(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी चोरीस गेलेली रक्कम रु.31,633/- व फर्निचर रिपेअरींग खर्चाची रक्कम रु.17,850/- अशी एकूण रक्कम मिळावी, या रकमेवर दि.04/03/2010 पासून 15% दराने व्याज मिळावे, मानसिक शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.20 लगत लेखी म्हणणे व पान क्र.21 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
या कामी अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्दे
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून
मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांचे वतीने अँड. के.एस. शेळके व सामनेवाला यांचेवतीने अँड.श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांनी दि.04/02/2010 ते दि.03/02/2011 या कालावधीसाठी विमा पॉलिसी घेतलेली होती ही, बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत विमापॉलिसी सर्टिफिकेट सादर केलेले आहे. पान क्र.5 चे कागदपत्र व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये विमा पॉलिसीमधील अटी व शर्तीमध्ये एक्सक्ल्युजन यामध्ये “जर कामकाजाची वेळ संपल्यानंतर रकमा कुलूप लावलेल्या सेफमध्ये (तिजोरीमध्ये) किंवा स्ट्रॉंगरुममध्ये ठेवलेल्या नसतील तर कंपनीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. अर्जदार यांचे कथनानुसार व पोलिस तपासानुसार कॅशिअरच्या कॅबीनमध्ये ड्रावरमध्ये रक्कम ठेवलेली होती, यामुळे नुकसान भरपाई देण्याची सामनेवालावर जबाबदारी नाही.” असे म्हटलेले आहे.
या कामी सामनेवाला यांनी पान क्र.26 लगत सर्वे रिपोर्ट, पान क्र.27 कंपोझीट पॉलिसी, पान क्र.28 लगत विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत. पान क्र.28 चे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीमधील एक्सक्ल्युजन क्लॉज 4 मध्ये “Unless the money is in a locked safe or strong room.” असा उल्लेख आहे. म्हणजेच कुलूप असलेल्या कपाटामध्ये किंवा स्टॉंगरुममध्ये पैसे ठेवले असतील तरच विमापॉलिसीप्रमाणे विमाक्लेम देता येतो असा उल्लेख आहे. अर्जदार यांनी या कामी पान क्र.8 लगत पोलिसांकडील फिर्यादीची प्रत व पान क्र.9 लगत पहिली खबर याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाहीत. पान क्र. 8 चे फिर्यादीमध्ये “पतसंस्थेच्या कॅश केबीनचे ड्रॉवरचे लॉक उचकटून” असा उल्लेख आहे. म्हणजेच कॅश केबीनमधील कुलूप असलेले ड्रॉवरचे कूलूप तोडून पैशांची चोरी झालेली आहे हे स्पष्ट होत आहे. म्हणजेच सामनेवाला यांनी कूलूप लावलेल्या ड्रॉवरमध्ये कॅश ठेवलेली होती असे दिसून येत आहे. वास्तविक पान क्र.8 ची फिर्याद व त्यामधील कथन याचा विचार होवून सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम मंजूर करणे गरजेचे होत, परंतु सामनेवाला यांनी चुकीचे कारण देवून अर्जदार यांचा विमाक्लेम नाकारलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.8 चे फिर्यादीमध्ये रोख रुपये 31,633/- चोरीस गेलेले आहेत असा उल्लेख आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.31,633/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
रक्कम रु.31,633/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य त्या वेळेत मिळालेली नाही, यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे. याचा विचार होता अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाई पोटी मंजूर रक्कम रु.31,633/- या रकमेवर पान क्र.13 चे विमाक्लेम नाकारल्याचे पत्राची तारीख दि.30/09/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे.
सामनेवालाकडून फर्निचर रिपेअरीगसाठी येणा-या खर्चाची रक्कम रु.17,850/- मिळावेत अशी मागणी अर्जदार यांनी केलेली आहे. सामनेवाला यांनी पान क्र.27 लगत क्रेडीट सोसायटी कंपोझीट पॉलिसी दाखल केलेली आहे. यामध्ये फर्निचर असा उल्लेख असून स्कोप ऑफ कव्हर याठिकाणी फक्त फायर अँण्ड अलाईड पेरील्स असा उल्लेख आहे. म्हणजेच आग लागल्यानंतर फर्निचरचे काही नुकसान झाले असल्यास विमा पॉलिसीप्रमाणे रक्कम मिळते असाच उल्लेख पान क्र.27 चे कंपोझीट पॉलिसीमध्ये आहे. याचा विचार होता मोडतोडीमुळे फर्निचरचे नुकसान झाले असल्यामुळे अर्जदार यांची फर्निचरचे नुकसान भरपाईची मागणी मान्य करता येत नाही.
अर्जदार यांनी विमाक्लेमची रक्कम मिळावी म्हणून सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे, यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.2500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत
आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे
रकमा द्याव्यात.
अ) विमाक्लेमपोटी रु.31,633/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवरती दि.30/09/2010 पासून संपुर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज द्यावे.
ब) मानसिक त्रासापोटी रु.2500/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.