( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
आदेश
( पारित दि. 30 मे, 2014)
तक्रारकर्तीने तिचे मयत पती श्री. प्रेमलाल चंभरू कावरे यांच्या अपघाती विम्याची रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह तसेच नुकसानभरपाई मिळण्याकरिता सदरहू तक्रार विद्यमान न्याय मंचात दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती प्रेमलाल चंभरू कावरे यांच्या नांवे मौजे बीरसी, ता. जिल्हा गोंदीया येथे सर्व्हे नंबर 15, क्षेत्रफळ एकूण 0.20 हे. आर. व जमा 2.10 या वर्णनाची शेती असून ते व्यवसायाने शेतकरी होते. दिनांक 27/07/2010 रोजी नाला ओलांडतांना तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला.
3. विरूध्द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 2 ही विमा सल्लागार कंपनी आहे. विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे प्रस्ताव अर्ज स्विकारतात. तक्रारकर्तीच्या पतीचा विमा हा महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आला होता.
4. दिनांक 27/07/2010 रोजी नाला ओलांडतांना तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. तक्रारकर्तीने दिनांक 24/07/2011 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे विमा दावा कागदपत्रांसह सादर केला. तक्रारकर्तीने तिचा विमा दावा प्रस्ताव मुदतीत म्हणजे 90 दिवसात दाखल न केल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 01/07/2011 रोजी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला. म्हणून तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच नुकसानभरपाई म्हणून रू. 20,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केली आहे.
5. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 17/12/2012 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 18/12/2012 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष 3 यांनी मात्र त्यांचा लेखी जबाब दाखल केलेला नाही.
विरूध्द पक्ष 1 यांनी आयुक्त कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांना आवश्यक पक्षकार न केल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा खारीज करावा असा अर्ज दिनांक 18/01/2013 रोजी दाखल केला तसेच सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु हा दिनांक 27/07/2010 रोजी झाला तेव्हापासून 90 दिवसांच्या आंत म्हणजेच दिनांक 27/10/2010 पर्यंत सदरहू विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे तक्रारकर्तीने दाखल करावयास पाहिजे होता. परंतु तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज दिनांक 27/04/2011 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे दाखल केल्यामुळे व तो मुदतीत नसल्यामुळे तसेच मुदतीत दाखल न करण्याचे कारण संयुक्तिक नसल्यामुळे तक्रारकर्तीचे प्रकरण फेटाळण्यात यावे.
विरूध्द पक्ष 2 यांनी आपल्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्ती ही त्यांची ग्राहक होऊ शकत नाही कारण ते महाराष्ट्र शासनाला सदर योजनेत विनामोबदला सहाय्य करतात.
6. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शासनाचे परिपत्रक पृष्ठ क्र. 15 वर दाखल केलेले असून विरूध्द पक्ष 1 यांनी विमा दावा फेटाळल्याचे पत्र पृष्ठ क्र. 33 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 38 वर, मर्ग सूचना पृष्ठ क्र. 40 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 45 वर, पोस्टमार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 47 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 55 वर तसेच फेरफार नोंदवही पृष्ठ क्र. 56 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
7. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचे पती हे घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती व त्यांच्या उत्पन्नावरच कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालत होता. पतीच्या निधनामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरायला वेळ लागल्यामुळे तक्रारकर्ती मुदतीत विमा दावा प्रस्ताव विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर करू शकली नही. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार जर दावा 90 दिवसानंतर दाखल केला असल्यास व त्यामागील विलंबाचे कारण हे संयुक्तिक असल्यास 90 दिवसानंतर सुध्दा दाखल केलेला विमा दावा अर्ज मंजूर केल्या जाऊ शकतो.
8. विरूध्द पक्ष 1 च्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने 90 दिवसांच्या आंत विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे विमा दावा दाखल न केल्यामुळे सदरहू विमा दावा मुदतीत नसल्या कारणाने तो खारीज करणे म्हणजे सेवेतील त्रुटी नाही. तसेच आयुक्त, कृषि विभाग यांना सदरहू प्रकरणात प्रतिवादी न केल्यामुळे सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी.
9. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तकारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु असल्याचे सिध्द होते काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. पोलीस स्टेशन दवनीवाडा येथे दिनांक 25/05/2010 रोजी दिलेल्या एफ.आय.आर. नुसार मृतकाचा मृत्यु हा पाण्यात बुडून झालेला आहे असे नमूद केले आहे. तसेच पृष्ठ क्र. 43 वर दाखल केलेल्या इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये मृतकाचे डोके, नाक, कान यांचा काही भाग मासोळ्यांनी खाल्लेला दिसून आला तसेच पायांना व मांड्यांना सुध्दा मासोळ्यांनी चावल्याचे निशान दिसत आहे असे नमूद करण्यात आलेले आहे. पृष्ठ क्र. 47 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण हे पाण्यात बुडून झाल्याचे लिहिले आहे.
वरील दस्त हे Primary Evidence असल्यामुळे ते Substantial Evidence असून त्यानुसार तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा पाण्यात बुडून झाल्याचे सिध्द होते. पोलीस स्टेशनमधील कागदपत्र हे Public document असल्यामुळे व ते विरूध्द पक्ष यांनी disprove न केल्यामुळे ते सद्यःस्थितीमध्ये proved document असल्याचे घोषित झाल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे असे मंचाचे मत आहे. करिता मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
11. फेरफाराची नोंद ही तक्रारकर्तीच्या पतीच्या नावाने मौजे बीरसी, तालुका जिल्हा गोंदीया येथे झालेली असून त्यासंबंधीचे कागदपत्र सदरहू प्रकरणात दाखल केलेले आहे. तसेच शेतक-याचा मृत्यु झाल्यानंतर त्याचे वारसदार त्याच दिवशी शेतकरी म्हणून गृहित धरल्या जातात व सरकारदप्तरी त्याची नोंद ही नंतर होणे ही तांत्रिक बाब आहे. तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह सादर केला. तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज सादर करण्यास लागलेला उशीर हा तिची मानसिक अवस्था व अशिक्षितपणा या मुख्य कारणामुळे झालेला आहे असा युक्तिवाद तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी केला. त्या युक्तिवादाला आम्ही सहमत आहोत. त्यामुळे तांत्रिक मुद्दयावरून नामंजूर केलेली विमा दाव्याची रक्कम मिळण्यास तक्रारकर्ती ही पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करिता मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे
12. तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- व्याजासह तसेच नुकसानभरपाईसह मिळण्यास पात्र आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर विमा दावा फेटाळल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 01/07/2011 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 10% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.