निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 29/07/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 07/05/2012
कालावधी 09 महिने 03 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल , M.Sc.
1 सुदामती भ्र.एकनाथ गिरी. अर्जदार
वय 45 वर्ष.धंदा.शेती व घरकाम. अड.बी.ए.मोदानी.
रा.मुरुंबा पो.असोला.जि.परभणी.
2 भागवत पिता एकनाथ गिरी.
वय. 28 वर्ष.धंदा.शेती.
3 अंगद पिता एकनाथ गिरी.
वय. 25 वर्ष.धंदा.शेती.
4 जनाबाई भ्र.विठ्ठलबुवा गिरी.
वय.21 वर्ष.धंदा.घरकाम.
रा.मुरुंबा पोस्ट असोला जि.परभणी.
विरुध्द
1 युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार.
दयावान कॉम्पलेक्स,स्टेशन रोड.परभणी. अड.जी.एच.दोडीया.
तर्फे शाखा व्यवस्थापक,शाखा परभणी.
2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायण प्लॉट नं.7- इ,सेक्टर 1.
एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स जवळ, कॅनॉट गार्डन टाऊन सेंटर.
सिडको.औरंगाबाद.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेची नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदार मौजे मुरुंबा जि. परभणी येथील रहिवाशी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती एकनाथ गिरी हा देखील लाभार्थी होता तारीख 19/10/2009 रोजी अर्जदारच्या पतीचा परभणी - वसमत रोडवर वाहन अपघातात मृत्यू झाला. अर्जदारने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेमफॉर्मसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिनांक 19/12/2009 तालुका कृषी अधिकारी परभणी यांचेकडे सुपूर्त केली. त्यांनी त्यानंतर ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे मंजुरीसाठी पाठविली.गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यानंतर तारीख 05/02/2010 चे कृषी अधिकारी परभणी यांना पत्र पाठवुन ड्रायव्हींग लायसेन्स व आर.सी.बुकाची छायाप्रत पाठविणे बाबत कळविले.याबाबत अर्जदाराचे म्हणणे असे की, अपघात झालेल्या मयताकडे वाहन चालविण्याचा परवाना होता किंवा नाही, हे पाहण्याची आवश्यकता नसतांना वरील कागदपत्रांची आवश्यकता नसतांना मागणी केली आहे.अर्जदाराने त्यानंतर क्लेम मंजुरीसाठी कृषी अधिकारी यांना वारंवार भेटून चौकशी केली असता त्यांचेकडून कसलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही आणि शेवटी तारीख 24/03/2011 चे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास पत्र पाठवून “ करारा नुसार आपण संबंधीत कागदपत्रे 90 दिवसाच्या मुदतीत न दिल्यामुळे तुमचा नुकसान भरपाईचा दावा देता येत नाही.” असे कळविले.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराचा वरील प्रमाणे चुकीच्या व बेकायदेशिर कारणास्तव क्लेम नामंजूर करुन त्याच्यावर अन्याय केला आहे व मानसिकत्रास दिला आहे म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- मानसिकत्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- 18 टक्के व्याजासह मिळावा अशी मागणी केली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तारीख 01/12/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि.20) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 12.09.2011 रोजी प्रकरणात नि.10 ला समाविष्ठ केले.
गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.20) दाखल केला. तक्रार अर्जातून त्यांच्या विरुध्द केलेल्या विधानांचा इन्कार करुन प्रस्तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्द मुळीच चालणेस पात्र नाही त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे की, अर्जदारने पाठविलेल्या क्लेम कागदपञात ड्रायव्हींग लायसेन्सची सत्यप्रत पाठविणे बाबत कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यांनी अर्जदारास तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत दिनांक 05/02/2010 रोजी आणि त्यानंतर पुन्हा दिनाक 05/10/2010, 03/11/2010, 06/12/2010 अशी स्मरणपत्रे पाठवुनही ड्रायव्हींग लायसेन्सची पुर्तता केली नव्हती. कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यांच्याकडून अर्जदाराचा क्लेम विमा कंपनीकडे मिळाला, परंतु सदरची कागदपत्रे पॉलिसीची शेवटची मुदत 14/11/2010 रोजी संपल्यानंतर नियम अटी प्रमाणे 90 दिवसाचे आत न मिळाल्याने अर्जदाराचा क्लेम वरील कारणास्तव नामंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतीत त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही. व गैरअर्जदार विमा कंपनीवर नुकसान भरपाई देण्याची मुळीच जबाबदारी येत नाही. अर्जदाराने त्यांचे विरुध्द तक्रार अर्जामध्ये केलेली बाकीची सर्व विधाने साफ नाकारून तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 1 चे शपथपत्र (नि.21) आणि पुराव्यातील कागदपञात नि.25 लगत विमा पॉलिसीची छायाप्रत दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.10) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्रांची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत एकनाथ रामभाऊ गिरी याच्या डेथक्लेमची कागदपत्रे तारीख 23/12/2009 रोजी प्राप्त झाली. त्यामध्ये ड्रायव्हींग लायसेन्सची सत्यप्रत पाठवलेली नव्हती. त्याची पुर्तता करण्यासाठी अर्जदारास ता.05.02.2010 त्यानंतर पुन्हा 05/10/2010, 03/11/2010, 6/12/2010 अशी स्मरणपत्रे पाठवुनही लायसेन्सची पुर्तता केली नाही. त्यामुळे तसा शेरा मारून विमा कंपनीकडे अपु-या कागदपञासह क्लेम 21.12.2010 रोजी पाठविला. आणि त्यानंतर विमा कंपनीने 31.12.2010 च्या पञाव्दारे अर्जदारास पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत कागदपञे न दिल्यामुळे क्लेम नाकारला असल्याचे कळविले होते. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत अर्जदारास वेळोवेळी पाठविलेल्या स्मरणपत्राच्या छायाप्रती आणि विमा कंपनीचे तारीख 24.03.2011 क्लेम नाकारल्याचे पत्र दाखल केले आहे.
तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.मोदानी आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर
1 गैरअर्जदार 1 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या
शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई
मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराचा मयत पती एकनाथ रामराव गिरी हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत सादर केलेल्या नि.4/5 वरील गट क्र.119 चा 7/12 उतारा, नि.4/4 वरील फेरफार उतारा, नि.4/1 सोबत दाखल केलेल्या कागदपत्रातील गाव न.नं.6-क चा उतारा, व होल्डींग प्रमाणपञ या महसुल कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 19.10.2009 रोजी सांयकाळी साडेसहा वाजता मयत एकनाथ रामराव गिरी व त्याचे सोबत जगन्नाथ चोपडे हिरो होंडा मोटर सायकल क्र. एमएच 22- जे 802 वर बसून गावाकडे येत असतांना परभणी वसमत रोडवर अज्ञात जीप चालकाने समोरून भरधाव येवुन मोटार सायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात अर्जदाराचा पती मयत झाला होता ही वस्तुस्थिती पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/6 वरील ताडकळस पोलिस स्टेशन गु.रजि.नं. 73/09 मधील घटनास्थळ पंचनामा, नि.4/7 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/8 वरील पी.एम.रिपोर्ट या पुराव्यातून शाबीत झाले आहे.
मयत एकनाथ रामराव गिरी हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत गैरअर्जदाराकडे विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपघात घडल्यानंतर लगेच सादर केलेली होती. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना अर्जदाराचा विमाक्लेम मिळाला होता ही अडमीटेड फॅक्ट आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी लेखी जबाबामध्ये असे नमुद केले आहे की, अर्जदाराने पाठवलेल्या क्लेम कागदपत्रात ड्रायव्हींग लायसेन्सची सत्यप्रत पाठवलेली नव्हती आणि ती पाठवण्यासाठी अर्जदारला कृषी अधिका-या मार्फत तारीख 05/02/2010 व त्यानंतर 5/10/2010, 3/11/2010, 6/12/2010 अशी स्मरणपत्रे पाठवुनही पुर्तता केली नाही स्मरणपत्राच्या स्थळप्रती देखील पुराव्यात गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबा सोबत दाखल केलेल्या आहेत.ड्रायव्हींग लायसेन्सची कॉपी न पाठवल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने तसा शेरा मारुन गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे क्लेमची कागदपत्रे पाठवल्यानंतर त्यांनी देखील तीच बाब लक्षात घेवुन आणि अर्जदारचा विमाक्लेम पॉलिसी कंडीशन प्रमाणे पॉलिसीची शेवटची मुदत संपल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्यांना मिळाला नसल्यामुळे अर्जदारकडुन पॉलिसी नियमांचे उल्लंगन झाल्यामुळे नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नसल्याने तारीख 24.03.2011 च्या पञाव्दारे अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला असल्याचे तिला कळविले होते. त्या क्लेम नामंजुर पञाची छायाप्रत अर्जदाराने पुराव्यात नि.4/1 वर दाखल केली आहे, परंतु याबाबतीत आमचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन मोटार सायकलवरुन जात असतांना झालेले होते, ही गोष्ट खरी असली तरी मोटार सायकलला समोरुन येणा-या ति-हाईत वाहनाने (जीपने) धडक दिल्यामुळे अपघात होवुन अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला होता ही वस्तुस्थिती आहे. सदरचा अपघात मयत एकनाथ गिरी याच्या वाहन चालवण्यातील निष्काळजीपणामुळे मुळीच झालेला नव्हता ही वस्तुस्थिती पुराव्यातील कागदपत्रातून स्पष्ट दिसते त्यामुळे अर्जदारने मयत पतीचा विमाक्लेम दाखल केल्या नंतर वास्तविक मयताच्या ड्रायव्हींग लायसेन्सची गैरअर्जदाराने केलेली मागणी मुळातच गैर व बेकायदेशिर आहे.व सदर प्रकरणी अर्जदाराने मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स देण्याची आवश्यकताही नाही असे असतांना गैरअर्जदार विमा कंपनी केवळ त्याच कारणासाठी अर्जदाराचा क्लेम तारीख 24/03/2011 च्या पत्रातून नाकारुन अर्जदारावर निश्चितपणे अन्याय केलेला आहे.दुसरी गोष्ट अशी की, पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे. ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्लेम चुकीच्या पध्दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्याचे स्पष्ट दिसते. गैरअर्जदार नं 3 यांनी मयत एकनाथ रामराव गिरी याचा डेथक्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवलेले आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार नं 1 यांनी अर्जदार क्रमांक 1 ते 4 यांना कायदेशिर हिस्या प्रमाणे डेथक्लेमची नुकसान भरपाई रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास द्यावी.
3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
सौ. अनिता ओस्तवाल श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या अध्यक्ष