::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/12/2017 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांकडून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार सारांश रुपात अशी आहे की, तक्रारकर्ता दि रिसोड अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. रिसोड, शाखा देगाव, याने विरुध्द पक्षाचा स्थानिक एजंट विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्यामार्फत कर्जदारांचा ग्रुप जनता पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी, विमा वर्ष 2015-16 चे प्रिमीयम विरुध्द पक्ष क्र. 2 मार्फत भरणा करुन विमा काढला होता. ज्यामध्ये तक्रारकर्त्याचे कर्जदार मुरलीधर हरिभाउ जहीरव यांचा समावेश होता. त्यामध्ये मिळणारी विमा रक्कम रुपये 1,00,000/- प्रत्येकी ही आहे. तक्रारकर्ता हे विमा रक्कमेचे नॉमिनी/विमेदार/ लाभार्थी म्हणजेच इंन्शुअर्ड असतात. त्यानंतर दिनांक 07/02/2016 रोजी मुरलीधर हरिभाउ जहीरव यांचा एका दुर्दैवी वाहन अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती तात्काळ विरुध्द पक्ष यांना कागदपत्रांसह देण्यात आली. त्याचप्रमाणे दिनांक 18/02/2016 रोजी लेखी स्वरुपात विरुध्द पक्षाला विनंती अर्ज देउन विमा क्लेमची मागणी केली. मात्र विरुध्द पक्षाने खोटे व बनावटी कारण पुढे करुन, तक्रारकर्त्याला पत्र देउन त्यांचा विमा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडून वेळीच विमा रक्कम मिळाली नाही. पर्यायाने मृतक कर्जदाराचे कर्ज थकीत झाले असून व्याज वाढत आहे. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने सेवेत कसूर व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून तक्रारीतील प्रार्थनेप्रमाणे विमा रक्कम रुपये 1,00,000/- त्यावर दिनांक 07/02/2016 पासुन दरसाल, दरशेकडा 24 % व्याज, शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसानापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- विरुध्द पक्षांकडून मिळावा, अशी विनंती केली.
2) विरुध्द पक्ष क्र. 3 चा लेखी जवाब ः- विरुध्द पक्ष क्र. 3 ने त्यांचा लेखी जबाब दाखल करुन, त्यांच्याविरुध्दची बहुतांश विधाने नाकबूल केली आहेत. तक्रारकर्त्याची तक्रार ही मोघम स्वरुपाची असून त्यास कोणताही कायदेशिर आधार नाही. हे म्हणणे नाकबूल की, तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षाचे लाभार्थी / ग्राहक आहेत व सदरची तक्रार दाखल करण्याचे त्यांना अधिकार आहेत. तक्रारीमधील मागणी व प्रार्थना ही गैरकायदेशिर असल्यामुळे, ती सर्व मागणी फेटाळण्यात यावी.
अधिकचे कथनामध्ये थोडक्यात आशय असा की, तक्रारकर्त्याने दिलेल्या कागदपत्रांचे, पोलीस पेपर्सचे, तसेच मयताच्या वडीलांचे व मयतासोबत मयताच्या मोटार सायकलवर पाठीमागे बसलेले मयताचे मित्र शेख मन्नान शेख युसूफ यांचे बयाण या सर्वांचे अवलोकन केले असता, विरुध्द पक्ष क्र. 3 च्या निदर्शनास असे आले आहे की, दिनांक 07/02/2016 रोजी मयत मुरलीधर हरीभाऊ जहीराव हे स्वतः त्यांचे घरुन मोटार सायकल क्र. एम एच 30/सी-8485 घेवून शिरपूर येथे त्याच्या मित्रासोबत काही कामानिमीत्त गेले होते व परत शिरपूर येथून रिसोड कडे येत असतांना त्याचा अपघाती मृत्यू झाला. अपघाताच्या दिवशी मयत मुरलीधर हरिभाऊ जहीराव स्वतः मोटार सायकल चालवित होते व त्यांचे पाठीमागे त्यांचे मित्र शेख मन्नान शे. युसूफ बसले होते परंतू तक्रारकर्त्याने क्लेम मिळण्यासाठी विरुध्द पक्ष क्र. 3 कडे दिनांक 29/10/2016 च्या पत्रानुसार असे सांगीतले की, अपघाताच्या वेळेस मृत व्यक्ती हा मोटार सायकलवर मागील शिटवर बसलेला होता, जे सपशेल खोटे आहे. अपघाताच्या वेळी मृतक मुरलीधर स्वतः मोटार सायकल चालवित असून त्याने स्वतः डोकयावर हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे मोटार वाहन कायदा कलम 129 व 128 चे उल्लंघन केलेले आहे. तसेच मृतकाकडे मोटार सायकल चालविण्याचा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसल्यामुळे मृतकाने मोटार वाहन कायदा कलम 3 व 4 चे उल्लंघन केलेले आहे. वरील कारणास्तव विमा पॉलिसीची रक्कम देय नसल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्याने बेकायदेशिरपणे केलेला दावा, रितसर कायद्याला अनुसरुन खारीज केला आहे व त्याबाबतचे पत्र तक्रारकर्त्याला मिळालेले आहे. तक्रारकर्त्याने कोणतेही कायदेशिर कागदपत्रे त्याचे दाव्याप्रित्यर्थ दाखल केले नाही. सदर तक्रारीमध्ये मृतकाचे वारसदार हे आवश्यक पक्ष असतांना सुध्दा त्यांना पक्ष बनविले नाही तसेच तक्रारकर्ता हे व्यावसायीक तत्वावर त्यांचा व्यवसाय करत असल्यामुळे व त्यामधून भरमसाठ उत्पन्न घेत असल्यामुळे ग्राहक अधिनियमा अंतर्गत कुठलेही लाभ वि. मंचापासून घेण्यास पात्र नाही. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षाचे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. वरील सर्व कारणास्तव सदरची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 3 चा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच उभय पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाली नाही असे दिसते व तक्रारकर्ते यांनीही विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही केली नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्दचे आक्षेप मंचाने तपासले नाही. परंतु विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी लेखी जबाबात असे कबुल केले की, विरुध्द पक्ष क्र. 1 हे विरुध्द पक्ष क्र. 3 ची वाशिम येथील शाखा आहे व विरुध्द पक्ष क्र. 2 हे विरुध्द पक्ष क्र. 3 चे एजंट आहे.
विरुध्द पक्ष क्र. 3 यांना ही बाब पण कबुल आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे वर्ष 2015-16 वर्षासाठी यांनी दिलेल्या यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या नांवाच्या कर्जदारांचा विमा काढला होता व त्या पॉलिसीचा क्र. 230400471 आययुपी 105299934 असा असून त्याचा कालावधी 10/07/2015 ते 09/07/2016 असा आहे. हे म्हणणे कबुल की, त्या यादीमध्ये मुरलीधर हरीभाऊ जहीराव यांचा नावाचा समावेश होता. दाखल पॉलिसी प्रतीत तक्रारकर्ते हे विमाकृत आहे, असे दिसते व तक्रारकर्ते यांनी मयत विमा लाभार्थीच्या वारसाचे संमतीपत्र रेकॉर्डवर तक्रार दाखल करतांनाच दाखल केले आहे, त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 चे याबद्दलचे सर्व आक्षेप नामंजूर करुन, तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
उभय पक्षात या बाबी मान्य आहे की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या कर्जदारांची विरुध्द पक्ष क्र. 3 कडून ग्रुप जनता पर्सनल अॅक्सिडेंट विमा पॉलिसी, प्रत्येकी 1,00,000/- सम इन्शुअर्ड रक्कमेची काढली होती. मयत मुरलीधर हरिभाउ जहीरव हे तक्रारकर्ते यांचे कर्जदार होते, त्यामुळे त्यांचीही विरुध्द पक्ष क्र. 3 कडून सदर पॉलिसी तक्रारकर्त्याने काढली होती, ही बाब विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी लेखी जबाबात मान्य केली आहे. उभय पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी कर्जदार विमाधारक मयत मुरलीधर हरिभाउ जहीरव यांचा अपघाती मृत्यू झाला याची सुचना विरुध्द पक्ष क्र. 3 यांना दिल्यावर, विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी चौकशी करुन, मयताच्या वडीलांचे व प्रत्यक्ष साक्षीदार शेख मन्नान शेख युसूफ जो घटनेच्या दिवशी मयतासोबत होता, त्यांचे बयाण नोंदविले होते. सदर बयाणावरुन असे दिसते की, घटनेच्या दिवशी, मयत मुरलीधर हरिभाऊ जहीराव हे स्वतः मोटर सायकल चालवत होते व त्यांचे मित्र शेख मन्नान शे. युसूफ हे सोबत बसले होते, ते शिरपूर येथून रिसोड कडे येत असतांना त्यांचा अपघात होवुन त्यात जहीराव हे मृत्यू पावले. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्ते यांना पत्र पाठवून, मृतकाचा मोटर सायकल चालविण्याचा परवाना, हे दस्त, मागीतले होते. परंतु तक्रारकर्ते यांच्या मते मृतक हे अपघाताच्या वेळेस वाहनाच्या मागील सिटवर बसले होते. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी युक्तिवादात जरी मृतकाने मोटर वाहन कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन केले आहे, असे नमूद केले तरी, विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी विमा दावा हा मृतकाजवळ सदर वाहन चालविण्याचा वाहन परवाना नव्हता, या कारणामुळे फेटाळला आहे व विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी दाखल केलेल्या सर्व दस्तातुन ही बाब सिध्द पण झाली आहे. तक्रारकर्ते यांनी प्रकरण अंतिम टप्प्यात असतांना मृतकाचे वडील हरिभाऊ जहीराव व शेख मन्नान शेख युसूफ यांचे प्रतिज्ञालेख दाखल करुन, त्यांचे विरुध्द पक्ष क्र. 3 ला दिलेल्या बयाणाला कलाटणी दिली व त्यांच्या बयाणाच्या विरुध्द कथन केले. परंतु हे दस्त तक्रारकर्ते, प्रकरणासोबतही दाखल करु शकले असते. म्हणून युक्तिवादासोबत दाखल केलेले हे दस्त मंचाने विचारात घेतले नाही. शिवाय विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी, त्यांनी या घटनेचे Investigation करतांना तात्काळ वरीलप्रमाणे दोघांचे बयाण नोंदविलेले आहे. त्यामुळे त्याबद्दलचे तक्रारकर्त्याने ऊपस्थित केलेले आक्षेप विचारात घेता येणार नाही, असे मंचाचे मत आहे.
विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाडयापैकी एका न्यायनिवाडयातील तथ्थे, I (2016) CPJ 12 (NC) Tirupati Transport Corporation X Oriental Insurance Company, वाहन चालकाजवळ अपघातावेळी वैध वाहन चालक परवाना नसेल तर, विमा दावा देता येणार नाही, असे आहेत.
याऊलट, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा, 2006 STPL (CL) 409 NC, New India Assurance Company Ltd. X Narayan Prasad Appaprasad Pathak, यातील तथ्थे असे आहेत. . .
Consumer Protection Act, 1986, Section 15 – Appeal –
Insurance – Motor Accident claim – Repudiation – Complaint Allowed by state commission and directed appellant to pay insured amount – Appeal – Fact that vehicle was carrying more passengers than permitted – Driver not possessed valid licence – Violation of terms and conditions of policy – Claim should be settled on non-standard basis – Guidelines issued by GIC – Admittedly vehicle purchased for Rs. 5,40,000/- Depreciation @ 20 % - Rs. 4,32,000/- directed to pay to complainant @ 75 % - Interest @ 9 %.
तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या अजून एका न्यायनिवाड्यातील, तथ्थे अशी आहेत की, IV (2011) CPJ 4 (SC),
(ii) Interpretation of Statutes – When two interpretations are possible one beneficial to consumer has to be followed.
म्हणून न्यायाच्या दृष्टीने तक्रारकर्ते यांचा विमा दावा non-standard basis तत्वानुसार मंजूर करुन, मंचाने खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
::: अं ति म आ दे श :::
१) तक्रारकर्ते यांची तक्रार विरुध्द पक्ष क्र. 3 विरुध्द फक्त अंशत: मंजूर करण्यांत येते.
२) विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्ते यांना मयत कर्जदार मुरलीधर हरिभाऊ अहीराव यांच्या विमा दाव्याची रक्कम नॉन-स्टॅंडर्ड बेसीस च्या तत्वानुसार संपूर्ण विमा क्लेम रक्कम रुपये 1,00,000/- च्या 75 % रक्कम रुपये 75,000/- ( अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार फक्त ) द.सा.द.शे. 9 % व्याजदराने दिनांक 11/05/2017 ( प्रकरण दाखल तारीख ) पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत व्याजासहीत दयावी मात्र तक्रारकर्ते यांची नुकसान भरपाई व प्रकरण खर्चाची मागणी फेटाळण्यात येते.
3) विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांचे आत करावे.
4) उभय पक्षास आदेशाची प्रत निःशुल्क दयावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri