(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 21 सप्टेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे.
1. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता हा राहणार – रिंगणाबोडी, ता. काटोल, जिल्हा – नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्त्याचे वडील उदाराम गंगाराम गजभिये ढाले, मौजा – रिंगणाबोडी, ता. काटोल, जिल्हा नागपूर येथे भुमापन क्रमांक 109 ही शेत जमीन आहे. तक्रारकर्त्याचे वडील शेतीचा व्यवसाय करीत होते.
2. विरुध्दपक्ष क्र.1 ही विमा कंपनी असून विरुध्दपक्ष क्र.2 ही विमा सल्लागार आहे. शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्त्याच्या वडीलाचा रुपये 1,00,000/- विमा उतरविला होता. विमा जरी शासनाच्या वतीने उतरविण्यात आला होता तरी तक्रारकर्ता हा मय्यत श्री उदाराम गंगाराम गजभिये यांचा मुलगा असल्याने तसेच तक्रारकर्त्याच्या आईचा सुध्दा या दरम्याने मृत्यु झाला असल्याने तक्रारकर्ता हा सदर विम्याचा लाभधारक आहे. सदर दाव्याचा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे सर्व कागदपञांची शहानिशा करुन सर्व प्रस्ताव बरोबर आहे हे पाहून विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ला दिला व विरुध्दपक्ष क्र.1 ला सदर दाव्याचे भुगतान करावयाचे होते.
3. तक्रारकर्त्याच्या वडीलाचा मृत्यु दिनांक 25.8.2010 रोजी पुरात वाहून गेल्याने झाला त्यामुळे तक्रारकर्त्याच्या आईने विरुध्दपक्ष क्र.3 कडे दिनांक 25.10.2010 रोजी रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी विरुध्दपक्षाने मागितलेल्या दसताऐवजाची पुर्तता केली. त्यानंतर तक्रारकर्त्याच्या आईचा दिनांक 18.4.2015 रोजी मृत्यु झाला, त्यामुळे तक्रारकर्ता एकमेव वारस असल्याने सदर तक्रार दाखल केली.
4. वास्तविकतः विरुध्दपक्ष क्र.1 ने दावा फेटाळल्याचे कळविले नाही व सदर दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञुटी देत आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने शासनाने मृतक शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी जी योजना सुरु केली त्या उद्देशाला तडा देत आहे.
5. तक्रारीचे कारण नागपूर जिल्ह्यातील असल्याने सदर तक्रार विद्यमान मंचाचे कार्यक्षेञात येते. तक्रारकर्त्याने आवश्यक ते शुल्क सदर अर्जासोबत भरला आहे. ही तक्रार इतर कुठल्याही न्यायालायात दाखल केली नाही. तक्रारकर्त्याच्या प्रार्थनेनुसार तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रारकर्त्याने प्रस्ताव दिल्यापासून दि.15.10.2010 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने द्यावे. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 15,000/- मागितला आहे.
6. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी उपस्थित होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला आपले लेखीउत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्र.1 च्या म्हणण्यानुसार उदाराम गजभिये हे शेतकरी असून मौजा – रिंगणाबोडी येथील सर्व्हे नं.109, ता. काटोल, जिल्हा – नागपूर येथे अपघाती मृत्यु पावला त्याचा मृत्यु दिनांक 25.8.2010 रोजी झाला, यासंबंधी त्यांना माहिती देण्यात आली नाही. त्याची विधवा पत्नी हिने UIIC Ltd. येथे तालुका कृषि अधिका-या तर्फे दावा केला नाही. अशाप्रकारचे कोणतेही पस्ताव तालुका कृषि अधिकारी तर्फे UIIC Ltd. ला देण्यात आला नाही. दिनांक 17.4.2015 ला विधवेचा मृत्यु झाला त्याचे पूर्वी तिने प्रस्ताव दाखल केला नाही. ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अधिकारक्षेञात हा दावा येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने निहीत वेळेत तक्रार दाखल केली नाही, त्यामुळे हा दावा फेटाळण्यात आला. त्याचप्रमाणे मे.कबाल विरुध्दपक्ष क्र.2 यांनी देखील त्यांची जबाबदारी पारपाडली नाही, त्यामुळे या दाव्याची संपूर्ण जबाबदारी विरुध्दपक्ष क्र.2 वर येते. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने विमा दावा कलेक्टर किंवा एच.डी.ओ. किंवा अॅडिशनल कलेक्टर यांचेकडे पाठविला नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 हे विमा दावा संबंधी जबाबदार नाही.
7. त्यावर प्रतीउत्तरात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्दपक्षाने त्याच्या आईच्या दाव्याबाबत मंजूर अथवा नामंजूर न केल्याने व नंतर त्याची आई मय्यत झाल्याने तिचा वारस म्हणून दाखल केली होती. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी सदर तक्रारीत उपस्थित राहून तक्रारकर्त्याने दावा विलंबाने दाखल केला व काही दस्ताऐवज न दिल्याने विरुध्दपक्ष क्र.1 ने दिनांक 30.12.2011 ला खारीज केल्याचे नमूद केले आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्याचा दावा त्यांना मिळालाच नाही असे नमूद केले आहे त्यामुळे तक्रारकर्त्याला कोणत्याही विरुध्दपक्षाने दावा फेटाळल्याचे पञ पाठविले नाही, हे सिध्द होते. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता सादर करतो की, त्याला विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चे दिनांक 30.12.2011 चे कोणतेही पञ किंवा ऑर्डर मिळाली नाही व विरिफध्दपक्ष क्र.1, 2 व 3 ने सदर पञ व ते तक्रारकर्त्याला मिळाल्याबाबतची पोच मंचासमक्ष दाखल केलेली नाही व जोपर्यंत सदर पञ तक्रारकर्त्याला मिळत नाही तोपर्यंत तक्रार मुदतीत आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याच्या वडीलाच्या मृत्युनंतर त्याची आई भयंकर शोकात होती व शिकली-सवरली नाही, त्यामुळे त्यांना विमा दावा करण्यास थोडा उशिर झाला. परंतु तक्रारकर्त्याचे वडील उदाराम हे शेतकरी आहे हे सर्व दस्ताऐवजावरुन सिध्द होते त्यामुळे ते तक्रारकर्त्यास होणा-या शारिरीक, मानसिक व आर्थिक दंडास पाञ आहे.
8. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीसोबत निशाणी क्र.3 नुसार प्रामुख्याने जनता अपघात विमा योजने अंतर्गत शासनाचा परिपञक, त्याच्या नावाचा सात-बारा, धारण केलेल्या जमिनीची नोंदवही, फेरफारची नोंदवही, कोंढाळी येथील मर्ग खबर, पंचनामा, तसेच एफ.आय.आर. रिपोर्ट, पोष्टमार्टम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपञ, ओळखपञ दाखल केले.
9. तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे काय ? : होय
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
10. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या नि.क्र.3 वरील दस्ताऐवजाप्रमाणे जनता अपघात विमा योजने अंतर्गत शासनाचा परिपञक लावलेला आहे, तसेच दस्ताऐवज क्रमांक 3 प्रमाणे त्याच्या नावाचा सात-बारा, दस्त क्र.15 वर धारण केलेल्या जमिनीची नोंदवही, दस्त क्रमांक 16 फेरफारची नोंदवही, दस्त क्र.18 वर कोंढाळी येथील मर्ग खबर, पंचनामा दस्त क्रं.20 वर जोडलेली आहे, तसेच एफ.आय.आर. रिपोर्ट, पोष्टमार्टम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपञ, ओळखपञ जोडलेली आहे. वरील सर्व कागदपञावरुन श्री उदाराम हे शेतकरी होते यात दुमत नाही. युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीने दिलेले पञ दिनांक 30.12.2011 च्या पञानुसार काही ञुटी दिसत आहे, त्याची पत्नी ही जास्त शिकलेली नसल्याकारणाने दिला विमा संबंधी कागदपञ जुळवा-जुळव करण्यासाठी वेळ लागल्याचे दिसून येते. परंतु विरुध्दपक्षाने देखील तक्रारकर्तीला दावा दाखल करण्यास उशिर झाल्या संबंधी कोणतेही कारण विचारले नाही अथवा स्पष्टीकरण मागितले नाही. तक्रारकर्त्याने सर्व सादर केलेल्या कागदपञावरुन व पोलीस रिपोर्टवरुन तक्रारकर्त्याचे वडील उदाराम गजभिये व एक मुलगी किरण बागडे जाम नदिच्या पाण्यात वाहून गेल्याचे स्पष्ट आढळून येते, त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तीक किंवा वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्यास रुपये 1,00,000/- विमा दाव्याची रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने दिनांक 30.12.2011 पासून द्यावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 21/09/2016