निकाल
पारीत दिनांकः- 21/01/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांचे टायर्स व ऑटो सर्व्हिसचे दुकान आहे, त्यासाठी त्यांनी जाबदेणारांकडून शॉप कीपर्स पॉलिसी घेतली होती. सदरच्या पॉलिसीचा कालावधी हा 9/5/2008 ते 8/5/2009 असा होता. दि. 16/8/2008 रोजी दुकानामध्ये शॉर्ट सर्किट होऊन दुकानाचे नुकसान झाले. याची माहिती तक्रारदारांनी लगेचच जाबदेणारांना दिली. जाबदेणारांनी श्री. शिंदे यांची सर्व्हेयर म्हणून नियुक्ती केली व त्यांनी त्यांचा अहवाल दाखल केला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सर्व्हेयर श्री. शिंदे हे अनुभवी नसून त्यांनी गाड्यांच्या अपघाताविषयी माहिती आहे, परंतु दुकानाच्या अपघाताविषयी त्यांना माहिती नाही. जाबदेणारांनी सर्व्हेयरच्या अहवालानुसार दि. 16/4/2009 रोजी रक्कम रु. 86,000/- चा चेक तक्रारदारास दिला. परंतु तक्रारदाराचे नुकसान रक्कम रु. 2,74,000/- इतके झाल्यामुळे जाबदेणारांनी देऊ केलेली रक्कम तक्रारदारांना अमान्य आहे. त्यानंतर तक्रारदारांनी अनेकवेळा पत्र पाठवून त्यांच्या क्लेमबाबत रिव्ह्यु घेण्यास सांगितले, परंतु जाबदेणारांनी योग्य ते उत्तर दिले नाही, म्हणून त्यांनी दि. 15/2/2010 रोजी जाबदेणारांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु जाबदेणारांनी दखल घेतली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 3,50,000/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता ते मंचासमोर उपस्थित झाले व त्यांच्या लेखी म्हणण्याद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराच्या दुकानामध्ये शॉर्ट सर्किट होऊन दुकानाचे नुकसान झाले व त्यांचा क्लेम दाखल झाल्यानंतर जाबदेणारांनी श्री. शिंदे यांना सर्व्हेयर म्हणून नियुक्त केले. सर्व्हेयर श्री. शिंदे हे अनुभवी नाहीत, हे जाबदेणारांना मान्य नाही. सर्व्हेयरनी त्यांच्या अहवालामध्ये नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु. 86,000/- इतके दाखविले,
त्यानंतर जाबदेणारांने तक्रारदारास रक्कम रु. 86,000/- चा चेक पाठविला. तक्रारदारांनी क्लेमच्या रिव्ह्युची मागणी केली होती, परंतु ती मागणी मान्य करण्यात आली नाही. तोच क्लेम तसाच ठेवण्यात आला. आय.आर.डी.ए. च्या नियमांनुसार सर्व्हेयर हे परवानाधारक आहेत व त्यांनी केलेले मुल्यांकन हे योग्य आह, म्हणून सदरील तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे तसेच सर्व्हेयर श्री. शिंदे यांचे शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांच्या दुकानामध्ये शॉर्ट सर्किट होऊन दुकानाचे व दुकानातील मालाचे नुकसान झाले. जाबदेणारांनी नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी सर्व्हेयरची नेमणूक केली व त्यांनी मुल्यांकन करुन त्यांचा अहवाल दाखल केला व जाबदेणारांनी त्या अहवालाप्रमाणे तक्रारदारास रक्कम रु. 86,000/- देऊ केले होते. जाबदेणारांनी सर्व्हेयरचा अहवाल व त्यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये रक्कम रु. 87,000/- इतके मुल्यांकन नमुद केले आहे. जाबदेणारांनी नियुक्त केलेले सर्व्हेयर श्री शिंदे हे आय.आर.डी.ए. च्या नियमांनुसार नोंदणीकृत व परवानाधारक आहेत हे त्यांच्या अहवालावरुन सिद्ध होते. तक्रारदारही मान्य करतात की, जाबदेणारांने त्यांना रक्कम रु. 86,000/- चा चेक देऊ केला होता. ग्राहक मंचामध्ये सर्व्हेयरने दाखल केलेला अहवाल चॅलेंज करता येत नाही, त्यामुळे जाबदेणारांनी सर्व्हेयरच्या अहवालानुसारच तक्रारदारांना रक्कम रु. 86,000/- चा चेक दिला होता, यामध्ये जाबदेणारांची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही, असे मंचाचे मत
आहे. म्हणून मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते. जाबदेणारांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केलेले आहेत, ते प्रस्तुतच्या मंचास तंतोतंत लागू होतात. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 86,000/- चा चेक दिलेला आहे, परंतु सर्व्हेयरने त्यांच्या अहवालामध्ये रक्कम रु. 87,000/- नमुद केलेले आहे, म्हणून जाबदेणारांनी तक्रारदारास सर्व्हेयरने त्यांच्या अहवालामध्ये नमुद केलेली रक्कम रु. 87,000/- द्यावी.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.