निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 25/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 07/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 07/07/2011 कालावधी 05 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. आश्रोबा पिता आप्पाराव जोरवार अर्जदार वय 60 वर्ष.धंदा. शेती. अड.एस.बी.धुळे. रा.हाटकरवाडी ता.मानवत जि.परभणी. विरुध्द युनायटेड इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार. शाखा परभणी ता.जि.परभणी. अड.आर.बी.वांगीकर. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) इंश्युअर्ड ट्रॅक्टरची अपघातात झालेली नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदार हा हटकरवाडी ता.मानवत येथील रहिवासी शेतकरी असून शेती कामासाठी त्याने MH-22 / H-5193 नंबरचा ट्रॅक्टर व खरेदी केलेला आहे.ट्रॅक्टरचा त्याने गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता,त्याची मुदत 18/03/2009 ते 17/03/2010 व पॉलिसी नंबर 230601/47/08/96/0002692 होता तारीख 22/02/2010 रोजी ब्रम्हपुरी शिवारातील ट्रॅक्टरने शेत नागरत असतांना शेता लगतच्या नाल्यात स्लीप होवुन ट्रॅक्टर पडला ट्रॅक्टरवर बसलेला इसम देखील जखमी होवुन नाल्यात पडला अपघातात ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले.दैठणा पोलिस पोलीस स्टेशनला अपघाताची खबर दिल्यावर पोलीसांनी गुन्हा रजिष्टर क्रमांक 19/10 प्रमाणे ड्रायव्हर विरुध्द गुन्हा नोंदविला होता,त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीला अपघातातील ट्रॅक्टरच्या नुकसानाची माहिती कळविली होती. विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर मार्फत पाहणी झाल्यावर अर्जदाराने ट्रॅक्टर व ट्रॉलीची दुरुस्ती केली,त्यासाठी त्याला रु.2,00,000/- खर्च करावा लागला ती नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे क्लेम केला, मात्र गैरअर्जदाराने पत्र पाठवुन अपघाताच्यावेळी ट्रॅक्टर चालक दुसराच व्यक्ती होता.व पॉलीसी कंडीशनचा भंग केला आहे, असे कारण दाखवुन नुकसान भरपाईचा क्लेम नामंजूर केला.अर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदार यानी चुकीचे व बेकायदेशिर कारण दाखवुन नुकसान भरपाईचा क्लेम नाकारुन त्याचे आर्थिक नुकसान केलेले आहे,म्हणून त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचामध्ये प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन ट्रॅक्टरची नुकसान भरपाई रु. 20,0000/- आणि मानसिकत्रासाची नुकसान भरपाई रु. 10,000/- गैरअर्जदाराकडून मिळावी अशी तक्रार अर्जातून मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2 ) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेले आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्याने तारीख 19/04/2011 रोजी प्रकरणात आपले लेखी जबाब ( नि.12) दाखल केलेले आहे. त्यामध्ये तक्रार अर्जात वर्णन केले प्रमाणे ट्रॅक्टर अर्जदाराच्या मालकीची असल्याचा व सदर ट्रॅक्टर त्यांच्याकडून विमा उतरविल्या संबंधीचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने साफ नाकारलेली आहेत. त्याचे म्हणणे असे की, अपघाताच्यावेळी अर्जदाराच्या ट्रॅक्टर वरील ड्रायव्हरकडे योग्य ड्रायव्हींग लायसेंन्स नव्हते असे तपासात निष्पन्न झाले होते. अर्जदाराकडून पॉलिसी नियमांचा भंग झालेला असल्यामुळे ट्रॅक्टरची अपघातातील नुकसान भरपाई देण्यास कंपनी जबाबदार नाही, सबब तक्रार अर्ज रु.5,000/- च्या कॉम्पेन्सेटरीकॉस्टसह खारीज करण्यात यावा. अशी लेखी जबाबाच्या शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र ( नि.13 ) आणि नि.15 लगत विमा पॉलिसीची प्रत व चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. प्रकरणाताचे अंतिम सुनावणीच्यावेळी अर्जदार तर्फे मंचासमोर कोणीही हजर नव्हते गैरअर्जदार तर्फे अड.वांगीकर यांनी युक्तीवाद केला. निर्णयासाठी उपस्थितीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मालकीच्या ट्रॅक्टरची अपघातात झालेली नुकसान भरपाईचे बेकायदेशिररित्या नाकारुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय. असल्यास किती ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2. अर्जदाराच्या मालकीचा जॉन डिअर मॉडेलचा ट्रॅक्टर नंबर MH-22 / H 5193 गैरअर्जदाराकडून इंश्युअर्ड केलेली होता, ही अडमिटेड फॅक्ट आहे. शिवाय पुराव्यात देखील अर्जदाराने ट्रॅक्टरचे आर.सी.बुक ची छायाप्रत (नि.5/4) आणि विमा पॉलीसी सर्टीफिकेट (नि.5/5) दाखल करुन शाबीत केलेले आहे. ट्रॅक्टरच्या विमा पॉलीसीची मुदत 18/03/2009 ते 17/03/2010 अखेर असल्याची त्यावर नोंद आहे. दिनांक 22.02.2010 रोजी अर्जदाराचा मुलगा सोपान जोरावर ब्रम्हपुरी शिवारातील शेत ट्रॅक्टरने नांगरत असतांना ट्रॅक्टर स्लीप होवुन शेता लगतच्या नाल्यात पडला ट्रॅक्टर वरील इसमही जखमी होवुन नाल्यात पडला अपघातात ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले. वस्तूस्थिती अपघात घटने नंतर दैठणा पोलीस स्टेशनला अर्जदारने खबर दिल्यानंतर पोलीसानी नोंदविलेल्या गु.र.नं. 19/10 चे कामी दिलेली एफ.आय.आर.वरुन (नि.5/1) आणि घटनास्थळाच्या पंचनामा (नि.5/3) च्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या आहेत त्याचे अवलोकन करता दिसून येते. अपघातामध्ये इन्शुअर्ड ट्रॅक्टरचे नुकसान झाल्या संबंधीची माहिती अर्जदाराने विमा कंपनीस कळविल्यानंतर गैरअर्जदारानी सर्व्हेअरची नेमणूक करुन नुकसानीचा सर्व्हे केला होता ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराने त्यानंतर ट्रॅक्टरची गॅरेज मध्ये दुरुस्त करुन रुपये 2,00,000/- ची दुरुस्तीची बीले व इतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी क्लेम केला होता हे गैरअर्जदारानी नाकारलेले नाही. अर्जदाराने सादर केलेल्या खर्चाच्या बिलावरुन गैरअर्जदार यानी नुकसान भरपाईचे मुल्यांकन ( असेसमेंट) करण्यासाठी नेमलेले सर्व्हेअर व लॉस असेसर श्री. गोविंद उत्तरवार ( नांदेड) यानी कलेल्या स्पॉट सर्व्हेची कॉपी आणि नुकसान भरपाई मुल्यांकन अहवालाची कॉपी अर्जदाराने प्रकरणात (नि.15/2 पान 20) वर दाखल केलेली आहे,त्यामध्ये नुकसान भरपाईचे मुल्यांकन रु.72,000/- विमा कंपनी देय होत असल्याचे नमुद केले आहे.ती नुकसान भरपाई अर्जदारास मंजूर न करता अथवा अदा न करता गैरअर्जदाराने दिनांक 30.12.2010 चे पत्र (नि.5/5) पाठवून अपघाताचेवेळी ट्रॅक्टरचा ख-या ड्रायव्हरचे नाव लपवुन दुसरीच व्यक्ती पोलिसापुढे उभी केली असे तपासात आढळले आहे त्यामुळे अर्जदाराकडून विमा पॉलीसी नियम/अटींचे उललंघन झलेले असल्याने नुकसान भरपाई क्लेम नामंजूर करण्यात आला असल्याचे कळविले. गैरअर्जदाराने वरील कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नाकारला असल्याने विमा कंपनीतर्फे नेमलेल्या चौकशी अधिका-याच्या अहवालावर विसंबून गैरअर्जदार यांनी क्लेम नामंजुरीचा घेतलेला निर्णय कायदेशिररित्या ग्राह्य धरता येईल का ? हा एकच मुद्या प्रकरणाच्या निर्णयाच्या बाबतीत महत्वाचा आहे. गैरअर्जदारातर्फे पुराव्यात नि.15/2 लगत दाखल केलेल्या पान नं 15 वरील विमा कंपनीतर्फे नेमलेले स्वतंत्र चौकशी अधिकारी श्री.मंचकराव खोमणे यांचा चौकशी अहवाल सादर केलेला आहे.त्यामध्ये अपघाताच्या वेळी ट्रॅक्टर ज्ञानोबा फरकांडे हा चालवित होता परंतु त्याचेकडे ड्रायव्हींग लायसेंन्स नसल्यामुळे अर्जदाराने स्वतःचा मुलगा सोपान जोरावर स्वतः चालवित होता असे पोलिसाला मॅनेज करुन सांगितले असे तपासात आढळून आले त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास कंपनी जबाबदार नाही असे मत व्यक्त केले आहे.परंतु पुराव्यातील नि.15/1 वरील एफ.आर.आर.आणि चौकशी अधिका-याने तारीख 14/08/2010 रोजी सोपान जोरावरच्या घेतलेल्या जबाबाचे (नि.15/2 पान 18) अवलोकन केले असता अपघाताचे वेळी तोच ड्रायव्हींग करत होता असे त्याने सांगितलेले आहे. शिवाय एफ.आय.आर.मध्येही त्याचेच नाव आहे.पुराव्यात अर्जदाराने सोपान जोरावर याचे ड्रायव्हींग लायसेंन्स (नि.5/6) दाखल केलेले असल्यामुळे चौकशी अधिका-याच्या अहवालावर विसंबून गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्या जाणूनबुजून क्लेम नाकारला आहे.असाच यातून निष्कर्ष निघतो. चौकशी अहवालाच्या पुष्टयर्थ संबंधीत चौकशी अधिका-याचे शपथपत्र दाखल केले नसल्यामुळे अहवालातील मत किंवा अहवाल कायदेशिररित्या पुराव्यात ग्राह्य धरता येणे कठीण आहे. गैरअर्जदारानी केवळ नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच 30.12.2010 चे पत्र पाठवून बेकायदेशीररित्या क्लेम नाकारुन सेवा त्रूटी केलेली असल्यामुळे सर्व्हेअर श्री.उत्तरवार यांनी केलेल्या अंतिम असेसमेंट रिपोर्टमधील ( नि.15/2 पान 20) सादर केलेल्या सर्व्हेअरच्या बिल चेक रिपोर्ट वरुन फाईनल नुकसान भरपाई मुल्यांकन रु.72,000/- ची नुकसान भरपाई विमा कंपनी अर्जदारला देय होत असल्याचे सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता दिसून येते.त्यामुळे तेवढीच नुकसान भरपाई मिळनेस अर्जदार पात्र आहे. गैरअर्जदारानी सदरची नुकसान भरपाई रक्कम देण्याची कायदेशीर जबाबदारी असतानाही चुकीचे कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम नामंजूर करुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केलेली आहे व त्याचे आर्थीक नुकसान केले आहे. सबब मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या मालकीच्या ट्रॅक्टरची अपघातात झालेली नुकसान भरपाई रुपये 72,000/- द.सा.द.शे. 9 % दराने क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे 30.12.2010 पासून व्याजासह द्यावी. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रु. 3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवण्यात याव्यात. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |