निकालपत्र
निकाल दिनांक – २७/०२/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
१. तक्रारदार यांची संगमनेर येथे नोंदणीकृत भागीदारी संस्था असुन त्याचा रजि.नं.एम.पी.ए.५८८९४ असा आहे. तक्रारदार यांचा अपारंपारीक ऊर्जा स्त्रोताचा वापर करून त्याची विक्री करण्याचे उद्देशाने केलेला व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी मौजे सेरावा, तालुका व जिल्हा अैसलमेर, राज्य राजस्थान येथील स.नं.४४६ पैकी क्षेत्राचा पवन ऊर्जाचा वापर करून वीज निर्मीती करण्यासाठी पवनचक्कीची उभारणी केलेली आहे. त्याचा विंडमिल नं. एस.के.डी. १८७ असा आहे. सामनेवाले कंपनीने तक्रारदार यांच्या विंडमिलच्या वीज वाहक तारांचा विमा उतरविला होता. सदरहु विम्याचा कालावधी दिनांक ०१-०४-२०१३ ते ३१-०३-२०१४ असा होता व त्याला पॉलिसी क्रमांक १६२५०२/४६/१३/०४/००००००१६ असा आहे. या पॉलिसीद्वारे सामनेवाले कंपनीकडे विंडमिलच्या वीज वाहक तारांचा दोन कोटींचा विमा उतरविला होता, त्याचा प्रिमीयम रक्कम रूपये ३,३७१/- असा होता. सदरचे विम्यानुसार विज वाहक वायरच्या चोरीचे संरक्षण दिलेले होते. विमा कालावधी चालु असतांना मौजे सेराव ता.जि. जैसलमेर राजस्थान राज्य येथील सं.नं. ४४६/प मध्ये असलेल्या विंडमिल नं. एस.के.डी.१८७ मधील ट्रान्सफॉर्मरच्या डाव्या बाजुस असलेल्या तांब्याच्या २१ वीज वाहक वायर ज्याची लांबी प्रत्येकी १४ मीटर अशी आहे. ती वायर या जागेवरून कापुन त्याची चोरी झाल्याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी दिनांक ३०-०७-२०१३ रोजी संबधीत पोलीस स्टेशनला सदरची तक्रार नोंदविली व विमा कंपनीलासुध्दा लेखी स्वरूपात कळविण्यात आले. त्यानंतर संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले कंपनीकडे तक्रारदार यांनी त्यांचा विमा दावा सादर केला. त्याप्रमाणे सामनेवाले यांचे जोधपुर येथील कमलेश बारमेरा यांची सर्व्हेअर म्हणुन नेमणूक करण्यात आली व त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तक्रारदाराचे रक्कम रूपये ७,५७,२१५/- ची नुकसान झाले असुन त्यापोटी तक्रारदाराला तक्रारदारास रूपये १,३१,०४६/- एवढी नुकसान भरपाई देणे योग्य राहील, असा अहवाल सामनेवाले कंपनीचे सर्व्हेअरने दिनांक ०९-०३-२०१४ रोजी दिला. तक्रारदाराने पुढे कथन केले की, सामनेवाले कंपनीने सदर रिपोर्टची दखल घेतली नाही. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक ०६-०४-२०१६ रोजी कंपनीकडे पत्र पाठवुन नुकसान भरपाईबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे कळविले. परंतु सामनेवाले कंपनीने दिनांक ०३-०८-२०१६ रोजी पत्र पाठवुन केवळ रक्कम रूपये ६,२५२/- मंजुर केले व त्या रकमेचा चेक दिनांक ०५-१२-२०१६ रोजी तक्रारदाराला पाठविला. परंतु तक्रारदाराने तो न स्विकारता सामनेवालेला परत पाठविला. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराला चुकीच्या कारणाने विमा दावा नाकारला व सेवेत त्रुटी दिली. सामनेवालेने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक ७ प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवाले विमा कंपनीने त्यांचे म्हणणे निशाणी ११ वर दाखल केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदाराचे विंड मिलच्या वीज वाहक तारांचा विमा उतरविला होता, ही बाब मान्य केलेली आहे व पुढे कथन केले की, सामनेवाले यांनी श्री.विजय गौर, जोधपुर यांना इन्व्हेस्टीगेटर म्हणुन नेमले व त्यापुर्वी सर्व्हेअर कमलेश बारमेरा यांनी दिलेल्या अहवालाची तपासणी करून रिपोर्ट देण्यास सांगितले. श्री.बारमेरा यांनी दिलेल्या अहवालामध्ये रक्कम रूपये १,३१,०४६/- असे नुकसान झालेले दर्शविले. परंतु पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार ही तपासणी अहवालामध्ये नमुद केलेली रक्कम योग्य नाही, म्हणुन त्यांनी इन्व्हेस्टीगेटरने दिलेला रिपोर्टच्यानुसार असा बचाव घेतला की, पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये सामान्य अट क्रमांक ६ नुसार अहवालात नमुद केलेली रक्कम योग्य नाही व तक्रारदार हे केवळ रक्कम रूपये ६,२५१/- एवढी रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. त्यामुळे तक्रारदाराला सामनेवाले यांनी रक्कम रूपये ६,२५१/- चा धनादेश पाठविला होता. परंतु तक्रारदाराने तो स्विकारलेला नाही. तसेच तक्रारदाराने अ-समरी अहवाल सादर न केल्यामुळे दावा रकमेमधुन २५ % रक्कम कपात करून रक्कम रूपये ४,६८८/- देय असल्याचे लेखी कैफीयतीमध्ये कथन केले आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी दिली नाही. सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.
३. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व त्यांचे वकील श्री.एस.जी. वैद्य यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यांचे वकील श्रीमती सुजाता गुंदेचा यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांची भागीदारी संस्था आहे. ती अपारंपारीक ऊर्जा स्त्रोताचा वापर करून त्याची विक्री करीता मौजे सेरावा, तालुका व जिल्हा अैसलमेर, राज्य राजस्थान येथील स.नं.४४६ पैकी क्षेत्राचा पवन ऊर्जाचा वापर करून वीज निर्मीती करण्यासाठी पवनचक्कीची उभारणी केलेली आहे. त्याचा विंडमिल नं. एस.के.डी. १८७ असा आहे. सामनेवाले कंपनीने तक्रारदार यांच्या विंडमिलच्या विज वाहक तारेचा विमा (Burlgary And House Breaking Policy) उतरविला होता. सदरहु विम्याचा कालावधी दिनांक ०१-०४-२०१३ ते ३१-०३-२०१४ असा होता. सदर पॉलिसीचा क्रमांक १६२५०२/४६/१३/०४/००००००१६ होता. याबाबत तक्रारदाराने पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे. सदर पॉलिसीद्वारे सामनेवाले कंपनीकडे विंडमिलचे वीज वाहक तारांचा दोन कोटी रकमेचा विमा उतरविला होता, त्याची प्रिमीयमची रक्कम रूपये ३,३७१/- अशी होती. तक्रारदाराने त्याची रक्कम सामनेवाले यांच्याकडे भरली व त्याबाबत पॉलिसीची प्रत प्रकरणात दाखल केलेली आहे. तसेच सदरहु विंडमिलच्या वीज वाहक तारेचा विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. यावरून स्पष्ट होते की, तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) : तक्रारदार यांनी त्यांच्या विंड मिलच्या वीज वाहक तारेचा विमा उतरविल्यानंतर विमा कालावधीत दिनांक २७-०६-२०१३ रोजी मौजे सेराव ता.जि. जैसलमेर राजस्थान राज्य येथील सं.नं. ४४६/प मध्ये असलेल्या विंडमिल नं. एस.के.डी.१८७ मधील ट्रान्सफॉर्मरच्या डाव्या बाजुस असलेल्या तांब्याच्या २१ वीज वाहक तार ज्याची लांबी प्रत्येकी १४ मीटर आहे त्या तारांची चोरी झाली. या घटनेबाबतची खबर पोलीस स्टेशनला व सामनेवाले कंपनीला तक्रारदार यांनी दिली आहे, असे कथन केले. सदरहु विंडमिलच्या तांब्याच्या तारांची चोरी झाली हे सामनेवाले यांना कळविण्यात आले व संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले कंपनीकडे तक्रारदार यांनी त्यांचा विमा दावा सादर केला. त्याप्रमाणे सामनेवाले यांचे जोधपुर येथील कमलेश बारमेरा यांची सर्व्हेअर म्हणुन नेमणूक करण्यात आली व त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तक्रारदाराचे रक्कम रूपये ७,५७,२१५/- ची नुकसान झाले असुन त्यापोटी विमा पॉलिसीप्रमाणे तक्रारदाराला रूपये १,३१,०४६/- देता येईल, असे अहवालात नमुद होते. सदरचा अहवाल हा दिनांक ०९-०३-२०१४ रोजी दिलेला आहे. तक्रारदाराचे या कथनाला सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कथनात असा बचाव घेतला की, सर्व्हेअरने दिलेला अहवाल योग्यप्रकारे गणना (Calculate) करून दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी श्री.विजय गौर, जोधपुर यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणुन नेमणुक केली होती. सदरच्या अहवालानुसार सर्व्हेअरने दिलेली रक्कम ही योग्य नाही, तर पॉलिसीची सामान्य अट क्रमांक ६ नुसार त्याचे अॅव्हरेज काढुन तक्रारदाराला रक्कम रूपये ६,२५२/- एवढी देता येणार, असे कथन केले. याठिकाणी विमा पॉलीसीमधील सामान्य अट क्रमांक ६ नमुद संदर्भांकीत करण्यात येते.
6. AVERAGE: If the property insured shall at the time of any loss or damage be collectively of greater value than the sum insured thereon, then the Insured shall be considered as being his own insurer for the difference, and shall bear a rateable proportion of the loss or damage accordingly. Even item, if more than one, in the Policy, shall be separately subject to condition.
विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता ती केवळ Wire and Cable याकरीता रक्कम रूपये २ कोटी रकमेकरिता विमा पॉलिसी उतरविण्यात आली आहे. सामनेवालेचे Investigator यांनी रक्कम रूपये ६,२५२/- गणणा करीत असतांना तक्रारदाराच्या चारही विंड मिलचे एकुण मुल्य रक्कम रूपये ४१,९१,९२,५६८/- याचा आधार घेऊन गणणा केलेली आहे. तक्रारदाराने केवळ वीज वाहक तारा व केबल यांचाच विमा उतरविला होता. त्यामुळे चारही विंडमिलचे एकुण मुल्य सामान्य अट क्रमांक ६ प्रमाणे गणणा करण्याकरिता आधार घेणे, हे चुकीचे आहे. सदरहु गणणेचा सामनेवाले यांनी कोणताही आधारभुत पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे इन्व्हेस्टीगेटर विजय गौर यांनी केलेली गणणा हि चुकीची आहे, असे मंचाचे मत आहे.
विमा पॉलिसीची सामान्य अट क्रमांक ६ मध्ये इन्श्युअर्ड मालमत्ता ही नुकसानीच्या वेळेस विमा रकमेपेक्षा जास्त मुल्याची असल्यास अट क्रमांक ६ चा वापर सामनेवाला करू शकतो. परंतु सदरहु प्रकरणात विमा पॉलिसीनुसार केवळ तार व केबल यांचा विमा उतरविण्यात आलेला असल्यामुळे व त्यांचे एकुण मुल्य कुठेही नमुद नसल्यामुळे सदरहु मालमत्ता ही विमा पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त मुल्याची होती, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सदरहु प्रकरणात सामनेवाले यांनी आधार घेतलेल्या विमा पॉलिसीची अट क्रमांक ६ लागु पडत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टीगेटर विजय गौर यांनी नुकसानीबाबत केलेली गणणा ही चुकीच्या आधारावर केल्यामुळे ती विचारात घेण्यासारखे नाही.
सामनेवाले यांनी विंड मिलचे वीज वाहक तारा केवळ चोरी झाल्यानंतर सर्व्हेअर श्री. बारमेरा यांची नियुक्ती केली. त्यांनी नुकसानीचे अवलोकन करून तक्रारदाराला रक्कम रूपये १,३१,०४६/- एवढा विमा दावा देय असल्याचे अहवालात नमुद केले. परंतु विमा दाव्याची सदरहु रक्कम न देता पुन्हा विजय गौर यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणुन नेमणुक केली. सर्व्हेअर बारमेरा यांचा अहवाल नुकसानीबाबत का विचारात घेण्यात आला नाही, याचे कोणतेही योग्य स्पष्टीकरण दिले नाही. सामनेवाले यांनी कमलेश बारमेरा यांचे शपथपत्र नि. १४ नुसार प्रकरणात दाखल केले आहे. सदरहु शपथपत्राचे अवलोकन केले असता सर्व्हेअर बारमेरा यांनी तक्रारदाराला प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची तपासणी करून दिनांक ०९-०३-२०१४ रोजी अहवाल दाखल केला. सदरहु शपथपत्रातुनच बारमेरा यांनी देखील विमा पॉलिसीतील सामान्य अट क्रमांक ६ मधील अॅव्हरेज क्लॉज तपासण्यात यावा, असे अहवाल सादर करतांना नमुद केले होते, असे कथन केले आहे. परंतु सदरहु अहवाल प्रकरणात दाखल नाही. त्यामुळे बारमेरा यांनी केलेले कथन पुराव्याअभावी विचारात घेता येणार नाही. तसेच बारमेरा यांचे शपथपत्र विमा पॉलिसीतील सामान्य अट क्रमांक ६ वर आधारीत असुन त्याप्रमाणे अगोदर दिलेल्या सर्व्हे अहवालातील नुकसानीची रक्कम कमी करून ६,२५२/- एवढीच रक्कम तक्रारदाराला देय असल्याचे नमुद केले आहे. परंतु मंचाने यापुर्वीत सदरहु प्रकरणात विमा पॉलिसीमधील समान्य अट क्रमांक ६ ही लागु पडत नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे कमलेश बारमेरा यांचे शपथपत्र ग्राह्य धरता येणार नाही.
सामनेवाले यांना तक्रारदारालाझालेल्या नुकसानीबाबत अहवाल वेळीच प्राप्त झाला होता व त्यानुसार रक्कम रूपये १,३१,०४६/- एवढा विमा दावा रक्कम देय होती. परंतु सामनेवाले यांनी सदरहु विमा दावा रक्कम तक्रारदारालान देता पुन्हा आपलाच इन्व्हेस्टीगेटरची नेमणुक करून सर्व्हेअरने प्रत्यक्ष तपासणी करून नुकसानीबाबत दिलेल्या अहवालातील रक्कम विमा पॉलिसीतील अट क्रमांक ६ चा चुकीचा अर्थ लावुन विमा दाव्याची रक्कम कमी केली व तक्रारदाराला केवळ रक्कम रूपये ६,२५२/- स्विकारण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. तक्रारदाराने सदरहु नुकसान स्विकारण्यास नका दिल्याने त्याचे प्रकरण बंद केले. सामनेवालेची सदरची वृत्ती ही निश्चितीच सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारदाराला वीज वाहक तारा व केबलचोरी झाल्यामुळे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची विमा पॉलसीच्या आधारे काढण्यात आलेली रक्कम रूपये १,३१,०४६/- मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतो, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (४) : मुमुद्दा क्र.१ ते ३ च्या होकारार्थी निष्कर्षानुसार तक्रारदार हा रक्कम रूपये १,३१,०४६/- एवढी नुकसानीपोटी विमा दावा रक्कम व त्यावर ९ % दराने तक्रार दाखल दिनांकापासुन व्याज मिळण्यास पात्र ठरतो. सामनेवाले यांनी तक्रारदाराने वारंवार मागणी करूनही विमा दाव्याची योग्य रक्कम दिली नाही. उलट विमा पॉलीसीमधील अटीचा चुकीचा अर्थ लावुन कमी रकमेचा विमा दावा केला, सदरहु कारणामुळे तक्रारदाराला मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला व मंचात तक्रार दाखल करून आर्थिक खर्च सहन करावा लागला. त्यामुळे या नुकसानीपोटी काही रक्कम तक्रारदाराला देणे न्यायोचित ठरेल. सबब मुद्दा क्रमांक ४ च्या उत्तरार्थ खालीलप्रमाणे अंतीम आदेश देण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदाराला सर्व्हेअरच्या तपासणी अहवालानुसार रक्कम रूपये १,३१,०४६/- (अक्षरी एक लाख एकतीस हजार शेहचाळीस) व त्यावर दिनांक २४-०८-२०१७ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |