- निकालपत्र –
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
( पारित दिनांक-06 सप्टेंबर, 2016)
1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये तिचे मृतक पती आणि विमाधारक शेतकरी यांचे अपघाती मृत्यू संबधाने कायदेशीर वारसदार म्हणून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
तिचे मृतक पती श्री सुखदेव भगवान पुंड यांचे मालकीची मौजा टाका, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर येथे शेती असून त्याचा भूमापन क्रं-187/1 असा आहे. ते व्यवसायाने शेतकरी होते आणि शेतीतील उत्पन्नावर आपले कुटूंबाचे पालनपोषण करीत होते.
तिने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा दिनांक-04.06.2011 रोजी शेतात काम करीता असताना विज अंगावर कोसळून मृत्यू झाला. महाराष्ट्र शासना तर्फे तिचे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढलेला असल्यामुळे त्याअंतर्गत विमा राशी रुपये-1,00,000/- विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी कडून मिळण्यास ती पात्र आहे. त्याअनुषंगाने तिने विमा प्रस्ताव आवश्यक सर्व दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, भिवापूर यांचे कार्यालयात दिनांक-12.08.2011 रोजी सादर केला. तक्रारकर्तीने विमा प्रस्तावा संबधीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अद्दापी विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांनी तिचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्या बाबत कळविले नाही त्यामुळे दिनांक-03.08.2015 रोजी तिने विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे कडे पत्र पाठवून विचारणा केली परंतु अद्दाप पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांनी त्या संबधाने काहीही कळविले नसल्याने तिने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. अशाप्रकारे तक्रारकर्तीने विमा प्रस्ताव सादर करुनही विमा दावा मंजूर वा नामंजूर केल्याचे कळविले नसल्याने विरुध्दपक्षानीं तिला दोषपूर्ण सेवा दिली असून त्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून तिने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव सादर केल्याचे दिनांका पासून म्हणजे दि.12/08/2011 पासून द.सा.द.शे.18% व्याजासह मिळावी तसेच झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानीपोटी नुकसान भरपाई रुपये-30,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे अशा मागण्या केल्यात.
03. प्रस्तुत तक्रारीमध्ये यातील विरुध्दपक्ष क्रं-1 ते क्रं-3 यांना मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-1 युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने मंचा समक्ष नि.क्रं-8 वर लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने आपल्या लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीचे पतीचा विज आंगावर पडून दिनांक-04/06/2011 रोजी मृत्यू झाल्याची बाब महिती अभावी नाकबुल केली. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-31/12/2011 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवून एफ.आय.आर, फेरफार पत्रक, कृषी पत्रक, आकस्मीक मृत्यू खबरी/मर्ग खबरी विमा दावा निश्चीती संदर्भात मागणी केली होती परंतु तिने त्याची पुर्तता केली नसल्याने तिला विमा दावा मागण्याचा हक्क उरत नाही. पॉलिसी संपल्याचे दिनांका पासून 90 दिवसांचे आत विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह सादर होणे आवश्यक आहे. तथापि विमा दावा सादर करण्यास झालेला विलंब योग्य आहे याची विमा कंपनीला खात्री पटल्या नंतर विमा दावा देण्यात येतो. तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ज्या दिनांकास विमा दावा सादर केला जातो तो दिनांक विरुध्दपक्ष विमा कंपनीला सुचित केल्याचा दिनांक समजण्यात येतो. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांनी विमा दाव्या संबधाने योग्य ती काळजी घेतली नाही, जेंव्हा की त्यांना त्या बाबत कमीशन दिल्या जाते, त्यामुळे नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी त्यांचेवर येते. तक्रारकर्तीचा विमा दावा हा मुदतबाहय आहे. तक्रार दाखल करण्यास 05 वर्ष उशिर झालेला आहे.
05. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी त्यांचे लेखी उत्तर पोस्टाव्दारे दाखल केले. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ती ही त्यांची ग्राहक होऊ शकत नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियमची रक्कम स्विकारुन विमा जोखीम स्विकारलेली असल्याने त्यांची तक्रारकर्ती ग्राहक होते. ते केवळ मध्यस्थ सल्लागार आहेत व शासनास विनामोबदला सहाय्य करतात. मृतक शेतकरी श्री सुखदेव भगवान पुंड, गाव टाका, तालुका भिवापूर यांचे मृत्यू संबधाने विमा प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांचे मार्फतीने अपूर्ण स्थितीत 90 दिवसांची वाढीव मुदत संपताना त्यांना प्राप्त झाला, त्यांनी तो प्रस्ताव आहे त्या स्थितीत दिनांक-17.12.2011 रोजी युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी नागपूर येथे पाठविला असता युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने दिनांक-30/12/2011 च्या पत्रान्वये अकस्मात मृत्यू खबरी/मर्ग खबरी व फेरफार पत्रक, 6-क, 6-ड, तलाठी प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवजांची मागणी केली व 30 दिवसात पुर्तता न केल्यास फाईल बंद करण्यात येईल असे वारसदारास कळविल्याचे दिसून येते. त्यानंतर युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने विमा दावा नामंजूर केला परंतु त्याची प्रत त्यांचे जवळ उपलब्ध नसल्याचे कळविले.
06. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भिवापूर, तालुका भिवापूर जिल्हा नागपूर यांनी मंचा समक्ष आपले लेखी निवेदन सादर केले. त्यांनी लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ती कडून शेतकरी अपघात विमा प्रस्ताव त्यांचे कार्यालयास दिनांक-16/08/2011 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी ते प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर यांचे कार्यालयात दिनांक-25/08/2011 रोजीचे पत्रान्वये पाठविला असल्याचे नमुद केले.
07. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्ती हिचे मृतक पती आणि विमाधारक शेतकरी श्री सुखदेव भगवान पुंड यांचा दि.04.06.2011 रोजी शेतात काम करीत असताना आंगावर विज कोसळून मृत्यू झाला ही बाब प्रकरणातील पोलीस दस्तऐवज घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मरणान्वेष्यण प्रतिवृत्त प्रमाणपत्र यावरुन सिध्द होते. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण “Shock as a result of lightening” असे नमुद केलेले आहे. तसेच प्रकरणातील मृतकाचे नावे उपलब्ध शेतीचे दस्तऐवज गाव नमुना-7/12 आणि गाव नमुना-8-अ, सहा-क, तलाठी प्रमाणपत्र यावरुन मृतक शेतकरी होता ही बाब सिध्द होते. मृतकाचा विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सन-2010-11 मध्ये दि.15 ऑगस्ट, 2010 ते 14 ऑगस्ट, 2011 या कालावधीत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढला होता व मृतकाचा मृत्यू हा दिनांक-04.06.2011 रोजी विमा कालावधीत झालेला आहे या बाबी प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजां वरुन सिध्द होतात.
09. महाराष्ट्र शासनाचे शेतकरी जनता अपघात विमा योजना सन-2010-11 दिनांक-10 ऑगस्ट, 2010 चे परिपत्रका नुसार विमा योजना संपल्या नंतर 90 दिवसा पर्यंत तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्त झालेले विमा प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव विमा कंपनीने स्विकारावेत असेही त्यात नमुद आहे. विमा योजना संपल्याचा दिनांक-14 ऑगस्ट, 2011 असून तेथून 03 महिने म्हणजे
दिनांक-14 नोव्हेंबर, 2011 पर्यंत मुदत होती. तक्रारकर्तीने विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, भिवापूर यांचे कार्यालयात दिनांक-12/08/2011 रोजी सादर केल्याची बाब तालुका कृषी अधिका-यांचे पोच वरुन दिसून येते. थोडक्यात तक्रारकर्तीने विहित मुदतीत विमा दावा सादर केल्याची बाब सिध्द होते.
10. विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी दिनांक-30/12/2011 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवून एफ.आय.आर, फेरफार पत्रक, 6-क, 6-ड, तलाठी प्रमाणपत्र, आकस्मीक मृत्यू खबरी/मर्ग खबरी विमा दावा निश्चीती संदर्भात मागणी केली होती व 30 दिवसांचे आत पुर्तता न केल्यास क्लेम फाईल बंद करण्यात येईल असेही कळविले होते परंतु तिने त्याची पुर्तता केली नसल्याने तिला आता विमा दावा मागण्याचा हक्क उरत नाही व सदर पत्राची प्रत विरुध्दपक्ष क्रं-2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पाठविल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने लेखी युक्तीवादा व्दारे तिला विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी कडून असे कुठलेही पत्र प्राप्त झाल्याची बाब नाकारलेली आहे. सदरचे दिनांक-30/12/2011 रोजीचे पत्र तक्रारकर्तीला मिळाले असल्या बद्दलचा पुरावा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दाखल केलेला नाही. त्याच बरोबर ही बाब सुध्दा तितकीच महत्वाची आहे की, महाराष्ट्र शासनाने मृतक शेतक-याचे वारसांना त्वरीत विमा रक्कम प्राप्त व्हावी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांची विमा दावा त्रृटींची पुर्तता करण्या करीता म्हणून जबाबदारी सोपविलेली असताना त्यांनी सुध्दा कोणतेही लक्ष दिले नसल्याचे दिसून येते जेंव्हा की, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दस्तऐवजाची पुर्तता करण्या संदर्भात तक्रारकर्तीला दिलेल्या पत्राची प्रतिलिपी त्यांनाही दिल्याचे पत्रावरुन दिसून येते.
11. तक्रारकर्तीने आपल्या शपथपत्रा मध्ये असेही नमुद केले आहे जो पर्यंत तिला विमा दावा मंजूर झाला किंवा नाही हे कळविल्या जात नाही तो पर्यंत तिची तक्रार ही मुदतीत येते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्या बाबत पत्र दिल्याचा पुरावा अभिलेखावर दाखल नसल्याचे तक्रारकर्तीचे या म्हणण्यात तथ्य दिसून येते.
12. तक्रारकर्तीचे मृतक पती हे शेतकरी होते, त्यांचा अपघाती मृत्यू झाला या बाबी दाखल अभिलेखावरील प्रतीवरुन सिध्द होतात. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने मागणी केलेल्या दस्तऐवजांची पुर्तता अद्दापही झालेली नसल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने दिनांक-30/12/2011 रोजीचे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे पत्रा नुसार गाव नमुना-7/12, आठ-अ, सहा-क, सहा-ड तलाठी प्रमाणपत्र, मोका घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचा दाखला अशा दस्तऐवजाच्या प्रती विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालयात निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 15 दिवसांचे आत पुरवाव्यात व त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्तीला शेतकरी अपघात विमा दाव्या योजने अंतर्गत देय रक्कम रुपये-1,00,000/- विमा दावा सादर केल्याचा दिनांक-12/08/2011 पासून 03 महिने सोडून म्हणजे दिनांक-12/11/2011 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह द्दावेत.
13. या ठिकाणी उल्लेख करणे अत्यंत जरुरीचे आहे की, तक्रारकर्ती कडून दस्तऐवजाची पुर्तता करण्याची जबाबदारी जरी विरुध्दपक्ष क्रं-(2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे कडे असली तरी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस हे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीस विमा दावा निश्चीत करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी नेमलेली एक यंत्रणा आहे व तो विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे मधील अंतर्गत व्यवहार आहे, दस्तऐवजाची पुर्तता तक्रारकर्ती कडून विरुध्दपक्ष क्रं-2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे तर्फे करवून घेण्याचे कार्य हे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे आहे. तक्रारकर्तीने विहित मुदतीचे आत विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला आहे, दरम्यानचे काळात विरुध्दपक्ष क्रं-2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस हे विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे सादर करण्यापूर्वी दाव्या सोबत आवश्यक असलेल्या दस्तऐवजांची काळजीपूर्वक छाननी करुन त्याच वेळी तक्रारकर्ती कडून दस्तऐवजांची पुर्तता करु शकले असते परंतु त्यांनी तसे केले नाही, याचाच अर्थ असा होतो की, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचा आपसी योग्य ताळमेळ नाही, परिणामी तक्रारकर्तीने विहित मुदतीचे आत विमा दावा दाखल करुनही तिला आज पर्यंत विम्या दाव्याचे रकमे पासून वंचित राहावे लागले. दाखल दस्तऐवजी पुराव्या वरुन तक्रारकर्तीचे पतीचा योजनेच्या काळात अपघाती मृत्यू झाल्याची बाब सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी देण्यास जबाबदार आहे असे मंचाचे मत आहे.
14. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंचा तर्फे प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
::आदेश::
1) तक्रारकर्ती श्रीमती शोभा सुखदेव पुंड यांची तक्रार खालील निर्देशांसह अंशतः मंजूर करण्यात येते.
2) तक्रारकर्तीला निर्देशीत करण्यात येते की, तिने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून शक्यतोवर पंधरा दिवसांचे आत निकालपत्रातील परिच्छेद क्रं-2) मधील नमुद दस्तऐवजांच्या प्रती विमा दावा निश्चीती संबधाने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालयात दाखल कराव्यात.
3) विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, विभागीय कार्यालय, शंकरनगर, नागपूर यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्ती कडून विमा दावा निश्चीती संबधाने आवश्यक गाव नमुना-7/12, आठ-अ, सहा-क, सहा-ड तलाठी प्रमाणपत्र, मोका घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचा दाखला अशा दस्तऐवजाच्या प्रती प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत तिचे मृतक पती सुखदेव पुंड यांचे अपघाती मृत्यू संबधाने देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- दिनांक-12/11/2011 पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह तक्रारकर्तीस अदा करावेत.
4) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत.
5) विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीस असे निर्देशित करण्यात येते की, त्यांना तक्रारकर्ती कडून निकालपत्रात नमुद केलेले दस्तऐवजाच्या प्रती प्राप्त झाल्या नंतर 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीचा विमा दावा निश्चीत करुन तिला परिच्छेद क्रं-3) मध्ये नमुद केल्या प्रमाणे देय विमा रक्कम नमुद केलेल्या व्याज दरासह तसेच परिच्छेद क्रं-4) मध्ये नमुद केल्या प्रमाणे नुकसान भरपाईच्या रकमा अदा कराव्यात.
6) विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) यांना या तक्रारीतुन मुक्त करण्यात येते.
7) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिलेल्या विहित मुदतीत करावे.
8) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी.