जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :28/06/2010 आदेश पारित दिनांक :12/10/2010 तक्रार क्रमांक :- 410/2010 तक्रारकर्ता :– श्रीमती सीमा अनिल भुतानी, वय अंदाजेः ... वर्षे, व्यवसायः घरकाम, रा. प्लॉट नं.एन.एल./1, मोटार स्टॅण्ड, कामठी, जि.नागपूर. वि रु ध्द गैरअर्जदार :– शाखा व्यवस्थापक साहेब, युनायटेड इंडिया इन्शोरेन्स कं.लि., डि.ए.बी.-डि.ओ.सराफ चेंबर्सच्यासमोर, माऊंट रोड, सदर, नागपूर. तक्रारकर्त्यातर्फे :– ऍड.श्री. जे. एस. भांबरा. गैरअर्जदारातर्फे :– ऍड.श्री. पी. एन. खडगी. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य मंचाचे निर्णयांन्वये श्री. विजयसिंह राणे यांचे आदेशांन्वये आ दे श (पारित दिनांक : 12/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद वकिलांमार्फत ऐकला. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याचे वाहन गैरअर्जदाराकडे दि.16.10.2008 ते 15.10.2009 या कालावधीकरीता विमाकृत होते. त्यामध्ये वाहनाची किंमत ही रु.14,00,000/- दर्शविण्यात आली होती. पुढे सदर वाहन हे 27.12.2008 रोजी चोरीस गेले. या वाहनाच्या विमा रकमेची मागणी तक्रारकर्त्याने वारंवार गैरअर्जदाराकडे केली. मात्र शेवटपर्यंत विम्याची रक्कम दिली नाही. गैरअर्जदाराने शेवटी रु.11,20,000/- एवढी रक्कम देण्याची तयारी दर्शविली. परंतू प्रत्यक्षात दिली नाही. 2. गैरअर्जदारावर मंचाने नोटीस बजावला. त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने लेखी उत्तरात नमूद केले आहे की, त्याला एका व्यक्तीने पत्रांन्वये कळविले की, तक्रारकर्त्याने वाहन हे चोरीला गेल्याचे लबाडीने सांगून वाहनाचा दुसरा क्रमांक छत्तीसगड येथून घेतलेला आहे. या प्रकरणाची गैरअर्जदाराने चौकशी करुन तपास लावला असता सदर पत्रातील बाब खोटी आढळून आली व तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम देण्यास ते तयार असतांना या दरम्यान तक्रारकर्त्याने मंचात तक्रार दाखल केली. 3. मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षकारांनी आप-आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे वाहन विमाकृत होते. त्यामध्ये वाहनाची दर्शविलेली किंमत रु.14,00,000/- होती व वाहन चोरीस गेले याबाबी उभय पक्षांना मान्य आहे. गैरअर्जदारांना जी शंका निर्माण झाली होती, त्याचे निरसन झालेले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास विम्याची रक्कम देणे हे त्यांचे कर्तव्य होते व आजही आहे. ते त्यांनी केलेले नाही. वाहनाची किंमत जी मालक घोषित करतो, ती महत्वाची समजली जाते. यामध्ये मालकांनी रु.14,00,000/- किंमत दर्शविली आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने ही रक्कम जास्त आहे असे म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. फार तर दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात घसारा येऊ शकतो. तो विचारात घेणे आवश्यक आहे. गैरअर्जदाराने विम्याची रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. 5. गैरअर्जदाराने रु.14,00,000/- विमा मुल्यातून रु.50,000/- घसारा वजा करुन उर्वरित रक्कम रु.13,50,000/- तक्रारकर्त्याला तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच 28.06.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह देणे कायदेशीर व न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्याला जो मानसिक त्रास झाला, त्याची क्षतिपूर्ती म्हणून रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- गैरअर्जदाराने द्यावे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.14,00,000/- विमा मुल्यातून रु.50,000/- घसारा वजा करुन उर्वरित रक्कम रु.13,50,000/- तक्रारकर्त्याला तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच 28.06.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावे. 3) तक्रारकर्त्याला मानसिक त्रासाची क्षतिपूर्ती म्हणून रु.25,000/- गैरअर्जदाराने द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे अन्यथा संपूर्ण आदेशीत रकमेवर गैरअर्जदार द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्यास बाध्य राहील. 6) तक्रारकर्त्याने सदर प्रकरणी मा. सदस्यांकरीता असलेल्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स घेऊन जावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |