जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 649/2010. तक्रार दाखल दिनांक: 02/012/2010. तक्रार आदेश दिनांक :21/03/2011. सौ. उज्वला शशिकांत घाडगे, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जनता शॉपींग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : रोहिणी एस. झिंगाडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून दुग्ध व्यवसायाकरिता त्यांनी गाई खरेदी केलेल्या आहेत. पशुधन विमा योजनेंतर्गत त्यांच्या होस्टर्न जातीच्या गाईचा विरुध्द पक्ष (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.32,200/- चा विमा उतरविण्यात आलेला आहे. गाईच्या विमा पॉलिसीचा क्रमांक 161205/47/08/01/442 असून गाईस दिलेल्या टॅगचा क्रमांक यूआयआय/ एसयूआर-54239 असा आहे. तक्रारदार यांनी गाय अचानक आजारी पडली आणि उपचार करुनही दि.8/11/2009 रोजी मृत्यू पावली. त्यानंतर गाईचे फोटो काढून पोस्टमार्टेम करण्यात आले. तसेच विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. परंतु विमा कंपनीने अनेक दिवस क्लेम प्रलंबीत ठेवून त्यानंतर अप्रत्यक्षरित्या विमा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रक्कम रु.32,200/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी क्लेम योग्य कारणास्तव दि.23/3/2010 रोजी नाकारला असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. त्यांनी दि.27/1/2010 व 23/3/2010 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारदार यांना फोटा दाखल करण्यास कळविले असता, अद्याप त्याप्रमाणे फोटो दाखल करण्यात आलेले नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस रु.32,200/- चे विमा संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. तसेच विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. 5. विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दि.27/1/2010 व 23/3/2010 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारदार यांना फोटो दाखल करण्यास कळविले असता, अद्याप त्याप्रमाणे फोटो दाखल केलेले नाहीत. उलटपक्षी, तक्रारदार यांच्या कथनानुसार त्यांनी सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविलेली आहेत. 6. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा, दुध संस्थेचा दाखला, ग्रामपंचायत दाखला, क्लेम फॉर्म, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युएशन रिपोर्ट, कॅटल वेटर्नरी सर्टिफिकेट, खरेदी पावती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? हे सिध्द करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. आमच्या मते, रेकॉर्डवर दाखल कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम रु.32,200/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.32,200/- तक्रार दाखल दि.23/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे संपूर्ण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) ( सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |