने केले नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस दिलेल्या सेवेत कुठलिही कमतरता ठेवली नाही. म्हणुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी गैरअर्जदार यांची विनंती आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले असून, इंशुरन्स पॉलीसीची प्रत, पॉलीसीच्या अटी शर्ती, कृषी आयुक्ताचे पत्र, करारनामा इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. // का र ण मि मां सा // प्रस्तूत प्रकरणातील एकंदरीत वस्तूस्थितीचा विचार करता, तसेच वरीष्ठ न्यायालयानी वेळोवेळी दिलेल्या निवाड्यांचा विचार करता, तक्रारकर्ती ही गैरअर्जदार यांची ‘ग्राहक’ आहे. तसेच त्रयस्त पक्षास आवश्यक पक्षकार केले नसल्याचे कारणावरुन तक्रारीस कोणतीही बाधा येत नाही असे या न्यायमंचाचे मत आहे. या न्यायमंचाचे असेही निदर्शनास येते की, तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असून त्यांचे नावे मौजा मेहंदी तह. पारशिवनी, जिल्हा नागपूर येथे शेती होती (शेत क्रमांक 196/2, आराजी 2.00 हे.आर.) पॉलीसीच्या वैध कालावधीमध्ये म्हणजेच दिनांक 17/8/2009 रोजी ट्रक क्र. एमएच—40, एन—16 च्या वाहन चालकाने तक्रारकर्तीच्या मयत पतीचे वाहनास धडक दिली व त्यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आणि संबंधित पोलीस स्टेशनने वाहन चालकाविरुध्द एफआयआर नोंदविली होती. (कागदपत्र क्र.12 ते 26) तक्रारकर्तीने संबंधित अधिका-यामार्फत आवश्यक कागदपत्रांसह विमादावा गैरअर्जदार यांचेकडे सादर केला व तो गैरअर्जदाराने अपघाताचे वेळी मयताजवळ वाहन चालविण्याचा परवाना नव्हता या कारणास्तव दिनांक 3/5/2010 रोजी नाकारल्याचे दिसून येते. जरी गैरअर्जदाराने दाखल केलेल्या पॉलीसीच्या अटी शर्तींमध्ये वाहन परवान्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले असले, तरी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या शासनाचे परीपत्रकाप्रमाणे सदर दस्तऐवजाची आवश्यकता आहे असे कुठेही नमूद केले नाही किंवा मोटार वाहन कायद्याचा भंग झाला असेल तर दावा निरस्त करण्यात येईल असेही कुठे नमूद नाही. इतकेच नव्हे तर, तक्रारकर्तीने अपघाताचे वेळी वाहन परवाना गाहाळ झाल्याचे शपथपत्र कागदपत्र क्र.50 वर सादर केले आहे एफआयआर व इतर दस्तऐवजांवरुन दुस-या वाहन चालकाच्या चूकीमुळे अपघात होऊन मयताचा मृत्यू झाला असे दिसून येते. त्यामुळे याठिकाणी मयताजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही या तांत्रिक कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची गैरअर्जदाराची कृती अयोग्य आहे. गैरअर्जदार यांनी आपले जबाबात विमा दावा नामंजूर करण्याची इतरही अनेक कारणे दिलेली आहेत, परंतू त्याचा उल्लेख दिनांक 3/5/2010 च्या दावा नाकारण्यासंबंधात दिलेल्या पत्रात नाही. वरील सर्व वस्तूस्थिती व परीस्थिती पाहता, तक्रारकर्तीने दाखल केलेला महाराष्ट्र राज्य आयोगाचा निकाल तसेच सदर योजनेचे कल्याणकारी स्वरुप पाहता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा दावा नाकारुन सेवेतील कमतरता दिलेली आहे. सबब हे मंच खालीप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस विम्याची रक्कम रुपये 1 लक्ष द्यावी. सदर रकमेवर दावा नाकारल्याचे दिनांकापासून म्हणजे 3/5/2010 पासून रक्कम मिळेपर्यंत द.सा. द.शे. 9% दराने व्याज द्यावे. 3) गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस दाव्याचे खर्चाबाबत रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी. 4) गैरअर्जदाराने वरील आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |