जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 93/2011 तक्रार दाखल तारीख –04/07/2011
ज्योती हरिहर जाधव
वय 40 वर्षे धंदा घरकाम व शेती .तक्रारदार
रा.चोथेवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
मंडल कार्यालय, क्रमांक -2 अंबिका हाऊस
शंकर नगर, चौक, नागपुर-440 010
2. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं.29 राज अपार्टमेंट, सिडको,औरंगाबाद. .सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.पावसे.
सामनेवाला 1 तर्फे :- अँड.ए.पी.गंडले
सामनेवाला 2 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती हरीहर जाधव हे शेतकरी होते. त्याची मौजे लिबगांव शिवारात शेत जमिन आहे. त्यांचा मृत्यू दि.18.01.2010 रोजी मोटार अपघाताने झाला. घटनेची माहीती अंबेजोगाई पोलिस स्टेशनला मयताच्या भावाने दिली. पोलिसांनी मालकाची चौकशी करुन मृत्यू नोंद केली. पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यात आले.
मृत्यूनंतर तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूच्या दाव्याचा प्रस्ताव तालूका कृषी अधिकारी अंबेजोगाई जि.बीड मार्फत सामनेवाला क्र. 1 व 2 कडे रितसार दाखल केले. सर्व कागदपत्रे प्रस्तावासोबत साक्षांकित करुन सामनेवाला क्र.1 व 2 कडे पाठविण्यात आलेले आहे. सामनेवाला यांनी दावा मंजूर केला नाही.तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला आहे. मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चाची रक्कम रु.5,000/- देण्याची मागणी तक्रारदार करीत आहेत.
विनंती की, तक्रारदारांना सामनेवाला यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासहीत देण्याचे आदेश व्हावेत. सामनेवाला क्र.2यांनी विमाप्रस्ताव त्वरीत सामनेवाला क्र.1 कडे पाठवून त्वरीत निर्णय दयावा असे आदेश व्हावेत. मानसिक त्रासाची रक्कम रु.10,000/- व खर्चाची रक्कम रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.14.12.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2कडे प्रस्ताव परिपूर्ण पाठविलेला नाही व तसाच प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांनी अपूर्ण अवस्थेत पाठविला असल्याने तो बंद करण्यात आलेला आहे. यात तक्रारदारांनी सदरची कागदपत्रे दाखल न केल्याने दावा बंद कलेला आहे.त्यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही.त्यामुळे तक्रार खर्चासह रदद करावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.24.8.2011रोजी पोस्टाद्वारे दाखल केला आहे. खुलाशात हरिहर जाधव रा.चिंचेवाडी यांचा अपघातदि.18.1.2010 रोजी झाला,. त्यांचा दावा दि.14.6.2010 रोजी अपूर्ण कागदपत्रासह उदा.शपथपत्र रु.20/- चे बॉंडवर, मृत्यू प्रमाणपत्र मळ, 6 डी मूळ, शवविच्छेदन अहवाल, एफआयआर, पोलिस अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेले इत्यादी कागदपत्राची अपूर्णता होती. या बाबत दि.6.7.2010 रोजी पत्र दिले. त्यानंतर दि.2.10.2010, 3.11.2010, 6.12.2010 रोजी स्मरणपत्रें दिली. तक्रारदारांनी सदरची कागदपत्रे दाखल केली नाहीत. म्हणून सामनेवाला क्र.1 कडे अपूर्ण अवस्थेत सदरचा दावा दि.21.1.2.2010 रोजी पाठविला. सामनेवाला क्र.1 यांनी दि.31.12.2010 रोजी सदरचा दावा अपूर्णतेच्या कारणाने बंद केला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाला क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.गंडले यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला क्र.2 च्या पत्रानुसार स्पष्ट होते की, तक्रारदाराच्या प्रस्तावात कोणकोणती कागदपत्रे अपूर्ण होती व त्यावर त्यांनी पत्र व स्मरणपत्रे पाठविली आहेत. परंतु सदरची कागदपत्रे पूर्तता न करण्यात आल्याने अपूर्ण अवस्थेतच सामनेवाला क्र.2 यांनी सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडे दि.21.12.2010 रोजी पाठविला व त्यावर सामनेवाला क्र.1 यांनी दि.31.12.2010 रोजी सदरचा दावा त्यांच कारणाने बंद केलेला आहे.
तक्रारदारांनी दि.31.3.2011 रोजीचे तालूका कृषी अधिकारी अंबेजोगाई यांचे पत्र दाखल केलेले आहे. त्यात सामनेवाला क्र.2 यांनी नमूद केलेल्या कागदपत्राची पूर्तता दि.20.01.2011 रोजी सामनेवाला क्र.2 कडे पाठविल्याचे नमूद केलेले आहे परंतु त्यापूर्वीच सामनेवाला क्र.1 यांनी सदरचा दावा बंद केल्याचे कळविले आहे व याचाही उल्लेख सदर पत्रात आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी दि.24.08.2011 रोजी पोस्टाद्वारे त्यांचा खुलासा दाखल केला. त्यात वरील कागदपत्राची बाब नमूद नाही. परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी सदरची कागदपत्रे सामनेवाला क्र.2 कडे पाठविली आहेत, सामनेवाला क्र.1 यांनी प्रस्ताव अर्ज हा कागदपत्राअभावी बंद केलेला आहे. तो गुणवत्तेवर बंद करण्यात आलेला नाही.त्यामुळे सामनेवाला क्र.2 कडे दावा बंद झाल्यानंतर मिळालेली कागदपत्रे सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे पाठविणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच त्यावर सामनेवाला क्र.1 यांनी गुणवत्तेवर दाव्याचा विचार करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली कागदपत्रे सामनेवाला क्र.1 कडे आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत पाठवावीत.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, सदरचा दाव्यात सामनेवाला क्र.2 कडून कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांचे आंत त्यावर निर्णय घ्यावा.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड