आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष 1 ने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती सुनिता हिचे पती सुरेश ईसराम कटरे हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा कन्हारटोला, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 280 ही शेतजमीन होती.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा व्यवसाय करीत असून महाराष्ट्र शासनाने सदर कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 अंतर्गत शेतक-यांचा विमा काढला होता. विरूध्द पक्ष क्रमांक 2 तालुका कृषि अधिकारी, सडक अर्जुनी हे शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांच्यामार्फत सडक अर्जुनी तालुक्यातील अपघातग्रस्त शेतक-यांचे दावे विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे मंजुरीसाठी सादर करावयाचे होते.
4. तक्रारकर्तीचे पती सुरेश ईसराम कटरे दिनांक 01/08/2010 रोजी मित्रासोबत मोटरसायकलवर मागे बसून जात असता चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात होऊन जागीच मरण पावले. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबाबत विमा दावा दिनांक14/10/2014 रोजी सादर केला आणि त्यांनी मागणी केलेल्या आवश्यक दस्तावेजांची पूर्तता केली. परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 कडून सदर विमा दाव्याच्या मंजुरीबाबत आजपर्यंत काहीच कळविण्यात आले नाही. म्हणून सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- दिनांक 14/10/2014 पासून द. सा. द. शे. 12% व्याजासह मिळावी.
2. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू. 30,000/- आणि तक्रार खर्च रू. 15,000/- मिळावा.
5. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे सादर केलेला दावा, 7/12 चा उतारा, गांव नमुना 8-अ उतारा, फेरफार पत्रक, घटनास्थळ पंचनामा व इतर पोलीस दस्तावेज, पोस्ट-मार्टेम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, वयाचा दाखला इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
6. विरूध्द पक्ष क्रमांक 1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीचे पती सुरेश ईसराम कटरे हे शेतकरी होते व त्यांच्या मालकीची तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मौजा कन्हारटोला येथे शेतजमीन होती हे नाकबूल केले आहे. तसेच सुरेश कटरे शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 अंतर्गत विमित शेतकरी असल्याचे नाकबूल केले आहे. तक्रारकर्तीचे पती दिनांक 01/08/2010 रोजी मित्रासोबत मोटरसायकलवर मागे बसून जात असता चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात होऊन जागीच मरण पावल्याचे देखील नाकबूल केले आहे.
त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्तीने विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे विमा लाभ मिळण्यासाठी विहित मुदतीत विमा प्रस्ताव व आवश्यक दस्तावेज विरूध्द पक्षाला सादर केले नाही. तसेच मृतकाच्या सर्व वारसांना तक्रारीत जोडले नसल्याने Non Joinder of necessary parties च्या तत्वाने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तिच्या पतीचा मृत्यु वाहन अपघातात झाला असून सदर अपघाताचा शेती व्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 01/08/2010 रोजी वाहन अपघाताने झाला असल्याने प्रकरणाच्या छाननीसाठी पोलीस चौकशीचे पूर्ण दस्तावेज आवश्यक असतांना तक्रारकर्तीने ते सादर न करता वस्तुस्थिती लपवून ठेवल्याचे म्हटले आहे.
त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारीमध्ये विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना विमा कंपनी संबोधले आहे. वास्तवात विरूध्द पक्ष क्रमांक 2 विमा कंपनीचे कार्यालय नाही. तसेच विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे दिनांक 14/10/2014 रोजी विमा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले आहे, परंतु तक्रारीत विरूध्द पक्ष क्रमांक 3 म्हणून कोणाचेही नांव नाही. संपूर्ण तक्रार खोटी आणि बनावट आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे पुढे म्हणणे असे की, दिनांक 01/08/2010 रोजी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यापासून तक्रार दोन वर्षाचे आंत दाखल करावयास पाहिजे होती. परंतु वरील मुदतीत कारवाई न करता दिनांक 14/02/2014 रोजी विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे पाठविला आणि दिनांक 22/07/2015 रोजी म्हणजे पतीच्या मृत्युनंतर 5 वर्षांनी सदरची तक्रार दाखल केली असल्याने ती मुदतबाह्य आहे. तक्रारकर्तीने स्वतः मुदतीचे आंत विमा प्रस्ताव सादर केला नाही आणि मुदतीचे आंत तक्रार दाखल केली नाही यांस सर्वस्वी तिचाच दोष असून त्यासाठी विरूध्द पक्ष यांची सेवेतील न्यूनता कारणीभूत नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारीच्या निर्णयासाठी उभय पक्षांचा दस्तावेज व तोंडी पुरावा आवश्यक असून त्यासाठी उभय पक्षांची उलटतपासणी घेणे आवश्यक आहे. सदरची प्रक्रिया संक्षिप्त स्वरूपात चालणा-या मंचासमोरील कार्यवाहीत पार पाडता येत नाही. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर न चालविता दिवाणी न्यायालयात चालविणे आवश्यक आहे. वरील कारणांमुळे तक्रार खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने केली आहे.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 2 तालुका कृषि अधिकारी, सडक अर्जुनी यांनी आपल्या लेखी जबाबात नमूद केले आहे की, तक्रारकर्ती सुनिता सुरेश कटरे, रा. सालईटोला यांचेकडून विमा प्रस्ताव दिनांक 04/02/2015 रोजी प्राप्त झाला तो दिनांक 06/02/2015 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांचेकडे पाठविण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करणेकरिता विमा कंपनीकडून आलेले पत्र तक्रारकर्तीस दिनांक 27/04/2015 रोजी देण्यात आले होते. परंतु तिचेकडून पूर्ततेसंबंधाने कागदपत्र आले नाही. पुन्हा दिनांक 11/06/2015 रोजी पूर्ततेसंबंधाने पत्र देण्यात आले. त्याची कोणतीही पूर्तता तक्रारकर्तीने केलेली नाही. तक्रारकर्तीने सादर केलेले कागदपत्र वेळेत वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आले असल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडून सेवेत कोणताही त्रुटीपूर्ण व्यवहार घडला नसल्याने त्यांच्या विरूध्दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
8. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रार मुदतीत आहे काय? | नाही |
2. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | निष्कर्ष नोंदविण्याची आवश्यकता नाही. |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | नाही |
4. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीचे पती सुरेश कटरे यांच्या मालकीची मौजा कन्हारटोली, ता. सडक अर्जुनी येथे भूमापन क्रमांक 208, क्षेत्रफळ 0.59 हेक्टर ही शेतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा आणि गांव नमुना आठ (अ) दस्त क्रमांक 2 व 3 वर दाखल केला आहे. सुरेश कटरे यांचा अपघाती मृत्यु दिनांक 01/08/2010 रोजी झालेला आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनामा दस्त क्रमांक 5 मध्ये "सदर अपघाताचे वेळी मोटरसायकल सुझुकी क्रमांक MH-35/E-5888 वरून मोटरसायकलस्वार इतर दोन इसमांसोबत गोरेगांव कडून कोहमारा कडे जात असता अज्ञात चारचाकी वाहनचालकाने ठोस मारून एक इसमाचे मरणास व दोन इसमास गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाल्याचे वाटते" असे नमूद आहे. तसेच मोटरसायकलचा समोरील टायर रिंग, शॉक अप, हेडलाईट, हॅन्डल, मडगार्ड पूर्णपणे तुटफूट झालेला असून गाडी डाव्या कडेवर पडली असून वरच्या बाजूला हॅन्डलजवळ एक इसम अपघाताने गंभीर जखमी होऊन मरण पावलेला आहे. त्याचा वेगळा इन्क्वेस्ट पंचनामा तयार केला जातो असे नमूद आहे.
तक्रारीमध्ये तसेच घटनास्थळ पंचनाम्यात अपघाताचे वेळी मोटरसायकल कोण चालवित होता याचा उल्लेख नाही व त्यासंबंधी प्रथम खबरी अहवालाची प्रत देखील दाखल केली नाही. पंचनाम्यातील वरील वस्तुस्थितीवरून मोटरसायकलला चारचाकी वाहनाने समोरून ठोस दिल्याने मोटरसायकलचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला आणि मोटरसायकल चालविणारा इसम सदर अपघातात कपाळाला झालेल्या व इतर जखमांमुळे मरण पावला असे सकृतदर्शनी दिसून येते. दस्त क्रमांक 6 वर अपघातातील मृतक सुरेश ईसराम कटरे याचा शव विच्छेदन अहवाल दाखल केला असून मृत्युचे कारण “Head Injury & hemorrhagic shock” असे नमूद आहे.
शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 च्या मार्गदर्शक सूचनांची प्रत तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांनी दाखल केली आहे. त्याप्रमाणे "जर शेतक-याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील" असे नमूद आहे. परंतु सदर प्रकरणात अपघाताचे वेळी वाहन चालविणा-या व्यक्तीचा वैध वाहन चालक परवाना दाखल केलेला नाही.
तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांनी दाखल केलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 च्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे विमा दावा दाखल करण्याबाबतचा कालावधी खालीलप्रमाणे निश्चित केलेला आहे.
4. 1) विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.
2) अखेरच्या दिवसातील अपघातांसाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसांपर्यंत विमा प्रस्ताव स्विकारावेत.
3) समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारावेत तथापि अपघाताचे सूचनापत्र विमा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत घेणे व त्यानुसार सविस्तर कार्यवाही करणे कंपनीस बंधनकारक राहील.
योजनेच्या वरील अटीप्रमाणे दिनांक 01/08/2010 रोजी अपघात झाल्यापासून 90 दिवसात म्हणजे दिनांक 30/10/2010 पर्यंत किंवा योजनेच्या शेवटच्या टप्प्यात अपघात घडल्याने योजनेचा कालावधी दिनांक 14/08/2010 रोजी संपल्यापासून 90 दिवसांत म्हणजे दिनांक 13/11/2010 पर्यंत विमा दावा विरूध्द पक्ष क्रमांक 2 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक होते. किंवा अपवादात्मक स्थितीत अपघाताची माहिती 90 दिवसांत विमा कंपनीला देऊन समर्थनीय कारणासह विमा दावा वाजवी कालावधीत मंजुरीसाठी सादर करावयास पाहिजे होता. मात्र सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीने अपघाताबाबत विरूध्द पक्षाला 90 दिवसांत कोणतीही माहिती दिली नाही आणि प्रथमतःच दिनांक 14/10/2014 रोजी म्हणजे अपघातानंतर 4 वर्षे, 2 महिने, 14 दिवसांनी विमा दावा रजिस्टर्ड पोष्टाने विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे मंजुरीसाठी पाठविला. त्यात देखील अपघाताचे वेळी अपघातग्रस्त मोटरसायकल कोण चालवित होता हे दर्शविणारे कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही आणि अपघातासंबंधी महत्वाची माहिती लपवून ठेवली आहे.
ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 24-अ(1) अन्वये तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आंत ग्राहक तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर तक्रार दाखल करावयाची असल्यास कलम 24-अ(2) नुसार तक्रार दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचे समर्थनीय कारण देऊन विलंब माफीचा अर्ज करणे आवश्यक आहे.
सदरच्या प्रकरणात दिनांक 01/08/2010 रोजी अपघात घडल्यानंतर तक्रारकर्तीने 4 वर्षे 2 महिनेपर्यंत अपघात दावा सादर केलेला नाही. तक्रारकर्तीचे असे म्हणणे नाही की, तिने योजनेप्रमाणे निश्चित केलेल्या मुदतीत विमा दावा मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांसह सादर केला. मात्र त्यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही न करता प्रलंबित ठेवला.
तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. उदय क्षीरसागर यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्तीने दिनांक 14/10/2014 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे विमा दावा सादर केला. तो विरूध्द पक्षाने मंजूर किंवा नामंजूर केला नाही म्हणून तक्रारीस कारण सतत घडत असल्याने तक्रार मुदतीत आहे. तक्रारकर्तीने योजनेप्रमाणे ठरविलेल्या मुदतीत विरूध्द पक्षाकडे विमा दावा दाखल केलेला नाही आणि विरूध्द पक्षाने तो अनिर्णित ठेवलेला नाही. म्हणून अपघात झाल्यानंतर 4 वर्षे 2 महिने 14 दिवसांनी तक्रारकर्तीने दाखल केलेला विमा दावा मूळ योजनेच्या तरतुदी विरूध्द आहे. म्हणून त्याद्वारे तक्रारीस कारण सतत घडत आहे किंवा नव्याने निर्माण झाले म्हणून तक्रार मुदतीत आहे हा तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद स्विकारता येत नाही. वरील कारणांमुळे दिनांक 01/08/2010 रोजीच्या अपघाताबाबत दिनांक 14/10/2014 रोजी दाखल केलेला विमा दावा आणि विलंब माफीच्या अर्जाशिवाय त्यासंबंधाने दिनांक 22/07/2015 रोजी म्हणजे अपघातापासून 4 वर्षे 11 महिने 22 दिवसांनी दाखल केलेली तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 24-अ(1) प्रमाणे मुदतबाह्य असल्याने मंचाला सदर तक्रारीची दखल घेण्याची व ती चालविण्याची अधिकारकक्षा नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे सदरची तक्रार मुदतबाह्य असल्याने मंचाला ती चालविण्याची व त्यावर निर्णय देण्याची अधिकारकक्षा नसल्याने मुद्दा क्रमांक 2 वर निष्कर्ष नोंदविण्याची आवश्यकता नाही.
11. मुद्दा क्रमांक 3 व 4 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे सदरची तक्रार मुदतबाह्य असल्याने खारीज होण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 3 व 4 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.