तक्रारकर्त्यातर्फे वकील :- ॲड. जे.एम. राऊत
विरुध्दपक्षातर्फे वकील :- ॲड. जी.एच. जैन
::: आ दे श प त्र :::
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा उपरोक्त ठिकाणचा रहिवाशी असून त्याचा व्यवसाय हा म्हैसपालन व त्यासोबत छोटया किराणा दुकानाचा आहे. तक्रारकर्त्याचा म्हैसपालन म्हणजे दुध विक्रीचा हा व्यवसाय वडिलोपार्जित असून या अगोदर त्यांनी या व्यवसायाकरिता कर्जाऊ म्हैस घेतलेली आहेत व त्या कर्जाची व्यवस्थित परतफेड सुध्दा केलेली आहे.
सदरहू दाव्याचा वादाचा मुद्दा असलेली मु-र्हा जातीची म्हैस दिनांक 27-09-2014 रोजी तक्रारकर्त्याने ग्रामपंचायत सांगळूद येथून ₹ 40,000/- ला खरेदी केली. या म्हैस खरेदीकरिता फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड, अकोला यांनी तक्रारकर्त्यास कर्ज अटी व शर्तीपूर्वक दिलेले आहे व या म्हशीचा विमा विरुध्दपक्ष यांनी ₹ 40,000/- इतक्या किंमतीचा विमा फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड यांच्या नांवे काढलेला आहे व या पॉलीसीचा क्रमांक 230483/47/14/01/00000021 असा आहे. सदर विम्यापोटी तक्रारदाराने विधीवत खरेदी केलेल्या म्हशीला निशाणी म्हणून 5599 या क्रमांकाचा बिल्ला विरुध्दपक्षाच्या प्रतिनिधीने म्हशीच्या कानावरती लावलेला होता.
दिनांक 08-02-2015 रोजी तक्रारकर्त्याने गोठयात जावून पाहिले असता या वादाचा मुद्दा असलेली म्हैस मरण पावलेली आढळली. सदर म्हैस ही दुभती/दुध देणारी असून खरेदी केलेल्या तारखेपासून प्रतिदिन अंदाजे 9 ते 10 लिटर दुध देत होती. म्हशीच्या अकस्मात मृत्युमुळे तक्रारकर्त्याला धक्का बसला. सदरहू म्हशीचा विरुध्दपक्ष कंपनीने विमा काढलेला असल्यामुळे तक्रारकर्त्याने म्हशीच्या मृत्युचे वर्णन करणारे पत्र युनायटेड इंडिया इन्शुरंस कंपनी लिमिटेड शाखा बाळापूर यांना त्याच दिवशी सदर कार्यालयात नेवून दिले.
विरुध्दपक्ष यांना लेखी तसेच दूरध्वनीवरुन सूचना देवूनही ते वेळेवर हजर न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने पशुधन विकास अधिकारी, उरळ, ता. बाळापूर, जि. अकोला यांना मृत म्हशीच्या शवचिकित्सेकरिता तोंडी विनंती केली. त्यानुसार त्यांनी मृत म्हशीची चिरफाड करुन मृत म्हशीच्या “ मृत्युचे कारण - न्युमोनिया ” असल्याची नोंद केली. विरुध्दपक्ष यांनी ठरवून दिलेल्या पूर्ण कागदपत्रांची तसेच पुराव्याची पूर्तता तक्रारकर्ता यांनी दिनांक 21-01-2015 रोजी करुन मृत म्हशीच्या विम्यापोटी मिळणा-या रकमेकरिता विरुध्दपक्ष यांच्याकडे त्यांच्या बाळापूर येथील कार्यालयात दावा दाखल केलेला आहे. दावा दाखल केल्यानंतर विरुध्दपक्ष यांच्या पॅनलवरील ॲड. श्री. बोराडे यांनी दिनांक 26-03-2015 रोजी तक्रारकर्त्याच्या निवासस्थानी भेट देवून त्यांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत चौकशी केली व सदर दावा हा खरा असून तक्रारकर्त्याला लवकरात लवकर दाव्यापोटी मिळणारी विमा रक्कम देण्याचे आश्वासन दिले. परंतु, वैयक्तिकरित्या व वारंवार तोंडी स्मरण देवून सुध्दा विरुध्दपक्षाने कसलाही प्रतिसाद दिला नाही. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, तक्रार मंजूर व्हावी व 1) विमा काढलेल्या टॅग क्रमांक 5599 या मृत म्हशीच्या आकस्मिक मृत्युपोटी ठरलेली विम्याची रक्कम ₹ 40,000/- फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड, अकोला यांच्या नांवे त्यांनी तक्रारदारास ठरवून दिलेल्या व्याजाप्रमाणे मिळण्यात यावी. 2) तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी ₹ 10,000/- इतकी रक्कम भरपाई म्हणून मिळावी. 3) न्यायिक खर्च ₹ 5,000/- दयावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 10 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा संयुक्त लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्त लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचे हे म्हणणे नाकबूल आहे की, दिनांक 08-01-2015 रोजी तक्रारकर्त्याने गोठयात जावून पाहले असता, वादातील म्हैस मरण पावलेली आढळली व ती सदरहू म्हैस दुभती असून खरेदी केलेल्या तारखेपासून दररोज अंदाजे 9 ते 10 लिटर दुध देत होती. विरुध्दपक्षाचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड कडून कर्ज घेतले. त्यानंतर तक्रारकर्त्याने स्वत: म्हशीचा विमा प्रिमियम अदा करुन फुलर्टन इंडिया कंपनी लिमिटेडच्या नावाने ₹ 40,000/- इतक्या रकमेचा विमा विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून दिनांक 18-12-2014 ते 17-12-2015 पर्यंतच्या कालावधीकरिता घेतला व म्हैस मेल्यानंतर तक्रारकर्ता स्वत: विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या बाळापूर येथील कार्यालयामध्ये आला व त्याने दिनांक 08-01-2015 च्या पत्रान्वये लेखी सूचना विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे श्री. धोटे यांना दिली व ते सूचनापत्र वाचून श्री. धोटे यांनी तक्रारकर्त्याला सांगितले की, तक्रारकर्त्यासोबत विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे प्रतिनिधी यांना मृतक म्हशीचे घटनास्थळी जावून तपास करण्यास पाठवितो व त्या तपासासंबंधीचा शेरा श्री. धोटे यांनी सूचनापत्रावर लिहिला. त्याचवेळी तक्रारकर्त्याने श्री. धोटे यांना विनंती केली की, तक्रारकर्त्याला सूचनापत्राची पोच पाहिजे. तक्रारकर्त्याकडे हया सूचनापत्राची दुसरी प्रत नव्हती म्हणून त्या मुळ सूचनापत्राची, ज्यावर श्री. धोटे यांची सही करायची राहिली, झेरॉक्स प्रत बाहेरुन काढून परत मूळ सूचनापत्र श्री. धोटे यांना देतो, असे सांगून तक्रारकर्त्याने श्री. धोटे यांची सही नसलेले मूळ सूचनापत्र सोबत घेऊन गेला व बराच वेळ झाल्यावरही तक्रारकर्ता परत आला नाही. त्यामुळे, श्री. धोटे यांना असे वाटले की, तक्रारकर्त्याला अचानक काही महत्वाचे दुसरे काम आले असेल किंवा त्याला काही मोठी अडचण आली असेल त्यामुळे तक्रारकर्ता ताबडतोब परत मुळ सूचनापत्र घेवून आला नसेल म्हणून श्री. धोटे यांनी तक्रारकर्ता यांची बरीच वाट पाहिली व तक्रारकर्ता न आल्याने मूळ सूचनापत्र परत न आणून दिल्याने मृतक म्हशीचे स्थळावर जाऊन मृतक म्हशीचे तपास करण्यास त्यांचे प्रतिनिधीस पाठविता आले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे मृतक म्हशीचा तपास करण्यापासून वंचित राहिले.
विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यानंतर तक्रारकर्त्याने सरळ मृतक म्हशीच्या क्लेमचे दस्तऐवज दुस-या इसमासोबत विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे कार्यालयाला पाठविले. जेव्हा की, तक्रारकर्त्याने म्हशीच्या क्लेमसंबंधी क्लेम फॉर्म व इतर फॉर्म हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्याच कार्यालयामधून ते घेतले नाही. तक्रारकर्त्याच्या अशा वागण्यावरुन विरुध्दपक्षास क्लेमसंबंधी संशय निर्माण झाला. त्याचप्रमाणे, श्री.बोराखडे यांची संशोधक म्हणून नेमणूक केली. त्यांनी तक्रारकर्ता व संबंधितांची भेट घेऊन विचारपूस करुन त्यांचा अहवाल विरुध्दपक्षास सादर केला व त्यांच्या अहवालानुसार तक्रारकर्ता हे चांदूर ता.जि. अकोला येथील रहिवासी असून तक्रारकर्त्याचे गांव हे अकोल्यापासून 6 कि.मी. अंतरावर आहे आणि अकोला शहरामध्ये विम्याचे तेरा कार्यालये असतांना सुध्दा तक्रारकर्त्याने त्याचे गावापासून 32 कि.मी. अंतरावर असलेल्या बाळापूर येथील विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या कार्यालयामधूनच सदरहू म्हशीचा विमा घेतला व त्याकरिता स्वत: तक्रारकर्त्याने प्रिमियम देवून म्हशीचा विमा फुर्लटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड च्या नावाने दिनांक 18-12-2014 ते 17-12-2015 या कालावधीसाठी काढला. जेव्हा की, फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडने तक्रारकर्त्यास ऑक्टोबर 2014 मध्ये कर्ज दिले आणि त्यांचे कर्जाचे सुरक्षतेसाठी त्या कंपनीने कर्ज वाटपावेळी कां विमा काढला नाही? याबद्दल प्रश्न उपस्थित होतो. तसेच तक्रारकर्त्याने त्याचे गावापासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या उरळ गावातील पशुतज्ञ डॉ. पिंपरकर यांचेकडून म्हशीचे शवविच्छेदन कां करुन घेतले? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच संशोधक श्री. बोराखडे यांनी म्हशीच्या फोटोची मूळ प्रिंट मागितली, परंतु, तक्रारकर्त्याने त्यास प्रतिसाद दिला नाही. फक्त सांगितले की, कशावरुन फोटो काढले ते ट्रेस होत नाही. फोटोवरुन म्हशीच्या कानातील टॅग इन्टॅक्ट आहे, असे दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने ताबडतोब म्हशीच्या मृत्युची लेखी सूचना विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला न दिल्यामुळे म्हशीच्या मृत्युसंबंधी स्थळावर जावून तपास करता आले नाही. म्हणून, तक्रारकर्त्याने विमा पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग केला. तसेच वर नमूद केलेल्या विसंगतीवरुन तक्रारकर्त्याच्या मृतक म्हशीच्या क्लेमसंबंधी दाट संशय निर्माण होतो. जरी तक्रारकर्त्याचा क्लेम हा खरा नसला तरी तक्रारकर्त्याचा क्लेम नाकारण्यासंबंधीचे सबळ पुरावे विरुध्दपक्षाकडे नसल्याकारणाने तसेच वर नमूद विसंगती बघता विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा क्लेम पूर्ण नाकारण्याऐवजी विनामानक आधारावर ( Non Standard Basis ) विमा रक्कम ₹ 40,000/- चे 75 टक्के ₹ 30,000/- चा क्लेम सेटल केला व त्याप्रमाणे विरुध्दपक्षाने दिनांक 26-06-2015 चे पत्रान्वये कारणे देवून ₹ 30,000/- चे डिस्चार्ज व्हाऊचर तक्रारकर्त्यास सहीकरिता पाठविले. परंतु, तक्रारकर्त्याने त्यास प्रतिसाद दिला नाही व मंचाकडे विरुध्दपक्षा विरुध्द तक्रार दाखल केली. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचाकडे आला नाही.
विरुध्दपक्षाचे म्हणणे असे की, विम्याच्या पॉलीसीप्रमाणे फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड ला सुध्दा या तक्रारीमध्ये पक्षकार/पार्टी करणे जरुरीचे होते. परंतु, तक्रारकर्त्याने सदरहू फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड ला पक्षकार/पार्टी केले नाही. म्हणून Non joinder of necessary parties या मुद्दयाखाली सुध्दा तक्रारकर्त्याची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही, ती खर्चासह खारीज व्हावी.
का र णे व नि ष्क र्ष
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा संयुक्त लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात विरुध्दपक्षाला तक्रारकर्त्याचे हे कथन मान्य आहे की, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असून त्याने फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड कडून कर्ज घेतले होते व त्यानंतर त्याने स्वत: त्याच्या म्हशीचा विमा प्रिमिअम अदा करुन फुलर्टन इंडिया कंपनी लिमिटेड च्या नावाने ₹ 40,000/- ईतक्या रकमेचा, विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून दिनांक 18-12-2014 ते 17-12-2015 पर्यंतच्या कालावधीकरिता घेतला होता. विरुध्दपक्षाला हे ही मान्य आहे की, तक्रारकर्त्याची सदर म्हैस दिनांक 08-01-2015 रोजी मरण पावली.
तक्रारकर्त्याच्या मतानुसार त्यांनी ही सूचना विरुध्दपक्षाकडे दिली, त्यावर विरुध्दपक्षाने म्हशीच्या तपासणीकरिता कार्यालयीन व्यक्तीची नेमणूक करण्याचा शेरा मारला. परंतु, ते वेळेवर हजर न झाल्याने तक्रारकर्त्याने पशुधन विकास अधिकारी, उरळ, ता. बाळापूर यांना मृत म्हशीच्या शवचिकित्सेकरिता तोंडी विनंती केल्यामुळे त्यांनी शवचिकित्सा करुन म्हशीच्या “ मृत्युचे कारण - न्युमोनिया ” व्यक्त केले. सदर म्हैस दुभती होती व तिची किंमत ₹ 40,000/- होती. तक्रारकर्त्याने मृतक म्हशीचा विमा मिळण्याकरिता विरुध्दपक्षाच्या बाळापूर येथील कार्यालयात दावा दाखल केला. परंतु, विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद न देता, विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून विमा रक्कम ₹ 40,000/- व नुकसान भरपाईपोटी रक्कम ₹ 10,000/-, प्रकरण खर्च ₹ 5,000/- देण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्त्याने केली.
यावर विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने म्हशीच्या मृत्युची बातमी/सूचना पत्रान्वये विरुध्दपक्षाच्या बाळापूर कार्यालयात दिली. परंतु, त्या पत्रावर अधिका-याने मृतक म्हशीचे घटनास्थळी जाऊन तपास करणे कामी तपास अधिका-याला पाठवितो असा शेरा मारल्यानंतर सही करण्यापूर्वीच तक्रारकर्त्याने सदर सूचनापत्र झेरॉक्स काढतो म्हणत घेऊन गेला व त्यानंतर तो कार्यालयात आलेला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना मृतक म्हशीचा तपास करण्यापासून तक्रारकर्त्याने वंचित ठेवले. तसेच तक्रारकर्त्याने विमा रक्कम मिळण्याबाबतचे क्लेम फॉम हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या कार्यालयातून न घेता, दुस-या कार्यालयामधून क्लेम फॉर्म मिळवला म्हणून विरुध्दपक्षास क्लेम संबंधी संशय निर्माण झाल्याने त्यांनी इन्व्हेस्टीगेटर/संशोधक नेमून संपूर्ण विचारपूस केली. तेव्हा असे कळले की, तक्रारकर्ता हा अकोल्यापासून 06 कि.मी. अंतरावर चांदूर या गांवी राहतो व अकोला शहरात विम्याचे तेरा कार्यालये असून सुध्दा तक्रारकर्त्याने 32 कि.मी. अंतरावर असलेल्या बाळापूर कार्यालयामधूनच सदरहू म्हशीचा विमा घेतला. तसेच म्हशीचे शवविच्छेदन हे देखील उरळ गावातील डॉक्टरांकडून करुन घेतले व म्हशीच्या फोटोवरुन कानातील टॅग हा इनटॅक्ट नव्हता. या सर्व विसंगतीमुळे व हया सर्व बाबी पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग यामध्ये मोडत असल्यामुळे विरुध्दपक्ष तक्रारकर्त्याचा क्लेम पूर्ण नाकारण्यापेक्षा विना मानक आधारावर ( Non Standard Basis ) रक्कम ₹ 40,000/- चे 75 टक्के रक्कम ₹ 30,000/- या रकमेत दावा सेटल करण्यास तयार आहे. अशा प्रकारचा विरुध्दपक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त तपासले असता असे दिसते की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या म्हशीच्या मृत्युची सूचना/वजा अर्जावर विरुध्दपक्षाची “ प्राप्त ” अशी सही नाही व त्यावर “ Depute Mr. Dhone to confirm the death of animal in question ” असा शेरा दिसतो. परंतु, सदर म्हशीचे शवविच्छेदन हे तक्रारकर्त्याने दुस-या अधिका-यामार्फत केलेले दिसते तसेच विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या चौकशी अहवालावरुन ही बाब लक्षात येते की, तक्रारकर्त्याने सदर विरुध्दपक्षाने शेरा लिहिलेले सूचनापत्र झेरॉक्स काढायचे म्हणून घेऊन गेला होता, त्यामुळे त्यावर विरुध्दपक्षाची सही दिसत नाही व म्हणून विरुध्दपक्षाला मृतक म्हशीचा तपास करण्यापासून तक्रारकर्त्यानेच वंचित ठेवले हया विरुध्दपक्षाच्या कथनात मंचाला तथ्य वाटते. तसेच विरुध्दपक्षाचा युक्तीवादातील बचाव, हा चौकशी अहवालावरुनही कळतो, त्यामुळे हया बाबी म्हणजे पॉलीसीतील अटी व शर्तीचा भंग करणा-या आहेत, असे मंचाचे देखील मत झाले आहे. तक्रारकर्त्याच्या म्हशीच्या किंमतीबद्दल वाद नाही म्हणून अशा लक्षवेधी विसंगतीमुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा विनामानक आधारावर ( Non Standard Basis ) मंजूर करुन विमा रक्कम ₹ 40,000/- चे 75 टक्के रक्कम ₹ 30,000/- विमा दाव्यापोटी तक्रारकर्त्यास दिल्यास ते न्यायोचित होईल या विरुध्दपक्षाच्या निष्कर्षाशी मंच सहमत आहे. तक्रारकर्ते यांचा दावा विनामानक आधारावर ( Non Standard Basis ) मंजूर केल्यामुळे तक्रारकर्ता ईतर कोणतीही नुकसान भरपाई व न्यायीक खर्च विरुध्दपक्षाकडून घेण्यास बाध्य नाही असे मंचाचे मत आहे, सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) तक्रारकर्ता त्याच्या मृत म्हशीच्या विमा दाव्यापोटी विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2
कडून विनामानक आधारावर ( Non Standard Basis ) विमा रक्कम
₹ 40,000/- ( अक्षरी रुपये चाळीस हजार फक्त ) चे 75 टक्के रक्कम
₹ 30,000/- ( अक्षरी रुपये तीस हजार फक्त) घेण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याची
व्याजाची, ईतर नुकसान भरपाईची व न्यायिक खर्चाची मागणी फेटाळण्यात
येते.
3) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
4) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.