::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 17/10/2019)
1. तक्रारकर्ती ही जुनासुर्ला ता.मुल, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तिचे पती कालीदास गोंविंदा भोयर हे शेतीचा व्यवसाय करुन शेतीच्या उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. त्यांच्या नावे मौजा जुनासुर्ला ता.मुल, जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र. 428 ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 9/8/2010 रोजी घरी असतांना संर्पदंशाने विषबाधा होवून अपघाती मृत्यु झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा महाराष्ट्र सरकारतर्फे रु. 1 लाख चा शेतकरी अपघात विमा काढण्यात आला होता. शासनाच्या सदर विमा योजनेप्रमाणे तक्रारकर्ती ही मयत विमाधारकाची पत्नी व वारस असल्याने सदर विम्याची लाभार्थी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने पतीचा शेतकरी अपघात विमा लाभ मिळण्यासाठी विरूध्द पक्ष क्र. 3 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 कडे दिनांक 15/12/2010 रोजी रीतसर अर्ज सादर केला. तक्रारकर्तीने आपल्या दाव्या सोबत आवश्यक कागदपत्रे विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दाखल केली, तसेच विरूध्द पक्ष क्र. 3च्या मागणी नुसार तक्रारकर्तीने कागदपत्राची पूर्तता केली. परंतु त्यानंतर आठ वर्षे उलटूनही आजपर्यंत तिच्या दाव्या संदर्भात कोणतीही माहिती तक्रारकर्तीला मिळाली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 2/2/2018 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुद्धा तक्रारकर्तीला विमा दावा रक्कम मिळाली नाही. सबब तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्तीची मागणी अशी आहे की विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रु. 1 लाख, दावा दाखल झाल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे तसेच झालेल्या मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रू.30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 15,000/- देण्याचा आदेश देण्यात यावा.
2. विरूध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांना नोटीस काढण्यात आले.
विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारीत उपस्थित होऊन लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 9/8/2010 रोजी झालेला असून तिच्या विमादाव्याचा प्रस्ताव वि.प.क्र.1 ला वि.प.क्र.3 मार्फत मुदतीत मिळालेला नाही. तक्रारकर्तीचा विमादावा वि.प.क्र.1 यांना मुदतीत मिळालेला नाही व तसे तक्रारकर्तीला विरूध्द पक्ष क्र.1 यांनी दि.8/4/2011 चे पत्रान्वये सदर विमा दावा अर्ज नामंजूर केल्याचे कळविले. तक्रारकर्तीने वि.पक्ष यांकडे विमादाव्याबाबत कोणताही पाठपुरावा केलेला नाही. अशा स्थितीत 2010 मध्ये झालेल्या मृत्युकरीता दिनांक 2/2/2018 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविल्यामुळे तक्रारीला कारण होऊ शकणार नाही व सदर तक्रार मुदतबाह्य आहे. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी अटी व करारातील तरतुदीनुसार विरूध्द पक्ष विमा कंपनीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
3. विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 ह्यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊनसुद्धा ते प्रकरणात हजार न राहिल्यामुळे त्यांचे विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश अनुक्रमे दि.25/7/2018 व दि. 9/1/2019 रोजी पारीत करण्यात आले .
4 तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे लेखी कथन, तसेच लेखीकथनालाच रिजॉइंडर समजण्यांत यावे अशी नि.क्र.16 वर पुर्सीस दाखल, लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
5. प्रस्तूत तक्रारीतील उभय पक्षाचे कथन व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते कि तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 9/8/2010 रोजी झाला. शासनामार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र. 1 यांचेकडून तक्रारकर्तीच्या मय्यत पतीचा रू.1 लाखाचा विमा काढलेला असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर विमादाव्याची रक्कम मिळण्याकरिता दिनांक 15/12/2010 रोजी अर्ज केला. तक्रारकर्तीचे कथनानुसार विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीचा दावा अद्याप निकाली काढलेला नसल्यामुळे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. परंतु मंचाच्या मते विमा योजनेअंतर्गत मृत्युदावा दाखल करणारी कोणतीही लाभार्थी व्यक्ती, ही दावा प्राप्त करण्यासाठी कोणताही पाठपूरावा न करता 8 ते 9 वर्षे वाट पाहणार नाही आणी दावा रक्कम मिळण्याकरिता तिचे सतत प्रयत्न सुरु राहतील. परंतु तक्रारकर्तीने प्रस्तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केला हे कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. उलटपक्षी वि.प.क्र.1 यांनी तक्रारकर्तीचा विमादावा नामंजूर केल्याचे तक्रारकर्तीला पंजीकृत डाकेने कळविले होते ह्या त्यांच्या कथनापुष्टयर्थ त्यांनी सदर पत्राची प्रत प्रकरणात दाखल केली व नियमानुसार सदर रेकॉर्ड जतन करण्याची जबाबदारी ही केवळ 7 वर्षांपर्यंतच आहे. त्यामुळे प्रस्तूत प्रकरणात दावा दाखल केल्यानंतर केवळ दावा नाकारण्याचे पत्र विरुद्ध पक्ष क्र. 1यांचेकडून कडून प्राप्त झाले नाही म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे असा तक्रारकर्तीने घेतलेला आक्षेप ग्राह्य धरण्यायोग्य नाही. शिवाय तब्बल 8 वर्षानंतर म्हणजे दिनांक 2/2/2018 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविल्यामुळे तक्रारीला नवीन कारण उद्भवत नाही. सबब मंचाचे मते सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.42/2018 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.