:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर)
(पारीत दिनांक–31 ऑक्टोंबर, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द तिचे मृतक पतीच्या मृत्यू पःश्चात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्या संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून मृतक श्री भाऊराव भिवा वासनिक हा तिचा पती होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता, त्याचे मालकीची मौजा खुटसावरी, तालुका-जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-252 (तक्रारीत भूमापन क्रं 252 हा चुकीचा नमुद केला असून दाखल 7/12 उता-याचे प्रतीवरुन भूमापन क्रं-169 असल्याचे दिसून येते) ही शेत जमीन होती. विरुध्दपक्ष क्रं-1) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) ही कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस नावाची नोडल एजन्सी आहे. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी भंडारा आहेत. महाराष्ट्र शासनाचे वतीने विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे संबधित लाभार्थ्यां कडून स्विकारतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला होता आणि तक्रारकर्ती ही सदर विमा योजने अंतर्गत वारसदार पत्नी म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिच्या पतीचा दिनांक-09/10/2010 रोजी सायकलने जात असताना एका ट्रकने धडक दिल्याने गंभीर जख्मी होऊन अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तिने दिनांक-17/12/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्या संबधी रितसर प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांच्या प्रतींसह सादर केला. पुढे विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता केली. परंतु तिला विमा दावा प्रस्तावा संबधाने विरुध्दपक्षां तर्फे काहीही कळविण्यात आले नाही, म्हणून तिने माहिती अधिकार कायद्दाखाली कृषी आयुक्तालयात माहिती अधिकार कायद्दाखाली माहिती मागितली असता त्यांनी ज्यांचे विमा दावे नाकारण्यात आलेत त्यांचे नावाची यादी पाठविली ज्यामध्ये तक्रारकर्तीचा विमा दावा हा घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा पोलीस अटेस्टेड करुन न दिल्याने फेटाळल्याचे सदरचे यादी वरुन तिला कळले. सदर दावा फेटाळल्या बाबत विरुध्दपक्षांनी आज पर्यंत तिला कळविलेले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळल्या बाबत तिला पत्र पाठविले नसल्याने सेवेत त्रृटी ठेवली. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत म्हणून तिने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-17/12/2011 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीचे मृतक पती श्री भाऊराव भिवा वासनिक याचे मालकीची मौजा खुटसावरी, तालुका-जिल्हा भंडारा येथे शेती असल्याची व त्यावरच त्याचा व त्याचे कुटूंबाचा उदरनिर्वाह असल्याची बाब नामंजूर करण्यात येऊन पुढे असे नमुद केले की, तिचे पतीने कधीही शेतीचा व्यवसायच केलेला नाही. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे मृतक पतीचा रुपये-1,00,000/- रकमेचा विमा काढल्याची बाब खोटी असल्याचे नमुद केले. तसेच तिने विमा दाव्या सोबत आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता केल्याची बाब सुध्दा नामंजूर करण्यात आली. तक्रारकर्तीने पतीचे मृत्यू नंतर दिनांक-17/12/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) तालुका कृषी अधिका-यांचे कार्यालयात विमा दावा आवश्यक दस्तऐवजासह दाखल केला होता व वेळोवेळी दस्तऐवजाची पुर्तता केली होती ही बाब नामंजूर करुन पुढे असे नमुद केले की, तक्रारअर्जात तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 कडे दिनांक-17/12/2011 रोजी अर्ज केल्याचे कुठेही नमुद नाही. तिने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विहित मुदतीत दस्तऐवज पाठविले असते, तर तिचे विम्या दाव्याचा योग्य तो विचार केल्या गेला असता, परंतु तिने सन-2017 पर्यंत (तक्रार मंचात दाखल करे पर्यंत) निष्काळजीपणे अर्ज करण्यास विलंब केल्याने ती विमादाव्याची रक्कम मिळण्या पासून वंचित राहील्याचे नमुद केले. तिचा विमा दावा पोलीसांनी अटेस्टेड करुन न दिल्याने फेटाळण्यात आला होता हे म्हणणे खोटे असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने कोणतेही दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविले नसल्याचे नमुद करुन पुढे असेही नमुद केले की, तिने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये जे सहपत्र आहे, त्यामध्ये दस्तऐवजाच्या प्रती अटेस्टेड केल्याचे लिहिलेले आहे परंतु त्या दस्तएवेजाच्या प्रती अटेस्टेड नाहीत म्हणून या मुद्यातील मजकूर विचाराअंती लिहिलेला असून तो खोटा असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने विमा दाव्या संबधी कोणतेही कष्ट घेतले नसून आता तिने मुदतबाहय अर्ज केल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने अर्ज विमा योजना संपल्याचा दिनांक-14 ऑगस्ट, 2011 चे पूर्वी किंवा त्यानंतर 90 दिवसा पर्यंत दाखल करावयास हवा होता परंतु तिने तो (तक्रार) दिनांक-13/06/2017 रोजी मुदत निघून गेल्यावर दाखल केल्याचे नमुद केले. शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा 15 ऑगस्ट, 2010 ते दिनांक-14 ऑगस्ट, 2011 पर्यंत होता व तक्रारकर्तीला याची कल्पना होती. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे कारण घडल्या पासून दोन वर्षाचे आत वि.मंचा समक्ष तक्रार दाखल न केल्यामुळे ती मदतबाहय असल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यानीं आपल्या लेखी जबाबा मध्ये नमुद केले की, तक्रारकर्ती श्रीमती सुषमा भाऊराव वासनिक हिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांचे कार्यालयात दिनांक-03/01/2011 रोजी अर्ज सादर केला होता, सदर अर्जातील त्रृटींची पुर्तता करुन तो विमा दावा पुढे त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं-62, दिनांक-15 जानेवारी, 2011 अनुसार जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी, भंडारा यांनी विनाविलंब तिचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-3) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांचेकडे पाठविला आणि त्यांनी तो विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला. त्यांनी पुढे असेही नमुद केले की, विमा दावा प्रस्तावा सोबत ब-याच दस्तऐवजाची कमतरता असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे कार्यालया कडून तक्रारकर्ती सोबत पत्र व्यवहार करुन त्रृटींची पुर्तता करण्यास कळविण्यात आले व त्रृटींची पुर्तता झाल्या नंतर त्यांनी तो विमा दावा अर्ज जिल्हा कृषी अधिकारी,भंडारा यांचे कार्यालयात सादर केला. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी केली.
06. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-10 नुसार एकूण-07 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, माहिती अधिकारात मागविलेली माहिती, तिने दाखल केलेल्या विमा दाव्याची प्रत, तिचे पतीचे शेताच्या 7/12 उता-याची प्रत व इतर दस्तऐवज, पतीचे अपघाता बाबत पोलीस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृतकाचा वयाचा पुरावा अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं-60 ते 62 वर तिचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-69 व 70 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे सिनीअर डिव्हीजनल मॅनेजर यांनी पुराव्या दाखल पान क्रं-66 ते 68 वर शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 63 ते 65 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
08. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तर आणि तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती उल्का खटी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
09. मृतक शेतकरी श्री भाऊराव भिवा वासनिक याचे मालकीची मौजा मौजा खुटसावरी, तालुका-जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-169 ही शेती होती ही बाब दाखल सन-2009-2010 गाव नमुना 7/12 उता-यावरुन सिध्द होते. तक्रारकर्तीने तक्रारीत शेतीचा भूमापन क्रं-252 असल्याचे नमुद केले, जे दाखल 7/12 उतारा प्रतीवरुन चुकीचे दिसून येते, त्याएवेजी तो भूमापन क्रं-169 असल्याचे दिसून येते. दाखल एफ.आय.आर.चे प्रतीवरुन मृतक श्री भाऊराव भिवा वासनीक याचा दिनांक-09/10/2010 रोजी खुटसावरी शिवार नॅशनल हायवे क्रं-6 वर अपघात झालयाची नोंद आहे. नक्कल तोंडी रिपोर्ट मध्ये दिनांक-09/10/2010 रोजी मृतक श्री भाऊराव वासनिक हा खुटसावरी फाटयाचे समोर हायवे रोड क्रं 6 वर जात असताना लाखनी कडून भंडा-याकडे जाणा-या ट्रक क्रं-KA-51/A-428 या ट्रक चालकाने धडक मारल्याने तो जागीच मरण पावल्याचे नमुद आहे. शासकीय वैद्दकीय रुग्णालय भंडारा यांनी दिनांक-09/10/2010 रोजी दिलेल्या शवविच्छेदन अहवाला मध्ये मृतकाचे मृत्यूचे कारण हे “hypovolumic shock with fracture femur shaft with multiple vital organ injury due to road traffic accident” असे नमुद आहे. उपरोक्त नमुद दस्तऐवजांच्या प्रतीं वरुन अपघाताचे दिवशी मृतकाचे नावे शेती असून तो शेतकरी असल्याची बाब सिध्द होते. तसेच दाखल पोलीस दस्तऐवजा वरुन मृतकाचा ट्रक चालकाने धडक दिल्याने भंडारा जिल्हयाचे क्षेत्रात अपघाती मृत्यू झाला होता ही बाब सुध्दा सिध्द होते. दाखल शवविच्छेदन अहवाला वरुन सुध्दा मृतकाचे अपघाती मृत्यूस पुष्टी मिळते. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने जरी तक्रारकर्त्याचे नावाने शेती होती तसेच तो शेतकरी होता या बाबी उत्तरात नाकबुल केलेल्या असल्या तरी त्यात काहीही तथ्य उरत नाही, त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ती ही लाभार्थी ठरते.
10. शेतकरी जनता अपघात विमा योजना-2010-11 चे दिनांक-10 ऑगस्ट, 2010 रोजीचे दाखल महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका वरुन ही योजना दिनांक-15 ऑगस्ट, 2010 ते दिनांक-14 ऑगस्ट, 2011 या कालावधीसाठी होती आणि योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांच्या आत विमा दावा करणे आवश्यक आहे. त्यानुसार विमा योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांचा कालावधी हा दिनांक-14 नोंव्हेंबर, 2011 येतो. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू हा दिनांक-09/10/2010 रोजी झालेला आहे आणि तिने सर्वप्रथम विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-30/12/2010 रोजी दाखल केल्याची बाब तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या स्वाक्षरीवरील पोच वरुन दिसून येते. या वरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्तीने विमा दावा हा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत सादर केला होता, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेला आक्षेप की, तिने विमा दावा विहित मुदतीत दाखल केला नाही यात काहीही तथ्य दिसून येत नाही.
11. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू हा दिनांक-09/10/2010 रोजी झालेला आहे आणि तिने सर्वप्रथम विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-30/12/2010 रोजी दाखल केल्याची बाब तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या स्वाक्षरीवरील पोच वरुन दिसून येते. तक्रारकर्तीने ही तक्रार मंचा समक्ष दिनांक-13/06/2017 रोजी दाखल केलेली आहे.
विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की, ही तक्रार तक्रारीचे कारण घडल्या पासून म्हणजे तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिनांका पासून 02 वर्षा नंतर दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय आहे. या आक्षेपावर तक्रारकर्तीचे वकीलानीं प्रत्युत्तर देताना असे सांगितले की, तिच्या विमा दावा प्रस्तावावर काय निर्णय झाला या संबधी तिला आज पर्यंत काहीही कळविलेले नाही आणि जो पर्यंत तिचा विमा दावा प्रस्ताव खारीज झाला असल्याचे तिला लेखी कळविल्या जात नाही, तो पर्यंत तक्रार दाखल करण्यास सतत कारण घडत असते. तक्रारकर्तीने सुध्दा तिचे शपथपत्रात अशा आशयाचा मजकूर नमुद केलेला आहे. तक्रारकर्तीने माहिती अधिकारी तथा कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी मार्च, 2017 रोजी तक्रारकर्तीचे वकीलांना माहिती अधिकारा संबधी पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केली, त्या सोबत पाठविलेल्या यादी नुसार तक्रारकर्तीचा विमा दावा हा स्पॉट, इक्वेक्स्ट पंचनामा पोलीस अटेस्टेड असे कारण नमुद करुन फेटाळण्यात आल्याचे नमुद आहे. याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्तीला तिचा विमा दावा हा मार्च, 2017 मध्ये फेटाळल्याचे माहिती अधिकार कायद्दाखाली माहिती मागविल्या नंतर माहिती पडल्यामुळे तक्रारीला कारण घडले असे जर गृहीत धरले तर त्यानंतर तक्रारकर्तीने तक्रार ही दिनांक-13 जुन, 2017 मध्ये दोन वर्षाचे आत मंचा समक्ष दाखल केली असल्याने तिची तक्रार ही मुदतीत असल्याचे मंचाचे मत आहे. अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने सदर विमा दावा फेटाळल्या बाबतचे पत्र प्रस्तुत तक्रारी मध्ये पुराव्या दाखल सादर केलेले नाही तसेच ते पत्र तक्रारकर्तीला मिळाल्या बाबत पुराव्या दाखल पोच सादर केलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा रद्द केला होता त्या बाबतचे पत्र प्राप्त झाले होते असे म्हणता येणार नाही, त्यामुळे तक्रारकर्तीला तिच्या विमा दाव्या संबधी कुठलीही माहिती न मिळाल्याने तक्रारीस कारण सतत घडत असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार अर्ज उशिराने मंचा समक्ष दाखल केला असा विरुध्दपक्षाचा आक्षेप निरस्त ठरतो.
या संबधाने तक्रारकर्तीचे वकीलानीं खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयाचा आधार घेतला-
“PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”—I (2006) CPJ-53 (NC)
या प्रकरणा मध्ये विमा दावा खारीज केल्याचे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नव्हते तसेच त्या पत्राची प्रत तक्रारकर्तीला मिळाल्याचे पण सिध्द झाले नव्हते परंतु तरीही जिल्हा ग्राहक मंचाने ती तक्रार खारीज केली होती, जिल्हा मंचाचा तो निर्णय मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रद्दबातल ठरविला आणि तक्रार ही मुदतीत असल्याचे नमुद केले.
हातातील प्रकरणात सुध्दा तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केल्या संबधीचे पत्र तक्रारकर्तीला मिळाल्याचा कोणताही पुरावा अभिलेखावर नाही आणि म्हणून तक्रार दाखल करण्यास कारण हे सतत घडत असल्याने ही तक्रार मुदतबाहय होत नाही.
12. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत माहिती अधिकारी तथा कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी मार्च, 2017 रोजी तक्रारकर्तीचे वकीलांना माहिती अधिकारा संबधी पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केली, त्या सोबत कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रायव्हेट लिमिटेड यांनी फारमर डाटा-2010-2011 तयार केलेली यादी दाखल केली, सदर यादी अनुसार ज्या शेतक-यांचे विमा दावे नामंजूर करण्यात आले, त्यांची नावे व क्लेम नामंजूर केल्याचे कारण त्यामध्ये नमुद केलेले आहे, त्यानुसार तक्रारकर्तीचा विमा दावा हा स्पॉट, इक्वेक्स्ट पंचनामा पोलीस अटेस्टेड असे कारण नमुद करुन फेटाळण्यात आल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष क्रं 1) विमा कंपनीने ही बाब लेखी उत्तरात नाकारुन असे नमुद केले की, तिने विहित मुदतीत दस्तऐवज सादर न केल्यामुळे तिचा विमा क्लेम नाकारल्याचे नमुद केले परंतु तक्रारकर्तीने नेमके कोणते दस्तऐवज दाखल केले नाहीत ते नमुद केलेले नाही. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमा दावा निश्चीतीचे प्रक्रियेत सहाय्य करणारी कंपनी असून तिने तक्रारकर्तीचा विमा दावा ज्या कारणास्तव नामंजूर केला त्या दिलेल्या कारणावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन मंचाला दिसून येत नाही. तक्रारकर्तीने विमा दाव्या सोबत पाठविलेले पोलीस दस्तऐवज अटेस्टेड नाहीत या कारणास्तव तिचा असल विमा (Genuine Claim) फेटाळण्याची विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती तसेच तिचा विमा दावा ज्या कारणास्तव फेटाळण्यात आला ते कारण कळविण्याची तसदी सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने घेतलेली नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पोलीस दस्तऐवजांवरुन तिचे पतीचा शेतकरी अपघात योजनेच्या कालावधीमध्ये अपघाती मृत्यू झाला या बाबी दाखल दस्तऐवजी पुराव्यां वरुन सिध्द होते. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला जर तक्रारकर्तीचे पतीचे अपघाता बाबत शंका होती तर त्यांनी संबधित पोलीस स्टेशनमध्ये विचारणा करावयास हवी होती परंतु केवळ पोलीस दस्तऐवज प्रमाणीत नाहीत म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीची विमा क्लेम नाकारण्याची कृती ही तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा ठरते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील कारणास्तव मंचाचे मते तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव कायद्दा नुसार योग्य असल्यामुळे आणि तो मुदतीत असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने मंजूर करावयास हवा होता. तसेच त्या प्रस्तावावर झालेल्या निर्णयाची सुचना तक्रारकर्तीला न दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने सेवेत कमतरता ठेवली असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
13. विरुध्दपक्ष क्रं 1) विमा कंपनीचे सिनिअर डिव्हीजनल मॅनेजर यांनी जे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले त्यामध्ये तक्रारकर्तीने मोटर अपघात विमा दावा प्राधिकरण यांचे समोर तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधी दावा दाखल केला असल्याने तिला आता मंचा समोर दावा दाखल करता येत नसल्याचे नमुद केले. परंतु त्यांनी मोटर अपघात विमा दावा प्राधिकरण यांचे समोर दाखल केलेल्या दाव्याची प्रत दाखल केलेली नाही. तसेही मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, शेतकरी अपघात विमा योजना ही शासना मार्फतीने मृतक शेतक-याचे वारसदारांना मृत्यू पःश्चात मदत मिळावी म्हणून सुरु केलेली योजना असून या योजनेचा आणि अपघात विमा दावा प्राधिकरण यांचे समोर दाखल केलेल्या प्रकरणाचा कोणताही संबध नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे पुराव्याचे शपथपत्राव्दारे घेतलेला आक्षेप मंजूर होण्यास पात्र नाही.
14. उपरोक्त नमुद विवेचना वरुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून तक्रारकर्ती ही विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- तक्रार दाखल दिनांक-13/06/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(2) मे.कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-13/06/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला अदा करावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(2) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.