निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 31/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 26/11/2012 कालावधी 10 महिने, 22 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
मंजुळाबाई भ्र.साहेबराव ठावरे. अर्जदार
वय -44 वर्षे,धंदा – घरकाम. अड.अरुण.डी.खापरे.
रा.बोथी ता.गंगाखेड.जि.परभणी.
विरुध्द
1 युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि. अड.जी.एच.दोडीया.
मंडळ कार्यालय क्रमांक 2 अंबिका हाउस
शंकर नगर चौक, नागपूर 440010.
2 शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि.
दयावान कॉम्प्लेक्स,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. प्र.अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदारांचे पती साहेबराव नागनाथ ठावरे यांच्या मालकीची शेतजमिन गट नं. 53, 56, 256, मौजे बोथी, ता.गंगाखेड जि.परभणी येथे असून त्याप्रमाणे 7 x 12, 8 अ,
6 ड, 6 क, उता-यावर नोंद केली आहे. दुर्दैवाने ता. 06/12/2009 रोजी मोटार सायकलवर बसून जात असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले, लोटस हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान ता. 07/12/2009 रोजी मृत्यू पावले. अपघातानंतर संबंधित पोलीस स्टेशन गंगाखेड यांनी दुस-या मोटारसायकल ड्रायव्हरच्या विरुध्द गुन्हा रजी.नं. 203/2009 प्रमाणे गुन्हा दाखल केला.मयताचे प्रेत पोस्टमार्टम करण्याकरीता सरकारी दवाखाना नांदेड येथे पाठवले, पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा करुन साक्षीदारांचे जबाब घेतले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी यांचेकडे पाठवला.त्यानंतर सदर प्रस्ताव ता.10/02/2010 रोजी कबाल इन्शुरन्स औरंगाबाद यांचेकडे पाठवला.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ता. 02/08/2010 रोजीच्या पत्रान्वये विमा प्रस्ताव नामंजूर केला.तक्रारदारांच्या पती जवळ गाडी चालविण्याचा परवाना नसल्यामुळे सदर प्रस्ताव नामंजूर केला.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पती जवळ अपघाताच्या वेळी वाहन चालविण्याचा परवाना नव्हता तक्रारदारांनी ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले नसल्याचे कारणास्तव योग्यरित्या ता. 02/08/2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केला.
तक्रारदारांची तक्रार आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे पती ता. 06/12/2009 रोजी मोटार सायकलवर बसून जात असतांना दुस-या मोटारसायकलने भरधाव व निष्काळजीपणाने गाडी चालवुन धडक दिली. सदर अपघातात तक्रारदारांचे पती गंभीर जखमी होवुन मृत्यू पावले.मोटारसायकल क्रमांक MH-16-E-6148 च्या वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात झालेला असल्यामुळे त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस पेपर्स वरुन दिसून येते. तक्रारदारांचे पतीच्या चुकीमुळे अपघात झालेला नसल्यामुळे त्यांचे ड्रायव्हिंग लायसेन्स दाखल केले नसल्याचे कारणास्तव गैरअर्जदार विमा कंपनीने विमा प्रस्ताव नामंजूर करणे उचित नाही, असे मंचाचे मत आहे.गैरअर्जदार विमा कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते.महाराष्ट्र राज्य आयोगाच्या आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार ( C.P.R. 2 (2008) 203 ) तसेच महाराष्ट्र राज्य आयोग सर्किट बेंच औरंगाबाद यांचे पहीले अपील 661/2011 मध्ये ता. 17/02/2012 रोजी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा प्रस्तावा सोबत ड्रायव्हिंग लायसेन्स दाखल करणे आवश्यक नाही, तसेच या संदर्भातील शासनाच्या परिपत्रकातील कलम 23 (इ) (5) नुसार अपघातग्रस्त वाहनचालकाचे चुकीमुळे शेतक-यांचा मृत्यू झाल्यास / अपंगत्व आल्यास दोषी वाहन चालक वगळता सर्व शेतक-यांना प्रपत्र 3 मध्ये नमुद केलेल्या बाबीमुळे मृत्यू / अपंगत्व आल्यास केवळ अपघात झाला या कारणास्तव नुकसान भरपाईची दावे मंजूर करण्यात येतील. तसेच कलम 23 (इ) (8) नुसार अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक आहे.त्यामुळे ड्रायव्हिंग लायसेन्सची अट फक्त दोषी वाहन चालकासाठी आहे. असे दिसून येते.तसेच वरील महाराष्ट्र राज्य आयोगाच्या न्यायनिवाड्यानुसार सदर योजने अंतर्गत अपघातग्रस्त शेतक-यांकरीता प्रस्तावा सोबत ड्रायव्हिंग लायसेन्स असण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदारांनी या संदर्भात न्यु इंडिया अशुरन्स कंपनी विरुध्द मंगला देविदास पोफले ( 2009 (3) All MR 887 ) मा.उच्च न्यायलय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद न्यायनिवाडा दाखल केला आहे. सदरील प्रकरणात लागु होतो.असे न्यायमंचाचे मत आहे.
वर नमुद केलेल्या सर्व न्यायनिवाड्यानुसार तक्रारदार सदर योजने अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रादारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- गैरअर्जदार विमा कंपनीने देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 गैरअर्जदार विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत
अपघात विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- फक्त
( अक्षरी रु.एकलाख फक्त ) आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
2 वरील रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास 9 टक्के व्याजदरासहीत द्यावी.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.