::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/04/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा पुरावा, उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद व उभय पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला.
उभय पक्षात याबद्दल वाद नाही की, तक्रारकर्ते हे मालेगाव येथील रहिवाशी असून, मालेगांव येथे गट क्र. 655 मध्ये अशोका ट्रेडर्स अॅंन्ड इंडस्ट्रीज या नावाने भागीदारी तत्वावर कापूस खरेदी व त्यावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाकडून Standard Fire and Special Perils Policy या प्रकारची तीन विमा पॉलिसीज प्राप्त करुन घेतल्या होत्या, सदर पॉलिसी क्रमांक व विमा कालावधीबाबत उभय पक्षात वाद नाही. यावरुन तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. उभय पक्षात हा वाद नाही की, विरुध्द पक्षाच्या वरील प्रकारच्या पॉलिसीनुसार तक्रारकर्त्यांच्या फॅक्टरीच्या माल जसे, कापुस, रुई व सरकी या मालाचे संरक्षण होणार होते.
तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, दिनांक 06/03/2014 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेच्या दरम्यान अचानक अतिशय मोठया प्रमाणात गारपीट झाली व या गारांच्या वादळी पाऊसामुळे विम्याचे संरक्षण असलेल्या कारखान्यातील शिल्लक माल, कापुस गठाण, सरकी व रुई या मालाचे रुपये 30,00,000/- ईतक्या रक्कमेचे नुकसान झाले. याबद्दल महसुल खात्यात नोंद होवून, तलाठी यांनी तसा पंचनामा करुन प्रमाणपत्र दिले. या मालाची नुकसान भरपाई, विमा रक्कम मिळावी म्हणून विरुध्द पक्षाकडे माहिती अर्ज केला व आवश्यक ते दस्त पुरवून क्लेम फॉर्म दाखल केला. विरुध्द पक्ष कंपनीचे सर्वेअर रॉबर्ट रोडरिग्स अॅंण्ड कंपनी यांनी पाहणी करुन, तसा अहवाल विरुध्द पक्षाकडे दिला. सर्व्हेअरने मागणी केलेले कागदपत्र सुध्दा पुरविले. परंतु त्यानंतर विरुध्द पक्ष विमा कंपनीने दिनांक 14/11/2014 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्ते यांचा विमा दावा कारणे देवून नाकारला. परंतु पत्रातील कारण कायदेशीर नाही. त्यामुळे ही सेवा न्युनता ठरते.
2) यावर विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते यांच्या सदर पॉलिसीच्या अटी, शर्तीनुसार पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची जोखीम या विमा पॉलिसीत समाविष्ठ नाही. मालाचे नुकसान जर STFI आणि RSMD ने झाले तरच दावा पेयेबल राहील. STFI मध्ये STORM, CYCLONE, TYPHOON, TEMPEST, HURRICANE, TORNADO, FLOOD AND INUNDATION चा समावेश होतो तर RSMD मध्ये RIOT, STRIKE, MALACIOUS DAMAGE AND TERRORISUM चा समावेश होतो. तक्रारकर्ते यांचे सदर नुकसान हे STFI आणि RSMD नुसार झाले नाही. ते नुकसान फक्त अवकाळी पाऊस पडल्यामुळे झाले. या विमा दाव्याची चौकशी, विरुध्द पक्षाने त्यांचे मान्यताप्राप्त शासकीय परवानाधारक रॉबर्ट रोडरिग्स आणि कंपनी, औरंगाबाद तर्फे केली, त्यांनी तक्रारकर्त्यास वारंवार कागदपत्रांची मागणी करुन सुध्दा, तक्रारकर्त्याने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही म्हणून सदर पॉलिसीच्या अटी, शर्तीनुसार तक्रारकर्ते यांचा विमा दावा कारणे देवून नाकारला. त्यामुळे सेवा न्युनता होणार नाही. विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, सर्वे अहवालानुसार घटनेच्या दिवशी उपलब्ध असलेल्या मालाच्या साठयापैकी काही माल हा गारांच्या पाण्यामुळे ओला झाला होता. सदरचा पाऊस हा अवकाळी स्वरुपाचा होता व तक्रारकर्त्याने माल हा खुल्या जागेत ठेवला होता व त्याची योग्य ती काळजी घेतली नव्हती. सर्वेअरचे आदेश असतांना तक्रारकर्त्याने डॅमेज माल सुध्दा विकला होता. तक्रारकर्त्याने त्याला नुकसान झालेल्या मालाची किंमत सर्वेअरला वेगळी सांगितली व तक्रारीत वेगळी लिहली तसेच तलाठी दाखल्यात ती वेगळीच दर्शविली म्हणून तो पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. पॉलिसीच्या अटी, शर्तीनुसारची घटना घडलेली नाही. जर तुफान, वारावादळ, पूर आला असता तर, माल वाहून गेला असता, ईमारतीला तडे गेले असते. नैसर्गीक आपत्तीमध्ये ही घटना मोडत नाही. सर्वेअरने सर्व मालाचे निरीक्षण करुन नुकसान रुपये 10,77,502/- ईतक्या रक्कमेचे निश्चीत केले आहे. परंतु ही रक्कम सुध्दा पॉलिसीच्या अटीनुसार देय नाही.
3) कारणे व निष्कर्ष ::
उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर व सदर पॉलिसी प्रत, या दस्ताचे अवलोकन केल्यानंतर असे आढळते की, तक्रारकर्ते यांच्या मालाचे नुकसान झाले आहे, ही बाब विरुध्द पक्षास मान्य आहे. परंतु दिनांक 06/03/2014 रोजी जी घटना घडलेली आहे, ती STFI मध्ये STORM, CYCLONE, TYPHOON, TEMPEST, HURRICANE, TORNADO, FLOOD AND INUNDATION मोडते का ? याबद्दलचा निष्कर्ष दाखल दस्तावरुन निघतो का? हे मंचाला तपासणे आहे. याबद्दल उभय पक्षाने मेट्रॉलॉजीकल डिपार्टमेंट कडील प्रमाणपत्र दाखल केले नाही. मात्र दाखल सर्वे रिपोर्टमध्ये सर्वेअरने असे नमुद केले की, “ The stock stored in the open was damaged by rain water and melted hails, there was hailstorm to some extent but the stock was not damaged by impact of hails. ” यावरुन मंचाचे असे मत आहे की, जरी घटनेमुळे ईमारतीला तडे वगैरे गेले नाही तरी, त्या दिवशी hailstorm ची घटना घडली होती, हे विरुध्द पक्ष सर्वेअर मान्य करतात व Storm चे Dictionary meaning असे आहे, A violent disturbance of the atmosphere with strong winds and usually rain, thunder, lightning or snow. These kinds of storms can produce rain, hailsnow, thunder and lightning. तसेच Storm ला समानार्थी शब्द tempest, cyclone, tornado असे होवू शकतात. म्हणजे पॉलिसी अट STFI मध्ये वादातील घटना मोडते. तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा .. 2013 AC 803 (NCDRC-New Delhi ) Oriental Insurance Co. Ltd. X M/s. R.P.Bricks नि.ता. 15/05/2013
यामध्ये मा. वरीष्ठ न्यायालयाने या घटनेबाबत असे निर्देश दिले की, माल हा पावसाच्या पाण्यामुळे किंवा गारांच्या पाण्यामुळे जर खराब झाला असेल तर, अशा परिस्थितीत, खालील प्रमाणे गृहीतके आहेत, On this analogy loss caused due to seepage following heavy rains into any part of the insured premises would be covered under the definition of ‘ flood ’ and ‘inundation.’ म्हणून तक्रारकर्त्याचा विमा दावा हा सदर पॉलिसीच्या अटी-शर्तीत बसतो असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असा बोध होतो की, त्यांनी सर्वेअरच्या मागणीनुसारचे सर्व दस्तऐवज दिनांक 21/04/2014 व दिनांक 01/08/2014 रोजीच्या पत्रानुसार विरुध्द पक्ष सर्वेअरला पुरविलेले आहेत. तक्रारकर्ते यांनी नुकसान भरपाईची किंमत प्रत्येक दस्तात वेगवेगळी कथन केली आहे. तक्रारकर्ते यांनी जरी रुपये 30,00,000/- ईतक्या रकमेचा नुकसानीबाबत तलाठी, मालेगांव यांचा दाखला तक्रारीसोबत जोडला तरी, तक्रारीतील प्रार्थनेत पहिल्यांदा रक्कम रुपये 10,00,000/- ईतक्या रकमेची मागणी केली होती, त्यानंतर दुरुस्ती करुन ती रक्कम रुपये 20,00,000/- मागीतली आहे. परंतु मंचाने सर्वेअरच्या अहवालावर भिस्त ठेवल्यामुळे त्यानुसारची निश्चित केलेली नुकसान भरपाई रक्कम रुपये 10,77,502/- सव्याज, ईतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास देणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. या प्रकरणात उभय पक्षाने दाखल केलेल्या न्यायनिवाडयांपैकी फक्त वर नमुद न्यायनिवाडयातील तथ्थ्ये हातातील प्रकरणात जसेच्या तसे लागू पडत असल्याने ईतर न्यायनिवाडयांचा उल्लेख करणे टाळले आहे.
सबब, अंतिम आदेश पुढीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना विमा दावा रक्कम रुपये 10,77,502/- ( रुपये दहा लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे दोन फक्त ) दरसाल, दरशेकडा 9 % व्याजदराने दिनांक 07/12/2015 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत दयावी. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई व प्रकरणाचा न्यायिक खर्चमिळून रक्कम रुपये 8,000/- (रुपये आठ हजार फक्त) अदा करावी.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
s.v.Giri