(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे पती राजेंद्र गलधर यांचा मृत्यू दिनांक 18/10/2009 रोजी ते मोटार सायकलवरु जात असताना अपघातामुळे झाला. तक्रारदाराचे पती मयत राजेंद्र गलधर हे अपघात विमा योजनेचे लाभधारक होते. दिनांक 18/10/2009 रोजी रात्री 10:30 वाजता औरंगाबाद – पैठण रोडवर अनिल पटेल पेट्रोल पंपाजवळून राजेंद्र गलधर हे त्यांच्या मोटार सायकलवरुन जात असताना समोरुन येणा-या एका ट्रकने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक चालवित त्यांना धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होती की, तक्रारदाराचे पती राजेंद्र यांना इतक्या गंभीर जखमा झाल्या की ते जागेवरच मरण पावले. त्यानंतर पोलीस स्टेशन पैठण येथे गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळ पंचनामा,एफआयआर,पीएम करण्यात आले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार मोटार सायकल चालवित असताना मयत राजेंद्र यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स होते. परंतु अपघातस्थळी ते हरवले. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे क्लेम दाखल केला. परंतु गैरअर्जदारानी विम्याची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून विम्याची रक्कम रु 1,00,000/- , 10,000/- नुकसान भरपाई व मोटार सायकल दुरुस्तीचा खर्च रु 26,000/- मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व इतर कागदपत्रे दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मयत राजेंद्र हे अपघाताच्या वेळेस मोटार सायकल चालवित होते परंतु त्यांच्या जवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आला आहे व तो बरोबर आहे. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार मयत राजेंद्र हे मोटार सायकल चालविता असताना त्यांच्या पाठीमागे दोन लोकांना घेऊन गाडी चालवित होते. वास्तविक पाहता,मोटार सायकलवर एक पिलीयन रायडर असावयास हवा. याकारणावरुन सुध्दा तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी. तक्रारदार हे मोटार सायकलचे रु 26,000/-चे नुकसान झाले असे म्हणतात परंतु त्यासाठी कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराचा हा क्लेम पॉलिसीच्या कक्षेत येऊ शकत नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार अमान्य करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी मंचाने केली. तक्रारदाराचे पती हे मोटार सायकलवरुन जात असताना ट्रकने त्यांना धडक दिल्यामुळे अपघाताने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळेस ते मोटार सायकल चालवित होते परंतु त्यांच्या जवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता म्हणून गैरअर्जदाराने त्यांचा क्लेम नामंजूर केलेला आहे. परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार मयत राजेंद्र हे गाडी चालवित असताना समोरुन येणा-या ट्रकने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने मयत राजेंद्र यांना धडक दिली व जागीच त्यांचा मृत्यू झाला्. तक्रारदार हे तकारीमध्ये सुध्दा असे म्हणतात की, त्यावेळेस त्यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स होते परंतु अपघातस्थळी ते हरवले. त्यामुळे ते लायसन्स त्यांना आता उपलब्ध होत नाही. तक्रारदाराचे मयत पती राजेद्र हे त्यांचे वाहन निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालवित होते असेही नाही. ते गाडी चालवित असताना समोरुन ट्रकने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने त्यांना धडक दिली व त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये मयत राजेंद्र यांची चूक नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे मयत राजेंद्र हे जागेवरच मरण पावले. अपघातस्थळी तक्रारदाराचे पती मयत राजेंद्र यांचेजवळील वाहन चालविण्याचा वैध परवाना पडून गेला. तक्रारदाराने तक्रार क्रमांक 216/2010 ही तक्रार गैरअर्जदाराविरुध्द त्यांच्या गाडीचे नुकसान भरपाईसाठी मंचात दाखल केली आहे. त्यामध्ये गेरअर्जदारा लेखी जवाबात असे नमूद करतात की, तक्रारदारानी त्यांच्याकडे जे लायसन्स दिसते ते LMV (NT) असे होते. त्यामुळे ते मोटार सायकल चालवू शकत नाहीत. LMV (NT) म्हणजे Light Motor Vehicle (non Transport). याचाच अर्थ मयत विमाधारकाजवळ लायसन्स होते परंतू योग्य नव्हते. मोटार व्हेईकल अक्टनुसार, व्यक्ती जे वाहन चाविते त्याचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते. तक्रारदार मोटार सायकल चालवित होते परंतु त्यांच्याजवळ LMV(NT) हया प्रकारातील ड्रायव्हिंग लायसन्स होते म्हणजेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. गैरअर्जदारानी योग्य त्या कारणावरुन क्लेम नामंजूर केला असे मंचाचे मत आहे म्हणूनच तक्रार नामंजूर करण्यात येते. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |