निकालपत्र
(पारित दिनांक 16-01-2009)
द्वारा. श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. तक्रारकर्ता हे शेतकरी आहेत. त्यांनी विदर्भ विकास पॅकेज योजना अंतर्गत श्री. विजय एन. गाढवे, बेला जि. भंडारा यांच्या कडून दि. 27/03/08 रोजी एक काळी पांढरी सिंगरी गाय रु. 25,300/- ला विकत घेतली होती व वि.प. क्रमांक 2 कडून आपल्या गायीचा विमा दि. 11/04/08 रोजी काढला होता. त्याचा विमा क्रमांक 230103/47/08/01/00000136 असा असून तो तीन वर्षाचा कालावधी म्हणजेच सन 2008 ते सन 2011 पर्यंत होता. वि.प. यांनी बिल्ला क्रमांक व्ही.आय.आय./100326 काळी पांढरी सिंगरी गायच्या कानावर ओळखीसाठी लावला होता.
2. दि. 14/06/08 ला तक्रारकर्ता यांची गाय सकाळी 7.30 वाजता मरण पावली. तेव्हा गावातील पंच बोलविण्यात आले व त्यांच्या साथीने पंचनामा करण्यात आला. तक्रारकर्ता यांनी डॉ. सि.पी. गोतमारे, तिगांव यांच्या कडून गायीची चिरफाड करुन घेतली. नंतर जिल्हा दुग्ध उत्पादक सह संस्था मार्फत युनायटेड इंडिया इंशोरेन्स कंपनीला पशू विम्याचे दावा पत्र पाठविण्यात आले. सोबत गायीचा बिल्ला व आवश्यक कागदपत्र जोडले होते. परंतू वि.प. यांनी विमादावा नाकारला.
3. तक्रारकर्ता यांनी मागणी करतात की,
I) वि.प. क्रमांक 1 ला निर्देश देण्यात यावे की, गायीच्या दाव्याची रक्कम रु. 25,000/- तक्रारकर्ता यांना मिळावे व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. 2000/- दयावेत.
4. वि.प. क्रमांक 1 व 2 यांनी आपला लेखी बयान नि.क्र. 05 वर दाखल केलेला आहे. वि.प. म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी गायी खरेदी केली व त्याचा व्यावसायीक उपयोग होत आहे असे पुरावे दिलेले नाहीत. आम्हाला गायीच्या मुत्यू बद्दल दिलेली सुचना खरी नाही. तक्रारकर्ता यांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस व खोटी आहेत. कंपनीचे तपासी अधिकारी यांनी गावाच्या सरपंचाशी विचारणा केली असता त्यांचा मतानुसार गायीचा मुत्यू बद्दल शंका आहे असे वि.प. यांचे मत आहे. वि.प. यांच्या सेवेत कोणतीही न्युनता दिसून येत नाही तेव्हा तक्रारकर्ता यांची तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे. तसेच सदर तक्रार ही दिवाणी न्यायालयात चालावी अशी आहे.
कारणे व निष्कर्ष
5. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताएवज, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांची काळी पांढरी सिंगरी गाय दि.14/06/08 रोजी मरण पावली. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रमांक 1 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह विमा रक्कम मिळण्याकरिता दावा केला होता. परंतू वि.प.क्रमांक 1 व 2 यांनी विमा दावा नाकरला याचे कारण कंपनीद्वारा तपासणी अधिकारी यांनी गावातील सरपंचाचे बयाण घेतले त्यांच्या मते, गायीच्या मृत्यू बद्दल शंका आहे. परंतू सरपंचानी चौकशीच्या वेळी केलेल्या बयाणात व तक्रारकर्ता द्वारा केलेल्या पंचनाम्यातील दोन व्यक्ति 1. रतनलाल चौहाण व 2. मधोराव भगत यांनी दोन्ही बयाणात स्वाक्षरी केलेल्या आहेत. यावरुन गायीच्या मुत्यू बद्दल कारण स्पष्ट होत नाही व या शुल्लक कारणासाठी विमा दावा नाकरता येत नाही.
6. तक्रारकर्ता यांनी मृत गायीचा कान बिल्ला क्र. यु.आय.आय./100326 यासह वि.प. यांच्या कडे पाठविलेला आहे याबद्दल वाद नाही. वि.प. यांनी बिल्ला हा चुकीचा आहे अथवा बिल्लाच्या क्रमांकामध्ये काही खोडतोड आहे असे कुठेही म्हटलेले नाही असे असताना आता गायीच्या मृत्यूबद्दल शंका घेणे यात काहीही तथ्य नाही. म्हणून तक्रारकर्ता गायीच्या मृत्यूदाव्याची रक्कम वि.प. यांच्याकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. वि.प. क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना विमा दाव्याची रक्कम रु. 25,000/- दयावे.
2. वि.प. क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. 1000/- दयावे.
3. वि.प. यांनी आदेशाचे पाल आदेशच्या तारखेपासून 30 दिवासांच्या आत करावे.