Dated the 03 Aug 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य)
- सामनेवाले ही सर्वसाधारण विमा कंपनी आहे. तक्रारदार ही मालकी हक्क स्वरुपाची संस्था आहे. तक्रारदारांनी सामनेवालेकडे प्रतिपूर्तीसाठी पाठविलेला अग्निविमा दावा नाकारल्याच्या बाबीतून प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
- तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार त्यांनी सामनेवालेकडून दि. 15/04/2010 ते दि. 14/04/2011 या कालावधीमध्ये वैध असलेली स्टँडर्ड फायर अॅण्ड पेरील पॉलिसी घेतली. सदर पॉलिसीअंतर्गत रु. 20 लाखापर्यंतचे संरक्षण प्राप्त होते. सदर पॉलिसीच्या वैधतेदरम्यान तक्रारदारांनी त्यांचा माल विमा संरक्षण असलेल्या गोदामामध्ये ठेवला होता. तथापि, दि. 21/06/2010 रोजी दुपारी 12.25 वाजता सदर गोदामास आग लागून त्यामधील रु. 3.80 लाख किंमतीच्या मालाची नुकसानी झाल्याबाबत व सदर नुकसानीची रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल केला. सामनेवाले यांना सदर दावा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व्हेअरनी वेळोवेळी मागणी केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे सामनेवाले यांना देण्यात आली. तथापि, सामनेवाले यांनी दाव्यासंबंधी दीर्घ कालावधीपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. अंतिमतः तक्रारदारांनी सर्वेअर रिपोर्टची मागणी केल्यानंतर दावा नाकारतांना असे नमूद केले की तक्रारदारांनी आगीचे कारण दिले नाही (cause of fire) व उभय पक्षांमध्ये झालेल्या कराराच्या अटींचा भंग केला आहे. सबब तक्रारदार प्रतिपूर्ती दावा घेण्यास पात्र नाहीत.
- सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन प्रामुख्याने असे नमूद केले की, विमा पॉलिसीच्या शर्ती व अटींनुसार विमा पॉलिसीधारकाने शर्ती व अटींचा भंग केल्यास पॉलिसीअंतर्गत संरक्षण त्याला प्राप्त होत नाही. प्रस्तुत प्रकरणातील गोडाऊनला लागलेल्या आगीसंदर्भात पोलिसांनी तक्राराविरुध्द दाखल केलेल्या एफ.आय.आर. व चार्जशिटनुसार तक्रारदारांनी फौजदारी कायदयातील अनेक तदतुदींचे उल्लंघन केले आहे. तक्रारदारांचे मुखत्यार यांनी पोलिसांपुढे दि. 05/07/2010 रोजी दिलेल्या जबानीनुसार गोडाऊनमध्ये विज जोडणी नव्हती. तथापि, सामनेवाले यांनी नेमलेल्या सर्वेअरच्या अहवालानुसार प्रस्तुत प्रकरणामधील गोदामामध्ये लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. सदर विरोधाभास विचारात घेता, तक्रारदारांनी कांही महत्त्वाची माहिती लपविली असल्याने व तक्रारदारांनी आगीचे कारण स्पष्ट न केल्यामुळे आणि विशेषतः उभय पक्षांमध्ये झालेल्या कराराच्या तरतुदीचा भंग केल्याने तक्रारदारांचा दावा नाकारण्यात येत आहे.
- तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद दाखल केला. सदर कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले. तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः-
- तक्रारदारांनी भिवंडी येथील ओम साई वेअरहौसिंगमधील गाळा नं. J-10 ते J-19 व पद्मावती कंपाऊंडमधील गाळा नं. आय 17 ते आय 19 या गाळयामधील त्यांच्या साठवणूक केलेल्या मालाबाबत रु. 40 लाख रकमेचे संरक्षण असलेली विमा पॉलिसी क्र. 180902/11/10/12/57 दि. 15/04/2010 ते दि. 14/04/2010 या कालावधीकरीता वैध असलेली स्टॅण्डर्ड फायर व पेरील पॉलिसी घेतल्याची बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. तसेच दि. 21/06/2010 रोजी सदर पद्मावती कंपाऊंडमधील ओम साई वेअरहाऊसच्या गोडाऊन क्रमांक जे 10 ते जे 16 मध्ये आग लागून सदर गोडावूनमधील तक्रारदारांच्या साठवणूक केलेल्या मालासह सदरील गोडाऊन जळून खाक झाल्याची बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. सदर आगीबाबतचा तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठविलेला रु. 3.80 लाख रकमेचा विमादावा सामनेवाले यांना प्राप्त झाल्याचे व तो दावा नाकारल्याची बाब ही सामनेवाले यांनी मान्य केली आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून आगीबाबत इंटिमेशन मिळाल्यानंतर परिमल शहा यांची सर्वेअर म्हणून नेमणूक केली. तक्रारदारांनी सर्वेकरीता आवश्यक ती कागदपत्रे वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे दिली. सामनेवाले यांनीसुध्दा मागणी केल्यानुसार तक्रारदारांनी कागदपत्रे दिल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. तथापि, आगीचे कारण दर्शविणारी कागदपत्रे सामनेवाले यांनी मागितली असता तक्रारदारांना पोलिसांकडून फोरेन्सिक रिर्पोर्ट न मिळाल्याने तक्रारदार सामनेवाले यांना देऊ शकले नाहीत असे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते.
(क) सामनेवाले यांनी तक्रारदारांचा दावा नाकारतांना प्रामुख्याने असे नमूद केले आहे की तक्रारदारांना वेळोवेळी आगीचे कारणाबाबत मागणी करुनही ते दिले नाही. सामनेवाले यांच्या सदरील दावा नाकारण्याच्या कारणाबाबत असे नमूद करावेसे वाटते की आय आर डी ए लायसन्सिंग प्रोफेशनल्स् रिक्वायरमेंट अँड कोड ऑफ कंडक्ट रेग्युलेशन 2000, चाप्टर IV मधील रेग्युलेशन 13(2)IV मधील सर्वेअरची कर्तव्ये खालीलप्रमाणे नमूद केली आहेतः
13(2)(iv) examining, inquiring, investigating, verifying and checking upon the causes and the circumstances of the loss in question including extent of loss, nature of ownership and insurable interest.
उपरोक्त तरतूद विचारात घेता, विमाधारकास झालेल्या नुकसानीबाबतचे कारण शोधणे ही जबाबदारी विमा कंपनीने आयआरडीए रेग्युलेशनप्रमाणे नेमलेल्या सर्वेअरची म्हणजेच विमा कंपनीची असतांना प्रस्तुत प्रकरणामध्ये सामनेवाले आपली जबाबदारी तक्रारदारावर सोपवून त्याचा उपयोग तक्रारदारांचा विमा दावा नाकारण्यासाठी करत असल्याचे दिसून येते.
(ड) सामनेवाले यांनी नेमलेल्या परिमल शहा या सर्वेअरनी सामनेवाले यांना आपला अहवाल दिल्याचे सामनेवाले यांनी कथन केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा दावा नाकारतांना असेही नमूद केले आहे की सर्वेअरनी दिलेल्या अहवालानुसार गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. तथापि, तक्रारदारांनी पोलिसांमध्ये दिलेल्या जबानीनुसार गोडाऊनमध्ये वीज जोडणीच घेण्यात आली नव्हती. सर्वेअर यांचा अहवाल व तक्रारदारांचा जबाब यामधील विसंगती सामनेवाले यांनी निदर्शनास आणून तक्रारदारांचा दावा नाकरण्यासाठी सदरील विसंगती नमूद केली आहे. सामनेवाला यांच्या सदरील कथनासंदर्भात असे नमूद करावेसे वाटते की गोडावूनमध्ये विज जोडणी नव्हती या कथनाच्यापृष्ठयर्थ सामनेवाले यांनी सर्वेअरचा अहवाल दाखल करणे आवश्यक होते. तथापि, त्यांनी सामनेवाले यांचे केवळ शाब्दिक कथन न्यायनिर्णयासाठी विचारात घेणे अयोग्य होईल असे मंचाचे मत आहे. त्यामुळे सर्व्हेअर अहवाल मंचापुढे दाखल न करता सर्वेअरच्या अहवालामधील सामनेवाले यांनी नमूद केलेल्या बाबींचा लाभ सामनेवाले यांना देणे केवळ अनुचित नव्हे तर अन्यायकारक होईल असे मंचाचे मत आहे.
इ. सामनेवाले यांनी असेही नमुद केले आहे की, गोडाऊनमध्ये साठवणूक केलेल्या मालामधून स्वयं रासायनिक प्रक्रियेमुळे (own fermentation) आग निर्माण होऊन नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, सदरील कथने ही त्याबाबतचा कोणताही पुरावा न देता केली असल्याने सदर शाब्दिक कथनाचा विचार करणे अयोग्य होईल असे मंचाचे मत आहे.
(ई) सामनेवाले यांनी दावा नाकारतांना असेही नमूद केले आहे की, तक्रारदारांनी गोडाऊनमध्ये स्पोटक वस्तूंचा साठा केल्याची शक्यता असल्यामुळे व अशा स्पोटक वस्तूंच्या स्वतःच्या फर्मेन्टेशनमधून आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामनेवाले यांनी आपल्या उपरोक्त कथनासंदर्भात कोणताही पुरावा दाखल न करताच केवळ स्वअंदाजानुसार वक्तव्ये केली असून त्यास कोणताही पुरावा दाखल केला नसल्याने या वक्तव्याचा विचार करता येणार नाही.
(उ) सामनेवाले यांनी अंतिमतः असेही नमूद केले आहे की, तक्रारदाराने इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्टमधील करारासंदर्भात मूलभूत बाबींचे उल्लंघन केले असल्याने तक्रारदार व सामनेवाले यांचेदरम्यान झालेला करावा अवैध आहे. सामनेवाले यांनी दावा नाकारण्यासाठी वापरलेले उपरोक्त कारण हे पोलिसांनी गोडावून मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी नमूद केलेल्या तपशिलावरुन घेतले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय दावा नाकारण्यासाठी उभय पक्षांमध्ये केलेल्या विमा करारामधील (विमा पॉलिसीअंतर्गत शर्ती व अटींचा) तदतूदींचा भंग झाल्याची बाब न दर्शविता, गोडावुन मालकाने भारतीय दंडविधान तसेच पर्यावरण कायदयामधील तदतूदींचा भंग केल्याचा आरोप करुन दावा नाकारणे बाब अनुचित होईल असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निकषानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
- तक्रार क्र. 284/2012 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या रु. 3.80 लाख रकमेच्या दाव्यापैकी 75% रक्कम रु. 2.85 लाख तक्रार दाखल दि. 14/09/2012 पासून 6% व्याजासह दि. 15/09/2015 पूर्वी तक्रारदारांना अदा करावा. विहीत मुदतीमध्ये आदेश पूर्ती न केल्यास दि. 16/09/2015 पासून आदेश पूर्ती होईपर्यंत 9% व्याजासह रक्कम अदा करावी.
- तक्रार खर्चाबद्दल सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु.10,000/- दि. 15/09/2015 पूर्वी तक्रारदारांना दयावेत.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्क देण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.