(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 31 ऑक्टोंबर, 2017)
1. तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्तीच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्ती ही राहणार - उखळी, तालुका – भिवापूर, जिल्हा - नागपुर येथील रहिवासी असून तिचे पती योगेश्वर गुंडेराव चांभारे याच्या मालकीची मौजा – उखळी, ता. भिवापूर, जिल्हा नागपूर येथे भूमापन क्रमांक 70/2 ही शेत जमीन आहे. तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता व शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुंटूंबाचे पालन-पोषण करीत होता.
3. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ही विमा कंपनी असून ते शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.3 मार्फत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ती महिलेच्या पतीचा विमा रुपये 1,00,000/- चा विमा उतरविला होता. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 6.8.2010 रोजी विषारी सापाने चावा घेतल्याने झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र.3 कडे दिनांक 04.12.2010 रोजी रितसर अर्ज केला व तसेच विरुध्दपक्षाने मागणी केलेल्या दस्ताऐवजांची पुर्तता केली. परंतु, तिच्या पतीच्या विमा दाव्या बाबत 6 वर्षे लोटूनही विमा दावा मंजुर झाला अथवा नाही, याबाबत काहीही कळले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 16.9.2016 रोजी विरुध्दपक्ष क्र.3 कडे सदर दाव्याबाबत माहिती मागितली, परंतु त्यांनी त्यासंबंधी काहीही माहिती दिली नाही. तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम मिळाली नसल्याने त्यावरील व्याजालाही मुकावे लागत आहे. ज्यादिवशी शासनाने मृत शेतक-यांच्या कुंटूंबाकरीता ही योजना सुरु केली, त्या उद्देशाला विरुध्दपक्ष तळा देत आहे. यावरुन, विरुध्दपक्ष हे सेवेमध्ये त्रुटी देत आहे असे समजते. त्यामुळे, तक्रारकर्तीने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे प्रस्ताव दिल्यापासून म्हणजेच दिनांक 4.12.2010 पासून द.सा.द.शे.18 % टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे.
2) तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 15,000/- ची रक्कम देण्याचे विरुध्दपक्ष यांचेविरुध्द आदेश द्यावे.
4. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी आपला लेखी जबाब सादर करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्तीची तक्रार ही मुदतबाह्य असून ती खारीज होण्यास पात्र आहे. दिनांक 6.8.2010 रोजी तक्रारकर्तीच्या प्रतीचा मृत्यु विषारी सापाने चावल्यामुळे झाला, परंतु रितसर विमा दावा दाखल करण्यास ती अपात्र ठरली. विरुध्दपक्ष क्र.3 यांनी आवश्यक ती कार्यवाही यासंबंधी केली नाही व जरुरी कागदपत्रे वारंवार मागणी करुनही दिले नाही. तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत, या पॉलिसी अंतर्गत विमा दावा मिळण्याकरीता आवश्यक ते कागदपत्र विरुध्दपक्ष क्र.3 मार्फत विरुध्दपक्ष क्र.1 कडे पाठविले नाही. त्यामुळे, विरुध्दपक्ष क्र.1 हे तक्रारकर्तीस सदर विमा दाव्याची रक्कम देण्यास अक्षम्य ठरले. तक्रारकर्तीने तिच्या पतीचा मृत्यु झाल्यानंतर ब-याच वर्षापर्यंत विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे विरुध्दपक्ष क्र.1 कडे दाव्याची मागणी केली नाही, त्यामुळे ही तक्रार प्राथमिक दृष्ट्या खारीज होण्यास पात्र आहे.
5. विरुध्दपक्ष क्र.3 आपले लेखीउत्तर दाखल करुन नमूद केले की, शासनाचे निर्णयान्वये अपघात झालेल्या शेतक-यांच्या वारसास मागदर्शन करुन सविस्तर प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत विमा कंपनीस सादर करण्यात येते. सदर प्रस्तावाची छाणनी विमा कंपनी करते. तक्रारकर्तीकडून दिनांक 4.12.2010 ला विमा प्रस्ताव प्राप्त झाला. सादर केल्या प्रस्तावाची तपासणी करुन या कार्यालयाने दिनांक 6.12.2010 ला जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, नागपुर यांना सादर करण्यात आला. त्यापत्राची प्रत विरुध्दपक्षाने लेखीउत्तरासाबत जोडली आहे.
6. तसेच, विरुध्दपक्ष क्र. 2 यांना मंचा मार्फत नोटीस पाठविलेली नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्ष क्रमांक 2 मंचात हजर झाले नाही व आपले म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे मंचाने विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 20.4.2017 ला पारीत केला.
7. सदर प्रकरणात तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र.1 चे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षानी अभिलेखावर दाखल केलेली तक्रार, लेखी बयाण व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी असून तो आपल्या कुंटूंबाचे पालन-पोषण शेतीवरील उत्पन्नावर करीता होता. निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.4 वर तिच्या पतीचे नावा सात-बारा जोडलेला आहे. त्याचप्रमाणे पोलीसांचे पोस्टमार्टम रिपोर्ट अन्वये तक्रारकतीच्या पतीचा मृत्यु हा सापाने डाव्या पायाचे घोट्यावर चावा घेतल्याने मृत्यु झाला असल्याचे नमूद केले आहे. तो निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.5 व 6 वर दाखल आहे. तसेच, दस्त क्र. 7 वर त्याचे मृत्युचे प्रमाणपत्र लावलेले आहे.
9. वरील सर्व दस्ताऐवजांवरुन तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा विषारी सापाने चावा घेतल्याने झाला असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्ष क्र.3 तालुका कृषि अधिकारी यांनी दिनांक 6.12.2010 रोजी में.कबाल इंन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि., नागपुर यांचेकडे तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव कागदपत्रासह पाठविल्याचे दिसून येते. तो निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.3 वर दाखल आहे. यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 यांना रितसर विमा दावा प्रस्ताव प्राप्त होऊनही त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर केला अथवा नाही, यासंबंधी 6 वर्षापासून कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे, तक्रारकर्तीस विमा दाव्याचे मुळ रकमेसह व्याजासही मुकावे लागत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाला वाटते. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 युनायटेड इंडीया इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- यावर दावा दाखल दिनांक 6.12.2010 पासून रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.18 % व्याजासह द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 31/10/2017