(घोषित दि. 25.01.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया सदस्या)
अर्जदाराच्या पतीचे घरातील साठविलेल्या कापसाने पेट घेतल्यामुळे दिनांक 02.12.2009 रोजी निधन झाले. अर्जदाराचे पती शेतकरी असून त्यांच्या नावे माहोरा, ता.जाफ्राबाद जि.जालना येथे शेत जमिन आहे. अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तालूका कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. अर्जदारास कबाल इन्शुरन्स कंपनीने प्रतिज्ञापत्र, वयाचा पुरावा, फेरफार इत्यादी कागदपत्र लागतील असे सांगितले. दिनांक 31.12.2010 च्या पत्राद्वारे गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 14.11.2010 पर्यंत कागदपत्र न मिळाल्यामुळे दावा रक्कम देऊ शकत नसल्याचे कळविले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी कागदपत्रे अपूर्ण असल्याबाबत त्यांना कळविले नाही व त्यांचा दावा फेटाळण्यात आला. अर्जदाराने दिनांक 04.02.2011 रोजी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. अर्जदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कागदपत्रां विषयी कोणतीही माहिती नसल्यामुळे त्यांनी कृषी आयुक्तालय, कबाल इन्शुरन्स कंपनी यांना तसे कळविले आहे. संबंधित कार्यालया मार्फत देखील कोणती कागदपत्रे पाहिजेत हे गैरअर्जदार यांना कळवावे असे सांगण्यात आले आहे. अर्जदाराने विमा रकमेची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत नुकसान भरपाई दावा अर्ज, अकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 उतारा नक्कल, वारसाचा दाखला, फेरफार, गाव नमुना इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार अर्जदाराची तक्रार ही नियमबाह्य आहे. अर्जदाराने मंचासमोर कोणतीही मूळ कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अर्जदाराच्या पतीचे नाव 7/12 मध्ये पॉलीसी सुरु होण्याआधी पासून असणे आवश्यक होते. अर्जदाराने याबाबतीत सबळ पुरावा देणे आवश्यक आहे. अर्जदाराने त्यांच्या पतीच्या अपघाती मृत्यूच्या बद्दलचाही पुरावा दिलेला नाही. दिनांक 01.11.2009 पासून इन्शुरन्स कंपनीने ट्रायपार्टी अग्रीमेंट केले आहे. दिनांक 15.08.2009 ते 14.08.2010 हा पॉलीसीचा कालावधी आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन हे आवश्यक पक्षकार असायला पाहिजे, जे अर्जदाराने केलेले नाही. अर्जदाराच्या पतीचा दिनांक 02.12.2009 रोजी मृत्यू झाल्यानंतर उशिराने म्हणजेच दिनांक 10.02.2010 रोजी गुन्हा पंचनामा नोंदविण्यात आला. अर्जदाराने प्रतिज्ञापत्र, वयाचा दाखला, फेरफार इत्यादी कागदपत्रे दिनांक 14.11.2010 पूर्वी दाखल केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराचे पती विलास साळोख यांचा मृत्यू दिनांक 02.12.2009 रोजी झाला असून प्रस्ताव दिनांक 30.10.2010 रोजी अपूर्ण कागदपत्रासह मिळाला आहे. अर्जदारास दिनांक 07.12.2010 रोजीच्या पत्राद्वारे प्रतिज्ञापत्र, मूळ फेरफार, वयाचा दाखला इत्यादी कागदपत्रे पाठविण्यासाठी पत्र देण्यात आले होते. अर्जदाराने कागदपत्रे पाठविली नसल्यामुळे दिनांक 21.12.2010 रोजी इन्शुरन्स कंपनीस अपूर्ण कागदपत्रे असा शेरा मारुन प्रस्ताव पाठविण्यात आला व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी सदरील प्रस्ताव नामंजूर केला.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदाराच्या पतीचे दिनांक 02.12.2009 रोजी त्यांच्या घरातील कापसाच्या गंजीला आग लागली असताना ती विझवताना जळून मृत्यू झाला. अर्जदाराने मंचात दाखल केलेला पोलीस पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल व मृत्यू प्रमाणपत्र यात देखील अर्जदाराचा मृत्यू दिनांक 02.12.2009 रोजी अपघाताने झाला हे दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 30.10.2010 रोजी त्यांना अर्जदाराचा नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव मिळाला असल्याचे म्हटले आहे. पण त्यासोबत 7/12 उतारा, वयाचा दाखला इत्यादी कागदपत्रे नसल्याचे त्यांनी अर्जदारास दिनांक 07.12.2010 रोजीच्या पत्राद्वारे कळविले व अर्जदाराकडून सदरील कागदपत्रे न मिळाल्यामुळे प्रस्ताव दिनांक 31.12.2010 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठविला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 07.12.2010 रोजी पाठविलेले पत्र व कागदपत्राबाबत केलेली मागणी ही न मिळाल्याची अर्जदाराचे म्हणणे आहे. विमा रक्कम मिळण्यास उशीर होत असल्यामुळे अर्जदाराने कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पूणे यांना देखील या प्रकरणी पत्र लिहीलेले दिसून येते. या विभागातर्फे देखील कृषी अधिकारी जालना यांना तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांना अर्जदारास विमा रकमेचा लाभ मिळवून देण्याबाबत कारवाई करण्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार 1 यांनी महाराष्ट्र शासनाबरोबर झालेल्या कराराची मुदत पूर्ण झाली असल्यामुळे त्यांनी अर्जदारास विमा रक्कम देण्याचे नाकारले.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केल्यावर गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दिनांक 30.10.2010 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव मिळाल्याचे दिसून येते. त्यांच्या तर्फे दिनांक 07.12.2010 रोजी पत्राद्वारे वयाचा दाखला, 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रांची मागणी करण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 21.12.2010 रोजी सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पाठविला. मंचात दाखल करण्यात आलेल्या 7/12 उतारा, पोलीस पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये नमुद केलेले वय ही कागदपत्रे दिनांक 14.11.2010 पूर्वीच्या तारखेची असल्याचे दिसून येते. यावरुन अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे दिनांक 14.11.2010 तारखे अगोदर दिलेली असल्याचे स्पष्ट होते.
वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास 30 दिवसाच्या आत विमा रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द्यावी.
- खर्चा बद्दल आदेश नाही.