निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 04/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 26/09/2012
कालावधी 10 महिने.21दिवसं.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडीया.
प्रभारी सदस्या -- - सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
गोदावरी भ्र.गौतम एंगडे. अर्जदार
वय 35 वर्ष.धंदा. घरकाम व शेती. अड.पी.ए.शिंदे.
रा.खडी पो.चाटोरी,ता.पालम जि.परभणी.
विरुध्द
1 युनायटेड इंडिया इन्श्योरन्स कं.लि. गैरअर्जदार.
मंडल कार्यालय क्रं 2, अंबिका हाउस. अड.जी.एच.दोडीया.
शंकर नगर चौक,नागपूर -- 440010 2 कबाल इन्श्युरन्स सर्व्हिस प्रा.लि.
तर्फे मॅनेजर.
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1. टाउन सेंटर.
सिडको.औरंगाबाद.431003
3 तालुका कृषी अधिकारी.
तालुका कृषी कार्यालय,पालम.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडीया. अध्यक्ष.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदारांचे पती श्री.गौतम माणिकराव एंगडे हे शेतकरी असून मौजे उमरी ता.पालम जि.परभणी येथे गट क्रमांक 44/1 मध्ये त्यांच्या मालकीची 95 आर एवढी जमीन आहे दुर्देवाने ता. 26/02/2010 रोजी जीप मधून गंगाखेडला जात असता जीपला अटोने धडक देवुन झालेल्या अपघातात मृत्यू पावले. सदर अपघाताची माहिती पोलीस स्टेशन गंगाखेड येथे दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा नोंदवला व घटनारस्थळ पंचनामा केला.
तक्रारदारांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी / गैरअर्जदार 3 यांचेकडे 31/03/2010 रोजी दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सदर प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे पाठवला. तक्रारदारांनी पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत प्रस्तावा संबंधीत कागदपत्रे न मिळाल्यामुळे विमा प्रस्ताव नाकारला तक्रारदारांचे पती ता.26/02/2010 रोजी मृत्यू पावले असून ता. 31/03/2010 रोजी विमा प्रस्ताव गैरअर्जदार 3 यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह दाखल करुनही प्रस्ताव नाकारला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 हजर झालेले असून लेखी म्हणणे ता.02/03/2012 रोजी दाखल केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी वयाचा दाखला, 6-ड चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र वगैरे कागदपत्रांची पुर्तता विहीत मुदतीत म्हणजेच पॉलिसीच्या कालावधीत ता.14/11/2010 पर्यंत झाली नाही.त्यामुळे गैरअर्जदार यांनी ता. 24/03/2011 रोजीच्या पत्रान्वये योग्य कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केला.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी म्हणणे ता. 12/09/2011 रोजी पोस्टाव्दारे न्यायमंचात प्राप्त झाले आहे. गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारादाराच्या प्रस्तावा मध्ये काही कागदपत्रांची म्हणजेच वयाच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत, 6 ड चा उतारा व मृत्यू प्रमाणपत्राची मुळप्रत वगैरे दाखल केलेले नसल्यामुळे सदर कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी स्मरणपत्रे पाठवुनही तक्रारदारांनी कागदपत्रे दाखल केली नाहीत.त्यामुळे गैरअर्जदार 1 विमा कंपनीने ता.31/12/2010 रोजी प्रस्तावाची फाईल बंद केली.सदर प्रकरणात गैरअर्जदार 3 यांना न्यायमंचाची नोटीस मिळूनही हजर नाही.त्यामुळे त्यांचे विरुध्द ता.10/01/2012 रोजी एकतर्फा आदेश देण्यात आला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.पी.ए.शिंदे व गैरअर्जदार 1 यांचे विव्दान वकील श्री.जी.एच.दोडीया यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू ता.26/02/2010 रोजी झालेला असून तक्रारदारांनी नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता विमा प्रस्ताव गैरअर्जदार 3 यांचेकडे ता.31/03/2010 रोजी दाखल केला.गैरअर्जदार 1 व 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या प्रस्तावा सोबत सांक्षाकित केलेला वयाचा दाखला, 6 ड चा उतारा व मृत्यू प्रमाणपत्राची मुळप्रत वगैरे कागदपत्र दाखल नाहीत.सदर कागदपत्रांची मागणी करण्याकरीता वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवुनही कागदपत्रांची पुर्तता केली नाही.गैरअर्जदार 1 विमा कंपनीला आवश्यक कागदपत्रे विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यामुळे विमा प्रस्ताव नाकारला.
तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार गैरअर्जदार 3 यांचेकडे विहीत मुदतीत व आवश्यक कागदपत्रा सहीत दाखल केला आहे.त्यामुळे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव विलंबाच्या कारणास्तव नाकारणे योग्य नाही. असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार 1 विमा कंपनी यांच्या मागणी नुसार सदर कागदपत्रे गैरअर्जदार 3 यांचेकडे दाखल केली आहे, परंतु सदर कागदपत्रे गैरअर्जदार 1 विमा कंपनीला प्राप्त झाल्या बाबत कोणताही पुरावा न्यायमंच समोर नाही. गैरअर्जदार 3 सदर प्रकरणात हजर नाहीत त्यामुळे सदर कागदपत्रे गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे पाठवली नाहीत याबाबत खुलासा होत नाही अशा परिस्थितीत तक्रारदारांनी गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे वयाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, 6 ड चा उतारा व मृत्यू प्रमाणपत्राची मुळ प्रत दाखल केल्यानंतर गैरअर्जदार 1 यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल. असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आ दे श
1 तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की,
वयाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, 6 ड च्या उता-यांची व मृत्यू प्रमाणपत्राची मुळप्रत वगैरे कागदपत्र गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात दाखल करावी.
2 गैरअर्जदार 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, वरील कागदपत्रे विमा कंपनीकडे प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसात तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करावा.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडीया.
प्रभारी सदस्या. प्रभारी अध्यक्षा.