श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 14 जून, 2017)
तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची संक्षिप्त तक्रार पुढीलप्रमाणे –
1. तक्रारकर्तीचे म्हणणे असे की, तिचे मय्यत पती देवानंद जागो लोहकर यांच्या मालकीची मौजा – चिचाळ, ता. पवनी , जि. भंडारा येथे भुमापन क्र. 1354 ही शेतजमिन होती व ते व्यवसायाने शेतकरी होते. सदरची शेती त्याच्या नावाने 7/12 मध्ये नोंद असून ती त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषणाचे साधन आहे.
विरुद्ध पक्ष क्र.1 दि युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि. हिचेकडे महाराष्ट्र शासनाने सन 2010-2011 या कालावधीसाठी शेतक-यांचा वैयक्तीक अपघात विमा उतरविला होता आणि विरुद्ध पक्ष क्रमांक 2 ही सदर विमा व्यवहारात शेतकरी व सरकार यांना मदत करण्यासाठी निर्धारीत केलेली कंपनी आहे. वि.प.क्र. 3 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कृषी कार्यालय असून सदर कार्यालयामार्फत अपघात विम्याचे प्रस्ताव सादर करण्यांत येतात.
तक्रारकर्तीचे पती देवानंद लोहकर दि.29.04.2010 रोजी पीण्यासाठी विहिरीचे पाणी काढतांना विहिरीत पडला व विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तक्रारकर्तीने परिपूर्ण विमा दावा वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, पवनी यांचेमार्फत दि.19.06.2010 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे व त्यांनी मंजूरीसाठी तो पुढे विरुध्द पक्ष क्र. 1 कडे सादर केला. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 ने सदर विमा दावा मंजूरीबाबत तक्रारकर्तीस काहीही कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने दि.23.12.2016 रोजी आपले वकीलांमार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 ला नोटीस पाठवून विमा दावा मंजूरीची विनंती केली तरीही त्यांनी विमा दावा मंजूर केला नाही. म्हणून तक्रारीस कारण सतत घडत आहे. तक्रारकर्तीने सदर तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1. विमा दावा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.19.06.2010 पासुन प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याज देण्याचा विरुध्द पक्षाविरुध्द आदेश व्हावा.
2. शारीरिक मानसिक व आर्थीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्याचा विरुध्द पक्षास आदेश व्हावा.
तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारकर्तीने तक्रारीचे पुष्टयर्थ शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 शासन निर्णय, सादर केलेला दावा, शेताचा 7/12 व ईतर दस्तऐवज, अपघाताबाबतचा एफ आय आर व ईतर पोलिस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र, वि.प.क्र. 1 ते 3 ला पाठविलेली कायदेशीर नोटीस इ. दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. विरुद्ध पक्ष क्र. 1 दि युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्तीची मागणी नाकारलेली आहे. तक्रारकर्तीचा पती देवानंद लोहकर दि. 29.04.2010 रोजी विहिरीत बुडून मरण पावल्याचे वि.प.क्र. 1 ने माहिती अभावी नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु 29.04.2010 रोजी झाल्यावर 90 दिवसांचे आत विमाप्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. मात्र मुदतीत विमा दावा कंपनीकडे सादर न करता तक्रारकर्तीने 7 वर्षानंतर 11.01.2017 रोजी मंचासमोर सदर तक्रार दाखल केली असल्याने ती मुदतबाह्य आहे. वि.प.क्र. 2 कबाल इंशुरंस सर्व्हिसेस हे ब्रोकरेज घेत असून परिपूर्ण विमा प्रस्ताव प्राप्त करुन तो विमा कंपनीकडे सादर करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही. तक्रारकर्तीचे पती नोंदणीकृत शेतकरी असल्याचे देखिल वि.प.क्र. 1 ने नाकबूल केले आहे. वि.प.क्र. 1 ला विमा प्रस्ताव प्राप्त झालाच नसल्याने तो नामंजूरीचा प्रश्नच निर्माण झाला नाही. वि.प.क्र. 1 कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडला नसल्याने तक्रारीस कारण घडलेले नाही म्हणून तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
3. वि.प.क्र. 2 कबाल इंशुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यांत आले.
4. वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, पवनी यांनी लेखी जवाब दाखल करुन कळविले की, तक्रारकर्तीकडून त्यांना विमा प्रस्ताव 19.06.2010 रोजी प्राप्त झाला. त्यांनी तो 19.06.2010 रोजी पुढील कार्यवाहीसाठी जि.कृ.अ. कार्यालय भंडारा यांचेकडे सादर केला. त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावल्याने त्यांचेकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडलेला नाही म्हणून त्यांना तक्रारीतून मुक्त करण्यांत यावे अशी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्ता व वि.प.च्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1. वि.प.क्रं.1 ने सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय.
2. तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
3. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे .
- कारणमिमांसा -
5. मुद्दा क्र. 1 व 2 बाबत – सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीने तिचा पती देवानंद जागो लोहकर हा शेतकरी होता हे दर्शविण्यासाठी 7/12 चा उतारा, गाव नमुना 6-क, फेरफार नोंदवहीची नक्कल इत्यादी दस्तावेज क्र. 3 प्रमाणे दाखल केले आहेत. त्यावरुन मौजा चिचाळ, तलाठी साजा क्र. 6 तालुका पवनी, जि. भंडारा येथे पती देवानंद लोहकर यांच्या मालकीची भुमापन क्र. 1354 क्षेत्रफळ 1.34 हेक्टर शेतजमीन असल्याचे सिध्द होते. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन विहरीतून देवानंद लोहकर याचे प्रेत काढल्यानंतर पंचांनी व तपासणी अंमलदाराने घटनास्थळी जी वस्तुस्थिती पाहिली त्यावरुन मृतक हा विहिरीत पडल्याने विहिरीचे पाण्यात बुडून मरण पावल्याचे स्पष्ट होते. तसेच शवविच्छेदन अहवालात देखिल मृत्यूचे कारण “Axphytia due to drowning” म्हणजे पाण्यात बुडाल्याने मृत्यू असेच नमुद केले आहे. शवविच्छेदन अहवाल, तसेच प्रत्यक्ष मौक्यावरील वस्तुस्थितीचे निरिक्षण केल्यावर पंच आणि पोलीस अधिकारी यांनी देवानंद लोहकर याच्या मृत्युचे जे कारण इन्क्वेस्ट पंचनामा व घटनास्थळ पंचनाम्यात नमुद केले आहे, त्यावरुन सदर मृत्यू अपघाती असल्याचे दिसून येते. वि.प.क्र. 1 ने देवानंद याचा मृत्यु अपघाती नव्हता हे सिध्द करणारा कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
वि.प.च्या अधिवक्त्याचा मुख्य आक्षेप असा कि, दि.29.04.2010 रोजी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यावर 90 दिवसांच्या आंत विमा दावा सादर करणे आवश्यक असतांना तक्रारकर्तीने विमा दावा मुदतीत सादर केला नाही आणि 11.01.2017 रोजी सरळ मंचासमोर तक्रार दाखल केली असल्याने ती मुदतबाह्य आहे.
वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी पवनी यांनी लेखी जवाबात स्पष्टपणे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने विमा दावा 19.06.2010 रोजी त्यांच्याकडे सादर केला व त्यादिवशी त्यांनी तो जि.अ.कृअधिकारी कार्यालय भंडारा यांना पुढील कारवाईसाठी सादर केला. यावरुन तक्रारकर्तीने दि.2.04.2010 रोजी तिच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यापासून 50 दिवसांतच विमा दावा सादर केलेला आहे, म्हणून तक्रारकर्तीने 90 दिवसांचे मुदतीत विमा दावा सादर न करता दि.11.01.2017 रोजी 7 वर्षानंतर सदरची तक्रार दाखल केली असल्याने ती मुदत बाह्य आहे हा वि.प.क्र. 1 चा बचाव निराधार व खोटा सिध्द होतो. जोपर्यंत विमा कंपनी विमा दावा नामंजूर केल्याबाबत विमा लाभार्थ्यास कळवित नाही तोपर्यंत विमा दाव्यासाठी कारण सतत घडत असल्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 ए प्रमाणे मुदतीत आहे.
तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्युबाबत विमा दावा मंजूरीसाठी 90 दिवसांचे आंत वि.प.क्र. 3 मार्फत वि.प.क्र. 1 कडे पाठविला असतांना तो मंजूर न करता किंवा नामंजूरीचे कोणतेही कारण तक्रारकर्तीस न कळविता विमा दावा सादरच केला नाही असा खोटा बचाव घेऊन तक्रारीस विरोध करण्याची वि.प.क्र. 1 ची कृती विमा लाभार्थ्याप्रती निश्चितच सेवेतील न्यूनता ठरते. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
6. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत - सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीचा पती देवानंद लोहकार याच्या अपघाती मृत्यूबाबत शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ती रु.1,00,000/- विमा दावा मिळण्यास पात्र असतांना वि.प.ने तो वेळीच मंजूर केला नाही म्हणून तक्रारकर्ती सदर विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल दि.01.01.2011 पासून (विमा प्रस्ताव दि.19.06.2010 रोजी प्रस्ताव दाखल केल्यापासून मंजूरी लागणारा 6 महिन्याचा वाजवी कालावधी सोडून) प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
1) वि.प.क्र. 1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.यांनी तक्रारकर्तीस तिचा पती देवानंद लोहकार याच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- दि.19.06.2010 पासून रक्कम तक्रारकर्तीचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
2) वि.प.क्र. 2 व 3 यांना रक्कम देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते.
3) वि.प.क्र. 1 ने अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.
4) आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी.
5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य द्यावी.
6) तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.