::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-07 मार्च, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली अपघातग्रस्त विमाकृत ट्रकच्या दुरुस्तीच्या खर्चाची परिपुर्तता विरुध्दपक्ष विमा कंपनीने न केल्याने सेवेतील कमतरता या आरोपा वरुन मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याचे मालकीचा ट्रक असून त्याचा नोंदणी क्रमांक-C.G-04/A-9082 असा आहे आणि तो विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विमाकृत केलेला आहे. दिनांक-23/10/2008 रोजी विमाकृत ट्रकने ट्रकचा ड्रॉयव्हर आणि क्लिनर हे दोघेही नागपूरहून रायपुर येथे जात असताना समोरुन येणा-या दुस-या वाहनाची धडक विमाकृत ट्रकला लागून तो क्षतीग्रस्त झाला, ज्यामध्ये त्या ट्रकचे बरेच नुकसान झाले. अपघाताची सुचना त्याच दिवशी विरुध्दपक्ष विमा कंपनीला देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी रिपोर्ट दाखल करुन पंचनामा केला व ट्रक जप्त केला. तक्रारकर्त्याने त्या नंतर न्यायालयातून तो ट्रक सोडवून घेतला. त्यानंतर तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त विमाकृत ट्रकच्या दुरुस्तीचा खर्च रुपये-2,55,557/- पॉलिसी अंतर्गत मिळण्यासाठी विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दाखल केला. तसेच दुरुस्ती नंतर ट्रकची पुर्न तपासणी करण्यासाठी विरुध्दपक्ष विमा कंपनीला विनंती करण्यात आली. तक्रारकर्त्याचे पत्रा वरुन विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे त्याला गुलाब चैतराम कळवे याचा वाहन चालक परवाना दाखल करण्यास सांगितले, जो अपघाताचे वेळी तो ट्रक चालवित होता. त्यावर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला कळविले की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रक हा नवकिशोर सुभलचंद्र प्रधान हा चालवित होता आणि गुलाब चैतराम कळवे हा त्या ट्रकचा क्लिनर होता आणि अपघाता नंतर चालक नवकिशोर प्रधान हा घटनास्थळा वरुन पळून गेला होता . परंतु गुलाब चैतराम कळवे त्या अपघाता मध्ये जखमी झाल्याने पोलीसानीं त्याला दवाखान्यात भर्ती केले व त्याचे नावाने विमा दावा बनविला. दिनांक-27/09/2010 रोजीचे पत्रान्वये विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्यास कळविले की, त्याने आवश्यक ते दस्तऐवज दाखल न केल्यामुळे त्याचा विमा दावा बंद करण्यात आला तसेच त्याला हे पण सांगण्यात आले की, पोलीसानीं केलेल्या चौकशी वरुन असे दिसून येते की, अपघाताचे वेळी तो विमाकृत ट्रक गुलाब चैतराम कळवे चालवित होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे नेमण्यात आलेल्या सर्व्हेअरने विमाकृत ट्रकची पाहणी करुन झालेल्या नुकसानीचे निर्धारण रुपये-1,80,648/- एवढे केले होते परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने दस्तऐवजाची पुर्तता केल्या नंतरही विमा दावा मंजूर न केल्यामुळे सेवेत कमतरता ठेवली म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला विमाकृत ट्रकचे दुरुस्तीचा खर्च रुपये-2,55,557/- व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे तसेच झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात असे नमुद केले की, विमाकृत ट्रकला अपघात झाला त्यावेळी तो ट्रक हा 09 वर्ष जुना झाला होता आणि म्हणून नुकसान भरपाईचा विचार करता घसा-याचा सुध्दा विचार होणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने बरेचदा विनंती करुनही विमाकृत ट्रक वरील ड्रॉयव्हर आणि क्लिनर बद्दलचे कागदपत्रे दाखल केले नाहीत. पोलीस दस्तऐवजा वरुन स्पष्ट दिसून येते की, अपघाताचे वेळी सदर विमाकृत ट्रक हा गुलाब चैतराम कळवे हाच चालवित होता परंतु तक्रारकर्त्याने दावा मंजूर होण्यासाठी असे खोटे विधान केले आहे की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रक हा नवकिशोर प्रधान चालवित होता.
विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, गुलाब कळवे याचे जवळ वैध ट्रक चालक परवाना नव्हता आणि त्याच्या चुकीमुळे ट्रकला अपघात झाला. विरुध्दपक्षाने हे सुध्दा नाकबुल केले की, क्षतीग्रस्त विमाकृत ट्रकचा दुरुस्तीचा खर्च रुपये-2,55,557/- आला. तक्रारकर्त्याने मागणी करुनही आवश्यक दस्तऐवज दाखल केले नाहीत म्हणून त्याचा विमा दावा बंद करण्यात आला. विमा सर्व्हेअरने केलेल्या नुकसानीचे निर्धारण बरोबर असून ज्याअर्थी अपघाताचे वेळी विमाकृत ट्रक हा चालक परवाना नसलेल्या व्यक्तीने चालविला व अपघात केला म्हणून विरुध्दपक्ष विमा कंपनी कुठलीही रक्कम देणे लागत नाही. या सर्व कारणावरुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच तक्रारकर्त्याचे अधिवक्ता श्री वकील यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा बंद एकाच कारणास्तव केला की, तक्रारकर्त्याने विमाकृत ट्रकच्या अपघाताचे वेळी ट्रक चालवित असलेला इसम गुलाब चैतराम कळवे याचा वाहन चालक परवाना सादर केला नाही. या मुद्दावर दोन्ही पक्षां कडून विपरीत वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार तो विमाकृत ट्रक अपघाताचे वेळी नवकिशोर प्रधान चालवित होता तर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या नुसार तो विमाकृत ट्रक अपघाताचे वेळी गुलाब चैतराम कळवे चालवित होता आणि त्यावेळी त्याचे जवळ वैध चालक परवाना नव्हता. हा एकच मुद्दा दोन्ही पक्षां मध्ये वादातीत आहे.
06. त्या शिवाय विमाकृत ट्रकला झालेल्या नुकसानी बद्दलच्या रकमे बद्दल दोन्ही पक्षांमध्ये वाद आहे परंतु नुकसानीच्या रकमेचा तेंव्हाच विचार करण्यात येईल जर हे सिध्द झाले की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रक हा नवकिशोर प्रधान चालवित होता. विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या लेखी उत्तरा सोबत एकही दस्तऐवज दाखल केलेला नाही, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावर ते आपली भिस्त ठेवत आहे. अपघात झाल्या नंतर पोलीसानीं एफ.आय.आर. नोंदवून गुन्हा दाखल केला. एफ.आय.आर.च्या प्रतीचे जर अवलोकन केले तर असे दिसून येते की, गुन्हा गुलाब चैतराम कळवे याचे विरुध्द दाखल करण्यात आलेला आहे. एफ.आय.आर. मध्ये असे लिहिलेले आहे की, चालक गुलाब कळवे हा ट्रक क्रमांक-C.G-04/A-9082 निष्काळजीपणे व बेदकारपणे चालवित असताना एका ट्रेलरला त्याने धडक दिली. त्या अपघाता मध्ये गुलाब चैतराम कळवे हा जख्मी झाला आणि विमाकृत ट्रकचे पण नुकसान झाले. घटनास्थळ पंचनाम्या मध्ये सुध्दा असे नमुद आहे की, गुलाब चैतराम कळवे तो ट्रक चालवित होता. परंतु तक्रारकर्त्याने जो वाहन चालक परवाना दाखल केला आहे तो नवकिशोर प्रधानचा आहे. तक्रारकर्त्याने दिनांक-09/10/2010 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीला पत्र पाठवून कळविले की, त्यावेळी विमाकृत ट्रक नवकिशोर प्रधान चालविता होता आणि गुलाब चैतराम कळवे हा क्लिनर होता आणि अपघाता नंतर चालक नवकिशोर प्रधान हा घटनास्थळावरुन पळून गेला होता.
07. वरील वस्तुस्थिती वरुन आमच्या पुढे असा प्रश्न उपस्थित होतो की, घटनेच्या वेळी तो ट्रक कोण व्यक्ती चालवित होता. पोलीस दस्तऐवजा वरुन असे दिसून येते की, अपघाताचे वेळी तो विमाकृत ट्रक गुलाब चैतराम कळवे चालविता होता आणि त्याचे विरुध्द पोलीसानीं गुन्हा नोंदविलेला आहे, त्यामुळे सकृतदर्शनी पाहता विमाकृत ट्रक त्यावेळी गुलाब चैतराम कळवे हा चालवित होता आणि म्हणून तक्रारकर्त्याचे म्हणणे की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रक नवकिशोर प्रधान चालवित होता यामध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही.
08. तक्रारकर्त्याने असे कुठलेही दस्तऐवज किंवा पुरावा दाखल केला नाही, ज्यावरुन हे दाखविता येईल की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रक नवकिशोर प्रधान चालवित होता. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला गुलाब चैतराम कळवे याचा वाहन चालक परवाना मागितला होता, जेणे करुन विमा दाव्यावर योग्य ती कारवाई करता आली असती परंतु तक्रारकर्त्याने गुलाब चैतराम कळवेचा वाहन चालक परवाना कधीच दाखल केला नाही. याचाच अर्थ असा होतो की, गुलाब चैतराम कळवे जवळ वाहन चालक परवाना नव्हता आणि तरी देखील त्याने तो ट्रक चालविला व अपघात घेता, त्यामुळे विमा पॉलिसीचे शर्तीचा भंग झाला. तक्रारकर्त्याने असा कुठेही आरोप केला नाही की, पोलीसानीं चुकीने गुलाब चैतराम कळवे याला अपघातग्रस्त ट्रकचा चालक म्हणून आरोपी बनविले, त्यामुळे पोलीस दस्तऐवजाच्या विपरीत कुठलाही पुरावा नसल्याने त्याला र्दुलक्षीत करता येणार नाही.
09. वरील कारणास्तव मंचाचे असे मत आहे की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने मागणी करुनही आवश्यक ते दस्तऐवज तक्रारकर्त्याने पुरविले नसल्याचे कारणावरुन विमा दावा फाईल बंद करुन कुठलीही चुक किंवा सेवेत कमतरता केलेली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री पृथ्वीराज जुठाराम मालीवाल यांची, विरुध्दपक्ष युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्यवस्थापक, शाखा शंकरनगर चौक, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.