मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 06/04/2011) 1. तक्रारकर्त्यांनी ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, त्यांचे वडिलांनी गैरअर्जदाराकडे त्यांच्या मालकीचा ट्रक क्र. CG 04 / J 5915 हा दि.13.02.2008 ते 12.02.2009 या कालावधीकरीता पॉलिसी क्र.230102/31/01/01/00041006 अन्वये रु.9,00,000/- करीता विमाकृत केला होता. सदर वाहन हे दि.28.09.2008 रोजी चोरीला गेले. याबाबतची सुचना पोलिस स्टेशन कळमना येथे देण्यात आली, वाहनाची सर्व मुळ कागदपत्रे ही ट्रकमध्ये होती. पोलिसांनी शोधल्यानंतर वाहन न सापडल्याने तक्रारकर्त्याने विमा दावा प्रपत्रासह वाहनाच्या विम्याच्या रकमेची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने वाहनाच्या मुळ कागदपत्रांची मागणी केली. जेव्हा की, मुळ कागदपत्र वाहनासोबत चोरीस गेले होते व तक्रारकर्त्याचे वडिलांचे निधनही झाले होते. वारंवार गैरअर्जदाराला विमा दाव्याबाबत मागणी केल्यानंतर त्यांनी रु.7,50,000/- विम्याची रक्कम देण्याची तयारी दर्शविली. तक्रारकर्त्यास ही बाब मान्य नव्हती, म्हणून त्यांनी सदर तक्राद दाखल केली आणि तीद्वारे रु.9,00,000/- विम्याची रक्कम मिळावी, त्यावर रु.40,000/’ प्रती महिन्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- मिळावे, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्राची प्रत, विमा पॉलिसी प्रमाणपत्राची प्रत, मोटर दावा प्रपत्र, पहिली खबर, सुचना पत्र आणि प्रथम न्यायाधिश, नागपूर यांचे आदेशाची प्रत दाखल केलेली आहे. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्यात आली. गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन पॉलिसीची बाब मान्य केली आणि असा उजर घेतला की, तक्रारकर्त्यांनी वाहनाचे मुळ दस्तऐवज अथवा त्याच्या प्रमाणित प्रतींची पूर्तता व इतर कायदेशीर पूर्तता न केल्यामुळे रु.7,50,000/- या रकमेकरीता दावा निकाली काढला होता आणि तक्रारकर्त्याला दस्तऐवजांची पूर्तता करण्यास सांगितले. मात्र त्यांनी तसे केले नाही, म्हणून या प्रकरणी त्यांचा कोणताही दोष नाही. तक्रार खारीज करावी अशी मागणी केलेली आहे. गैरअर्जदाराने उत्तरासोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. -निष्कर्ष- 3. सदर प्रकरणातील मान्य बाबीप्रमाणे विमा राशी रु.9,00,000/- IDV (Insured Declared Value) असतांना ती रु.7,50,000/- का निर्धारित करण्यात आली याचे कोणतेही कारण गैरअर्जदाराने दिलेले नाही. तक्रारकर्त्याकडे दस्तऐवजाची मागणी केल्याबाबतचे कोणतेही पत्र दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्याच्या वाहनाचे मुळ कागदपत्र वाहनासोबत चोरीस गेले होते असे त्यांचे निवेदन आहे आणि मुळ कागदपत्र चोरीस गेले असतांना तो गैरअर्जदाराकडे देऊ शकणार नाही ही बाबही स्पष्ट होते आणि गैरअर्जदार हे मुळ कागदपत्र नसतांना रु.7,50,000/- चा दावा देऊ शकत होते, त्यामुळे ते कारण संयुक्तीक नाही. उलट योग्य मुल्यांकन करुन दावा देणे गैरअर्जदारांना शक्य होते. गैरअर्जदाराने आजपर्यंत कोणतीही रक्कम तक्रारकर्त्याला दिलेली नाही आणि ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. 4. वाहनाचे घोषित मुल्य रु.9,00,000/- होते व त्यावर विमा पॉलिसी देण्यात आली होती. पॉलिसीच्या प्रतीचे निरीक्षण केले असता असे दिसते की, पॉलिसी दिल्यापासून अंदाजित सात महिन्यानंतर वाहन चोरीस गेले आणि त्यामुळे घसा-याची काही रक्कम तक्रारकर्त्याच्या मागणीतून वगळणे गरजेचे आहे. त्यामुळे ती 5% एवढी ठरवून रु.9,00000/- तून वगळण्यात यावी. त्याप्रमाणे तक्रारकर्ते हे रु.8,55,000/- एवढे नुकसानीबाबत मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.8,55,000/- एवढी नुकसान भरपाई द्यावी. त्या रकमेवर गैरअर्जदाराकडे दावा दाखल केल्याचे तारखेपासून 30.09.2008, पुढील दोन महिन्याचा कालावधी सोडून, दि.01.12.2008 पासून ते संपूर्ण प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजाने द्यावी. 3) तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांना द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे न पेक्षा द.सा.द.शे.9% व्याजाऐवजी 12% व्याज द्यावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |